खुपच सुंदर कविता (यातना) !!!!!
खरं सांगु का तुम्हाला..? 
छान चाललय माझं..!
टेरेस गार्डन फ्लॅट,
कार मधुन फिरतो..
विकेंडला मी फार्महाउसवर रहातो,
महिना अखेर हप्ते भरुन 
जीव माझा जातो..
तरीही जगाला ओरडुन सांगतोय,
छान चाललय माझं..!
क्लास-वन चा जॉब, कार्पोरेट ऑफिस,
हाय प्रोफाइल लोकांसोबत 
रोज उठतो बसतो..
खोट्या प्रतिष्ठेपायी मी खरा चेहरा झाकतो..
तरीही जगाला ओरडुन सांगतोय,
छान चाललय माझं..!
आई-वडिल, भाऊ-बहिण सर्व एकत्र रहातो,
आतुन मात्र ते कधी वेगळे होतील याचीच वाट पहातो..
तरीही जगाला ओरडुन सांगतोय,
छान चाललय माझं..!
गावाकडची जमीन विकुन,
मुलाला ऑडी घेउन दिली..
वर्षाकाठी तिन लाख खर्च,
वर शेतातली भाजी बंद झाली..
तरीही जगाला ओरडुन सांगतोय,
छान चाललय माझं..!
चौसोपी वाडा सोडुन, अपार्टमेंट ला रहायला आलो..
शंभर जोर मारुन न दमणारा,
आज दम्याचे औषध खावु लागलो..
तरीही जगाला ओरडुन सांगतोय,
छान चाललय माझं..!
पोरगा झाला डॉक्टर,
पोरगी आय.टी. वाली..
मराठी बोलता बोलता,
जीभ इंग्रजी वर घसरली..
इंग्रजीतलं संगळं आलं,
पण रामरक्षा विसरली..
तरीही जगाला ओरडुन सांगतोय,
छान चाललय माझं..!
फेसबुक वर शेकडो मित्र,
तरीही कट्यावर एकटा बसतो..
मीच केलेल्या विनोदावर,
मीच खळखळुन हसतो..
तरीही जगाला ओरडुन सांगतोय,
छान चाललय माझं..!
आम्ही आमच्या घरात,
आणि मुलगा हॉस्टेल वर रहातोय..
मी मुलाला स्थळ शोधतोय,
अन् तो वृध्दाश्रमांची माहिती घेतोय..
तरीही जगाला ओरडुन सांगतोय,
छान चाललय माझं..!
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा