लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २६ मे, २०१६

-: प्राचीन भारतीय जलव्यवस्थापन  :-

✍
☄ -: प्राचीन भारतीय जलव्यवस्थापन  :-

वराहमिहिराने आजच्या वैज्ञानिकांसारख्या नोंदी करून ठेवल्या, ज्या महत्वपूर्ण आहेत. त्याने पंचावन्न वृक्ष व वनस्पतींचा अभ्यास करून मांडणी केली आहे. त्याच प्रमाणे त्याने मातीचे वर्गीकरण देखील विस्ताराने केले आहे. ह्या सर्व निरीक्षणांचे निकष ही त्याने मांडून ठेवले आहेत. त्यातील काही आहेत –
1. भरपूर फांद्या व तेलकट साल असलेले ठेंगणे झाडं असेल तर पाणी आढळते.
2. उन्हाळ्यात जमिनीतून वाफा येताना दिसल्या तर पृष्ठ्भागाजवळ पाणी असते.
3. झाडाची एकच फांदी जमिनीकडे झुकलेली असेल तर तिच्या खालील भागात पाणी आढळते.
4. जेंव्हा जमीन गरम झालेली असते तेंव्हा एखाद्याच ठिकाणी ती थंड लागली तर तिथे पाणी असते.
5. काटेरी झाडांचे काटे बोथटलेले असतील तर हमखास पाणी मिळते... वगैरे.

अशी अनेक निरीक्षणे त्याने नोंदवलेली आहेत.

खरी गंमत तर पुढेच आहे.

वराहमिहिराचे हे प्रतिपादन खरं की खोटं, हे ठरविण्यासाठी आंध्र प्रदेशातल्या तिरुपती मधल्या श्री वेंकटेश्वर (एस. व्ही.) विद्यापीठाने सुमारे पंधरा – सोळा वर्षांपूर्वी प्रत्यक्ष विहिरी खोदुन पाहायचे ठरविले. वराहमिहिराच्या निरीक्षणानुसार पाणी मिळण्यास योग्य ठरतील अश्या जागा निवडल्या आणि सुमारे ३०० बोअर घेतले. (बोअरवेल खणल्या). आश्चर्य म्हणजे ९५% ठिकाणी पाणी लागले. अर्थात वराहमिहिराचे निरीक्षण योग्य होते हे सिध्द झाले. मात्र पुढे दुर्दैवाने हा प्रकल्प सरकारी लालफिताशाहीत अडकला आणि तो लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही..!

पाण्याच्या व्यवस्थापनाची अनेक उदाहरणं आपल्याला इंग्रजांचे शासन येण्याच्या आधीपर्यंत ठिकठिकाणी दिसतात. अगदी उत्तर पेशवाईत औरंगाबाद ला बांधलेले ‘थत्ते नहर’ असो, की पुण्याला पेशव्यांच्या काळात केलेली पाणी पुरवठ्याची रचना असो. बऱ्हाणपूर ला आजही अस्तित्वात असलेली, पाचशे वर्षांपूर्वीची पाणी वाहून नेण्याची रचना असो की पंढरपूर – अकलूज रस्त्यावरील वेळापूर गावात सातवाहन कालीन बांधलेली बारव असो. ‘समरांगण सूत्रधार’ ह्या ग्रंथाच्या आधाराने राजा भोज ने बांधलेला भोपाळ चा मोठा तलाव असो... अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.

गढा-मंडला (जबलपुर संभाग) आणि चंद्रपूर या भागात प्राचीन काळापासून गोंडांचं राज्य होतं. अगदी मुगलांना, आदिलशाहीला किंवा कुतुबशाहीला सुध्दा त्यांना जिंकता आलं नव्हतं. मात्र तरीही आपल्या देशात हा प्रदेश म्हणजे मागासलेला मानला गेला. अर्थात खरं चित्र तसं नव्हतं. एक खूप सुरेख हिंदी पुस्तक आहे – ‘गोंड कालीन जल व्यवस्थापन’. यात सुमारे पाचशे ते आठशे वर्षांपूर्वी गोंड साम्राज्यात किती उत्कृष्टपणे पाण्याचं नियोजन केलं होतं याचं वर्णन आहे. या नियोजनाचा फायदा म्हणजे कुठल्याही दुष्काळाची किंवा अवर्षणाची झळ ह्या गोंड प्रदेशाला कधीही लागली नाही.

जबलपुर शहरात गोंड राणी दुर्गावती च्या काळात (अर्थात पाचशे वर्षांपूर्वी) ‘बावन ताल आणि बहात्तर तलैय्या’ बांधले गेले (तलैय्या – लहान तलाव). हे तलाव नुसतेच खोदून बांधले गेले नव्हते तर जमिनीच्या ‘कंटूर’ प्रमाणे त्यांची रचना आहे. काही तलाव तर आतून एक-दुसऱ्याशी जोडले गेलेले आहेत. आज त्यातले अनेक बुजले असूनही उरलेल्या तलावांमुळे जबलपुर मधे, अगदी आज ही पाण्याची पातळी बऱ्यापैकी चागली आहे आणि येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत नाही. मग त्या काळात पाण्याची, शेतीची आणि निसर्गाची काय समृध्दी असेल..!!

याचाच अर्थ, पाण्याचे महत्त्व, पाण्याचा शोध आणि पाण्याचे नियोजन याचे संपूर्ण विकसित तंत्रज्ञान आपल्या जवळ होते. काही हजार वर्षांपासून आपण ते प्रभावी पध्दतीने वापरत होतो. आणि म्हणूनच आपला देश खऱ्या अर्थाने सुजलाम – सुफलाम होता..!

मात्र आपल्यापैकी अनेकांच्या मनावर इंग्रजांचे असे जबरदस्त गारुड आहे की अनेकांना आज ही असे वाटते की आपल्या देशात पाण्याचे महत्त्व ओळखले ते इंग्रजांनी. आपल्याला धरणे बांधायला शिकवले ते इंग्रजांनी..!

दुर्दैवाने आपण आपलं प्राचीन जल व्यवस्थापन विसरलो अन आज पाण्यासाठी आपण त्राही-त्राही करतोय, १४४ कलमं लावतोय, युध्द खेळतोय..!!

आपल्यालाच आपल्या समृध्द ज्ञानाचा, वारश्याचा आणि तंत्रज्ञानाचा विसर पडला आहे. निदान खरं खोटं ठरवण्यासाठी तरी...
*आजच्या जलतज्ञानी ह्या विषयावर शास्त्रोक्त अभ्यास करणं गरजेचं आहे.*
(Whatsapp वरून साभार)

सोमवार, २३ मे, २०१६

सैराट म्हणजे .......

सध्या तरुणांच्या मनात एकाच शब्दाची हवा  आहे! चलती आहे! सैराट!!!
जो तो , जी ती सध्या सैराट आहे! काय अर्थ आहे या शब्दाचा? कुणी वापरलाय हा शब्द यापूर्वी? पाहुयात! interesting आहे!

सैराट म्हणजे अनियंत्रित...uncontrollable...मुक्त हा शब्द समानार्थी नव्हे...सुटलेले...निसटलेले...नियंत्रण गमावलेले एखादे गुर, जनावर त्याला सैराट असे म्हणतात!

आमच्या वाचनात आलेला या शब्दाचा सर्वात जुना वापर हा अर्थातच दासबोधातला आणि मनोबोधातला! काय म्हणतात समर्थ सैराटांना??

मनाच्या श्लोकांत एक श्लोक येतो...
क्रियेवीण नानापरीं बोलिजेतें|
परी चीत दुश्चीत तें लाजवीतें॥
मना कल्पना धीट सैराट धावे|
तया मानवा देव कैसेनि पावे॥

जे लोक करत काहीच नाहीत परंतु केवळ मनाचे वारू, कल्पनांचे घोडे सैराट सोडतात त्यांना देव कसा बरे भेटॆल? असा त्याचा सामान्य अर्थ आहे...
अर्थात सैराट असण्याचे तोटे समर्थ सांगतात!

दासबोधात कुविद्या लक्षण समासात समर्थ एखाद्याजवळ कु अर्थात वाईट गोष्टी कुठल्या असू शकतात याची यादी देताना म्हणतात,
धीट सैराट मोकाट | चाट चावट वाजट |
थोट उद्धट लंपट | बटवाल कुबुद्धी || २.३.३०
धीट म्हणजे भीडभाड न बाळगणारा, सैराट, चावट वगैरे वगैरे दुर्गुणांनी युक्त मनुष्य अत्यंत वाईट होय! इथेही सैराट वर्तनाचे समर्थन न करता समर्थ उच्चाटन सुचविताना दिसतात!

विवेक व वैराग्य काय असते हे सांगताना समर्थ म्हणातात,
परी तो होऊं नये मोकाट | नष्ट भ्रष्ट आणी
चाट | सीमाच नाहीं सैराट | गुरूं जैंसें ||१२.४.५
ज्याला विवेकाने वागावयाचे आहे व वैराग्य प्राप्त करून घ्यायचे आहे त्याने कधीही चौखुर उधळलेल्या गुरासारखे मोकाट, सैराट होऊ नये! जनावरांच्या बाजारातही सैराट गुरे सर्वात स्वस्तात मिळतात व ती कुणालाही फ़ुकट देखील नको असतात...जितके जनावर नियंत्रित व शांत तितकी त्याची किम्मत अधीक असते. गुरांची ही त-हा तर माणासाचे काय!

तात्पर्य: संत सैराट वर्तनाचा निषेध करून सैराटपणे वागू नये असे सुचवितात!
आता निर्णय आम्ही तरुणाईच्या हाती सोपवितो...
सैराटपणावर नियंत्रण मिळवून समर्थांनी भारतभर महंतांचे जबरदस्त नेटवर्क विणून आणि देशाच्या शत्रुंच्या बित्तंबातम्या काढून त्याला जेरीला आणुन शिवाय हिंदू धर्माची पताका सर्वत्र फ़डकत ठेवली तसे वागायचे की
आपल्या (शक्यतो मनापासून प्रेम केलेल्या) धर्मपत्नीला घाराबाहेर हाकलून तिच्यावर धुणीभांडी करायची वेळ आणणा-या नागराज मंजुळे यांचे ऐकत ऐन अभ्यास करण्याच्या, आयुष्य घडविण्याच्या वयात सैराट वागून स्वत:चे नुकसान करून घ्यायचे?

आपल्या मित्रमंडळींमध्ये अलिकडेच सैराट झालेले कुणी असतील तर त्यांच्या माहितीत भर पडावी म्हणून अवश्य शेअर करून थोडे पुण्य पदरी पाडून घ्या!

मंगळवार, १७ मे, २०१६

बेटी हिरा आहेस

✍�� जरूर वाचा

☄" एकदा एका मुलीने तक्रार केली बापाकडे, मलाच का बंधने ? जाऊ नको कुणीकडे....."

" बाप बोलला बेटी म्हणणे तुझं पटतयं चल जरा बाहेर, आत खूप उकडंतयं....."

���� पेठेतून जाताना दिसलं दुकान लोखंडाचं, बाहेरच पडल होत, अवजड सामान लोहाचं, बाप बोलला ,बेटी ! हे, ऊनपावसात इथंच असतं तरी पण याला काही होत नसतं, किमतीत पण याच्या अधिक उणं होत नसतं......,

जरा पुढे जाताच ,ज्वेलरी शाँप दिसलं
आत जाऊन मग ,हिर्यचा मोल पुसलं
तिजोरीतून बंद पेटी ,हळूवार पुढे मांडली त्याच्या झगमगाटात ,नजरच दिपली, सराफ बोलला किमती आहे,फार जपावं लागतं जरा सुद्धा चरा पडता ,मोल याचं घटतं
काळजी घेऊन खूप,जपून ठेवावं लागतं तिजोरीच्या आत , लपवावं लागतं.......,

फिरून घरी येताच, बाप बोलला "बेटी! तूच तर माझी, हिर्याची पेटी
सांग तुला जपण्यात ,काय माझं चुकतं तुझ्यामुळेच माझं, घर सारं झगमगतं"

"तुझा दादा म्हणजे लोखंड, जपावं लागत नाही तू म्हणजे अनमोल हिरा, सांग चुकतं का काही
तुझ्यामुळेच घर प्रकाशित,आमचा तु अभिमान, तुझ्यासाठी काळीज तुटतं, तु जीव की प्राण"

" बस्स! करा बाबा "ऎकवत आता नाही तुमच्याकडे माझी ,तक्रार मुळीच नाही मीच मला आता ,जीवापाड जपेन हिर्याच्या तेजानं, चौफेर चमकेन."

  पटवून द्या तिला बेटी! तू हिरा आहेस
आमच्या आनंदाचा तू झरा आहे
म्हणुन जपाव लागत.....!

��������������������������������

शुक्रवार, ६ मे, २०१६

सैराट........


नागराज पोपटराव मंजुळे या माणसाचं कौतुक केवळ यासाठी नाही की या माणसांनं स्वतःला प्रस्थापित प्रवाहाच्या विरोधात उभं करून दाखवलय तर त्याचं खरं अभिनंदन यासाठी की त्याने या प्रवाहाची दिशाच बदलवून टाकलीय.
-सचिन तायडे, पब्लिक स्पिकर
सैराटचं यश कशात.
 सैराटचं यश हे त्या प्रत्येकाचं यश आहे, ज्याला अमानुषतेची चीड आहे , सैराटचं यश हे त्या प्रत्येकाचं यश आहे ज्याला आपलं जगणं कुठल्याशा फुटकळ मध्ययुगीन परंपरांमुळं नाईलाजानं एकतर स्वतःच बरबाद करावं लागतं किंवा कुणाकडून ते केलं तरी जातं... सैराट चं यश हे त्या प्रत्येक ‘पुरूषी’ अहंकाराचं अपयश आहे ज्या पुरूषी अहंकाराला सांभाळणारी स्त्रीच या समाजात खाणदानी ठरवल्या येते.. सैराटचं यश त्या प्रत्येकाचं आहे ज्याने मातीतून उगवून, बंडखोरी करून आभाळाला स्पर्श करण्याचं स्वप्न पाहिलंय.. आणि सैराटचं यश हे त्या प्रत्येक जोडप्याचंही यश आहे ज्यांनी शेवटपर्यंत एकामेकांची साथ कधीच सोडली नव्हती…
सोशल मीडियावर सैराटची बदनामी... 
 मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचं सांस्कृतिकच नव्हे तर अख्खं सामाजिक जीवनच सैराटमय झालंय.. जो तो सैराटमय झालाय. मात्र याचवेळी सुरू झालेल्या, बुरसटलेल्या विरोधकांच्या बालीश, परंतु तितक्याच धूर्त नि जातीयवादी युक्तीवादामुळं सैराटच जराही नुकसान झालं नाही हेही विशेष... उलट सोशल मीडियावर जेवढा अपप्रचार करण्याचा फुटकळ प्रयत्न झाला तितके जास्तच हाऊसफूलचे बोर्ड राज्यभरातल्या थिएटरवर धडाधड लागल्या जात आहेत…
 
शेवट हेलावून टाकणारा.... 
 सैराट पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता आणि अजूनही आहे…काहींना ‘रिंकू’ जाम आवडली म्हणून असेन वा काहींना ‘आकाश’ जबराट वाटला, म्हणून असेन.. वा काहीजन नागराज मंजुळे यांचे मोठे फॅन असतील म्हणूनही असेल…कारण काहीही असो, सैराट ने एक वादळ उभं केलय ज्याच्या त्याच्या मनात… झिंगाट हे गाणं सुरू झाल्यावर जो तो थेएटरमधे बूंगाट होऊन चिंगाट नाचतोय हे चित्र एकीकडे पहायला मिळत असतांनाच चित्रपट संपतांना मात्र थिएटरमधे भयान सुन्नता पसरून जाते, हातपाय गळून जातात, कित्येकांच्या तर डोळ्याच्या कडा आपोआप ओल्याही होतात आणि कुणीही एकामेकांशी फार काही न बोलता आपआपल्या गाड्यांना पार्कींग एरियातून काढून सुन्न , प्रश्नांकीत चेह-याने घराकडं निघून जातोय…जातीचं अतिशय वास्तव मात्र तितकच क्रूर, कडू सत्य नागराजने सैराटच्या शेवटच्या क्षणांत चितारलय…सिनेमाचा शेवट भयानक आहे… कदाचित तुमच्या कित्येक रात्री खाणारा आहे…तुम्हाला विचार करायला भाग पाडणारा आहे…नागराजने फँन्ड्री च्या वेळीही हेच केलं होतं शेवटच्या क्षणी जब्याच्या हातातून त्याने जो दगड भिरकावला होता तो इथल्या जातीय सरंजामदारांना बरोबर जाऊन बसला होता.. यावेळीही सैराटनं तेच केलय मात्र यावेळी चार पाऊलं पुढं गेलय सैराटचं हे कथानक... सौंदर्य, प्रेम आणि क्रौर्य या तीन भूमिकांचा आवाज झालाय हा सिनेमा…
झी स्टुडिओचे आभार...
नागराज मंजुळेच्या पटकथेचं नि एकूणच त्यांचं कौतुक करतांना विशेष आभार त्या प्रोड्यूसरचे मानले पाहिजेत ज्यांनी अशा विषयाला पाठबळ दिलय..विशेष आभार अजय-अतुल या जोडीचेही व्यक्त केले पाहिजेत, ज्यांनी अगदी अमेरिकेत जाऊन तिथल्या कलाकारांच्या सहाय्याने या सिनेमाचं जबरदस्त म्युझिक तयार केलंय…नागराजचं  विशेष अभिनंदन यासाठीही की या माणसाने जे पाहीलं किंवा जे जे तो जगत आलाय तेच तो दाखवण्याचा आग्रह धरतोय.. निव्वळ गोड गोड दिखावा...गुडीगुडी खोटा खोटा रोमँन्टीसिझम या माणसाला कबूल नाही... त्याच्या “उन्हाच्या कटाविरूद्ध” या काव्यसंग्रहाला वाचतांनाही हे सतत जाणवत राहतं की या माणसाची नजर अस्सलतेला प्राधान्य देते...या माणसाची भाषाही पडद्यावर तीच असते जी त्याच्या रोजच्या जगण्यात आहे… शुद्ध शब्दांचा, शुद्ध उच्चारांचा पोक्कळ आवेश नाही वा सो कॉल्ड बॉडीलँग्वेजचा अभिनिवेश दिसत नाही, नागराजच्या जगण्यात ना त्याच्या सिनेमात. आज घडीला राज्याच्या गावागावांमधे करोडो लोक जे खरं जीवन जगतात तेच नागराज त्याच्या पटकथेत मांडतोय… 
नागराजचं कौतुक करावं तेवढे थोडं...
साध्यासुध्या चेह-याची, जाड्याभरड्या काळ्या रंगाची माणसं, उन्हात काम करून करून घामानं चिंबलेले मजूर, संसार जगवण्यासाठी दिनरात राबलेल्या अन् रापलेल्या आज्या त्याला महत्वाचाएत… तर दूसरीकडे स्त्रीच्या सौंदर्याची पिढ्यानपिढ्या ठरलेली टीपीकल व्याख्या तर सैराटच्या रूपानं नागराजने टराटर फाडलीय… मात्र हे सारं काही अनेकांना सहन होणारं नाहीए खरतर अनेकांना झोंबणारच आहे  हे  सारं…जातीचा माज असलेल्यांना तर हा सिनेमा म्हणजे संस्कृती बुडवणारा वाटायला लागलाय…मुळात कोणत्या संस्कार आणि संस्कृतीचं तुणतुणं वाजवत असतो आपण..? या सिनेमात आर्ची च्या बूलेट ला शिवरायांचा झेंडा आहे म्हणून काही पोट्यांचं टोळकं कोर्टात जाण्याच्या बेतात होतं.. अनेकांनी सोशलमिडीयावर तर सैराटविरुद्ध “ धर्म खतरेमें है ”  सारखं वादळ उठवण्याचा वावटळी प्रयत्नही करून पाहिला…मग यावेळी किशोरवयीन मुलांमुली व त्यांच्यावर पडणा-या संस्कारांपर्यंत अनेकांनी आपलं लबाड समाजप्रबोधन सुरू केलं... या आधी असे कित्येक चित्रपट आलेले आहेत.. हिंदी सिनेमाचा सनी लिओनी पर्यंतचा प्रवास तर सांगायलाच नको....अगदी मराठीत सुद्धा बीपी, शाळा ,टाईमपास सारखे चित्रपट डोक्यावर घेण्यात आलेत मात्र त्यावेळी असं रान कुणी उठवलं नाही कदाचित सैराट च्या निमित्तानं झालेली तुफान प्रसिद्धी आणि लोकांचा मिळालेला जबरदस्त प्रतिसाद हे सारं काही एक वडार समाजातून आलेल्या एका मंजुळेला मिळतय हे सारं कही अनेकांना पाहावल्या गेलं नसावं… या सा-याच विरोधात जातीचा दूर्गंध अधीक जास्त जानवतोय…आणि नेमकं नागराज ने, जे आजूबाजूला रोज घडतय तेच सैराटमधून दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय …
महाराष्ट्रातील 'सैराट' वास्तव...
काही महीण्यांपूर्वीच कोल्हापूरमधे लग्न करून आपला संसार सुरू केलेल्या एका जोडप्याला मुलीच्या भावांनी रात्रीच्यावेळी घरात घूसून गळे चिरून जिवंत मारलं हे वास्तव नाही का? नगर जिल्ह्यात खर्डा येथे नितीन आगे प्रकरणात सुद्धा त्या अकरावीत शिकणा-या पोराच्या शरीरात मागच्या बाजूने त्याच्या अंगात वीटभट्टीतली तप्त सळई खूपसून हालहाल करून आणि नंतर झाडाला लटकवून ठार मारलं हे वास्तव नाही का? राज्यभरात विविध ठिकाणी कुठे हातपाय तोडण्यात आलेएत.. तर कुठे अख्ख्या गावानेच बहिष्कृत करून नग्न धिंड काढलीय तर कुठे कुणाचे डोळे फोडण्यात आलेय हे वास्तव नाही का ? तर शिर्डीमधे भीमगीताची रिंगीग टोन ठेवल्यामुळं सागर शेजवळच्या तोंडावर,छातीवर बूलेट रगडून रगडून त्याला मारण्यात आलं हेही वास्तव नाही का ? आश्चर्य याचंय की हे सारं एकतर इज्जत वाचवण्यासाठी केलं जातय किंवा जातीची दादागीरी बरकरार ठेवण्यासाठी केलं जातय… 
शिवाजी महाराजांना ओढून आणतायं...
 यात सगळ्यात वाईट काही असेल तर ओढून ताणून या सा-यात शिवरायांना ओढून आणलं जातं…महाराजांचा उदो उदो करतांना काही खूजे लोक महाराजांच्या पायाची धूळ बनण्याची लायकी नसतांनाही स्वतःला छत्रपती म्हणवून घेतात... महाराज, राजमाता जिजाऊसाहेब यांना कळल्या नाहीत आणि कळणारच नाहीत…अशांचं कर्तृत्व काय, तर ते महाराज ज्या जातीचे होते त्याच जातीत हेही जन्माला आलेत एव्हढच… खरतर हे सारच दुर्देवी आहे…तरीही आजघडीला महाराजांच्या ख-या संस्कारांवर चालणारे असंख्य आहेत हेही नाकारून चालणार नाही परंतू ही जमेची बाजू जरी असली तरी अशांची संख्या तुलनेने कमीच आहे.
जातीयवादाची दुर्गंधी
87 व्या अखिल भारतीय साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी मराठा जातीत जन्मलेले फ.मु.शिंदे यांची निवड झाली होती त्या प्रसंगी माध्यमांसमोर बोलतांना शिंदे आवर्जून म्हणाले होते की, “ पिढ्यापिढ्या जे उन्हातच होते अशांना सावलीत आणणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मी मला मिळालेला हा अध्यक्षपदाचा बहुमान अर्पण करतो…” एखाद्या उच्च जातीत जन्माला येउन अशी सहवेदना वाटून घेणारे असे लिखाणाच्या, चिंतनाच्या आणि कलेच्या क्षेत्रात काम करणारे कितीजण आहेत?  हाच खरा सवाल मला वाटतं सैराटच्या निमित्तानं पुन्हा उभा राहिला आहे... निव्वळ राजकीयच नाही तर सांस्कृतिक क्षेत्रातही ही जातीयवादाची दुर्गंधी पोहचलीय..आधी काही लोकांच्या ओठात जात असायची आता ती पोटातही आहे आणि कृतीतही आहे याचे दुःख अधीक आहे…
ग्रामीण जीवन पडद्यावर...
या सा-यामुळचं नागराज आजूबाजूचं उघडंनागडं सत्य दाखवण्यावर भर देतोय, मुळात तो त्याची ही जबाबदारी मानतोय.  ज्याची पर्वा इथल्या इस्टमनकलरवाल्यांना कधीच नव्हती ना इथल्या कित्येक पटकथाकारांना हे सारं लिहीणं कधी गरजेचं वाटलं ? जे करोडोंचं जगणच नाही तेच पडद्यावर आतापर्यंत दाखवण्यात प्रयत्न होत आलाय. नेमकं याच गोष्टीला नागराजने फाटा दिलाय. खरतर आजूबाजूच्या सामाजिक विस्तवाचं वास्तव लक्षात घ्यावसं वाटत नाही कित्येक पटकथाकारांना . काही विचारवंत - लेखकांना शेजारच्या जिल्ह्यात काय शिजतय आणि याही उपर जाऊन आपल्या बुडाखाली काय जळतय याचं साधं सोयरसूतक नसतंच. मात्र तिकडे आखातातल्या तेलावर किंवा तिथल्या भयंकर अशा रासायनिक अण्वस्त्रांवर किंवा लँटीन अमेरिकेत झालेल्या बदलांवर आपली लेखणी पळवायला यांचा हात अधिकची गती घेतो.  उंटाचा मुका घ्यायच्या स्पर्धेत उतरू पाहणा-या या विचारवंत लेखकांना देशाच्या विकासासाठी वा एकूणच प्रगतीसाठी युरोपीअन देशांची वा अमेरिकेतल्या पाच पन्नास राज्यांची तूलना करणारी लीटमस टेस्ट नेहमीच गरजेची का पडते हेही कळत नाही.
लग्नाचा बाजार... 
सिनेमात लग्नाचं जोडपं हे हमखास गोरंगोमटं दाखवण्यावर भर असायचा मग हेच प्रतिबिंब समाजातही पडायला लागलं..प्रत्येकाला आपली जोडीदारीन ऐश्वर्या राय सारखी हवीय आणि जोडीदार शाहरूख सारखा..बाकीच्यांचं जणू हृदय धडधडतच नाही, त्यांना जणू प्रेमच होत नाही... बाकीच्यांना जशा काही भावनाच नसतात. मुळात याला - त्याला दाखवण्यासाठीच ज्यांचा त्यांचा हा रंगाचा, सौंदर्याचा खटाटोप सुरू असतो…अगदी लग्नाच्यावेळीही केवळ याला त्याला दाखवण्यासाठीच अगदी कर्ज काढून लग्नाचा बडेजाव करण्यात येतो, हुंडा देतांना घेतांना मुळात ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे मात्र उलट “आमच्यात हुंडा खूप असतो ना” हे असं किळसवाणं वाक्य वापरतांना त्यांचील छाती अभिमानाने फूलून येते. कित्येक घरांमधे मुलीला पाहण्यासाठी एक नाही दोन नाही पन्नास पन्नास मुलं  येऊन जातात, मग पन्नास वेळेला चहा बनतो, पन्नास वेळेला पोहे तयार होतात, पन्नास वेळेला तीला साडी नेसावी लागते..पन्नास वेळेला तीला चेह-यावर हसू ठेवावं लागतं या सगळ्यातून बिचारी तरली की मग एकतर देण्याघेण्यावरून मुद्दा फिस्कटतो किंवा कुठले तरी गुणच जूळून येत नाहीत..जर वागणुकीच्या बाबतीत काही चूकीचं जाणवलं असेल तर लक्षात येऊ शकतं मात्र दिसण्याहून किंवा रंगावरून जेव्हा नाकारण्यात येतं अशावेळी कुण्या परक्यानं आपल्याला नाकारल्याचं दुख एकीकडे नक्कीच होत असतं मात्र त्याहीपेक्षा अधिक वेदना त्यावेळी होतात ज्यावेळेला आपल्या घरातलेच आपल्याच पोटच्या पोरीला तू बूटकी आहेस काळी आहेस म्हणून तुझं लग्न होत नाहीए असं म्हणतांना दिसून येतात.. मुळात आपल्याला मिळेलेल्या शरिरापासून संस्कारापर्य़तची सारी देण मायबापाचीच तर असते.
आधुनिकता म्हणजे काय....
 प्रतिभावान नाटककार शेक्सपिअर नेहमी म्हणायचा निग्रो स्त्री ही मला जगातली सर्वात सुंदर स्त्री वाटते..ते तीच्या गडद काळ्या रंगामुळेच. तिच्या रंगात इतर कुठलीही मिलावट होऊ शकत नाही.. कुठलाही मेकअप तिला, तिच्या अस्सलतेला बदलवू शकत नाही. जगण्यातली आणि दिसण्यातली अस्सलताच तर अधिक महत्वाची असते. चेहरा गोरा आहे या पेक्षा मन स्वच्छ असणं हे अधिक श्रेयस्कर नाहीए का..? मातीत राबणारे काळेकुळकुळीत झालेले शेतमजूर प्रेमळ, मायाळू नसतात का..? विकलांगता शरिराला असेल तर हरकत नाही मात्र वृत्तीनं विकलांग असणं हे कितीतरी घातक असतं.. मॉलमधे इस्केलेटरवर उभं राहता येणं किंवा चार इंग्रजीचे शब्द बोलता येण्यानं कुणी आधुनिक होत नसतं..आधुनिकतेचा संबंध योग्यतेशी असतो.. नसता , स्पर्धा परीक्षेसाठी समाजसुधारक पाठ करायचे आणि पोस्ट हातात पडताच हुंडा मागून लग्नाच्या बाजारात स्वतःचा भाव ठरवायचा हा असा करंटेपणा करणा-यांना  बहिष्कृत करण्याची एक मोहिमच आता हातात घेतली पाहीजे..
भयानक सत्य...
 जातीसाठी माती खाऊन पोटच्या पोरीला जिवंत मारणा-यांना चौकात नेऊन बदडलं पाहीजे... कुठे बलात्कार झाला असेल तर अशी छापून आलेली बलात्काराची बातमी चवीनं नाही तर रागानं वाचली पाहीजे…नागराज त्याचा हा असा साराच राग सैराट सारख्या चित्रपटांतून व्यक्त करत चाललाय…जातीसाठी दिवसरात्र जगणारे कित्येक वंशाचे दिवे ‘प्रिंस’ च्या माध्यमातून नागराजने जगाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ज्यांना आपल्या बहिणीपेक्षा आपली जात मोठी असते…मुळात अशा कित्येक ‘प्रिंस’ला भैय्या भैय्या म्हणून एक माजलेला पुरूष बनवण्यासाठी त्या त्या घरातले कित्येक आजी आजोबा आणि कित्येक मायबाप कारणीभूत असतात, लहानपणापासूनच मोठ्याप्रमाणावर त्यांचे सारेच लाड पुरवण्यावर इतका भर असतो की पुढे ते स्वतःच्या आईला ‘घरात नीट रहायचं नाहीतर तुला मामाच्या घरी नेऊन सोडेन’ इथपर्यंत बोलायची हिम्मत ठेवतात…हे सारं खूप भयानक आहे परंतु सत्य आहे…नागराज या अशाच कित्येक जळजळीत सवालांच्या विरोधात उभा राहीलाय अगदी सैराट बनून…
 
नागराजचं सैराटपण कायम राहो....
 नागराजमधे पराकोटीचा आत्मविश्वास आहे, मुळात हा आत्मविश्वास त्याला त्याच्या अनुभवांनी, निरिक्षणांनी आणि संवेदनशीलतेनच बहाल केलाय. म्हणूनच की काय आमचंही संपूर्ण नाव आम्हीही अभिमानाने मिरवून दाखवू शकतो ही त्याची कृतीशील धारणा आहे…त्याने स्वतःला सिद्ध केलय..जर्मनीमधे तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लोकांनी त्याला डोक्यावर घेतलय नि रिंकू राजगुरू या देखण्या मुलीला पदार्पणातच मिळालेल्या भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्कारानं ते अधिक स्पष्टही झालय की सैराट एक लाजवाब चित्रपट आहे , नागराजचं हे सामाजिक जाणीवांचं सैराटपण अजून काही अशाच चित्रपटांच्या निर्मितीचं कारण बनत राहो याच सदिच्छांसह तूर्तास थांबतो. 
सचिन तायडे, पब्लिक स्पिकर : 

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

बाण स्तंभ। -प्रशांत पोळ

अतिशय सुंदर वाचण्यासारखा आणि आपल्या संस्कृतीविषयी अभिमान बाळगण्या सारखा लेख आहे. नक्की वाचा

बाण स्तंभ। -प्रशांत पोळ

: अनेकांच्या मागणी वरुन या मालिकेतील पहिला लेख, 'बाणस्त॔भ' येथे देतोय -

बाण स्तंभ। -प्रशांत पोळ 

इतिहास हा फार चकवणारा विषय आहे. आणि इतिहासाचा मागोवा घेता घेता आपण एखाद्या अश्या जागी येऊन उभे राहतो की मन अक्षरशः थक्क होऊन जाते. हे असं शक्य आहे कां, या विषयी मनात गोंधळ उडतो. दीड हजार वर्षांपूर्वी हे इतकं प्रगत ज्ञान आपल्यापाशी होतं यावर विश्वासच बसत नाही.

गुजराथ च्या सोमनाथ मंदिरापाशी येऊन आपली अशीच परिस्थिती होते. मुळात सोमनाथ मंदिराचा इतिहासच विलक्षण. बारा ज्योतिर्लिंगांतील हे एक देखणं, वैभवशाली शिवलिंग. इतकं समृध्द की उत्तर पश्चिमेतून येणाऱ्या प्रत्येक आक्रमकाचं लक्ष सोमनाथ कडे गेलं आणि अनेकवार सोमनाथ लुटल्या गेलं. सोनं, नाणं, चांदी, हिरे, माणकं, रत्न. . . सर्व गाडे भरभरून नेलं. आणि इतकी संपत्ती लुटल्या जाऊन ही दर वेळी सोमनाथ चं शिवालय परत तश्याच वैभवानं उभं राहायचं.

मात्र फक्त ह्या वैभवासाठी सोमनाथ महत्वाचं नाही. सोमनाथ चं मंदिर भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर आहे. विशाल पसरलेला अरबी समुद्र रोज सोमनाथाचे पादप्रक्षालन करत असतो. आणि गेल्या हजारो वर्षांच्या ज्ञात इतिहासात ह्या सागराने कधीही सोमनाथाचा उपमर्द केलेला नाही. कोणत्याही वादळामुळे सोमनाथाचे गौरवशाली मंदिर कधी उध्वस्त झाले नाही.

ह्या सोमनाथाच्या मंदिराच्या आवारात एक स्तंभ आहे. हा ‘बाण स्तंभ’ म्हणून ओळखला जातो. हा केंव्हापासून त्या ठिकाणी आहे, हे सांगणं अवघड आहे. इतिहासाचा धांदोळा घेत घेत मागे गेलो की कुठेतरी सहाव्या शतकापाशी आपण पोहोचतो, जिथे ह्या बाण स्तंभाचा उल्लेख आढळतो. पण म्हणजे हा सहाव्या शतकात उभारल्या गेलाय असं सिध्द होत नाही. हा स्तंभ किती जुना आहे, याबद्दल नक्की सांगणं शक्य नाही.

हा बाण स्तंभ म्हणजे दिशादर्शक स्तंभ आहे. यावर एक बाण उभारलाय आणि खाली लिहिलंय –

‘आसमुद्रान्त दक्षिण धृव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग’

याचा अर्थ असा – या बिंदुपासून दक्षिण धृवा पर्यंत सरळ रेषेत एकही अडथळा नाही. अर्थात या मार्गात एकही जमिनीचा तुकडा नाही.

ज्याक्षणी सर्वप्रथम मी हा स्तंभ बघितला अन हा शिलालेख वाचला, तो वाचून डोक्यात त्याचा अर्थ जाता क्षणीच अंगावर काटा उभा राहिला ! हे ज्ञान इतक्या पूर्वी आपल्याला होतं..? कसं शक्य आहे हे? आणि जर हे खरच असेल तर किती समृध्दशाली ज्ञानाचा वैश्विक वारसा आपण बाळगतोय..!

संस्कृत मधे कोरलेल्या ह्या एका ओळीच्या अर्था मधे अनेक गूढ अर्थ सामावलेले आहेत. ह्या ओळीचा सरळ अर्थ आहे, सोमनाथ मंदिराच्या त्या बिंदुपासून दक्षिण धृवा पर्यंत (म्हणजे अन्टार्टिक पर्यंत) एक सरळ रेघ ओढली तर मधे एकही भूखंड लागत नाही. आता हे खरं कश्यावरून..? आजकालच्या ह्या तंत्रज्ञानाच्या युगात हे शोधणं सोपं व्हावं. मात्र हे तितकंसं सोपं नाही. गुगल मेप वरून बघितलं तर वर वर बघता भूखंड दिसत नाही. मात्र तो मोठा भूखंड. एखादा लहान भूखंड शोधायचा असेल तर त्या पूर्ण मार्गाला ‘एन्लार्ज’ करत करत पुढे जायचे. हे तसं किचकट काम. मात्र संयम ठेऊन, चिकाटीने हळू हळू बघत गेलं की मार्गात एकही मोठा भूखंड, म्हणजे 10 Km X 10 Km चा, लागत नाही. त्या खालचा भूखंड हा विशेष तंत्रज्ञानानेच शोधावा लागेल. थोडक्यात, तो संस्कृत श्लोक खरा आहे असं धरून चालू.

पण मूळ प्रश्न तसाच राहतो. अगदी सन ६०० मधे हा बाण स्तंभ उभारला असं जरी म्हटलं, तरी त्या काळात पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध आहे, हे ज्ञान कुठून मिळालं ? बरं, दक्षिण गोलार्ध माहीत होता हे गृहीत धरलं तरी सोमनाथ मंदिरापासून दक्षिण धृवापर्यंत सरळ रेषेत गेलं की मध्ये कोठेही एकही भूखंड येत नाही, हे ‘मेपिंग’ कोणी केलं ? सारंच अद्भुत..!
याचाच अर्थ, बाण स्तंभ उभारण्याच्या काळात, भारतीयांना पृथ्वी गोल आहे हे माहीत होतं आणि फक्त तितकंच नाही, तर ह्या पृथ्वीला दक्षिण धृव आहे (म्हणजेच अर्थात उत्तर धृव ही आहेच), हे ज्ञान ही होतं. हे कसं काय शक्य झालं ? त्यासाठी पृथ्वीचा ‘एरियल व्ह्यू’ घेण्याचं काही साधन होतं कां ? नसल्यास पृथ्वीचा नकाशा त्या काळी अस्तित्वात होता कां ?
नकाशाशास्त्र (इंग्रजीत ‘कार्टोग्राफी’ – मूळ फ्रेंच भाषेतून उचललेला शब्द) हे फार प्राचीन शास्त्र. ख्रिस्तपूर्व सहा ते आठ हजार वर्षांपूर्वी गुहेत कोरलेल्या आकाशस्थ ताऱ्यांचे नकाशे मिळाले आहेत. मात्र पहिल्यांदा पृथ्वीचा नकाशा कोणी काढला, यावर एकमत नाही. भारतीय ज्ञानाचे पुरावे मिळाले नसल्याने ‘एनेक्झीमेंडर’ ह्या ग्रीक शास्त्रज्ञाकडे हा मान जातो. ख्रिस्तपूर्व ६११ ते ५४६ हा त्याचा कालखंड. मात्र त्याचा नकाशा हा अत्यंत ढोबळ आहे. त्या काळात जिथे जिथे ज्ञात मनुष्यवस्ती आहे, तो भाग या नकाशात दाखविण्यात आलेला आहे. या नकाशात उत्तर आणि दक्षिण धृव दिसण्याचं ही काही कारण नाही.
आजच्या वास्तविक जगाच्या जवळ जाणारा पृथ्वीचा नकाशा हेनरीक्स मार्टेलस ने साधारण सन १४९० च्या आसपास केलेला आढळतो. असं म्हणतात, कोलंबस ने ह्याच नकाशा चा आधार घेतलेला होता.

‘पृथ्वी गोल आहे’ हे मत युरोपातील काही शास्त्रज्ञांनी ख्रिस्तपूर्व काळात व्यक्त केलेले आढळते. एनेक्झीमेंडर ने ख्रिस्तपूर्व ६०० वर्षांपूर्वी पृथ्वीला एका ‘सिलेंडर’ च्या स्वरूपात बघितले होते. एरिस्टोटल ने ही पृथ्वीला गोल म्हटलेले आहे.

मात्र भारता जवळ हे ज्ञान फार आधीपासून होते ह्याच्या अनेक खुणा मिळतात. याच ज्ञानाच्या आधारावर सन ५०० च्या आसपास आर्यभट्ट ने फक्त पृथ्वी गोल आहे, हेच सांगितले नाही, तर पृथ्वीचा व्यास ४,९६७ योजने आहे (म्हणजे नवीन मापना प्रमाणे ३९,९६८ कि. मी.) हे देखील ठासून सांगितले. आज सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पृथ्वीचा काढलेला व्यास ४०,०७५ कि. मी. आहे. अर्थात आर्यभट्ट च्या आकलनात चूक होतेय ती फक्त ०.२६ %. सोळाशे वर्षांपूर्वी आर्यभट्ट जवळ हे ज्ञान आले कोठून..?
सन २००८ मधे जर्मन इतिहासतज्ञ जोसेफ श्वार्टझबर्ग ने हे सिध्द केले की ख्रिस्तपूर्व दोन / अडीच हजार वर्षांपूर्वी पासून भारतात नकाशाशास्त्र अत्यंत विकसित होते. नगर रचनेचे नकाशे तर त्या काळात उपलब्ध होतेच, पण नौकानयना साठी आवश्यक असे नकाशे असल्याचे ही पुरावे आढळतात.

भारतात नौकानयन शास्त्र फार पूर्वीपासून विकसित होतं. संपूर्ण दक्षिण आशियात ज्या प्रकारे हिंदू संस्कृतीच्या पाउलखुणा आढळतात, त्यानुसार भारताची जहाजं पार पूर्व टोकापर्यंत, म्हणजे जावा, सुमात्रा, यवद्वीप ओलांडून जापान पर्यंत समुद्रात विहार करत होती याचे भरभक्कम पुरावे मिळाले आहेत. १९५५ साली शोधण्यात आलेल्या गुजरात च्या लोथल मधे अडीच हजार वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले आहेत. यात भारताच्या प्रगत नौकानयना विषयी अनेक पुरावे दिसतात. 
अर्थात सोमनाथ मंदिर उभारण्याच्या काळात दक्षिण धृवापर्यंत चे दिशादर्शन त्या काळातील लोकांना असेल हे निश्चित.

दुसरा अजून एक विचार समोर येतो की दक्षिण धृवा पर्यंत सरळ रेषेत जमीन नसलेला समुद्र आहे हे नंतर शोधून काढण्यात आलं की दक्षिण धृवापासून जमीन नसलेल्या सरळ रेषेची सांगता भारतात जिथे होते, तिथे सोमनाथ हे ज्योतिर्लिंग उभारण्यात आलं..? त्या बाण स्तंभावर लिहिलेल्या ओळीत उल्लेख केलेला आहे, (‘आसमुद्रान्त दक्षिण धृव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग’) तो ज्योतीर्मार्ग म्हणजे नेमकं काय..?

सध्या तरी हे

बेगडी व्यक्ती पूजा आणि रियल लाईफ हिरो…   प्रमोद गायकवाड, सोशल नेट्वर्किंग फोरम

 
��������������������
व्यक्ती पूजेच्या बाबतीत भारताचा हात अख्ख्या जगात कुणी धरू शकेल असे मला वाटत नाही. 
परवाचीच घटना ….सियाचीन सीमेवर  देशाचे संरक्षण करताना 10 सैनिक हिमस्खलनात गाडले गेले. सहा दिवस भारतीय सैनिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण 9 जवान शहीद झाले. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे त्यातील लान्स नायक हनुमंथप्पा सहा दिवसानंतरही बर्फाखाली जिवंत सापडले. त्यानंतर त्यांना दिल्लीत उपचारार्थ आणले गेले पण दुर्दैवाने आज त्यांचंही निधन झालं. संपूर्ण देशाला या जवानांच्या कुटूंबीयांची चिंता वाटावी आणि त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करणाऱ्या जवानांचा अभिमान वाटावा अशी ही घटना.….  पण परवा झाले काय कि पंतप्रधानांनी जांबाज जवान हनुमंथप्पांना हॉस्पीटलला भेटायला जात असल्याचे ट्वीट केले आणि एका सेकंदात या घटनेचा हिरो बदलला गेला. प्राणांची बाजी लावत मायनस २०-२५ सेल्सिअस तापमानात अत्यंत कठीण परिस्थितीत आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या या जवानांपेक्षा बऱ्याच लोकांना हॉस्पिटलमध्ये बघायला जाणाऱ्या मोदींचा जास्त अभिमान वाटून गेला. यासंदर्भात सोशल मीडियात व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये लान्स नायक हनुमंथपांचा फक्त उल्लेख करून मोदींवर मात्र स्तुती सुमने उधळली जात होती. वाचून वाईट तर वाटलेच पण आपल्या देशाला लाभलेल्या या व्यक्ती पूजेच्या शापातून मुक्तता व्हावी असे तीव्रतेने वाटून गेले. या घटनेत मोदींची चूक आहे असे नाही पण अतिउत्साही समर्थक मात्र आपल्या नेत्याच्या अतिप्रेमापोटी असे उद्योग करतात.   
खरे म्हणजे व्यक्ती पूजेत काँग्रेस पक्ष सर्वोच्च स्थानी असला तरी अन्य पक्षही मागे आहेत असं अजिबात नाही. सर्वच राष्ट्रीय आणि प्रांतीक पक्षांचे चेले आपापल्या नेत्यांनी भ्रष्टाचार करो, अत्याचार करो, गुंडगीरी करो, काहीही करो... त्यांचे समर्थन करण्यात आजिबात मागे रहात नाहीत. दक्षीणेत तर भाट कार्यकर्ते आपल्या नेत्यांची मंदिरेसुद्धा बांधतात. जवळपास सर्वच नेते प्रसिद्धीचा झोत आपल्यावर राहिल हे बघण्यात दक्ष असतात.  भाजपही याच वाटेवरील प्रवासी बनलाय. विशेषतः मोदीप्रेमी आपण या व्यक्ती पूजेत मागे रहायला नको याची पुरेपूर काळजी घेताना दिसतात.
याघटनेतून सोशल मिडीयाचा जबाबदारीने वापर करताना निदान कोणत्या वेळी कुणाची स्तुती करावी याचे भान आपण सर्वांनी नक्कीच पाळायला शिकले पाहिजे. 
लान्सनायक हनुमंथप्पा यांच्यासह शहिद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली ����������
सोबतच जबाबदार भारतीय म्हणून व्यक्तीपुजेचं स्तोम अशा प्रसंगी तरी माजवू नये ही सोशल नेटवर्कर्सला विनंती..! 
अत्यंत प्रतिकूल परिस्थीतीत या जवानांना वाचविण्याचे प्रयत्न करणार्या भारताच्या सर्व रिअल लाईफ हिरोंना कडक सलाम करायलाच हवा…! 
����जय जवान जय किसान����