सोमवार, २३ मे, २०१६

गुरुचरित्र (किंवा सप्तशती) स्त्रियांनी वाचावे का? .

गुरुचरित्र (किंवा सप्तशती) स्त्रियांनी वाचावे का?
.
त्याचे यथामती माझे उत्तर असे राहील.
.
गुरु चरित्रामध्ये पस्तिसाव्या अध्यायात सांगितले आहे की,
स्त्रिया केवी मंत्रहीन । शुक्राचार्या कैसे झाले ॥८॥
विस्तारोनि आम्हासी । सांगा स्वामी कृपेसी ।
म्हणोनि लागली चरणासी । करुणावचनेकरोनिया ॥९॥
श्रीगुरु सांगती तियेसी । पूर्वकथा आहे ऐसी ।
.
आणि पुढे शुक्राचार्य, दमयंती आणि बृहस्पती पुत्र कच याची मंत्र षटकर्णी कसा केला ही गोष्ट आली आहे.
.
श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. स्त्रींयानी गुरूचरीत्राचे पारायण करू नये असे म्हणतात. पारायणासाठी ज्या गोष्टींचे पालन करायला लागते त्याचे पालनात स्त्रीधर्मामुळे खंड पडण्याची शक्यता असते. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे.
.
पण एक सांगा, जे करू नये तेच का आपल्याला करायचे असते. स्त्रियांनी स्त्रीधर्म पाळावा, पुरुषांनी पुरुष धर्म पाळावा, ते सोडून भलतीकडेच विषय नेण्याची सवय मात्र चांगली नव्हे. स्त्रियांवर मौंजी बंधन संस्कार, शास्त्राध्ययन अधिकार प्राप्ती झालेली नसते. त्यांच्या शरीरात असलेल्या अंड कोशाला बीज मंत्रांनी, मंत्राच्या सामर्थ्याने, उच्चारवाने आघात होवू शकतो.
.
स्त्रियांना मंत्राधिकार नसतात, संध्यावन्दनाचा अधिकार नसतो, मग संकल्प कसा सोडणार. यापूर्वी मी एकदा गुरुचरित्र वाचण्यापूर्वी सोडण्याचा संकल्प पोस्ट केला होता, तो वाचला की आपल्याला कळेल.
.
त्यांनी गुरुचरित्र ऐकावे, वाचू नये. तसेच सप्तशती देखील वाचू नये. शिवाय गुरुचरित्रातले काही अध्याय (२६ वेदरचना, ३६ कर्ममार्ग) हे अध्याय त्यांनी ऐकू देखील नये. त्यात काही बंध, मुद्रा, वैदिक बीजमंत्र आलेले आहेत.
.
स्त्रियांना बीजात्मक मंत्र सिद्ध करण्याचे अधिकार आणि सामर्थ्य नसते. पूर्वीच्या वैदिक स्त्रियांचे दाखले आजच्या कलियुगात चालत नाही, त्यांनी स्वत:ला सिद्ध केले होते. वैदिक काळात गार्गी, मैत्रेयी आदी स्त्रियांनी शास्त्रार्थामधील चर्चेत पुरुषांना देखील लाजविले होते. अध्ययन, सहशीक्षा या गोष्टीला वैदिक काळात प्रोत्साहन दिले जाण्याचेच हे दाखले आहेत.
.
हरित संहिताच्या अनुसार महिला दोन प्रकारच्या असतात, ब्रह्मवादिनी आणि सद्योवाह. यातल्या ब्रह्मवादिनी प्रकारच्या स्त्रियांनी शास्त्रानुसार सारे संस्कार काराबून त्या वेदाध्ययन करण्यास पत्र होत्या, त्या आजन्म ब्रह्मचारिणी राहिल्या होत्या. सद्योवाह स्त्रिया या गृहस्थाश्रमात राहून अनुरूप कर्मे करत होत्या. विशेष म्हणजे ब्रह्मवादिनी स्त्रियां शाम्भावोपाय दिक्षाधिकारी या पात्रतेतील होत्या. काव्य रचना, त्याग, त[अस्य द्वारा त्यांनी ऋषी भाव प्राप्त केलेला होता. त्यांना मंत्राचा साक्षात्कार झालेला होता.
.
त्यांनी ऋग्वेदातील अनेक सुक्त सिद्ध केले होते, साक्षात्कृत केले होते. उदाहरणार्थ,
ऋग्वेद दशम मंडळातले ३९, ४० वे सुक्त तपस्विनी ब्रह्मवादिनी घोषा यांचे आहे.
ऋग्वेदातील १.२७.७ वा मंत्र ऋषिका रोमशा यांचा आहे.
१.५.२९ वा मंत्र ऋषिका विश्वारा यांचा आहे.
१.१०.४५ व मंत्र दृष्टा इंद्राणी यांचा आहे.
१.१०१५९ व मंत्र ऋषिका अपाला यांचा आहे.
तसेच सूर्या नावाची देखील एक ब्रह्मवादिनी ऋषिका होती.
अगस्त्य ऋषी पत्नी लोपामुद्रा सती यांनी देखील आपल्या पती बरोबर सूक्तांचे दर्शन केले होते.
.
या वैदिक काळातील स्त्रियांनी यज्ञोपवीत संस्कार केले होते, त्या वेद, उपनिषद जनात होत्या. शास्त्रोक्त संध्या वंदनादी विधी करून त्या त्या देवता प्रसन्न करवून घेतल्या होत्या. जेव्हा हवे तेव्हा या स्त्रिया हव्या त्या देवतांना आवाहन करीत आणि देवता देखील क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या सेवेत तत्पर असत, एवढा अधिकार त्यांनी मिळवला होता.

वेद काळातील अदिती, उषा, इंद्राणी, इला, सिनीवाली, प्रश्नि या सुप्रसिद्ध देवस्त्री, ब्रह्मर्षी, ऋषिका होत्या. यात अदिती या नावाचा उल्लेख सर्वाधिक झालेला आहे. या साऱ्या सर्वशक्तीमती, विश्वहितैषीणी तथा मंगलकारिणी देवी मानल्या गेल्या. यांच्या शिवाय दिति, सीता, सूर्या, वाक, सरस्वती यांचे देखील स्तवन होते.
.
निष्कर्ष: जर आजच्या काळात या अधिकारापर्यंत पोचण्याची क्षमता आणि शास्त्रसंमत विधिवत ज्ञानपिपासा असलेल्या अधिकारी स्त्रियांनी वेदशास्त्र अध्ययन करण्यास, गुरुचरित्र वाचण्यास, सप्तशती वाचण्यास काहीच हरकत नाही.
.
.
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त.⁠⁠⁠⁠
श्री. विष्णुजी राऊत, पुणे
श्री. श्रीकृष्ण पुराणिक

४ टिप्पण्या:

  1. ही पोस्ट मी लिहिलेली आहे, आणि ती या लिंकवर बघायला मिळेल.
    https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=1175337612525954&id=434744516585271

    पोस्ट करणाऱ्याने कृपया लिंक जशी आहे तशी पोस्ट करण्याची तसदी घ्यावी. स्वत:च्या नावे खपविल्याने आपल्याला काही विशेष समाधान मिळत असेल तर ठीक आहे. पण परमार्थात वृथा अभिमान त्याग करायचा असतो. आपण तर आपले "मी" पण घेवून फिरत आहात.

    काल आमच्या शक्तिपात साधक या व्हाट्सअप ग्रुप वर 'श्री विष्णुजी राउत' यांनी हा विचारलेला प्रश्न होता, "स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का?" त्याचे उत्तर दिले नी दोन्ही Facebook ग्रुप वर ते पोस्ट केले. तिथून या पोस्ट ची उचलबांगडी झाली आणि अजून कुठे कुठे आणि कुणी कुणी पोस्ट केली देव जाणे.
    .
    परमार्थात आधी "मी" जायला हवे. पोस्ट जर आपल्याला आवडली असेल, वाचनीय असेल, ती इतरांनी देखील वाचावी असे वाटत असेल तर ती जशी आहे तशी टाकायला काय अडचण असते ते कळत नाही. "मी" च जर सुटत नसेल तर परमार्थाचा प्रपंचच झाला, ढोंगी परमार्थाचे हे ज्वलंत उदाहरण.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. श्री श्रीकृष्ण पुराणिक सर नमस्कार
      सर्व प्रथम आपले पोस्ट बद्दल सदर्भसहित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
      सदर माहितीही अतिशय उपयुक्त असल्याने संग्रह म्हणून व् माहिती साठी पोस्ट केलि आहे. आपण सन्दर्भ दिल्यामुळे पोस्टमधे बदल करुन आपल्या नावाने प्रसिद्ध करीत आहोत.
      अशीच उपयुक्त माहिती पाठविल्यास आपल्या नावसाहित प्रसिद्द करण्यात येईल.
      Thanks

      हटवा
  2. मराठी भाषेतून गुरूचरित्र असेल तर ते वाचवयास हरकत नही ना?

    उत्तर द्याहटवा