सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५

मी कर्नल संतोष महाडिक बोलतोय...-- कवी - दिपक पारध


मायभूमी वाचविण्यासाठी, जवान सरहद्द लढवतोय,
अहो ऐकताय का ?
मी कर्नल संतोष महाडिक बोलतोय...

लहान पणापासून वाढलो, सह्याद्रीच्या कुशीत,
निडर पणाने लढलो, देशाच्या वेशीत,
वीरगती मिळाली पण एक खंत तुम्हाला सांगतोय,
अहो ऐकताय का ?
मी कर्नल संतोष महाडिक बोलतोय...

राजकारण, अर्थकारण ह्यात मी शून्यच होतो,
देशासाठी जगायचं, ह्याच विचारानं पेटलो होतो,
कट्यावरच्या गप्पा, मला कधी जमल्याचं नाही,
शत्रू वाटचाल करीत असताना, मला गप्पं बसवलंच नाही,
बसू तरी शांत कसा, जेव्हा परका माय माझी ओरबाडतोय,
अहो ऐकताय का ?
मी कर्नल संतोष महाडिक बोलतोय....

आज शांत झोपलोय, पण मन अजूनही शांत नाही,
माझ्या देशातील बांधवांना, अजूनही खात्री नाही,
आतून बाहेरून, कट कारस्थाने रचली जातायेत,
पण आमचे मंत्री अजूनही, अंतर्गत कलह माजवतायेत,
जवान देशासाठी तर पुढारी श्रेयासाठी लढतोय,
अहो ऐकताय का ?
मी कर्नल संतोष महाडिक बोलतोय...

वीरगती नंतर मी पुन्हा माझ्या, जन्मभूमीत पोहोचलो,
स्वकीयांचे डोळे घायमोकळून रडत होते, पण मी न बोलू शकलो,
जमलेल्या कित्येकांमध्ये आता, देश प्रेरणा जागृत होईल,
पण पाठफिरवताच तेथून, राजकारणामुळे तो पुन्हा शांत होईल,
मी मेल्याचा शोक नाही, तर माझ्याच बांधवांची खंत सांगतोय,
अहो ऐकताय का ?
मी कर्नल संतोष महाडिक बोलतोय...

मेल्यानंतर हि आज, छाती भरगच्च फुगलीये,
एवढ्या गर्दी समोर, मी तिरंग्याची चादर ओढलीये,
पण हा मान कसला आहे हे सगळ्यांना नाही कळणार,
माझ्या मातेचे लक्तरे तोडणाऱ्याला, थोडी ना वीरगती मिळणार,
मायभूमीसाठी शहिद होण्याचे सुख काय असते,
ह्याची जाण तुम्हाला करून देतोय,
अहो ऐकताय का ?
मी कर्नल संतोष महाडिक बोलतोय...

चला माझ्या निघण्याची वेळ झाली,
माझ्या इतर शहीद बांधवांना भेटण्याची वेळ आली,
आज सुखानं विलीन होत अनंतात जाईल,
पण का माझ्या गाथेने तुमच्या मध्ये देशप्रेम जागृत होईल,
जर असे झालेच तर मी माझे जीवन अजून सार्थक समजेल,
आणि ह्याच मायभूमीत पुन्हा जन्म मिळो असेच मागणे मागेल,
चला एवढे बोलून, तुमची रजा घेतोय,
मी तुमचा आणि तुमचाच, कर्नल संतोष महाडिक बोलतोय...

आवडल्यास नक्की शेअर करा...
जय हिन्द

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा