मी लोडाला टेकून बसलो
मला टेकूनी कन्या बसली
मी हसलो गालात जरासा
कन्या माझी खुशीत हसली
मला बिलगूनी अशी ती बसली
हक्क गाजवित माझ्यावरती
असे वाटते त्रिभुवनातील
सुखे उधळली माझ्यावरती
बोट धरुनी अजून माझे
बसण्यामध्ये सुखावते ती
टेकून मजला बसते आणि
मलाच टेकू देते जणु ती
किती निरागस तिचा चेहरा
डोळ्यामध्ये स्वप्नांचे जग
कणभरही तिज दुःख नसावे
यासाठी तर माझी तगमग
काय करु मी किती काळजी
कठीण असते फार बापपण
कळीप्रमाणे हळू फुलावे
बालपणातून तिचे तरुणपण
कोण कोठला राजकुमार
घेऊन जाईल राजकुमारी
विचार येता मनात माझ्या
उगीच होतो खिन्न दुपारी
बापाचे काळीज खरोखर
सशासारखे भित्रे असते
लेकीच्या केसाला धक्का
बापाचे काळीज थरथरते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा