मज्जा म्हणजे नक्की काय ?
फाईव्ह स्टार मधे जेवण ? ब्रांडेड वस्तू ? सेलिब्रिटी बरोबर फोटो ? फॉरेन टुर ?
छट्ट !!! मुळीच नाही.
आजी आमची गोष्ट सांगताना, "मग काय? भराभरा घरी घेतलो, चहा गेला" असं चुकून बोलून गेल्यावर खी खी करून दिवसभर हसणे म्हणजे मज्जा.
काकू गाणं म्हणत असताना, "भरजरी ग पितांबर दिला सोडून" असं आळवून म्हणायला लागल्यावर, "अगं काकू, सोडून नाही फाडून" असं म्हणून हसत सुटणे म्हणजे मज्जा.
गावाहून परत निघताना 'आज्जी माझा हा बांधलेला झोका सोडू नकोस हा, मी पुन्हा येईन तेव्हा अस्साच हवा इथे" असं आजीला बजावून सांगणे मग सहा महिन्यांनी परत गेल्यावर, आपण येणार म्हणून बहुदा कालच आजीने पुन्हा झोका बांधून घेतलाय हे लक्षात आल्यावर 'आज्जी तू ठेवलास झोका तस्साच? पण मग या दोरीचा रंग का बदलला"? असं विचारून त्याच झोक्यावर मोट्ठे झोके काढणे म्हणजे मज्जा.
शेतात लावणी सुरु असताना चहा घेऊन जाताना, मावशी शंभर वेळा सांगत असे " पाय रोवून घाल, चिखलात रुतला म्हणजे निसटून पडणार नाहीस." हे पूर्ण वेळ लक्षात ठेवत चालल्यावर शेतात आपली सगळी माणसं दिसल्यावर विसरून साटकरून घसरून ढोपरभर पाण्यात पडून चहा सांडवणे म्हणजे मज्जा.
डेक्कन एक्सप्रेस ने येऊन, त्याला भेटून उशिरा घरी जाऊन गालातल्या गालात हसत 'कोयना आज लेट आली' असं सांगणे म्हणजे मज्जा.
'काय ग सदैव घाई तुला घरी जायची'? 'ते काही नाही आता आपण लग्न करूया' असं त्याने म्हणणं म्हणजे मज्जा.
जरासं दुर्लक्ष झाल्यावर मुलीने सबंध अंगाला व्हिक्स फासून घेतल्यावर आणि मग आग होत्येय असं म्हणत ती मोठ्यांदी रडत असताना देखील, हसणे न थांबणे म्हणजे मज्जा.
मुलाला पलंगावर दुप्ट्यावर ठेऊन पटकन सासऱ्यांना वाढायला घ्यावे, मुलाने वरतून धार सोडावी ती डायरेक्ट आजोबांच्या पानात", हे पाहणे म्हणजे मज्जा.
'आज्जी तूच कर गं पुरणपोळी, आईला नाही येत चांगली' असं लेकाने केलेले आईचे कौतुक ऐकणे म्हणजे मज्जा आणि आमच्या आदित्यला घावनाला जाळी पडली नाही तर मुळीच आवडत नाही हो " असे आईने केलेले लेकाचे कौतुक ऐकणे म्हणजे ही मज्जाच.
चुकून आपले कुत्रे आपल्या हातून सुटून एखाद्याच्या मागे लागल्यावर कुत्र्याला धरायला त्याच्या मागे धावणे हि देखील मज्जा.
'मला जाम राग आला होता गं', रात्री लांबच झोपले, पण इतकी थंडी वाजत होती शेवटी म्हंटलं 'मरु दे' बाकीचं उद्या भांडू असं मुलीला सांगणे म्हणजे मज्जा.
सुट्टी संपेपर्यंत तू मला रोज तुला आवडणारा पदार्थ सांगायचा. रोज करणार तुझ्यासाठी, असे म्हणून 'जेवायला काय करावे' हा जटील प्रश्न सहज सोडवून आई तू ग्रेट आहेस हा' अशी स्तुती ऐकणे म्हणजे मज्जा.
माझ्या सगळ्या मज्जा माझ्या माणसांबरोबच्या संवादातून, संबंधातून जन्म घेतात.
सुखाचा शोध अविरत सुरु ठेवावा, दुखः जीवनात येते हे जरी खरे असले तरी काही काळाने बोथट होतेच.
ज्याला स्वतःमधे आणि स्वतःच्या माणसांमध्ये आनंद मिळवता येत नाही, त्याला तो फाइव्ह स्टार हॉटेलात, महागड्या वस्तूंमध्ये, दूर कुठेतरी जाऊन देखील मिळेलच याची काय खात्री?
आज, आत्ता, या क्षणी हे अत्यंत महत्वाचं ………
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा