अमरत्वाचा शाप आणि भळभळणाऱ्या जखमेची वेदना घेऊन मानवी जीवनाच्या सुखासाठी याचना करणाऱ्या अश्वत्थाम्याची भेट घेण्यासाठी दिवाळीत महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश यांना व्यापून असलेल्या सातपुड्याच्या डोंगररांगांमधून लाखो आदिवासी बांधव एकत्र येतात.
श्रीकृष्णाने अश्वत्थाम्याच्या माथ्यावरील मणी काढून घेतल्यानंतर अश्वत्थामा आजही मानवी दुःखाचे प्रतीक म्हणून रक्तबंबाळ अवस्थेत सातपुड्यात भटकतोय. आपल्या जखमेवर पट्टी लावण्यासाठी तो आजही वीतभर कापडाची चिंधी आणि तेल मागतोय. अमरत्वाचा शाप आणि भळभळणाऱ्या जखमेची वेदना घेऊन मानवी जीवनाच्या सुखासाठी याचना करणाऱ्या या अश्वत्थाम्याची भेट घेण्यासाठी ऐन दिवाळीत महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना व्यापून असलेल्या सातपुड्याच्या डोंगररांगांमधून लाखो आदिवासी बांधव एकत्र येतात.
उत्तर भारतापासून दख्खनी महाराष्ट्राला अलगद बाजूला काढणाऱ्या अहिराणीच्या सातपुडा पर्वतरांगांत, ही अश्वत्थाम्याची आगळीवेगळी यात्रा पार पडते. अस्तंभा ऋषीची यात्रा असंही तिला म्हटलं जातं. अस्तंभा हे सातपुड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबारपासून गुजरात आणि मध्य प्रदेशातील लांबलांबच्या ठिकाणांहून लाखो आदिवासी दरवर्षी नेमाने यात्रेला येतात. वाद्यसंगीताचीही साथ असल्याने, त्याचा आनंद लुटत ते आपल्या परिक्रमेला निघतात. अस्तंभ्याला जाण्यासाठी साधी पायवाटही नसल्याने अगदी जीव मुठीत घेऊन पाय पुढे टाकावा लागतो. कधी उंच चढाव, तर कधी खोल दरी, असा हा खडतर रस्ता आहे. अर्थात याही परिस्थितीत लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने अश्वत्थाम्याच्या दर्शनाला येत असतात.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगावपासून तीस कि.मी.वरील असली या गावापासून पुढं चालत राहिलं की रस्त्यावर देराणी-जेठानी देवस्थान, तेथे काही काळ विश्रांती घेतल्यानंतर गोटामाळ, गोऱ्या माळ, मग सातघोळाचा चढ, त्यानंतर नकट्या देवाचं स्थान, मग जुना अस्तंभा... साधारणतः मध्यरात्रीनंतर हातात टेंभे अथवा टायर जाळून डोंगर चढायला सुरुवात होते. टोळी-टोळीने हातात टेंभे घेऊन डोंगरावर लोक जाताना डोंगरावर जणू तारकापुंज अवतरल्याचा भास होतो. जुन्या अस्तंभ्यात शिखरावर पोहोचल्यानंतर अश्वत्थाम्याचे प्रतीक असलेला दगड दिसतो. तेथे असलेल्या भीमकुंडापाशी पिंजर नि तांदूळ वाहून यात्रेची सांगता होते. हे भीमकुंड भीमानं तहान लागल्यामुळं गदा हाणून तयार केलेलं पाण्याचं महाभारतकालीन कुंड असल्याची आख्यायिका आहे. येथे दर्शन घेतल्यानंतर अश्वत्थामा पशुधन, आरोग्य व संपत्तीचे रक्षण करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे बहुतेक लोक आजही यात्रेला जाताना सोबत गाई-म्हशींचे दोर, बैलाच्या गळ्यातील कंठा घेऊन जातात. तर परतताना डोंगरावरील रोईच्याचे गवत आणतात. हे गवत घराच्या दरवाजावर लावल्यास रोगराई, दुःख, पीडा घरात येत नाही, अशी श्रद्धा. शिखराच्या दुसऱ्या बाजूनं उतरलं, तर मामा-भांजे नावाची अद्भुत जागा लागते. मग डुगडुग्या पत्थर पार केली की मोठ्ठी उतरण. मग देवनदी. मग चांदसैली, माकड टेकडी, कोठार! गच्च जंगलांनी, नद्या-ओढ्यांनी, डोंगर-दऱ्यांनी वेढलेला हा सगळा परिसर पार करताना यात्रेकरू ‘पत्थरवाले की जय’, ‘मामा भांजे की जय’ असा घोष करत असतात. अश्वत्थाम्याच्या प्रतीकासमोर मोठ्या श्रद्धेने लोक नारळ फोडतात, पूजाअर्चा करतात. काही काळ विश्रांती घेतात आणि परतीला लागतात. अस्तंभाच्या शिखरावरून सृष्टिसौंदर्याचे दर्शन घडते. तेथून दिसणारा सूर्योदय तसेच तापीचे विहंगम दृश्य डोळ्याचे पारणे फेडल्याशिवाय राहत नाही.
पण कोण हे अस्तंभा ऋषी? कोण हा पत्थरवाला? आणि कोण हे मामा-भांजे? ऐन दिवाळीत ही यात्रा तरी कसली? तिथले लोक असं सांगतात की, अस्तंभा ऋषी म्हणजेच कौरव नि पांडवांचे गुरू आणि एकलव्याकडे गुरुदक्षिणा म्हणून अंगठा मागणारे द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामा. आदिवासींशी त्याचे नाते वैऱ्याचे असावे, असा सर्वसाधारण समज असला तरी अश्वत्थाम्याच्या यात्रेला सर्वाधिक आदिवासी येतात. अश्वत्थामा हा कौरवांचा अखेरचा सेनापती. पत्थरवाला म्हणजेही तोच.
या वणवण करणाऱ्या अस्तंभ्याची पूजा करण्यासाठी पिढ्यान््पिढ्या सातपुड्याच्या परिघातले आदिवासी नित्यनेमानं येतात. धनत्रयोदशीपासून सातपुड्याच्या रांगा कुलपुरुष अस्तंभ्याच्या जयजयकारानं दुमदुमून जातात. कदाचित हा विरोधाभास वाटेल. पण हा विरोधाभास समजून घ्यायला हवा. या देशात गेल्या हजारो वर्षांपासून चाललेल्या संस्कृतिसंघर्षातून, समूह-वंशांच्या जीवघेण्या संग्रामातून हा विरोधाभास निर्माण झालाय. म्हणूनच आपण एकीकडे गणपतीपुढे वामन अवताराच्या आरत्या ओवाळतो, तर दिवाळीत त्याच वामनानं गाडलेल्या बळीराजाच्या नावानं नवं संवत्सर सुरू करून ‘इडापिडा टळो, बळीचं राज्य येवो,’ असं म्हणतो. श्रीरामाला देवत्व बहाल करताना, त्याने ठार केलेल्या वालीचं मोठेपण आपल्या बोलण्या-चालण्यात अजूनही रुतून राह्यलेलं असतं; त्याशिवाय का असहाय वाटल्यानंतर मराठी माणसं ‘कोणी वाली उरला नाही.’ असे उद््गार काढत असतात? आणि उत्तरेत रावणदहन चालू असताना दक्षिणेत रावणाची भक्ती केली जाते? ‘सटवाईचा फेरा’ असं म्हटलं जाताना कालपरवा जन्माला आलेल्या बाळाच्या उशाशी लेखणी ठेवून सटवी काय ललाटलेख लिहिते, याचं अप्रूपही आपल्याला वाटतं. हे असं होतं; कारण त्यामागं पिढ्यांच्या हारजीतीचा, आक्रमणांचा, वंशच्छेदांचा एक जिताजागता इतिहास असतो, आणि इतिहास नेहमी जेत्यांच्या नावानं लिहिला जातो. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, या न्यायानुसार सगळ्या बेरजा, सगळे गुण जेत्याच्या नावावर जमा करण्याचं, आणि सगळा उणेपणा, सगळे अवगुण हारलेल्याच्या माथी मारण्याचं तंत्रही सरसकट अवलंबलं जातं. मग आपल्या सुपीक जमिनीवर आक्रमण करणाऱ्यांशी भिडणाऱ्या बळीला पाताळात गाडलं जातं. राज्याच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या वालीचा शिरच्छेद केला जातो. साधना करणाऱ्या एकलव्याचा अंगठा मागितला जातो. जिंकलेल्यांना देव म्हटलं जातं, आणि हारलेल्यांना दानव म्हटलं जातं. गावगाड्यातले देव गावाच्या मध्यभागी मंदिरात स्थापले जातात आणि म्हसोबा, बिरोबाला गावाबाहेर पडावं लागतं. अश्वत्थामा त्याला कसा अपवाद असेल? कुलदेवता देवमोगरा देवीनंतर अस्तंभ्याला मानणाऱ्या आदिवासींसाठी तो खलपुरुष नाही, यात म्हणूनच नवल वाटण्यासारखं काही नाही. किंवा मामा-भांजे म्हणून ज्यांचा जयजयकार केला जातो, ते म्हणजे शकुनीमामा आणि कौरवही असू शकतील! शेवटी हा हारजीतीचाच तर खेळ आहे. आजच्या लढाईतही आपल्या नागरी, प्रगत संस्कृतीनं आदिवासींना कोपऱ्यातच तर ढकलून दिलेलं आहे. अन्नान्नदशेत त्यांना नेऊन सोडलं आहे. त्यांच्याच जमिनींवर आक्रमण करून त्यांना पाताळात गाडण्याचं तेवढं बाकी ठेवलं आहे... अश्वत्थामा हा अमरत्वाचा शाप लाभलेल्या सातांपैकी पहिला चिरंजीव, असं म्हणतात ते खरंच असावं. आणि तो सातपुड्यात भटकतो, हेही खरं असावं. त्याला शोधावं लागत नाही. सातपुड्यातल्या तळोदा, शहादा, अक्राणी, धडगाव, अक्कलकुव्यातल्या पाड्यापाड्यांवर तो असतो. बोटभर dचिंधीसाठी आणि कणभर अन्नासाठी शतकानुशतके मोताद झालेला, टीचभर पोटासाठी रानोमाळ वणवणणारा... हा अस्तंभा, अश्वत्थामा... अस्तित्वासाठी लढ्याची साधनंच हिरावून घेतली गेल्यानं फुटक्या कपाळानं वावरणारा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा