चाळीसगावच्या लेकीनं मारली आहे अंतराळ क्षेत्रात भरारी. नासाच्या विमानांच्या डिझाईनसाठी चर्चेत आलेल्या स्वीटी पाटेनं आता एक नवं स्पेस शटलचं डिझाईन तयार केलं आहे. त्यामुळे ५० प्रवासी अंतराळात एकाचवेळी जाऊ शकणार आहेत.
चाळीसगावची स्वीटी पाटे…वय अवघे 20 वर्षे…अमेरिकेतल्या एरोनॉटिक्स आणि अॅस्ट्रोनॉटिक्स फाऊंडेशनच्या स्पर्धेत स्वातीनं तिसरा क्रमांक मिळवला आहे. तिच्या या स्पेस शटलचं नाव आहे ‘क्षितीज वाहक’.
या स्पर्धेत जगातल्या ६५ विद्यापीठातल्या १०० टीम्सनी भाग घेतला होता. ‘स्पेस 2012’ या स्पेस रिसर्चकॉन्फरन्समध्ये स्वीटीनं आपलं हे संशोधन जगासमोर मांडलं. या आधीही स्वीटीनं नासामध्ये आपल्या कर्तबगारीचा झेंडा रोवला आहे. डॉल्फिनच्या आकाराचं, कमी इंधनावर चालणारं आणि किमान धावपट्टीत उतरणाऱ्या विमानाचं डिझाईन स्वीटीनं तयार केलं होतं. इतकंच नाही तर स्वीटीनं मानवरहित कार्गे विमानाचं डिझाईनही तयार करून नासाला पाठवलं आहे.
आपल्याला अंतराळात प्रवास करता येईल का या एका प्रश्नानं झपाटलेल्या मुलीचा हा आतापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे आणि अनुकरणीयही आहे…