सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५

● श्रीकांत जिचकार ●


भारतातील सर्वात शिक्षण घेतलेली व्यक्ती

►►एकच माणूस डॉक्टर होता, तो वकिलही होता, तो आयपीएस म्हणजे जिल्हा पोलिस प्रमुख दर्जाचा अधिकारी तसंच आयएएस म्हणजे कलेक्टर दर्जाचा अधिकारी होता. याशिवाय तो पत्रकारही होता. इतकंच नाही तो किर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता. इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे श्रीकांत जिचकार होय.

►►शैक्षणिक क्षेत्रातील ‘महामेरू’ म्हणून संबोधता येईल, असं नाव म्हणजे श्रीकांत जिचकार होय. अवघ्या 49 वर्षांचं जीवन, 42 विद्यापीठं, 20 पदव्या आणि 28 सुवर्णपदकं असा ज्ञानाचा खजिना या अवलियाने जिंकला.

►►आयएस असो वा आयपीएस, एलएलएम असो वा एमबीबीएस, देशातील बहुतेक सर्वच पदव्यां मिळवण्याचा विक्रम श्रीकांत जिचकार यांच्या नावावर जमा आहे.

►►जिचकारांनी मिळवलेल्या 20 पदव्यांमध्ये एमबीबीएस आणि एमडी, एलएलबी, एलएलएम, डीबीएम आणि एमबीए, जर्नालिझम यांचा समावेश आहे. जिचकरांनी 10 विषयांत एम ए केलं. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉपी, राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्व, मानसशास्त्र यांचा समावेश आहे.

►►जिचकारांनी संस्कृतमध्ये मानाची डी.लिट ही पदवी मिळवली.

►►जिचकारांनी मिळवलेल्या बहुतेक पदव्या या प्रथम श्रेणीतून मिळवल्या आहेत.

►►श्रीकांत जिचकार यांची भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तींच्या पक्तिंत गणती होते. या ज्ञानयोगी चैतन्याच्या झऱ्याने, ज्ञानदेवता सरस्वतीलाही अक्षरश: मोहून टाकलं. त्यामुळेच आपल्या अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एकही वर्ष वाया जाऊ न देता, बहुतेक सर्व पदव्यांवर नाव कोरलं.

►►जिचकार यांनी 1978 साली यूपीएससीची परीक्षा दिली. यामध्ये त्यांनी अपेक्षित यश मिळवून आयपीएस झाले. पुढे दोनच वर्षात म्हणजे 1980 साली त्यांनी आयएएसची पदवी खिशात टाकली.

►►जिचकार यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये ५२,००० पुस्तकांचा संग्रह आहे.

►►एखाद्या विद्यार्थ्याने आयएएसचं स्वप्न पाहिलं असेल. त्यासाठी अपार मेहनत करून आएएस होणारे अधिकारी आपण पाहिलेत. ही परीक्षा पास झाल्यानंतर अशा विद्यार्थ्यांचा गगनात आनंद मावेनासा होतो. साहजिकच आहे.

►►मात्र जिचकार नावाचा ज्ञानयोगी वेगळाच होता. जिचकारांनी सरकारी बाबू म्हणून न मिरवता, अवघ्या चारच महिन्यात आएएसला रामराम ठोकून राजीनामा दिला.

►►विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आयएएसचा राजीनामा दिला.

►►या बुद्धिवंताने वयाच्या 25 व्या वर्षी पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि जिंकून दाखवली. जिचकार महाराष्ट्र विधानसभेमध्ये १९८० साली वयाच्या २५ व्या वर्षी निवडून गेले. महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेलेले ते सर्वांत तरुण सभासद होते.

►►जिचकारांनी १२ वर्षे विधानसभेमध्ये काम केले. एकेकाळी त्यांच्याकडे १४ खात्यांचा कारभार होता.

►►यानंतर त्यांनी राज्यसभेवरही धडक मारली. १९९२ साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली. जिचकार १९९८ सालापर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. या काळामध्ये त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले. त्यांनी युनो आणि युनेस्को संघटनांसाठी ही काम केले.

►►लोकसभेच्या रिंगणात मात्र जिचकारांचा पराभव झाला. 1999 साली झालेल्या निवडणुकीत त्यांचा 3000 मतांनी पराभव झाला.

►► जिचकारांचा २ जून, इ.स. २००४ रोजी नागपुराजवळ कोढली गावानजीक घडलेल्या कार-अपघातामध्ये मृत्यू झाला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा