शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

।। श्रीफळ ।।- श्री प्रदीप मधुकर गुरव , नाशिक

मंदिरात देवासमोर किंव्वा देवीसमोर नारळ फोडण्यात येतो. त्याच्या पाठीमागे बलिदानाचा भाव आहे. मनुष्य किंव्वा पशू ह्यांचे बलिदान देणाऱ्या प्राचीन मानवाला आपल्या ऋषींनी समजावण्याचा अविश्रांत प्रयत्न केला. उपासनेच्या स्वरुपात दिल्या जाणाऱ्या बलिदानाच्या मागे असलेल्या त्याच्या भावनेला समाधान देण्यासाठी ऋषींनी त्याला, विश्वामित्राने निर्माण केलेल्या प्रतिसृष्टीतील नर म्हणजे नारळ, ह्याचे बलिदान द्यायला सुचविले. नारळालाही डोके, शेंडी, नाक, दोन डोळे आहेत.
मंदिरात फोडलेल्या नारळाचा अर्धा भाग मंदिरात ठेवून खालचा अर्धा भाग प्रसाद रुपात नेण्याची पद्धति आहे. बलिदानाच्या वेळी रक्ताचा छिडकाव झाला पाहिजे. त्यासाठी काय काय करायचे ? ऋषींनी सांगितले : देव किंव्वा देवीच्या मूर्तिला सिंदूर लाव आणि त्याच्यावर नारळाच्या पाण्याचा छिडकाव कर. त्यामुळे रक्ताचा लाल रंग देखील पाहायला मिळेल. अशा रीतीने ऋषींनी मानवाला नरहत्या किंव्वा पशुहत्येपासून वाचवले. श्रीफळाला मात्र स्वताचे बलिदान द्यावे लागले.
श्रीफळ हे बारमाही फळ आहे. दीर्घकाळ टिकू शकते. म्हणून प्रत्येक शुभकार्यात, पूजेच्या वेळी ते सहजपणे उपलब्ध होते.
ह्या गोष्टीच्या स्मृती रुपात प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी श्रीफळाची आवश्यकता स्वीकारण्यात आलेली आहे.

समुद्राचा खारटपणा हृदयात साठवून लोकांना गोडपाणी देणारे श्रीफळ आपल्याला संदेश देते की, विश्वाचा खारटपणाही हृदयात साठव, पण लोकांना मात्र तू गोडपणा देत जा. स्वधर्म पालनात कवटीप्रमाणे कठोर व अंतर्यामी मलईप्रमाणे नरम राहाण्याचा बहुमोल जीवनमंत्र श्रीफळ आपल्याला देते.
।। शुभं भवतु ।।
��

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा