⛳ .. ⛳
राज्य शासनाच्या वतीने डिसेंबर महिन्यात रायगड किल्ल्यावर ‘रायगड महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. यासाठी केंद्र शासनाच्या भारतीय पुरातत्व खात्याकडून आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे. रायगडावर शिवकालीन वातावरण तयार करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सक्षम नेतृत्वातील महाराष्ट्राचे वैभव याठिकाणी प्रत्यक्ष साकार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे देशात प्रथमच अशा पद्धतीचा महोत्सव साजरा करण्यात येणार असून भारतीय इतिहास व ऐतिहासिक वास्तूंची गौरवशाली परंपरा सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न असणार आहे.
रायगड महोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यामध्ये साजरा होणाऱ्या रायगड महोत्सवात शिवकालीन वातावरण प्रत्यक्षात उभे करण्यात येईल आणि देशात अशा पद्धतीचा महोत्सव साजरा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. 25 ते 31 डिसेंबर 2015 या 7 दिवसीय कालावधीत रायगड किल्ल्यावर आणि रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी विविध उपक्रमांचा समावेश असलेला रायगड महोत्सव आयोजित करण्यात येईल. ऐतिहासिक स्मारकाच्या जतनासंदर्भातील केंद्र शासनाचे नियम व अटी पाळून रागयड किल्ल्यावर शिवकालीन वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. हे उपक्रम सकाळी 7 ते सायंकाळी 5 या कालावधीत होणार आहेत. याकरिता दररोज रोप वने 600 ते 700 आणि पायी 4000 ते 6000 असे एकूण सुमारे 5000 ते 7000 व्यक्ती किल्ल्यावर शिववैभवाचे साक्षीदार होण्यासाठी येतील तर पायथ्याशी उभारण्यात येणाऱ्या “शिवसृष्टीला” रोज अंदाजे 30 ते 40 हजार व्यक्ती भेट देतील, असा अंदाज आहे.
रायगड किल्यावर ‘शिव-वैभव’
• संपूर्ण किल्ल्यावर पताका, माळा, अब्दगिरी, रांगोळ्या, विविध प्रतिकृती, मुखवटे, शिल्प आदिंच्या सहाय्याने विविध ठिकाणी सजावट करण्यात येईल. जागोजागी शिवकालीन इतिहासाबाबत चित्ररुपात माहिती देणारे आकर्षक फलक लावण्यात येतील.
• होळीचा माळ, महाद्वार, शिरकाईचे देऊळ, पालखी दरवाजा, कोरडे तळे, पीर, समाधीस्थळ, जगदीश्वराचे देऊळ अशा विविध ठिकाणी त्याठिकाणची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन शिवकालीन कलाप्रकार अल्पकालावधीच्या विश्रांतीनंतर सातत्याने सादर होत राहतील. इतिहासतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार या कलाप्रकारांची निवड होईल व सादरीकरण होईल.
• हे सर्व कार्यक्रम सुमारे 30 मिनिटाच्या कालावधीचे असतील आणि ते दर अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर त्या ठिकाणी सादर होतील. म्हणजे येणारा प्रेक्षक वर्ग प्रत्येक कार्यक्रम पाहून पुढे जाऊ शकेल. गोंधळ, भारुड, कीर्तन, पोवाडा, युद्धकला (दांडपट्टा, तलवार बाजी, शब्दवेध, भालाफेक आदी.) आख्यान इत्यादी. असे कार्यक्रम या महोत्सवात होणार आहे.
• वाघदरवाजा जवळच्या खळगासदृश भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंग उदा. अफजलखान भेट, बाजीप्रभू लढा प्रसंग तसेच गनिमी कावा प्रात्यक्षिके सादर करण्यात येतील.
• सभा मंडपाच्या ठिकाणी राज्याभिषेक दिनप्रसंगी (6 जून आणि शुद्ध ज्येष्ठ त्रयोदशी रोजी काही संस्था आयोजित करतात त्यानुसार) शामियानासदृश सजावट केली जाईल. शिवकालीन वेशभूषेतील व्यक्ती दरबारामध्ये हजर असतील.
• छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे, तशी पुतळ्याच्या स्वरुपात तेथे असेल. मेघडंबरी आकर्षकरित्या सजविण्यात येईल.
• दरबारी मनसबदार, अष्टप्रधान, भालदार, चोपदार, वकील आदिंच्या तत्कालीन वेशभूषेतील व्यक्ती शिवकालीन राजदरबाराचा देखावा उभा करतील. अर्ध्या तासाचा जीवंत देखावा अर्ध्या तासाच्या अंतराने 8 वेळा सादर होईल.
• राणीचा वसा या भागात तत्कालीन महलातील विविध दालनांच्या सजावटीनुसार सुशोभिकरण केले जाईल. उदा. देव्हारा, बैठकीची खोली, खलबत्याची खोली, व्यायामशाळा आदी.
• बाजारपेठेच्या ठिकाणी तत्कालीन बाजारपेठेचा देखावा उभा करण्यात येईल. त्याठिकाणी त्या काळातील वस्तुंचे प्रदर्शन भरविण्यात येईल.
• महाद्वाराच्या खालच्या बाजूला असलेला उभा कडा हा किल्ल्याचा भाग नसल्याने (एएसआयच्या क्षेत्राबाहेर असल्याने) त्याठिकाणी मावळ्यांच्या वेशभूषेतील हायकर्स रॅप्लिंगचे प्रात्यक्षिके दाखवतील.
• रात्रीच्या वेळी रायगड किल्ल्याच्या परिसराचे वैशिष्ट्ये उठून दिसण्यासाठी रायगडाच्या पायथ्यापासून ते महाद्वारापर्यंत विशिष्ट अंतरावर मशाली तेवत ठेवून किल्ल्याची वाट उजळविण्यात येईल.
रायगड किल्ल्यावरील व्यवस्था
• रायगड किल्ल्यावर एकावेळी रात्री 200 जण मुक्काम करु शकतात, तशी सोय जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या विश्रामगृहाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. किल्ल्यावर होणाऱ्या व वर नमुद केलेल्या उपक्रमांसाठी कलाकार तसेच अन्य तांत्रिक सहाय्य करणारा अत्यावश्यक कर्मचारी या काळात तेथे राहतील. बाहेरुन येणाऱ्या कोणत्याही प्रेक्षकाची तेथे सोय केली जाणार नाही.
• रायगड किल्ल्यावरील प्रवेश सर्वांना मोफत असेल. गर्दीचा अंदाज घेऊन रोप वने आणि पायवाटेने येणाऱ्या प्रेक्षकांना सुरक्षा रक्षकांमार्फत जागोजागी नियंत्रित करण्यात येईल. किल्ल्यावरील कार्यक्रम सुविहितपणे व्हावेत आणि प्रेक्षकांमध्ये शिस्त असावी याकरिता पुरेशी काळजी घेण्यात येईल.
रायगड किल्ला पायथ्याशी ‘शिव-सृष्टी’
• किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी येथील जागेत 3 ते 5 एकर परिसरात ‘शिव-सृष्टी’ उभी करण्यात येईल. या शिव-सृष्टीत रायगड किल्ल्यावरील राजदरबाराचा हुबेहुब देखावा उभा करण्यात येईल. नगारखाना, दरवाजा, सभामंडप अशा स्वरुपातील या दरबारात शिवराज्याभिषेकाचा सोहळा दर अर्ध्या तासाच्या अंतराने सादर करण्यात येईल.
• छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रसंगांचे चित्रण करणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन, महाराजांच्या गड किल्ल्यांच्या वैभवाचे चित्रण करणारे प्रदर्शन, रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती, छत्रपती शिवाजी महाराजावरील संबंधित पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, शिवकालीन नाण्यांचे प्रदर्शन, शिवकालीन वेशभूषांचे प्रदर्शन, शिवकालीन इतिहासाचा मागोवा घेणारे ध्वनीचित्र प्रदर्शन, मातीचे किल्ले बनविण्याची प्रात्यक्षिके, हस्तकलांची विक्री, प्रदर्शन व प्रात्यक्षिके, बचत गटांचे स्टॉल, मराठी खाद्य पदार्थांचे विक्री स्टॉल्स, याशिवाय नवीन पिढीला आकर्षित करतील, असं इंटरॲक्टिव गेम्स आणि अन्य प्रात्यक्षिके असणारी विविध दालने येथे असणार आहेत.
किल्ल्यावर जाण्यासाठी जेथून रोप वे सुरु होतो तेथे रोप वेच्या प्रारंभी 24 व्यक्तींची सोय होऊ शकेल असे सभागृह आहे. हिरकणीवाडी येथे ग्रामस्थांनी तयार केलेल्या सुमारे 250 लोकांची सोय होऊ शकेल तर पाचाड येथे अतिरिक्त 200 जणांची मुक्कामाची सोय होऊ शकेल. ही सर्व व्यवस्था शिव-सृष्टीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी आवश्यक असणार आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा