श्री स्वामी चरित्र सारामृत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
श्री स्वामी चरित्र सारामृत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २३ मे, २०१६

अध्याय १० ते १२ - श्री स्वामी चरित्र सारामृत

अध्याय १०
। श्री स्वामी चरित्र सारामृत दशमोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥ गाठी होते पूर्वपुण्य । म्हणूनी पावलो नरजन्म । याचे सार्थक उत्तम । करणे उचित आपणा ॥१॥ ऐसा मनी करुनी विचार । आरंभिले स्वामीचरित्र । ते शेवटासी नेणार । स्वामी समर्थ असती पै ॥२॥ हावेरी नामक ग्रामी । यजुर्वेदी गृहस्थाश्रमी । बाळाप्पा नामे द्विज कोणी । राहते होते आनंदे ॥३॥ संपत्ती आणि संतती । अनुकूल सर्व तयांप्रती । सावकारी सराफी करिती । जनी वागती प्रतिष्ठित ॥४॥ तीस वर्षांचे वय झाले । संसाराते उबगले । सद़्गुरुसेवेचे दिवस आले । मती पालटली तयांची ॥५॥ लटिका अवघा संसार । यामाजी नाही सार । परलोकी दारा पुत्र । कोणी नये कामाते ॥६॥ इहलोकी जे जे करावे । परलोकी त्याचे फळ भोगावे । दुष्कर्माने दुःख भोगावे । सत्कर्मे सौख्य पाविजे ॥७॥ बाळाप्पाचे मनात । यापरी विचार येत । सदा उद्विग्न चित्त । व्यवहारी सौख्य वाटेना ॥८॥ लल्ल संसारी वर्तती । तरी मनी नाही शांती । योग्य सद़्गुरु आपणाप्रती । कोठे आता भेटेल ॥९॥ हाचि विचार रात्रंदिन । चित्ताचे न होय समाधान । तयांप्रती सुस्वप्न । तीन रात्री एक पडे ॥१०॥ पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी । भरोनी आपणापुढे येती । पाहोनिया ऐशा गोष्टी । उल्हासले मानस ॥११॥ तात्काळ केला निर्धार । सोडावे सर्व घरदार । मायापाश दृढतर । विवेकशस्त्रे तोडावा ॥१२॥ सोलापुरी काम आम्हांसी । ऐसे सांगून सर्वत्रांसी । निघाले सद़्गुरु शोधासी । घरदार सोडिले ॥१३॥ मुरगोड ग्राम प्रख्यात । तेथे आले फिरत फिरत । जेथे चिदंबर दिक्षीत । महापुरुष जन्मले ॥१४॥ ते ईश्वरी अवतार । लोकां दाविले चमत्कार । तयांचा महिमा अपार । वर्णू केवि अल्प मती ॥१५॥ स्वामीचरित्र वर्णितां । चिदंबर दिक्षीतांची कथा । आठवली ते वर्णिता । सर्व दोष हरतील ॥१६॥ महायात्रा संकल्पेकरुन । जन निघती घराहून । परी मार्गी लागल्या पुण्यस्थान । स्नानदान करिताती ॥१७॥ महायात्रा स्वामीचरित्र । ग्रेथ क्रमिता मी किंकर । मार्गी लागले अति पवित्र । चिदंबराचे पुण्यस्थान ॥१८॥ तयांचे घेउनी दर्शन । पुढे करावे मार्गक्रमण । श्रोती होउनी सावधान । श्रवणी सादर असावे ॥१९॥ मुरगोडी मल्हार दीक्षित । वेदशास्त्री पारंगत । धर्मकर्मी सदारत । ईश्वरभक्त तैसाची ॥२०॥ जयांची ख्याती सर्वत्र । विद्याधनाचे माहेर । अलिप्तपणे संसार । करोनी काळ क्रमिताती ॥२१॥ परी तया नाही संतती । म्हणोनिया उद्विग्न चित्ती । मग शिवाराधना करिती । कामना चित्ती धरोनी ॥२२॥ द्वादश वर्षे अनुष्ठान । केले शंकराचे पूजन । सदाशिव प्रसन्न होऊन । वर देत तयांसी ॥२३॥ तुझी भक्ती पाहोन । संतुष्ट झाले माझे मन । मीच तुझा पुत्र होईन । भरवसा पूर्ण असावा ॥२४॥ ऐकोनिया वरासी । आनंदले मानसी । वार्ता सांगता कांतेसी । तीही चित्ती तोषली ॥२५॥ तियेसी झाले गर्भधारण । आनंदले उभयतांचे मन । जो साक्षात उमारमण । तिच्या उदरी राहिला ॥२६॥ अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी । इच्छामात्र घडी मोडी । तो परमात्मा त्रिपुरारी । गर्भवास भोगीत ॥२७॥ नवमास भरता पूर्ण । कांता प्रसवली पुत्ररत्न । मल्हार दीक्षिते आनंदोन । संस्कार केले यथाविधी ॥२८॥ चिदंबर नामाभिधान । ठेवियले तयालागून । शुक्ल पक्षीय शशिसमान । बाळ वाढू लागले ॥२९॥ प्रत्यक्ष शंकर अवतरला । करु लागला बाललीला । पाहोनी जनी-जनकाला । कौतुक अत्यंत वाटतसे ॥३०॥ पुढे केले मौजीबंधन । वेदशास्त्री झाले निपुण । निघंट शिक्षा व्याकरण । काव्यग्रंथ पढविले ॥३१॥ एकदा यजमानाचे घरी । व्रत होते गजगौरी । चिदंबर तया अवसरी । पुजेलागी आणिले ॥३२॥ मृत्तिकेचा गज करोन । पूजा करिती यजमान । यथाविधी सर्व पूजन । दीक्षित त्यांसी सांगती ॥३३॥ प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता । गजासी प्राण येउनी तत्त्वता । चालू लागला हे पाहता । विस्मित झाले यजमान ॥३४॥ बाळपणी ऐशी कृति । पाहोनी सर्व आश्चर्य करिती । हे ईश्वर अवतार म्हणती । सर्वत्र ख्याती पसरली ॥३५॥ ऐशी लीला अपार । दाखविती चिदंबर । प्रत्यक्ष जे का शंकर । जगदुद्धारार्थ अवतरले ॥३६॥ असो पुढे प्रौढपणी । यज्ञ केला दीक्षितांनी । सर्व सामग्री मिळवूनी । द्रव्य बहुत खर्चिले ॥३७॥ तया समयी एके दिनी । ब्राह्मण बैसले भोजनी । तूप गेले सरोनी । दीक्षिताते समजले ॥३८॥ जले भरले होते घट । तयांसी लाविता अमृतहस्त । ते घृत झाले समस्त । आश्चर्य करिती सर्व जन ॥३९॥ तेव्हा पुणे शहरामाजी । पेशवे होते रावबाजी । एके समयी ते सहजी । दर्शनाते पातले ॥४०॥ अन्यायाने राज्य करीत । दुसऱ्यांचे द्रव्य हरीत । यामुळे जन झाले त्रस्त । दाद त्यांची लागेना ॥४१॥ तयांनी हे ऐकोन । मुरगोडी आले धावोन । म्हणती दीक्षितांसी सांगून । दाद आपुली लावावी ॥४२॥ रावबाजीसी वृत्तान्त । कर्णोपकर्णी झाला श्रुत । म्हणती जे सांगतील दिक्षीत । ते अमान्य करवेना ॥४३॥ मग दीक्षितांसी निरोप पाठविला । आम्ही येतो दर्शनाला । परी आपण आम्हांला । त्वरीत निरोप देईजे ॥४४॥ ऐसे सांगता दीक्षितांप्रती । तये वेळी काय बोलती । आता पालटली तुझी मती । त्वरीत मागसी निरोप ॥४५॥ कोपला तुजवरी ईश्वर । जाईल राज्यलक्ष्मी सर्व । वचनी ठेवी निर्धार । निरोप तुज दिला असे ॥४६॥ सिद्धवाक्य सत्य झाले । रावबाजीचे राज्य गेले । ब्रह्मावर्ती राहिले । परतंत्र जन्मभरी ॥४७॥ एके समयी अक्कलकोटी । दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी । तेव्हा बोलले स्वामी यती । आम्ही त्याते जाणतो ॥४८॥ यज्ञसमारंभाचे अवसरी । आम्ही होतो त्यांच्या घरी । तूप वाढण्याची कामगिरी । आम्हांकडे तै होती ॥४९॥ लीलाविग्रही श्रीस्वामी । जयांचे आगमन त्रिभुवनी । ते दीक्षितांच्या सदनी । असतील नवल नसेची ॥५०॥ महासिद्ध दीक्षित । त्यांचे वर्णिले अल्पवृत्त । मुरगोडी बाळाप्पा येत । पुण्यस्थान जाणोनी ॥५१॥ तिथे ऐकिला वृत्तान्त । अक्कलकोटी स्वामीसमर्थ । भक्तजन तारणार्थ । यतिरुपे प्रगटले ॥५२॥ अमृतासमान रसाळ कथा । ऐकता पावन श्रोता-वक्ता । करोनिया एकाग्र चित्ता । अवधान द्यावे श्रोते हो ॥५३॥ पुढले अध्यायी कथन । बाळाप्पा करील जप ध्यान । तयाची भक्ती देखोन । स्वामी कृपा करतील ॥५४॥ भक्तजनांची माउली । अक्कलकोटी प्रगटली । सदा कृपेची साउली । आम्हांवरी करो ते ॥५५॥ मागणे हेचि स्वामीप्रती । दृढ इच्छा माझे चित्ती । शंकराची प्रेमळ प्रीती । दास विष्णुवरी असो ते ॥५६॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत प्रेमळ भक्त । दशमोऽध्याय गोड हा ॥५७॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

अध्याय ११
। श्री स्वामी चरित्र सारामृत एकादशोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥ मागले अध्यायी वर्णिले । बाळाप्पा मुरगोडी आले । पुण्यस्थानी राहिले । तीन रात्री आनंदे ॥१॥ तेथे कळला वृतान्त । अक्कलकोटी साक्षात । यतिरुपे श्रीदत्त । वास्तव्य सांप्रत करिताती ॥२॥ तेथे आपुला मनोदय । सिद्धीस जाईल निःसंशय । फिटेल सर्वही संदेह । श्री सद़्गुरुकृपेने ॥३॥ परी मुरगोडीचे विप्र । बाळाप्पासी सांगत । गाणगापूर विख्यात । महाक्षेत्र भीमातीरी ॥४॥ तेथे आपण जावोनी । बैसावे हो अनुष्ठानी । श्रीगुरु स्वप्नी येवोनी । सांगती तैसे करावे ॥५॥ मानला तयासी विचार । निघाले तेथूनी सत्वर । जवळी केले गाणगापूर । परम पावन स्थान ते ॥६॥ कामना धरोनी चित्ती । सेवेकरी सेवा करिती । जेथे वाहे भीमा नदी । स्नान करिती भक्तजन ॥७॥ पुत्रकामना धरुनी चित्ती । आराधिती नृसिंहसरस्वती । दरिद्री धन इच्छिती । रोगीजन आरोग्य ॥८॥ कोणी घालिती प्रदक्षिणा । कोणी ब्राह्मणभोजना । कोणी करिती गंगास्नाना । कोणी घालिती नमस्कार ॥९॥ तेथील सर्व सेवेकरी । नित्य नियमे दोन प्रहरी । मागोनिया मधुकरी । निर्वाह करिती आपुला ॥१०॥ बाळाप्पा तेथे पातले । स्थान पाहोनी आनंदले । नृसिंहसरस्वती पाऊले । प्रेमभावे वंदिली ॥११॥ प्रातःकाळी उठोनी । संगमावरी स्नान करोनी । जप ध्यान आटपोनी । मागुनी येती गावात ॥१२॥ सेवेकऱ्यांबरोबरी । मागोनिया मधुकरी । भोजनोत्तर संगमावरी । परतोनि येती ते ॥१३॥ माध्यान्ह स्नान करोनी । पुन्हा बैसली जप ध्यानी । अस्ता जाता वासरमणी । संध्यास्नान करावे ॥१४॥ करोनिया संध्यावंदन । जप आणि नामस्मरण । रात्र पडता परतोन । ग्रामामाजी येती ते ॥१५॥ बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी । संतती संपत्ती सर्व सदनी । परान्न ठावे नसे स्वप्नी । सांप्रत भिक्षा मागती ॥१६॥ सद़्गुरुप्राप्तीकरिता । सोडूनी गृह-सुत-कांता । शीतोष्णाची पर्वा न करिता । आनंदवृत्ती राहती ॥१७॥ पंचपक्वान्ने सेविती घरी । येथे मागती मधुकरी । मिळती कोरड्या भाकरी । उदर पूर्ती न होय ॥१८॥ शीतोष्णाचा होय त्रास । अर्धपोटी उपवास । परी तयांचे मानस । कदा उदास नोहेची ॥१९॥ अय्याराम सेवेकरी । राहत होते गाणगापुरी । त्यांनी देखुनी ऐसीपरी । बाळाप्पासी बोलती ॥२०॥ तुम्ही भिक्षा घेवोनी । नित्य यावे आमुच्या सदनी । जे जे पडेल तुम्हांस कमी । ते ते आम्ही पुरवू जी ॥२१॥ बाळाप्पासी मानवले । दोन दिवस तैसे केले । पोटभरोनी जेवले । परी संकोच मानसी ॥२२॥ जाणे सोडिले त्यांचे घरी । मागोनिया मधुकरी । जावोनिया संगमावरी । झोळी उदकी बुडवावी ॥२३॥ आणोनिया बाहेरी । बैसोनी तिथे शिळेवरी । मग खाव्या भाकरी । ऐसा नेम चालविला ॥२४॥ ऐसे लोटले काही दिवस । सर्व शरीर झाले कृश । निशिदीनी चिंता चित्तास । सद़्गुरुप्राप्तीची लागली ॥२५॥ घरदार सोडिले । वनिता पुत्रा त्यागिले । अतितर कष्ट सोशिले । सद़्गुरुकृपा नोहेची ॥२६॥ हीन आपुले प्राक्तन । भोग भोगवी दारुण । पहावे सद़्गुरुचरण । ऐसे पुण्य नसेची ॥२७॥ ऐसे विचार निशिदीनी । येती बाळाप्पाचे मनी । तथापि कष्ट सोसोनी । नित्य नेम चालविला ॥२८॥ एक मास होता निश्चिती । स्वप्नी तीन यतिमूर्ती । येवोनिया दर्शन देती । बाळाप्पा चित्ती सुखावे ॥२९॥ पंधरा दिवस गेल्यावरी । निद्रिस्त असता एके रात्री । एक ब्राह्मण स्वप्नाभीतरी । येवोनिया आज्ञापी ॥३०॥ अक्कलकोटी श्रीदत्त । स्वामीरुपे नांदत । तेथे जाऊनी त्वरित । कार्य इच्छित साधावे ॥३१॥ पाहोनिया ऐसे स्वप्न । मनी पावले समाधान । म्हणती केले कष्ट दारुण । त्याचे फळ मिळेल की ॥३२॥ अक्कलकोटी त्वरीत । जावयाचा विचार करीत । तव तयासी एक पत्र । शय्येखाली सापडले ॥३३॥ त्यात लिहिली एक ओळी । करु नये उतावळी । ऐसे पाहूनी त्या वेळी । विचार केला मानसी ॥३४॥ आपण केले अनुष्ठान । परी ते जाहले अपूर्ण । आणखीही काही दिन । क्रम आपुला चालवावा ॥३५॥ मग कोणे एके दिवशी । बाळाप्पा आले संगमासी । वृक्षातळी ठेवून वस्त्रासी । गेले स्नान करावया ॥३६॥ परतले स्नान करोनि । सत्वर आले त्या स्थानी । वस्त्र उचलिता खालोनी । वृश्चिक एक निघाला ॥३७॥ तयासी त्यांनी न मारिले । नित्यकर्म आटोपिले । ग्रामामाजी परत आले । गेले भिक्षेकारणे ॥३८॥ त्या दिवशी ग्रामाभीतरी । पक्वान्न मिळाले घरोघरी । बाळाप्पा तोषले अंतरी । उत्तम दिन मानिला ॥३९॥ अक्कलकोटी जावयासी । निघाले मग त्याच दिवशी । उत्तम शकुन तयांसी । मार्गावरी जाहले ॥४०॥ चरण-चाली चालोनी । अक्कलकोटी दुसरे दिनी । बाळाप्पा पोचले येवोनी । नगरी रम्य देखिली ॥४१॥ जेथे नृसिंहसरस्वती । यतिरुपे वास करिती । तेथे सर्व सौख्ये नांदती । आनंद भरला सर्वत्र ॥४२॥ तया नगरीच्या नारी । कामधंदा करिता घरी । गीत गाउनी परोपरी । स्वामीमहिमा वर्णिती ॥४३॥ दूर देशीचे ब्राह्मण । वैश्यादिक इतर वर्ण । स्वामीमहिमा ऐकोन । दर्शनाते धावती ॥४४॥ तयांची जाहली गर्दी । यात्रा उतरे घरोघरी । नामघोषे ते नगरी । रात्रंदिन गजबजे ॥४५॥ राजे आणि पंडित । शास्त्री वेदांती येत । तैसे भिक्षुक गृहस्थ । स्वामीदर्शनाकारणे ॥४६॥ कानफाटे नाथपंथी । संन्यासी फकीर यती । रामदासी अघोरपंथी । दर्शना येती स्वामींच्या ॥४७॥ कोणी करिती कीर्तन । गायन आणि वादन । कोणी भजनी नाचोन । स्वामीमहिमा वर्णिती ॥४८॥ तया क्षेत्रीच महिमान । केवी वर्णू मी अज्ञान । प्रत्यक्ष जे वैकुंठभुवन । स्वामीकृपेने जाहले ॥४९॥ पुण्यपावन देखोन नगरी । बाळाप्पा तोषले अंतरी । पूर्वपुण्य तयांचे पदरी । जन्मसार्थक जाहले ॥५०॥ बाळाप्पा होउनी सेवेकरी । स्वहस्ते करील श्रीचाकरी । ती मधुर कथा चतुरी । पुढील अध्यायी परिसावी ॥५१॥ जयाचा महिमा अगाध । जो केवळ सच्चिदानंद । विष्णूशंकरी अभेद । मित्रत्व ठेवो जन्मवरी ॥५२॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । श्रोते सदा परिसोत । एकादशोऽध्याय गोड हा ॥५३॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

अध्याय १२
। श्री स्वामी चरित्र सारामृत द्वादशोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥ करावया जगदुद्धार । हरावया भूभार । वारंवार परमेश्वर । नाना अवतार धरितसे ॥१॥ भक्तजन तारणार्थ । अक्कलकोटी श्रीदत्त । यतिरुपे प्रगट होत । तेची समर्थ श्रीस्वामी ॥२॥ गताध्यायाचे अंती । बाळाप्पा आले अक्कलकोटी । पुण्यनगर पाहोनी दृष्टी । आनंद पोटी नच मावे ॥३॥ त्या दिवशी श्री समर्थ । होते खासबागेत । यात्रा आली बहुत । गर्दी झाली श्रींजवळी ॥४॥ बाळाप्पाचे मानसी । तेव्ही चिंता पडली ऐशी । ऐशा गर्दीत आपणासी । दर्शन कैसे होईल ॥५॥ परी दर्शन घेतल्याविण । आज करु नये भोजन । बाळाप्पाचे तनमन । स्वामीचरणी लागले ॥६॥ दर्शनेच्छा उत्कट चित्ती । खडीसाखर घेवोनी हाती । गर्दीमाजी प्रवेश करिती । स्वामी सान्निध पातले ॥७॥ आजानुबाहू सुहास्यवदन । श्रीस्वामीमूर्ती पाहोन । बाळाप्पाने धावोन । दृढ चरण धरियेले ॥८॥ कंठ सद़्गदित जाहला । चरणी भाळ ठेविला । क्षणैक मीपण विसरला । परम तोषला मानसी ॥९॥ गंगा मिनली सागरी । जैसे तरंग जलाभीतरी । तैसे बाळाप्पा ते अवसरी । स्वामीचरणी दृढ झाले ॥१०॥ मधुस्तव भ्रमर जैसा । कमलपुष्प न सोडी सहसा । स्वामीचरणी बाळाप्पा तैसा । दृढ जडला स्वभावे ॥११॥ येवोनिया भानावरती । श्रीचरणांची सोडिली मिठी । ब्रह्मानंद न मावे पोटी । स्तोत्र ओठी गातसे ॥१२॥ श्री स्वामी समर्थ त्या वेळी । पडले होते भूतळी । उठोनिया काय केली । लीला एक विचित्र ॥१३॥ सर्व वृक्षांसी आलिंगन । दिले त्यांनी प्रेमेकरोन । बाळाप्पावरचे प्रेम । ऐशी कृतीने दाविले ॥१४॥ धन्यता मानोनी मनी । बाळाप्पा निघाले तेथोनी । परी तयांचे श्रीचरणी । चित्त गुंतले अखंड ॥१५॥ त्यासवे एक जहागिरदार । ते होते बिऱ्हाडावर । स्वयंपाक करोनी तयार । म्हणती जाऊ दर्शना ॥१६॥ बाळाप्पा दर्शन करोन । आले बिऱ्हाडी परतोन । जहागिरदारे नैवेद्य काढोन । बाळाप्पा हाती दिधला ॥१७॥ म्हणती जाउनी स्वामींसी । अर्पण करा नैवेद्यासी । अवश्य म्हणोनी तयांसी । बाळाप्पा तेव्हा चालले ॥१८॥ म्हणती नैवेद्य दाखवून । मग करु प्रसाद भक्षण । मार्गी तयांसी वर्तमान । विदीत एक जाहले ॥१९॥ या समयी श्री समर्थ । असती नृप मंदिरात । राजाज्ञेवाचूनी तेथ । प्रवेश कोणाचा न होय ॥२०॥ ऐसे ऐकूनी वर्तमान । बाळाप्पा मनी झाले खिन्न । म्हणती आज नैवेद्यार्पण । आपल्या हस्ते नोहेची ॥२१॥ मार्गावरुनी परतले । सत्वर बिऱ्हाडावरती आले । तेथे नैवेद्यार्पण केले । मग सारिले भोजन ॥२२॥ नित्य प्रातःकाळी उठोन । षट्कर्मांते आचरोन । घेवोनी स्वामी दर्शन । जपालागी बैसावे ॥२३॥ श्री शंकर उपास्य दैवत । त्याचे करावे पूजन नित्य । माध्यान्ही येता आदित्य । जपानुष्ठान आटपावे ॥२४॥ करी झोळी घेवोनी । श्री स्वामींजवळी येवोन । मस्तक ठेवोनी चरणी । जावे भिक्षेकारणे ॥२५॥ मागोनिया मधुकरी । मग यावे बिऱ्हाडावरी । जी मिळेल भाजीभाकरी । त्याने पोट भरावे ॥२६॥ घ्यावे स्वामी दर्शन । मग करावे अनुष्ठान । ऐशा प्रकारे करोन । अक्कलकोटी राहिले ॥२७॥ चोळाप्पा आदीकरोन । सेवेकरी बहुतजण । त्यांत सुंदराबाई म्हणून । मुख्य होती त्या वेळी ॥२८॥ आपण व्हावे सेवेकरी । इच्छा बाळाप्पाचे अंतरी । सुंदराबाईचिये करी । आधिपत्य सर्व असे ॥२९॥ एके दिवशी तयासी । बाई आज्ञा करी ऐशी । आपणही श्रीसेवेसी । करीत जावे आनंदे ॥३०॥ बाळाप्पा मनी आनंदला । म्हणे सुदिन आज उगवला । सद़्गुरुसेवेचा लाभ झाला । जाहले सार्थक जन्माचे ॥३१॥ बहुत जण सेवेकरी । बाई मुख्य त्यांमाझारी । सर्व अधिकार तिच्या करी । व्यवस्थेचा होता पै ॥३२॥ मी प्रिय बहु स्वामींसी । ऐसा अभिमान तियेसी । गर्वभरे इतरांसी । तुच्छ मानू लागली ॥३३॥ या कारणे आपसात । भांडणे होती सदोदित । स्वामीसेवेची तेथ । अव्यवस्था होतसे ॥३४॥ हे बाळाप्पांनी पाहोन । नाना युक्ती योजून । मोडुनि टाकिले भांडण । एकचित्त सर्व केले ॥३५॥ कोठेही असता समर्थ । पूजादिक व्हावया यथार्थ । तत्संबंधी सर्व साहित्य । बाळाप्पा सिद्ध ठेविती ॥३६॥ समर्थांच्या येता चित्ती । अरण्यांतही वस्ती करिती । परी तेथेही पूजा आरती । नियमे करिती बाळाप्पा ॥३७॥ बाळाप्पांची प्रेमळ भक्ती । पाहुनी संतोष स्वामीप्रती । दृढ भाव धरुनी चित्ती । सेवा करिती आनंदे ॥३८॥ ऐसे लोटता काही दिवस । बाळाप्पाचिया शरीरास । व्याधी जडली रात्रंदिवस । चैन नसे क्षणभरी ॥३९॥ बेंबीमधूनिया रक्त । वहातसे दिवसरात्र । तया दुःखे विव्हळ होत । म्हणती कैसे करावे ॥४०॥ भोग भोगिला काही दिन । कागदाची पुडी बेंबीतून । पडली ती पाहता उकलोन । विष त्यात निघाले ॥४१॥ पूर्वी कोण्या कृतघ्ने । बाळाप्पासी यावे मरण । विष दिधले कानोल्यातून । पडले आज बाहेर ॥४२॥ स्वामीकृपेने आजवरी । गुप्त राहिले होते उदरी । सद़्गुरुसेवा त्यांचे करी । व्हावी लिखित विधीचे ॥४३॥ आजवरी बहुतापरी । बाळाप्पा करी चाकरी । तयाचे अंतर परी । स्वामीमय न जाहले ॥४४॥ प्रत्येक सोमवारी तयांनी । महादेवांची पूजा करोनी । मग यावे परतोनी । स्वामीसेवेकारणे ॥४५॥ हे पाहोनी एके दिवशी । बाई विनवी समर्थांसी । आपण सांगुनी बाळाप्पासी । शंकरपूजनी वर्जावे ॥४६॥ तैशी आज्ञा तयाप्रती । एके दिनी समर्थ करिती । परी बाळाप्पाचे चित्ती । विश्वास काही पटेना ॥४७॥ बाईच्या आग्रहावरुन समर्थे दिली आज्ञा जाण । हे नसेल सत्य पूर्ण । विनोद केला निश्चये ॥४८॥ पूजा करणे उचित । न करावी हेचि सत्य । यापरी चिठ्ठ्या लिहित । प्रश्न पाहत बाळाप्पा ॥४९॥ एक चिठ्ठी तयातून । उचलुनी पाहता वाचून । न करावेची पूजन । तयामाजी लिहिलेसे ॥५०॥ तेव्हा सर्व भ्रांती फिटली । स्वामी आज्ञा सत्य मानिली । ही भानगड पाहिली । श्रीपाद भटजीने ॥५१॥ समर्थांचा पूर्ण भक्त । चोळाप्पा नामे विख्यात । तयाचा हा जामात । श्रापादभट्ट जाणिजे ॥५२॥ स्वामीपुढे भक्तजन । ठेविती द्रव्यादिक आणोन । ते सुंदराबाई उचलोन । नेत असे सत्वर ॥५३॥ त्यामुळे चोळप्पाप्रती । अल्प होई द्रव्यप्राप्ती । बाळाप्पामुळे म्हणती । नुकसान होते आपुले ॥५४॥ तेव्हा जामात श्वशुर । उभयतां करिती विचार । बाळाप्पाते आता दूर । केले पाहिजे युक्तीने ॥५५॥ श्रीपादभट्ट एके दिवशी । काय बोलती बाळाप्पासी । दारापुत्र सोडुनी देशी । आपण येथे राहिला ॥५६॥ आपण आल्यापासोन । आमुचे होते नुकसान । ऐसे बोल ऐकोन । बाळाप्पा मनी खिन्न झाला ॥५७॥ बाळाप्पा बोले वचन । तुमचे अन्न खावोन । करितो तुमचे नुकसान । व्यर्थ माझा जन्म हा ॥५८॥ स्वामींनी मज आज्ञा द्यावी । मी जातो आपुल्या गावी । परी तुम्ही युक्ती योजावी । आज्ञा होईल ऐशीच ॥५९॥ श्रीपादभट्टे एके दिवशी । विचारले समर्थांसी । कुलदेवतेच्या दर्शनासी । जावया इच्छी बाळाप्पा ॥६०॥ ऐसे ऐकुनिया समर्थ । हास्यमुखे काय बोलत । कुलदेवतेचे दर्शननित्य । बाळाप्पा येथे करीत असे ॥६१॥ तेव्हा निरुत्तर जाहला । ऐसा उपाय खुंटला । मग तयाने पाहिला । कारभार चिठ्ठ्यांचा ॥६२॥ तयाने पुसिले वर्तमान । बाळाप्पा सांगे संपूर्ण । श्रीपादभट्टे ऐकोन । कापट्य मनी आणिले ॥६३॥ म्हणे जावया आपणासी । समर्थ न देती आज्ञेसी । तरी टाकून चिठ्ठ्यांसी । आज्ञा घ्यावी आपण ॥६४॥ तयांचे कपट न जाणोनी । अवश्य म्हणे त्याच दिनी । दोन चिठ्ठ्या लिहोनी । उभयतांसी टाकिल्या ॥६५॥ चिठ्ठी आपुल्या करी । भटजी उचली सत्वरी । येथे राहूनी चाकरी । करी ऐसे लिहिलेसे ॥६६॥ भटजी मनी खिन्न झाला । सर्व उपाय खुंटला । महाराज आता बाळाप्पाला । न सोडतील निश्चये ॥६७॥ स्वामी चरणी दृढ भक्ती । बाळाप्पाची जडली होती । कैसा दूर तयाप्रती । करितील यती दयाळ ॥६८॥ जो केवळ दयाधन । भक्तकाजकल्पद्रुम । विष्णू शंकर दोघेजण । तयांसी शरण सदैव ॥६९॥ इति श्री स्वामी चरित्र । नाना प्राकृत कथा संमत । सदा प्रेमळ परिसोत । द्वादशोऽध्याय गोड हा ॥७०॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

गुरुवार, १९ मे, २०१६

४ ते ६ अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत

शुक्रवार दुसरा  दिवस ४ ते  ६ अध्याय
              श्री स्वामी  समर्थ

अध्याय (४)
श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थोध्याय

॥ श्री गणेशाय नमः ॥ मुखे कीर्तन करावे । अथवा श्रवणी ऐकावे । षोडशोपचारे पूजावे । स्वामीचरण भक्तीने ॥१॥ न लगे करणे तीर्थाटन । योग्याभ्यास होमहवन । सांडोनिया अवघा शीण । नामस्मरण करावे ॥२॥ स्वामी नामाचा जप करिता । चारी पुरुषार्थ योती हाता । स्वामीचरित्र गात ऐकता । पुनरावृत्ति चुकेल ॥३॥ गताध्यायाचे अंती । अक्कलकोटी आले यति । नृपराया दर्शन देती । स्वेच्छेने राहती तया पुरी ॥४॥ चोळप्पाचा दृढ भाव । घरी राहिले स्वामीराव । हे तयाचे सुकृत पूर्व । नित्य सेवा घडे त्याते ॥५॥ जे केवळ वैकुंठवासी । अष्टसिद्धी ज्यांच्या दासी । नवविधी तत्पर सेवेसी । ते धरिती मानवरुप ॥६॥ चोळप्पा केवळ निर्धन । परी स्वामीकृपा होता पूर्ण । लक्ष्मी होऊनिया आपण । सहज आली तया घरी ॥७॥ कैसी आहे तयाची भक्ती । नित्य पाहती परीक्षा यति । नाना प्रकारे त्रास देती । परी तो कधी न कंटाळे ॥८॥ चोळप्पाची सद़्गुणी कांता । तीही केवळ पतिव्रता । सदोदित तिच्या चित्ता । आनंद स्वामीसेवेचा ॥९॥ स्वामी नाना खेळ खेळती । विचित्र लीला दाखविती । नगरवासी जनांची भक्ती । दिवसेंदिवस दृढ जडली ॥१०॥ स्वामी केवळ ईश्वरमूर्ती । देशोदेशी झाली ख्याती । बहुत लोक दर्शना येती । कामना चित्ती धरोनी ॥११॥ कोणी संपत्तीकारणे । कोणी मागते संताने । व्हावी म्हणोनिया लग्ने येती दूर देशाहूनी ॥१२॥ शरीरभोगे कष्टले । संसारतापे तप्त झाले । मायामय पसाऱ्याते फसले । ऐसे आले किती एक ॥१३॥ सर्वांशी कल्पद्रुमासमान । होऊनी कामना करिती पूर्ण । भक्तकाजास्तव अवतीर्ण । मानवरूपे जाहले ॥१४॥ भक्त अंतरी जे जे इच्छिती । ते ते यतिराज पुरविती । दृढ चरणी जयांची भक्ति । त्यासी होती कल्पतरू ॥१५॥ जे का निंदक कुटिल । तया शास्ते केवळे । नास्तिकाप्रती तात्काळ । योग्य शासन करिताती ॥१६॥ महिमा वाढला विशेष । कित्येक करू लागले द्वेष । कोणा एका समयास । वर्तमान घडले पै ॥१७॥ कोणी दोन संन्यासी । आले अक्कलकोटासी । हासोनि म्हणती जनांसी । ढोंगियाच्या नादी लागला ॥१८॥ हा स्वामी नव्हे ढोंगी । जो नाना भोग भोगी । साधू लक्षणे याचे अंगी । कोणते ही वसतसे ॥१९॥ काय तुम्हा वेड लागले । वंदिता ढोंग्याची पाऊले । यात स्वार्थ ना परमार्थ मिळे । फसला तुम्ही अवघेही ॥२०॥ ऐसे तयांनी निंदिले । समर्थांनी अंतरी जाणिले । जेव्हा ते भेटीसी आले । तेव्हा केले नवल एक ॥२१॥ पहावया आले लक्षण । समर्थ समजले ती खूण । ज्या घरी बैसले तेथोन । उठोनिया चालिले ॥२२॥ एका भक्ताचिया घरी । पातली समर्थांची स्वारी । तेही दोघे अविचारी । होते बरोबरी संन्यासी ॥२३॥ तेथे या तिन्ही मूर्ती । बैसविल्या भक्ते पाटावरती । श्रीस्वामी आपुले चित्ती । चमत्कार म्हणती करू आता ॥२४॥ दर्शनेच्छू जन असंख्यात । पातले तेथे क्षणार्धात । समाज दाटला बहुत । एकच गर्दी जाहली ॥२५॥ दर्शन घेऊन चरणांचे । मंगल नांव गर्जतीवाचे । हेतू पुरवावे मनीचे । म्हणोनिया विनविती ॥२६॥ कोणी द्रव्य पुढे ठेविती । कोणी फळे समर्पिती । नाना वस्तू अर्पण करिती । नाही मिती तयांचे ॥२७॥ कोणी नवसाते करिती । कोणी आणोनिया देती । कोणी काही संकल्प करिती । चरण पूजिती आनंदे ॥२८॥ संन्यासी कौतुक पाहती । मनामाजी आश्चर्य करिती । क्षण एक तटस्थ होती । वैरभाव विसरोनी ॥२९॥ क्षण एक घडता सत्संगती । तत्काळ पालटे की कुमति । म्हणोनी कवि वर्णिताती । संतमहिमा विशेष ॥३०॥ स्वामीपुढे जे जे पदार्थ । पडले होते असंख्यात । ते निजहस्ते समर्थ । संन्याशांपुढे लोटिती ॥३१॥ पाणी सुटले त्यांच्या मुखासी । म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी । आजसारा दिवस उपवासी । जीव आमुचा कळवळला ॥३२॥ मोडली जनांची गर्दी । तो येवोनी सेवेकरी । संन्याशांपुढल्या नानापरी । वस्तू नेऊ लागले ॥३३॥ तेव्हा एक क्षणार्धात । द्रव्यादिक सारे नेत । संन्यासी मनी झुरत । व्याकुळ होत भुकेने ॥३४॥ समर्थांनी त्या दिवशी । स्पर्श न केला अन्नोदकासी । सूर्य जाता अस्ताचलासी । तेथोनिया उठले ॥३५॥ दोघे संन्यासी त्या दिवशी । राहिले केवळ उपवासी । रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्य असे ॥३६॥ जे पातले करू छळणा । त्यांची जाहली विटंबना । दंडावया कुत्सित जना । अवतरले यतिवर्य ॥३७॥ त्यांच्या चरणी ज्यांची भक्ति । त्यांचे मनोरथ पुरविती । पसरली जगी ऐशी ख्याती । लीला ज्यांची विचित्र ॥३८॥ श्रीपादवल्लभ भक्ति । कलियुगी वाढेल निश्चिती । त्यांचा अवतार स्वामी यति । वर्णी कीर्ती विष्णुदास ॥३९॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त । चतुर्थोध्याय गोड हा ॥४०॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

अध्याय (५)

। श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥ भवकानन वैश्वानरा । अज्ञानतमच्छेदका भास्करा । पूर्णसाक्षी परात्परा । भक्ता खरा सदय तू ॥१॥ गंगाजळ जैसे निर्मळ । तैसे तुझे मन कोमल । तुजसी स्तवितां प्रेमळ । सत्वर त्याते पावसी ॥२॥ विशेष गंगाजळाहून । आपुले असे महिमान । पाप ताप आणि दैन्य । तुमच्या स्मरणे निवारती ॥३॥ स्वामीचरित्र कराया श्रवण । श्रोते बैसले सावधान । प्रसंगाहूनि प्रसंग पूर्ण । रसभरित पुढे पुढे ॥४॥ ज्यांचे सबळ पूर्वपुण्य । तया झाले स्वामीदर्शन । ऐसे चोळप्पा आदीकरून । भाग्यवंत सेवेकरी ॥५॥ अक्कलकोट नगरात । एक तपापर्यंत । स्वामीराज वास करीत । भक्त बहुत जाहले ॥६॥ वार्ता पसरली चहूकडे । कोणासी पडता साकडे । धाव घेती स्वामींकडे । राजेरजवाडे थोर थोर ॥७॥ म्हणती भोसल्यांचे भाग्य परम । स्वामीरत्न लाभले उत्तम । नृपतीही भक्त निःस्सीम । स्वामीचरणी चित्त त्यांचे ॥८॥ तेव्ही किती एक नृपती । स्वामीदर्शन घेऊ इच्छिती । आणि आपुल्या नगराप्रती । आणू म्हणती तयांसी ॥९॥ बडोद्यामाजी त्या अवसरी । मल्हारराव राज्याधिकारी । एकदा तयांचे अंतरी । विचार ऐसा पातला ॥१०॥ अक्कलकोटाहुनी स्वामींसी । आणावे आपुल्या नगरासी । मग कोणे एके दिवशी । विचार ऐसा पातला ॥११॥ दिवाण आणि सरदार । मानकरी तैसे थोर थोर । बैसले असता समग्र । बोले नृपवर तयांप्रती ॥१२॥ कोणी जाऊनी अक्कलकोटासी । येथे आणील स्वामींसी । तरी आम्ही तयासी । इनाम देऊ बहुत ॥१३॥ त्याचा राखू सन्मान । लागेल तितुके देऊ धन । ही वटपुरी वैकुंठभवन । वसता स्वामी होईल ॥१४॥ कार्य जाणुनी कठीण । कोणी न बोलती वचन । कोणा एका लागून । गोष्ट मान्य करवेना ॥१५॥ तेव्हा तात्यासाहेब सरदार । होता योग्य आणि चतुर । तो बोलता झाला उत्तर । नृपालागी परियेसा ॥१६॥ आपुली जरी इच्छा ऐसी । स्वामींते आणावे वटपुरीसी । तरी मी आणीन तयांसी । निश्चय मानसी असो द्या ॥१७॥ ऐसे ऐकोनी उत्तर । संतोषला तो नृपवर । तैसी सभाही समग्र । आनंदित जाहली ॥१८॥ संजिवनी विद्या साधण्याकरिता । शुक्राजवळी कच जाता । दैवी सन्मानिला होता । बहुत आनंदे करोनी ॥१९॥ नृपतीसह सकळ जने । त्यापरी तात्यांसी सन्माने । गौरवोनि मधुर वचने । यशस्वी म्हणती तया ॥२०॥ बहुत धन देत नृपती । सेवक दिधले सांगाती । जावया अक्कलकोटाप्रती । आज्ञा दिधली तात्याते ॥२१॥ तात्यासाहेब निघाले । सत्वर अक्कलकोटी आले । नगर पाहुनी संतोषले । जे केवळ वैकुंठ ॥२२॥ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती । आनंदीत झाले चित्ती । तेथील जनांची पाहुनी भक्ती । धन्य म्हणती तयाते ॥२३॥ अक्कलकोटीचे नृपती । स्वामीचरणी त्यांची भक्ती । राजघराण्यातील युवती । त्याही करिती स्वामीसेवा ॥२४॥ आणि सर्व नागरिक । तेही झाले स्वामीसेवक । त्यांत वरिष्ठ चोळप्पादिक । सेवेकरी निःस्सीम ॥२५॥ ऐसे पाहुनी तात्यांसी । विचार पडला मानसी । या नगरातुनी स्वामीसी । कैसे नेऊ आपण ॥२६॥ अक्कलकोटीचे सकल जन । स्वामीभक्त झाले पूर्ण । स्वामींचेही मन रमोन । गेले ऐसे ह्या ठाया ॥२७॥ प्रयत्नांती परमेश्वर । प्रयत्ने कार्य होय सत्वर । लढवोनी युक्ति थोर । कार्य आपण साधावे ॥२८॥ ऐसा मनी विचार करोनी । कार्य आरंभिले तात्यांनी । संतुष्ट रहावे सेवकजनी । ऐसे सदा करिताती ॥२९॥ करोनी नाना पक्वान्ने । करिती ब्राह्मणभोजने । दिधली बहुसाल दाने । याचक धने तृप्त केले ॥३०॥ स्वामीचिया पूजेप्रती । नाना द्रव्ये समर्पिती । जेणे सेवेकरी संतुष्ट होती । ऐसे करिती सर्वदा ॥३१॥ प्रसन्न व्हावे भक्तवत्सले । कार्य साधावे आपुले । म्हणोनी नाना उपाय केले । द्रव्य वेचिले तात्यांनी ॥३२॥ ऐशीयाने काही न झाले । केले तितुके व्यर्थे गेले । तात्या मनी खिन्न झाले । विचार पडला तयांसी ॥३३॥ मग लढविली एक युक्ती । एकांती गाठूनी चोळप्पाप्रती । त्याजलागी विनंती करिती । बुद्धीवाद सांगती त्या ॥३४॥ जरी तुम्ही समर्थांसी । घेऊनी याल बडोद्यासी । मग मल्हारराव आदरेसी । इनाम देतील तुम्हाते ॥३५॥ मान राहील दरबारी । आणि देतील जहागिरी । ऐसे नानाप्रकारी । चोळप्पाते सांगितले ॥३६॥ द्रव्येण सर्वे वशः । चोळप्पासी लागली आशा । तयाच्या अंतरी भरवसा । जहागिरीचा बहुसाल ॥३७॥ मग कोणे एके दिवशी । करीत असता स्वामीसेवेसी । यतिराज तया समयासी । आनंदवृत्ती बैसले ॥३८॥ चोळप्पाने कर जोडोनी । विनंती केली मधुर वचनी । कृपाळू होऊनी समर्थांनी । बडोद्याप्रती चलावे ॥३९॥ तेणे माझे कल्याण । मिळेल मला बहुत धन । आपुलाही योग्य सन्मान । तेथे जाता होईल ॥४०॥ ऐसे ऐकोनिया वचन । समर्थांनी हास्य करोन । उत्तर चोळप्पालागोन । काय दिले सत्वर ॥४१॥ रावमल्हार नृपती । त्याच्या अंतरी नाही भक्ती । मग आम्ही बडोद्याप्रती । काय म्हणोनी चलावे ॥४२॥ पुढले अध्यायी सुंदर कथा । पावन होय श्रोता वक्ता । श्रीस्वामीराज वदविता । निमित्त विष्णूदास असे ॥४३॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा ऐकोत भाविक भक्त । पंचमोध्याय गोड हा ॥४४॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

अध्याय (६)

। श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥ धरोनी शिशूचा हात । अक्षरे पंडित लिहवीत । तैसे स्वामीचरित्रामृत । स्वामी समर्थ वदविती ॥१॥ मी केवळ मतिमंद । केवी वर्णू चरित्र अगाध । परी माझा हा छंद । स्वामी समर्थ पुरविती ॥२॥ ज्यांच्या वरप्रसादे करून । मुढा होई शास्त्रज्ञान । त्या समर्थांचे चरण । वारंवार नमितसे ॥३॥ कृपाळू होऊन समर्था । वदवावे आपुल्या चरित्रा । श्रवणे श्रोतयांच्या चित्ता । ब्रह्मानंद प्राप्त होवो ॥४॥ सुरतरूची घेऊनी सुमने । त्यासीच अर्पावी प्रीतीने । झाला ग्रंथ स्वामीकृपेने । त्यांच्याच पदी अर्पिजे ॥५॥ मागील अध्यायाच्या अंती । चोळप्पा विनवी स्वामीप्रती । कृपा करोनी मजवरती । बडोद्याप्रती चलावे ॥६॥ भाषण ऐसे ऐकोनी । समर्थ बोलती हसोनी । मल्हाररावाचिया मनी । आम्हांविषयी भाव नसे ॥७॥ म्हणोनी तयाच्या नगरात । आम्हा जाणे नव्हे उचित । अक्कलकोट नगरांत । आम्हा राहणे आवडे ॥८॥ ऐसी ऐकोनिया वाणी । चोळप्पा खिन्न झाला मनी । त्याने सत्वर येवोनी । तात्यांप्रती सांगितले ॥९॥ ऐसा यत्न व्यर्थ गेला । तात्या मनी चिंतावला । आपण आलो ज्या कार्याला । ते न जाय सिद्धीसी ॥१०॥ परी पहावा यत्न करोनी । ऐसा विचार केला मनी । मग काय केले तात्यांनी । अनुष्ठान आरंभिले ॥११॥ ऐसे नाना उपाय केले । परी ते सर्व व्यर्थ गेले । कार्य सिद्धीस न गेले । खिन्न झाले मुख त्यांचे ॥१२॥ भक्ती नाही अंतरी । दांभिक साधनांते करी । तयांते स्वामी नरहरी । प्रसन्न कैसे होतील ॥१३॥ तयांनी माजविली ढोंगे । आणि केली नाना सोंगे । भक्तीवीण हटयोगे । स्वामीकृपा न होय ॥१४॥ मग तात्यांनी काय केले । सप्ताहासी ब्राह्मण बैसविले । गुरुचरित्र आरंभिले । व्हावयासी स्वामीकृपा ॥१५॥ परी तयाच्या वाड्यात । कधी न गेले समर्थ । तात्या झाला व्यग्रचित्त । काही उपाय सुचेना ॥१६॥ मल्हारराव नृपाने । पाठविले ज्या कार्याकारणे । ते आपुल्या हातून होणे । अशक्य असे वाटते ॥१७॥ आता जाऊनी बडोद्यासी । काय सांगावे राजयासी । आमि सकळ जनांसी । तोंड कैसे दाखवावे ॥१८॥ ऐशा उपाये करोन । न होती स्वामी प्रसन्न । आता एक युक्ति योजून । न्यावे पळवोन यतीसी ॥१९॥ स्वामी केवळ ईश्वरमूर्ती । हे नेणे तो मंदमती । म्हणूनी योजिली कपटयुक्ती । परी ते सिद्धीते न जाय ॥२०॥ असो कोणे एके दिवशी । साधोनी योग्य समयासी । मेण्यात घालोनी स्वामीसी । तात्यासाहेब निघाले ॥२१॥ कडबगांवचा मार्ग धरिला । अर्धमार्गी मेणा आला । अंतरसाक्षी समर्थांला । गोष्ट विदित जाहली ॥२२॥ मेण्यातून उतरले । मागुती अक्कलकोटी आले । ऐसे बहुत वेळा घडले । हाही उपाय खुंटला ॥२३॥ मग पुढे राजवाड्यांत । जाऊनिया राहिले समर्थ । तेव्हा उपाय खुंटत । टेकिले हात तात्यांनी ॥२४॥ या प्रकारे यत्न केले । परी तितुके व्यर्थ गेले । व्यर्थ दिवस गमाविले । द्रव्य वेचिले व्यर्थची ॥२५॥ मग अपयशाते घेवोनी । बडोद्यासी आले परतोनी । समर्थकृपा भक्तीवाचोनी । अन्य उपाये न होय ॥२६॥ परी मल्हारराव नृपती । प्रयत्न आरंभिती पुढती । सर्वत्रांसी विचारीती । कोण जातो स्वामींकडे ॥२७॥ तेव्ही मराठा उमराव । नृपकार्याची धरुनी हाव । आपण पुढे जाहला ॥२८॥ स्वामीकारणे वस्त्रे भूषणे । धन आणि अमोल रत्ने । देऊनी त्याजवळी नृपाने । आज्ञा दिधली जावया ॥२९॥ तो येवोनी अक्कलकोटी । घेतली समर्थांची भेटी । वस्त्रे अलंकार सुवर्णताटी । स्वामीपुढे ठेवित ॥३०॥ ती पाहून समर्थाला । तेव्हा अनिवार क्रोध आला । यशवंता पाहोनी डोळा । काय तेव्हा बोलले ॥३१॥ अरे बेडी आणोनी । सत्वर ठोका याचे चरणी । ऐसे त्रिवार मोठ्यांनी । समर्थ क्रोधे बोलले ॥३२॥ क्रोध मुद्रा पाहोनी । यशवंतराव भ्याला मनी । पळाले तोंडचे पाणी । लटलटा कापू लागला ॥३३॥ मग थोड्याच दिवशी । आज्ञा आली यशवंतासी । सत्वर यावे बडोद्यासी । तेथील कार्यासी सोडोनी ॥३४॥ साहेबा विषप्रयोग केला । मल्हाररावावरी आळ आला । त्या कृत्यामाजी यशवंताला । गुन्हेगार लेखिले ॥३५॥ हाती पायी बेडी पडली । स्वामीवचनाची प्रचिता आली । अघटित लीला दाविली । ख्याती झाली सर्वत्र ॥३६॥ समर्थांची अवकृपा जयावरी । त्याच्या कष्ट होती शरीरी । कृपा होय जयावरी । तया सर्वानंद प्राप्त होय ॥३७॥ महासमर्था भक्तपालका । अनादिसिद्धा जगन्नायका । निशिदिनी शंकर सखा । विष्णूचिया मनी वसे ॥३८॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा भक्त परिसोत । षष्ठोध्याय गोड हा ॥३९॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥