सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

शुभ मुहूर्त

शुभ मुहूर्त
                  -------------
           कुंडल्या पाहून लग्नांचे मुहूर्त काढले जातात तरी अनेक स्त्रीया विधवा व पुरूष विधूर का होतात?  पत्रिका व कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट होतात,  अकाली मृत्यू होतात असे का?  95% विवाह हे मुहूर्तावर नुसार वेळेवर  लागत नाहित, तरी मुहूर्ताचा आग्रह भटांकडे का धरावा?
           मुहूर्त पाहून निवडणुकीसाठी उभे राहणा-या सर्व उमेद्वारांपैकी एकच निवडून येतो आणि बाकीचे आपटतात. असे का घडते ?  मंत्रीपद मिळाल्यानंतर  मंत्रालयाच्या जबाबदारी स्वीकारण्यासाठी  व खुर्चीवर बसण्यासाठी  शुभ मुहूर्त शोधतात तरी त्यांच्या योजना अयशस्वी का होतात?  मंत्रीपद अल्प कालावधीत का जाते?
          मानवाला किती अपत्य होणार हे  नशिबात ठरलेले असतांना सुद्धा कुटूंब नियोजनद्वारे अपत्य होणे कसे थांबते?  जन्म ठरलेला असतो तर कायदेशीर  गर्भपातामुळे  जन्म कसा थांबतो?  शुभ मुहूर्तावर  मूल जन्माला घातल्यास  वैज्ञानिक,  राष्ट्रपती,  पंतप्रधान  होईल काय?  उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर  , उद्योजक,  व्यावसायिक  आपल्या कार्यालयाचे  अथवा इमारतीचे  बांधकाम  करतांना, प्रवेश करतांना, व्यवसायास  प्रारंभ करतांना  मूहूर्त पाहूनच सर्व करतात. तरी सुद्धा  कित्येकांना  अपयश येते असे का?
           शुभमुहूर्त  हे थोतांड आहे सत्य नव्हे . ज्यांचा स्वतः वर विश्वास नसतो , तेच लोकं अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.
           मुहूर्त पाहणारी पेशवाई  नष्ट झाली आणि कधीही  मुहूर्त न पाहणारी इंग्रजशाही अख्खा  भारत देश गिळून बसली.
           बांधवांनो !  स्वतःवर व स्वकर्तृत्वावर  विश्वास  ठेवा . जर कोणता भट ,पंडित, पुरोहित, ज्योतिषी, बुवा,  बापू,  महाराज,  साधू ,साध्वी तथा वास्तूशास्त्र विशारद  शुभमुहूर्तावरच सर्व काही केल्यास तथा वास्तूशास्त्राप्रमाणेच बांधकाम केल्यास यश येईल असे सांगत असतील तर स्टँम्प पेपवर लिहून देण्यास सांगा.  यश न आल्यास नुकसानभरपाईचा दावा ठोकेल  असा दम द्या. ते तुमच्या जवळही फिरकणार नाहित. कारण त्यांनाही माहित असते हे सर्व थोतांड आहे.   परंतु ज्यांची रोजी रोटी व प्रतिष्ठा अशा बाबींवर विसंबून असते ते शुभमुहूर्त थोतांड आहे हे कसे काय सांगणार?
           बंधू - भगिनिंनो एक लक्षात ठेवा. पृथ्वी स्वत:भोवती फिरते म्हणून दिवस आणि रात्र होतात.  पृथ्वी सूर्याभोवती  फिरते म्हणून महिने आणि वर्ष होतात. जोपर्यंत पृथ्वी स्वतःभोवती  व सूर्या भोवती  फिरत आहे तोपर्यंत सर्वच दिवस, दिशा व वेळ ह्या शुभ आहेत. ज्या दिवशी पृथ्वीचे हे फिरणे थांबेल तोच दिवस आणि  वेळ अशुभ समजावी . तोपर्यंत  सर्वच शुभ आहे. असे समजावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा