व्यक्ति परिचय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
व्यक्ति परिचय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १५ जून, २०१६

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्त्यांसाठी मनोगत आणि पुढील आंदोलनाची दिशा_

15 जून 2016.... ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे वयाची 78 वर्षे पूर्ण करून 79 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.... त्यानिमित्त त्यांनी व्यक्त केलेले मनोगत त्यांच्याच शब्दात...

*_कार्यकर्त्यांसाठी मनोगत आणि पुढील आंदोलनाची दिशा_*.........

15 जून 1938 साली शेतकरी कुटुंबात जन्म झाला. बाल वयात आईने संस्कार केले. आईच्या संस्कारांमुळे सामाजिक राष्ट्रीय दृष्टीकोन निर्माण झाला. स्वतःसाठी जीवन जगताना समाजाचे आपण काही देणे लागतो याची जाणीव निर्माण झाली.

            जीवनात एक प्रश्न सतत उभा राहिला की, प्रत्येक माणूस जन्माला येताना रिकाम्या हाताने येतो आणि जातानाही रिकाम्या हातनेच जातो. जन्माला येताना काहीच आणत नाहीत आणि जातानाही काहीच घेऊन जात नाही. मग तो माझं-माझं म्हणत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आयुष्यभर पळतो कशासाठी? अनेकांना प्रश्न विचारीत गेलो की, माणूस जगतो कशासाठी ? पण समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. त्यावेळी माझे वय होते 23 ते 24 वर्षांचे होते. मरण अटळ आहे, ते एक दिवस येणारच आहे. तर आजच मेलेलं काय वाईट?  म्हणून एक दिवस आत्महत्या करण्याच्या विचारावर आलो होतो. योगायोगाने दिल्लीच्या स्टेशनवर बुक स्टॉल वरील स्वामी विवेकानंद यांचे चित्र मनाला आकर्षक वाटले म्हणून एक छोटेसे पुस्तक विकत घेतले. ते पुस्तक वाचायला सुरूवात केल्यानंतर त्यातून जीवनाचा अर्थ हळुहळू कळत गेला.

            प्रत्येक माणूस जन्माला आल्यापासून मृत्युपर्यंत आनंदाच्या शोधात असतो. प्रत्येक माणसाला अखंड आनंद हवा आहे. मात्र असा अखंड आनंद तो जमीन, गाडी, माडी, हवेली अशा बाह्य वस्तुंमध्ये शोधत आहे. असा अखंड आनंद बाह्य वस्तुंपासून मिळत नसतो तर आपल्या आतूनच मिळत असतो. असा आनंद सेवेतून मिळत असतो. सेवेचा अर्थ निष्काम कर्म. “कर्मण्ये वाधिकारस्ते मां फलेशु कदाचनः” समाज, राष्ट्रहितासाठी निष्काम भावनेने केलेले कर्म हीच ईश्वराची पूजा आहे. अशा पुजेतून खरा आनंद मिळतो हे स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकातून कळत गेले.

            चार भिंतीच्या आत एक मंदिर, मुर्तीची पुजा अशा सेवेबरोबरच गांव एक मंदिर आहे, राष्ट्र एक मंदिर आहे, जनता ही सर्वेश्वर आहे, त्या जनतेची सेवा ही ईश्वराची पुजा आहे,मानव सेवा हीच माधव सेवा आहे, जनसेवा ही ईश्वराची पूजा आहे, हे समजले. मंदिरातील पूजा करणे हा दोष नाही. मात्र त्या पूजेबरोबरच  गांव, राष्ट्रातील जनतेची सेवा ही खरी ईश्वराची पुजा आहे. अशा पुजेतूनच माणसांना स्थायी व अखंड आनंद मिळतो. हे मला स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकातून समजत गेले. 1962 मध्ये भारत- चीनच्या लढाईत मोठ्या संख्येने आमचे जवान मारले गेले. देशाच्या संरक्षणासाठी तरूणांची गरज होती. अशा परिस्थितीत 1963 मध्ये मी भारतीय सैन्यात गेलो.

            1965 मध्ये भारत पाकिस्तानचे युद्ध झाले. दुष्मनांचे आमच्यावर हल्ले झाले. या हल्ल्यात सोबतचे सर्व सहकारी शहीद झाले. माझ्या कपाळावर एका गोळीचा तुकडा उडून लागला. गाडीमध्ये 20 ते 25 गोळ्या लागूनही आपण जिवंत राहिलो ही ईश्वराची काहीतरी इच्छा असावी असे समजून त्या वेळी भारत-पाकिस्तान खेमकरणच्या सीमेवर विचार केला की, बरोबरीचे सर्व सहकारी शहीद होतात आणि आपणच जिवंत राहतो हा आपला पुनर्जन्म आहे. स्वामी विवेकानंदच्या पुस्तकातून समजले  होते की मानवी जीवन सेवेसाठी असून गांव एक मंदिर आहे, राष्ट्र एक मंदिर आहे. जनता सर्वेश्वर आहे. त्या जनतेची सेवा हीच ईश्वराची पूजा आहे. म्हणून उर्वरित आयुष्य गाव, समाज आणि देश सेवेसाठीच अर्पण करण्याचा निर्णय झाला. जगायचे ते सेवेसाठीच आणि ज्या दिवशी मरायचे ते गाव, समाज व देशाची सेवा करता करताच मरायचे असा निर्णय घेतला.

घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे धोका दिसू लागला की, लग्न करावे तर चूल पेटविण्यातच वेळ जाईल. मला गावाची, जनतेची, देशाची सेवा करता येणार नाही. म्हणून निर्णय घेतला की, लग्नच करायचं नाही. अविवाहित राहूनच आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण गांव, समाज आणि देशाच्या सेवेत लागावा अशी माझी धारणा झाली. आणि आता माझ वय 78 वर्षे झाले, आजही तेच विचार जीवनात आहेत. असे विचार टिकून राहण्यासाठी ईश्वराची कृपा आहे असे मला वाटते. युवकांनी थोरामोठ्यांची चरित्रे, विचार वाचून चिंतन केले तर एखादे पुस्तकही आपले गुरू होऊन जीवनाची वाट दाखवू शकते. त्यातून जीवनात नवी ऊर्जा मिळत असते.

            गावात घर आहे. जमीन आहे. भाऊ आहेत. मात्र त्या घरात जाऊन 40 वर्षापेक्षा अधिक काळ झाला. पुन्हा घरात गेलो नाही. भावांच्या मुलांची नावे काय आहेत ते कधी जाणून घेतले नाहीत. कोटी रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या, मात्र कुठेही बँक बँलन्स ठेवला नाही. कोटी रुपयांचे पुरस्कार मिळाले, त्याचाही ट्रस्ट करून टाकला. त्याच्या व्याजातून हा ट्रस्ट समाज हिताची कामे करतो.  

            माझ्या संपूर्ण आयुष्यात माझे बँक अकाऊंटचे पुस्तक माझे जवळ मी कधी ठेवलेले नाही. कार्यकर्त्यांच्या जीवनात पारदर्शकता असावी. जेणे करून कोणालाही संशय येण्यास वाव मिळत नाही. संत यादवबाबा समाधी मंदिरामध्ये राहतो. झोपण्याचे एक बिस्तर आणि जेवणाचे ताट या शिवाय काहीच नाही. मात्र जीवनात जो आनंद आहे तो लखपती करोडपतींनाही मिळत नसेल एवढा आनंद मी माझ्या जीवनात प्रत्यक्ष अनुभवीत आहे. आजच्या तरूणांनी माझ्यासारखे अविवाहीत राहून सामाजिक कार्य करावे असा माझा संदेश नाही. त्याऐवजी प्रपंच करून समाजासाठी  व देशासाठी शक्य होईल तेवढा वेळ द्यावा. प्रपंच करीत असताना तो चार भिंतीच्या आतील लहान प्रपंच करण्याऐवजी समाजहितासाठी थोडा मोठा प्रपंच करावा. कारण लहान प्रपंचात नेहमी दुःख असते तर मोठ्या प्रपंचात आनंद असतो.  

            माझ्या आयुष्यातील 78 वर्षामध्ये ग्रामविकास किंवा भ्रष्टाचाराच्या विरोधात कार्य करताना आलेल्या अडी-अडचणी, झालेला विरोध, त्यासाठी करावा लागलेला संघर्ष प्रसंगी अनेक वेळेला सूड भावनेने मला अनेक वेळा जेलमध्ये पाठविले. या सर्व बाबींचे अनुभव कथन करायचे ठरविले तर एक भला मोठा ग्रंथच तयार होईल. मात्र दोन गोष्टी मला फार महत्वाच्या वाटतात. विकास आणि विकासाला लागलेली भ्रष्टाचाराची गळती थांबविणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ही दोनही कामे केल्याशिवाय गाव, समाज आणि देशाला खऱ्या अर्थाने उज्वल भविष्य मिळणे अशक्य आहे. ग्रामविकास करताना निसर्गाचे शोषण करून केलेला विकास हा शाश्वत विकास नसून तो कधी तरी विनाशकारी ठरेल. आज पेट्रोल, डिझेल, रॉकेल, कोळसा, पाणी या सारख्या वस्तुंचे अमर्याद शोषण करून शहरांचा, देशाचा जो विकास होत आहे तो शाश्वत विकास नाही. राळेगणसिद्धीच्या लोकांनी केलेला विकास हा शाश्वत विकास आहे. त्यांनी निसर्गाने दिलेले पावसाचे पडणारे पाणी अडविले, जिरविले. भू-गर्भातील पाण्याची पातळी वाढविली. त्यातून कृषीचा विकास केला व स्वावलंबी झाले. गावची अर्थव्यवस्था बदलली. हाताला काम व भाकरीचा प्रश्न गावातच सुटला. त्यांनी निसर्गाचे शोषण केले नाही. स्वातंत्र्यानंतर विकास खूप झाला. उंच-उंच इमारती उभ्या झाल्या. रस्ते पक्के झाले, कारखाने झाले. लोकांना काम मिळाले. इमारतीची उंची वाढत गेली. पण माणसांची वैचारिक पातळी खाली आली. मी आणि माझं याच्या पलिकडे लोक पहायला तयार नाहीत. यालाच खरा विकास म्हणणार का? निसर्गाने दिलेल्या देणगीच्या आधारे गावाने एकत्रित येऊन व्यक्ति, परिवार, गाव स्वावलंबी करणे हा खरा आणि शाश्वत विकास आहे. तसा विकास राळेगणसिद्धीच्या लोकांनी केला.

      राळेगणसिद्धी सारख्या 2500 लोकवस्तीच्या खेड्यात गावातील सर्व लोकांनी संघटीत होऊन जे कार्य उभे केले ते पाहण्यासाठी राज्य, देश, परदेशातून 8 लाख लोकांनी पहाणी केली. अनेकांनी त्यातून प्रेरणा घेतली. पाच लोकांनी या कामाचा अभ्यास करून पी.एच.डी. केली आहे.

*भ्रष्टाचार-*  विकास कामांबरोबरच विकासाला लागलेली भ्रष्टाचाराची गळती थांबविण्यासाठी राज्यामध्ये वेळोवेळी 18 वेळा 10 दिवस, 15 दिवस, 1 महिना सतत दौरे करून, काही हजार की.मी. प्रवास करून लोकशिक्षण लोकजागृतीचे काम केले. अनेक वेळेला पत्रके, फोल्डर पोष्टर प्रिन्ट करून लोकांना वाटली. त्यामुळे जनता जागृत होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये 33 जिल्ह्यात, 252 तालुक्यात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन नावाने संघटन उभे झाले. एक सामान्य कार्यकर्ता हे करू शकतो. त्यासाठी वीस वर्षाचा कालावधी जावा लागला. सरकारची इच्छा नसताना जनशक्तीच्या दबावामुळे सात कायदे सरकारला करावे लागले. माहितीच्या अधिकाराचा अत्यंत महत्त्वपूर्ण कायदा झाला. या कायद्याचा देशभरातील जनतेला लाभ मिळू लागला. मात्र त्यासाठी 8 वर्षे सतत संघर्ष करावा लागला. अनेक वेळेला आंदोलने केली. आंदोलनामुळे भ्रष्टाचार केलेल्या 6 मंत्र्यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. 400 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार केला म्हणून सरकारला कारवाई करावी लागली. त्यासाठी 25 वर्षे अथक परिश्रम करावे लागले. अपमान सहन करावा लागला. काही वेळेला जेलमध्ये जावे लागले. दिल्लीतही अनेक वेळेला जंतर-मंतर आणि रामलीला मैदानावर उपोषण करावे लागले. आंदोलन केल्यामुळे लोकपाल बिलासारखा कायदा सरकारला करावा लागला. राळेगणसिद्धीच्या कामाचे वैशिष्ट्य हे आहे की, परदेशातून कोणत्याही देणग्या घेतल्या नाही. आपल्या देशातून काही किरकोळ देणग्या सोडल्या तर कोणत्याही उद्योगपतींकडून देणग्या घेतल्या नाहीत. शासनाची योजना आणि लोकांचा सहभाग यातून हे काम उभे झाले आहे. कोटी रुपयांची कामे लोकांनी आपल्या श्रमदानातून केली आहेत.

            *लोकपाल* कायद्याची अंमलबजावणी अद्यापही होत नसल्यामुळे पुन्हा एकदा आंदोलन करावे लागेल असे वाटू लागले आहे. मात्र वयोमानपरत्वे शरीराची साथ मिळेल की नाही, शंका असल्याने जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे. राज्यात आणि दिल्लीत केलेल्या आंदोलनाचा प्रभाव वाढत गेला. पण काही कार्यकर्ते या आंदोलनाचा दुरूपयोग करू लागले. अण्णा हजारे यांचे आम्ही कार्य़कर्ते म्हणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करू लागल्याने आम्ही मोठ्या अथक परिश्रमातून उभ्या केलेल्या आंदोलनाच्या सर्व समित्या बरखास्त कराव्या लागल्या. आता कुठेही समित्या ठेवलेल्या नाहीत. काही स्वार्थी कार्यकर्त्यांमुळे सदर आंदोलन बदनाम होऊ नये म्हणून ते बरखास्त केले आहे. आंदोलन हे चारित्र्यावर आधारलेले असावे. पुन्हा अशी वेळ येऊ नये यासाठी आता आम्ही निर्णय घेतला आहे की, आंदोलन करणारे कार्यकर्ते चारित्र्यशील असावेत. समाज आणि राष्ट्रहितासाठी सेवाभावाने कार्य करणारे कार्यकर्ते असावेत. सत्याच्या मार्गाने चालणारे असावेत. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, त्याग आणि अपमान पचविण्याची शक्ती असणारे कार्यकर्ते असावेत. स्वातंत्र्यासाठी झालेल्या बलिदानाची आठवण ठेवणारे कार्यकर्ते असावेत. अशा कार्यकर्त्यांनी राष्ट्रहितासाठी पुढे येऊन 100 रुपयांच्या स्टँप पेपर वर त्यांनी प्रतिज्ञापत्र करून द्यावे की, ‘मी कोणत्याही पक्ष आणि पार्टीत जाणार नाही, पक्ष पार्टीतर्फे निवडणूक लढविणार नाही. मी समाज आणि देशाची सेवा करीन.’ अशा विचारांचे हजारो कार्यकर्ते पुढे आले आणि प्रसंगी अहिंसेच्या मार्गाने जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवली तर देशातील भ्रष्टाचाराला आळा बसून देशात लोकांची, लोकांनी, लोकसहभागातून चालविलेली खरी लोकशाही येऊ शकेल.

            घटनेच्या परिछेद 84 (क) आणि (ख) मध्ये म्हटल्याप्रमाणे भारतात राहणारी कोणतीही व्यक्ती जिचे वय 25 वर्षे आहे अशी व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवू शकते आणि भारतात राहणारी कोणतीही व्यक्ती जिचे वय 30 वर्षे आहे अशी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते. जी व्यक्ती पक्ष-पार्टी विरहीत आहे. घटनेप्रमाणे वैयक्तिक व्यक्ति जी चारित्र्यशील आहे अशा व्यक्तीला ही अट राहणार नाही अशा व्यक्तीने अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे ठरविले व प्रतिज्ञापत्र दिले तर नाकारता येणार नाही. कारण घटनेचा आधार आहे. घटनेने व्यक्तीला निवडणूक लढविण्याचे अधिकार दिले आहेत. पक्ष-पार्टीच्या समुहाला घटनेने अधिकार दिलेले नाहीत. या संबंधाने शंका असणाऱ्या लोकांनी घटना तपासून पहावी. निवडणूक आयोगाकडून घटनाबाह्य समुहाला कायमस्वरूपी निवडणूक चिन्ह दिले जाते आणि घटनेप्रमाणे वैयक्तिक निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीला फक्त 15 दिवस आधी चिन्ह देण्यात येते. या 15 दिवसात लोकसभेच्या सर्व मतदारांपर्यंत तो जाऊ शकत नाही.  हा अन्याय आहे. घटनाबाह्य समुहाला निवडणूक आयोग जे निवडणूक चिन्ह देतात त्या चिन्हाला घटनेचा आधार काय? अशा अन्यायाविरोधात आंदोलन हाच पर्याय आहे. देशात खरी लोकशाही यावी असं वाटत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी ‘स्वातंत्र्याची दुसरी लढाई’ समजून पुढे येणे आवश्यक आहे. 1857 ते 1947 या नव्वद (90) वर्षांच्या कालखंडात स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी बलिदान केले. जुलमी, अन्यायी, लुटारू इंग्रजांना या देशातून घालविणे आणि लोकशाही आणणे हे त्यांचे खरे स्वप्न होते. लाखो लोकांच्या बलिदानामुळे इंग्रज या देशातून गेला पण अद्यापही खरी लोकशाही आली नाही.

            स्वातंत्र्याच्या 68 वर्षानंतरही देशात खरी लोकशाही आली नाही. फक्त गोरे लोक गेले आणि काळे लोक आले एवढात फरक झाला. चारित्र्यशील कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या संघटनेतर्फे आंदोलनासाठी पुढे येणाऱ्या कार्यकर्त्यांना पहिली लढाई ‘लोकपालची अंमलबजावणी व्हावी’ या मागणीसाठी करावी लागणार आहे. निवडणूक सुधारणा व्हावी, पक्ष आणि पार्टीच्या लोकांनी चारित्र्यशिल लोकांनाच तिकट द्यावे म्हणून राईट टू रिजेक्टची मागणी करताना आमची मागणी होती की, एका मतदार संघामध्ये जे उमेदवार निवडणूकीसाठी उभे आहेत त्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने जे निवडणूक चिन्ह दिले आहे, मात्र मतदाराला या उमेदवारापैकी कोणीच योग्य वाटत नाही अशा मतदारासाठी निवडणूक आयोगाने नापसंतीचे चिन्ह द्यावे. जेणे करून ज्या मतदारांना उमेदवार पसंत नाही ते नापसंतीच्या चिन्हावर आपले मत देतील. सर्व उमेदवारांना मिळालेल्या मतापेक्षा नापसंतीच्या मतावर अधिक मते पडली तर निवडणूक रदद् करावी आणि फेर निवडणूक घेण्यात यावी. मात्र फेर निडवणूकीमध्ये पहिल्या निवडणूकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना एकदा मतदारांनी नाकारलेले असल्यामुळे त्यांना पुन्हा निवडणूकीसाठी उभे राहता येणार नाही. जेणे करून पक्ष आणि पार्ट्या चारित्र्य़शील उमेदवारांनाच तिकीट देतील व दूषित राजकारणाचे शुद्धीकरण होईल. मात्र निवडणूक आयोगाने तसा निर्णय न घेता इलेक्ट्रॉनिक मशीनवर फक्त ‘नोटा’आणून टाळाटाळ केली. फक्त ‘नोटा’ मुळे गुंड, भ्रष्टाचारी, व्याभिचारी, लुटारू अशा उमेदवारांना आळा बसणार नाही. या मागणीसाठी पुन्हा आंदोलन करण्याची गरज आहे.

*ग्रामसभा* ग्रामसभेला जादा अधिकार मिळणे आवश्यक आहे. ही गावची संसद असते. राज्याच्या, केंद्राच्या संसदेपेक्षा ही संसद श्रेष्ठ असते. कारण विधानसभा व लोकसभेला दर पाच वर्षातून ग्रामसंसद/ग्रामसभा बदलत असते. परंतू ग्रामसभा स्वतः कधी बदलत नसते. प्रत्येक मतदार 18 वर्षाचे वय झाले की ग्रासभेचा आपोआप सदस्य होतो आणि तो मरेपर्यंत सदस्य असतो. म्हणून राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला कोणत्याही गावातील जल, जंगल, जमीन या सारख्या इतर वस्तू घ्यावयाच्या असतील तर ग्रामसभेची मान्यता घेतल्याशिवाय घेता येणार नाही असा कायदा करावा लागेल. लोकशाही लोकांनी, लोकांची लोकसहभागातून चालविलेली शाही ती लोकशाही आहे. स्वातंत्र्याची 68 वर्षे उलटली आहेत मात्र आजही देशात लोकशाही आली नाही कारण पक्ष, पार्टीशाहींनी त्या लोकशाहीला येऊच दिले नाही. त्यासाठी पुन्हा एकदा स्वातंत्र्याची दुसरी लढाई अहिंसेच्या मार्गाने लढावी लागणार आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण करून ग्रामसभेला पूर्ण अधिकार देणारा कायदा करावा या मागण्यासाठी दिल्लीत जंतर-मंतर किंवा रामलीला मैदान या ठिकाणी जनतेला पुन्हा आंदोलन करण्याचा विचार करावा लागणार आहे. यासंबंधी कार्यकर्त्यांनी आपले विचार कळवावेत.

धन्यवाद, जयहिंद.
आपला,

*कि. बा. तथा अण्णा हजारे*
(14 जून 2016)


मंगळवार, ३१ मे, २०१६

लोककल्याणकारी अहिल्याई

लोककल्याणकारी अहिल्याई
 -------------------------

          राष्ट्रमाता अहिल्याईने आपले समस्तआयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचत असताना,जाती-धर्माची व प्रदेशाची मर्यादा न घालता, संपूर्ण भारतात कार्य केलेले आहे. अनेक विहिरी, तलाव, पाणपोई, धर्मशाळा व घाट बांधलेत. रस्ते, पूल निर्माण केलेत.जे काम आज भारताच्या शासनव्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केले जाते तेच काम शेकडो वर्षांपूर्वी राष्ट्रमाता अहिल्याईने केले. ‘प्रजा सुखी तर आपण सुखी,’ असे तत्त्व राष्ट्रमातेने अंगीकारले होते.

           मल्हाररावांच्या मृत्यूनंतर इंदोरवरून संस्थानाची राजधानी ‘महेश्‍वर’ या ठिकाणी आणून उद्योगधंद्याच्या विकासाला प्राधान्य दिले. वस्त्रोद्योग भरभराटीला आणले. वस्त्रोद्योगासाठी विणकर, कोष्टी, हलबा तसेच रस्ते, मशिदी, मंदिरे, धर्मशाळा व इतर बांधकामे सतत चालत असल्यामुळे पाथरवट, वास्तुशिल्पी, शिल्पकार, गवंडी, लोहार, सुतार, सोनार, चर्मकार अशा अनेक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यात. कलावंत, साहित्यिक व कारागीर अशा गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन, घर, पैसा व इतर सर्व सोयी उपलब्ध करून दिल्यात तसेच उद्योगासाठी पैसा आणि माल विकण्यासाठी बाजारपेठा उपलब्ध करून दिल्याने उद्योग व व्यापार भरभराटीला आला. परप्रांतात माल विकला जाऊ लागल्यामुळे इतरत्र मराठी माणसांविषयी प्रेम, आपुलकी व जिव्हाळ्याची भावना वाढीस लागली. आजही भारतात महेश्‍वरी साड्या प्रसिद्ध आहेत.

           काही भूमिहीन असणार्‍या कुणबी, मराठा, तेली, माळी यांसारख्या ओबीसी तसेच दलित, आदिवासी भटक्या, विमुक्त समाजास शेतजमिनी दिल्यात. शेतीच्या जोडीला इतर उद्योग सुरू केले. कृषिप्रधान देश असणार्‍या भारतातील संपूर्ण लोकजीवन पावसावर अवलंबून आहे. बर्‍याच वेळा दुष्काळ पडल्याने त्यांच्या जीवनात त्राही माजते. अशा वेळी भारतात तलाव, विहिरी, घाट व कुंडांची निर्मिती करून लोकांच्या गैरसोयी दूर केल्यात. शेतीचे उत्पन्न वाढावे म्हणून शेतकर्‍यांना आर्थिक मदतीचा हात दिला. त्यांच्यावरील करवसुलीची मर्यादा निश्‍चित ठरवून दिली. त्यामुळे जास्त कर वसूल करण्याची शासकीय कर्मचार्‍यांची हिंमत होत नव्हती. म्हणून राष्ट्रमातेच्या संस्थानात अंशत:ही भ्रष्टाचाराला वाव नव्हता.

           रानात चरणार्‍या पशू-पक्ष्यांसाठी रानातच तलाव बांधलेत. शेतकर्‍यांना योग्य मोबदला देऊन पिकांनी भरलेली उभी शेतं खरेदी केलीत आणि पशू-पक्ष्यांना व गायींना चरण्यासाठी सोडलीत. गो-कुरणांचीही व्यवस्था केली. त्या मुंग्यांना साखर आणि मास्यांना कणकेच्या गोळ्या टाकत.शेतात काम करणार्‍या बैलांना पाणी पाजण्यासाठी रोजाने माणसे लावली. केवळ माणसांच्याच नाही, तर पशू-पक्षांच्याही उदरनिर्वाहाची सोय केली. अशा प्रकारे आपल्या राज्यात सूक्ष्म जीवही उपाशी राहणार नाही, याची सतत दक्षता घेणारी, केवळ समाजाचेच नाही, तर निसर्गातील सजीवांचेही जीवन सुखर करणारी एकमेव राणी अहिल्याई होय!

           गोरगरिबांकरिता औषधोपचारासाठी मोफत दवाखान्याच्या सोयी केल्यात.व्यापार-व्यवसाय आणि दळणवळणासाठी पक्के रस्ते बांधलेत, दीनदुबळे, अनाथ, विधवा, अपंग यांसारख्या असहाय लोकांचे पुनर्वसन केले. त्यांच्यासाठी अन्नछत्रे व सदावर्ते चालविली. धर्मशाळा बांधून त्यांची राहण्याची नि:शुल्क व्यवस्था केली.ग्रामोद्योगांना प्रोत्साहन देऊन बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिलेत. हिवाळ्यात गोरगरीब प्रजेला गरम वस्त्रांचे वाटप केले. बेकारांना काम व श्रमांना योग्य दाम दिलेत. प्रवाशांसाठी मार्गावर अरण्यमय प्रदेशातही आमराई, बगिचे निर्माण केले. पर्यावरणाचा समतोल कायम राहावा म्हणून रस्त्याच्या दुतर्फा तसेच ओसाड, पडीक जमिनीवर व डोंगरावर झाडे लावून वृक्षरोपणासारखे उपक्रम राबवलेत. पर्यावरणाचा  समतोल राहावा व जमिनीची धूप थांबावी तथा शेतक-यांची आर्थिक  स्थीती सुधारावी यासाठी राज्यातील प्रत्येक शेतक-यांनी २० झाडे लावलीच पाहिजे असा अहिल्याईचा  दंडक होता.  त्यातील ९ झाडे ही शेतक-यांच्या मालकीची असायचीत.  त्यांना या झाडांचा  हवा तसा उपयोग करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य  असायचे.  तर ११ झाडं ही सरकारच्या अर्थात  संस्थानाच्या मालकिची असायचीत.

            अन्नछत्रे, धर्मशाळा, आरोग्यशाळा, पाथशाळा, गोशाळा, वाटसरूंसाठी विश्रांतीकरिता ओटे इत्यादींची बांधकामे केलीत. स्वत: दोनच अपत्यांना जन्म देऊन मर्यादित कुटुंबाचा आदर्श गिरवला. ग्रामपंचायतीची स्थापना, कोतवालपदाची निर्मिती, टपाल व्यवस्था, विनाविलंब न्याय देण्यासाठी न्यायालये, निपुत्रिकांना दत्तक वारसाहक्क, राज्याच्या व प्रजेच्या संरक्षणासाठी पोलिसयंत्रणा, सैन्यव्यवस्था, स्त्रीसैन्य, परराज्यात वकिलांची नेमणूक अशी व्यवस्था केली. राज्यात हुंडा घेणे आणि देणे बंदी, दारूबंदी यासारखे कायदे केले ते केवळ प्रजेला सुखी करण्यासाठीच.

           प्रजेला नियमित काम मिळावे व कलावंतांच्या वास्तुकला जिवंत राहाव्यात यासाठी सर्वधर्मसमभावाचा आदर्श गिरवीत मंदिरांची निर्मिती व जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. खडेपीर, चांदवड येथील नानावली दर्गा, बुखारी बाबांचा दर्गा, चांदशहा दर्गा व अनेक पीर, मशिदी बांधल्यात.या सर्वांच्या देखरेखीसाठी कायमस्वरूपाच्या नेमणुका करून दिल्यात.रस्ते व महारस्ते बांधून पाणपोया सुरू केल्यात.त्यामुळे प्रजेला कामं मिळालीत आणि पर्यटनाला प्रोत्साहनही मिळाले. अहिल्याईंनी उपेक्षित, दलित, पिडीत,  आदिवासी, भटके - विमुक्त, ओबीसी, गरीब, मजूर, कामगार यांच्या हितासाठी, उपजीविकेसाठी, कलाकौशल्यांना उत्तेजन देण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आयुष्य वेचले.

           वैशिष्ट्यपूर्ण होळकरांच्या राज्यात सरकारी कोष आणि खाजगी कोष होते.महसूल व कराद्वारे प्राप्त होणार्‍या उत्पन्नाचा समावेश सरकारी कोषात, तर लढाईतील लूट वा खंडणी यातून मिळणार्‍या उत्पन्नाचा २५ टक्के वाटा स्त्रीधन म्हणून खाजगी कोषात जमा व्हायचा. खाजगी कोषातून खर्च व विनियोग करण्याचे स्वातंत्र्य पूर्णत: घरातल्या प्रमुख स्त्रीस होते. गौतमाबाईच्या मृत्यूनंतर हा खाजगी कोष अहिल्याकडे आला. या खाजगीतूनच अहिल्याईने जनकल्याणाची कामे केली.

           प्रजेवर जास्त कराचा बोज  न लादता राज्याचा कोष समृद्ध करून राज्य भरभराटीस आणले. हे सर्व कार्य आपल्या खाजगी संपत्तीवर तुळशीपत्र ठेवून, खाजगी उत्पन्नाचा उपयोगसुद्धा लोककल्याणासाठी केला. ‘‘शासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो, तर तो त्यांचा विश्‍वस्त असतो. त्याची उधळपट्टी करण्याचा त्यास काहीही अधिकार पोहोचत नाही.’’ ‘‘राज्यकर्त्यांनी केवळ राजकारणात गुंतून राहण्याऐवजी समाजाच्या म्हणजेच प्रजेच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे.’’- असे त्यांचे तत्त्व होते. हा अहिल्याईचा गुण आजच्या पुढार्‍यांना निश्‍चित घेण्यासारखा आहे. अशा या लोककल्याणकारी कार्य करणार्‍या राष्ट्रमाता अहिल्याईंच्या ३१ मे रोजी  येऊ घातलेल्या २९१ व्या जयंती दिना निमित्त कोटी कोटी अभिवादन!

 होमेश भुजाडे
नागपूर
 ९४२२८०३२७३

शनिवार, २८ मे, २०१६

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती

            हिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने झुंजण्याचा संकल्प बालपणीच करणारा व त्यानुसार अपार कष्ट भोगणारा वीर देशभक्त, मनुष्यजातीचे कल्याण हेच अंतिम उद्दिष्ट असणारा राष्ट्रवादी, मूलग्राही व कृतिशूर विचारवंत, विज्ञाननिष्ठ व उपयुक्ततावादी समाजसुधारक, महाकाव्याचा नायक शोभावा असा महाकवी, इतिहास घडविणारा इतिहासकार, आपल्या प्रत्येक ग्रंथालाच इतिहास असणारा साहित्यिक, अमोघ वक्ता! स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे व्यक्तिमत्व अक्षरशः शतपैलू आहे. अनेक श्रेष्ठ गुणांचा समुच्चय त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रकर्षाने झाला होता. हे सर्व गुण त्यांनी इतिहासाच्या ज्ञानप्रकाशाने प्रकट केलेल्या व डोळसपणे स्वीकारलेल्या दिव्य व दाहक व्रताची सांगता करण्यासाठी त्यांनी मातृभूमीला समर्पित केले हे त्यांचे वैशिष्ट्य! त्यांचे उभे आयुष्य म्हणजे त्यांच्या वेळोवेळीच्या तत्वज्ञानाचा, युगप्रवर्तक घोषणांचा, धाडसी हालचालींचा, शूर कृत्यांचा, त्यागाचा आणि हालअपेष्टांचा विस्मयकारक चित्रपटच होय!

सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकर हे गावातील प्रतिष्ठित गृहस्थ होते. विनायकराव हे त्यांचे दुसरे चिरंजीव. थोरले बाबाराव आणि धाकटे नारायणराव. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी ह्यांनी त्यांच्यावर आईसारखीच माया केली. सावरकरांचे वडील १८९९ च्या प्लेगास बळी गेले.
सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. चापेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.
मार्च १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर १९०२ साली फर्गुसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९०६  साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.
राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना त्यांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले.  इटालीयन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मेझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते.
श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी घोषित केलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती.
१८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते स्वातंत्र्यानंतर प्रसिद्ध झाले.
राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराप सावरकर यांना ब्रिटीश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्यापाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रानी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे  ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती.
वीर सावरकरांनीच पुढे दुसर्‍या महायुद्धाच्यावेळी जपान येथे जाउन नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी "आझाद हिंद फ़ौजेचे" सेनापतिपद भूषवावे अशी गळ घातली. त्यासाठी त्यांनी श्री रासबिहारी बोस यांचे पत्र नेताजींना दाखवुन सेनापतीची गरज पटवून दिली.पुढचा रोमहर्षक इतिहास सगळ्यांना माहीतच असेल.पण मुख्य प्रेरणा वीर सावरकरांचीच होती.
  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती निमीत्त  आधारवड परिवार व् मासिक सैनिक दर्पण तर्फे कोटि कोटी प्रणाम !!!   

शुक्रवार, २० मे, २०१६

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

  • हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रांतिकारक चळवळ संघटित करणारे आद्य क्रांतिवीर
  • दोन देशांच्या सरकारांनी ज्यांच्या ग्रंथावर प्रसिद्धिपूर्वीच प्रतिबन्ध घातला असे जगातील आद्य लेखक
  • हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यलढ्यात भाग घेतला म्हणून ज्यांची पदवी विद्यापीठाने काढून घेतली असे आद्य पदवीधर
  • हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यलढ्यात सहभागी झाल्यामुळे ज्यांना बॅरिस्टर पदवी नाकारण्यात आली असे आद्य विधिज्ञ
  • विदेशी कपड्यांची निर्भयपणाने प्रकट होळी आयोजित करणारे आद्य देशभक्त
  • हिन्दुराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सर्वस्पर्शी विचार करणारे, अस्पृश्यता व जातिभेद यांच्याविरुद्ध बंड पुकारणारे आद्य क्रांतिवीर
  • ब्रिटिश न्यायालयाचा अधिकार नाकारणारे आद्य भारतीय बंडखोर नेते
  • पन्नास वर्षे सीमापारीची काळ्यापाण्याची शिक्षा झालेले आणि ती पुरुन उरल्यानंतर सक्रिय कार्य करणारे जगातील आद्य राजबंदी
  • कारागृहात लेखनसाहित्य न मिळाल्यामुळे काट्याकुट्यांनी कारागृहाच्या भिंतींवर सुमारे दहा सहस्त्र ओळींचे काव्य कोरून लिहिणारे आणि ते सहबंदिवानांकडून मुखोद्गत करवून घेऊन प्रसिद्ध करविणारे जगातील आद्य कवी
  • हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात ज्यांची अटक गाजली असे हिन्दुस्थानचे आद्य राजबंदी
  • योगशास्त्राच्या उत्तुंग परंपरेनुसार प्रायोपवेशनाने मृत्युला कवटाळणारे आद्य आणि एकमेव क्रांतिकारक महायोगी
  • "झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा"

    गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

    अमर शहीद हेमू कालाणी


            अमर शहीद हेमू कालाणी की आज 21 जनवरी को पुण्यतिथि है। अमर शहीद हेमू कालाणी को आज के दिन अंग्रेज सरकार ने 19 वर्ष की अल्प आयु में फांसी पर लटकाया था। 

    अमर शहीद हेमू कालाणी की जीवनी

    हेमू कालाणी (Hemu Kalani)भारत के एक क्रान्तिकारी एवं स्वतन्त्रता संग्रामसेनानी थे।
    अंग्रेजी शासन ने उन्हें फांसी पर लटका दिया था।
    आरम्भिक जीवन
    हेमू कालाणी सिन्ध के सख्खर(Sukkur) में २३ मार्च सन् १९२३ को जन्मे थे।
    उनके पिताजी का नाम पेसूमल कालाणी एवं उनकी माँ का नाम जेठी बाई था।
    स्वतन्त्रता संग्रामजब वे किशोर वयस्क अवस्था के थे तब उन्होंने अपने साथियों के साथ विदेशी वस्तुओं का बहिष्कार किया और लोगों से स्वदेशी वस्तुओं का उपयोग करने का आग्रह किया.
    सन् १९४२ में जबमहात्मा गांधीनेभारत छोड़ो आन्दोलनचलाया तो हेमू इसमें कूद पड़े।
    १९४२ में उन्हें यह गुप्त जानकारी मिली कि अंग्रेजी सेना हथियारों से भरी रेलगाड़ी रोहड़ी शहर से होकर गुजरेगी.
    हेमू कालाणी अपने साथियों के साथ रेल पटरी को अस्त व्यस्त करने की योजना बनाई. वे यह सब कार्य अत्यंत गुप्त तरीके से कर रहे थे पर फिर भी वहां पर तैनात पुलिस कर्मियों की नजर उनपर पड़ी और उन्होंने हेमू कालाणी को गिरफ्तार कर लिया और उनके बाकी साथी फरार हो गए.
    हेमू कालाणी को कोर्ट ने फांसी की सजा सुनाई. उस समय के सिंध के गणमान्य लोगों ने एक पेटीशन दायर की और वायसराय से उनको फांसी की सजा ना देने की अपील की. वायसराय ने इस शर्त पर यह स्वीकार किया कि हेमू कालाणी अपने साथियों का नाम और पता बताये पर हेमू कालाणी ने यह शर्त अस्वीकार कर दी.
    २१ जनवरी १९४३ को उन्हें फांसी की सजा दी गई. जब फांसी से पहले उनसे आखरी इच्छा पूछी गई तो उन्होंने भारतवर्ष में फिर से जन्म लेने की इच्छा जाहिर की.
    इन्कलाब जिंदाबाद और भारत माता की जय की घोषणा के साथ उन्होंने फांसी को स्वीकार किया।
    भारत माता के लाल अमर शहीद हेमू कालाणी को सैनिक दर्पण की ओर से सत सत नमन और विनम्र श्रद्धांजलि !!!

    शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

    अटलजी

    लोकशाहीचे सच्चे "प्रधानसेवक".....

    राजकारणाचे एक युग गाजवलेल्या अन आपल्याच पक्षाच्या सद्य विचारसरणीहून भिन्न विचारशैली व मर्यादेचे समाजभान सजग असणारया, आपल्या विचारधारांशी समर्पित राहिलेल्या राष्ट्रतेज अटलजींचा आज वाढदिवस. त्यांच्या जीवनातला मोठा काळ तीव्र संघर्ष करण्यात केला. राजकारणात राहूनही ते बहुआयामी राहिले. तितकेच व्यासंगी अन सृजन. लढवय्येही अन तत्वचिंतकदेखील. अनेक चढ उतार त्यांनी आयुष्यात अनुभवले, सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचले. लोकमान्यतेच्या अन लोकप्रेमाच्या अमृतधारा अनुभवल्या....

    परंतु मला प्रश्न पडतो कि आजच्या संध्याछायेच्या कुशीत त्यांना कसे वाटत असेल ? ते काय विचार करत असतील ? त्यांच्या स्मृतीच्या मंतरलेल्या चैत्रबनात अजूनही कधी बहार होत असेल का ? राहिलेल्या काही ईच्छा अन निसटलेले काही क्षण यांची पानगळ होत असेल का ? हरवलेल्या तारुण्यातील मागे राहिलेला गीत गांधार अजूनही मनात अवचित कधी बरसत असेल का ? विजनवासात देखील ते कोट्यावधींच्या मनांचे कानेकोपरे धुंडाळत असतील का ? त्यांनाही नातलग होते, आप्तेष्ट होते,मित्र होते कधी कोणी त्यांच्या स्वप्नात येत असेल का ? त्यांचे स्वर्गवासी जन्मदाते अवती भोवती असल्याचे भास होत असतील का ?सकाळी जागे होताना त्यांचे डोळे पाणावत असतील का ? थरथरत्या बोटांनी त्यांना डोळे पुसता येत असतील का ?

    काही वर्षे मागे गेले की अटलजीच्या संघर्षमय जीवनाचा बोलका पट डोळ्यासमोर उलगडत जातो.

    लोकशाहीची जगभरातील सर्वात मोठी परंपरा असलेल्या भारतीय राजकारणातील भीष्म पितामह म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचेच एकमेव नाव घेता येईल, असे गौरवोद्गार माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी राज्यसभेत काढले होते.

    मितभाषी, मनमिळावू राजकारणी, उत्तम नेता, संवेदनशील कवी, उत्कृष्ट वक्ता अशा एक ना अनेक बिरुदावल्या वाजपेयी यांच्यासाठी वापरल्या जातात.

    अटलजी वाजपेयींच्या कामाची पद्धत लक्षात घेवून तत्कालीन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी उत्तम वक्ता असेलला हा युवक पुढे या देशाचा पंतप्रधान होईल, असे भाकित केले होते. पंडित नेहरू यांनी वर्तवलेले भाकित तब्बल ३९ वर्षांनी सत्यात उतरले.

    राजकारणातील सात्विक चेहरा अशी ओळख लाभलेल्या वाजपेयी यांनी आपल्या लोकांना धीर देताना

    ‘सूरज निकलेगा,
    अंधेरा छटेगा,
    कमल खिलेगा’

    हा मंत्र दिला .

    आपले राजकीय जीवनही अत्यंत मनमोकळेपणाने जगणाऱया वाजपेयी यांनी लिहिलेली ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘मेरी एक्क्यावन्न कविताएँ’ हा त्यांचा काव्यसंग्रह विशेष गाजला. संवेदनशील अशा कविमनाच्या वाजपेयींना पं. भीमसेन जोशी यांच्या गायकीची तर पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरी वादनाची विशेष आवड आहे. वाजपेयीजींना गेल्यावर्षी भारतरत्न हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला आहे.

    वाजपेयी यांना गीतकार साहिर लुधियान्वी यांचे

    ‘कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है,

    हे गाणे मनापासून आवडते. याच गाण्याच्या पंक्तीनुसार त्यांच्यासारखे नेते समाजोद्धारासाठीच जन्माला आलेले असतात, असे म्हटल्यास योग्य ठरेल.  

    राजधर्म आणि नैतिकता यांवर आधारित सामाजिक जाण असणारया या ऋषितुल्य योगी नेत्यास दीर्घायुष्यासाठी मनस्वी शुभेच्छा.....अस्तित्वाच्या शोधाची अखेरची वाट धुंडाळत असणारया या धृवतारयास त्यांचे इप्सित मिळो ही सद्गदित शुभकामना  ....