हिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने झुंजण्याचा संकल्प बालपणीच करणारा व त्यानुसार अपार कष्ट भोगणारा वीर देशभक्त, मनुष्यजातीचे कल्याण हेच अंतिम उद्दिष्ट असणारा राष्ट्रवादी, मूलग्राही व कृतिशूर विचारवंत, विज्ञाननिष्ठ व उपयुक्ततावादी समाजसुधारक, महाकाव्याचा नायक शोभावा असा महाकवी, इतिहास घडविणारा इतिहासकार, आपल्या प्रत्येक ग्रंथालाच इतिहास असणारा साहित्यिक, अमोघ वक्ता! स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे व्यक्तिमत्व अक्षरशः शतपैलू आहे. अनेक श्रेष्ठ गुणांचा समुच्चय त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रकर्षाने झाला होता. हे सर्व गुण त्यांनी इतिहासाच्या ज्ञानप्रकाशाने प्रकट केलेल्या व डोळसपणे स्वीकारलेल्या दिव्य व दाहक व्रताची सांगता करण्यासाठी त्यांनी मातृभूमीला समर्पित केले हे त्यांचे वैशिष्ट्य! त्यांचे उभे आयुष्य म्हणजे त्यांच्या वेळोवेळीच्या तत्वज्ञानाचा, युगप्रवर्तक घोषणांचा, धाडसी हालचालींचा, शूर कृत्यांचा, त्यागाचा आणि हालअपेष्टांचा विस्मयकारक चित्रपटच होय!
सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकर हे गावातील प्रतिष्ठित गृहस्थ होते. विनायकराव हे त्यांचे दुसरे चिरंजीव. थोरले बाबाराव आणि धाकटे नारायणराव. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी ह्यांनी त्यांच्यावर आईसारखीच माया केली. सावरकरांचे वडील १८९९ च्या प्लेगास बळी गेले.
सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. चापेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.
मार्च १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर १९०२ साली फर्गुसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.
राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना त्यांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालीयन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मेझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते.
श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी घोषित केलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती.
१८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते स्वातंत्र्यानंतर प्रसिद्ध झाले.
राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराप सावरकर यांना ब्रिटीश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्यापाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रानी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती.
वीर सावरकरांनीच पुढे दुसर्या महायुद्धाच्यावेळी जपान येथे जाउन नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी "आझाद हिंद फ़ौजेचे" सेनापतिपद भूषवावे अशी गळ घातली. त्यासाठी त्यांनी श्री रासबिहारी बोस यांचे पत्र नेताजींना दाखवुन सेनापतीची गरज पटवून दिली.पुढचा रोमहर्षक इतिहास सगळ्यांना माहीतच असेल.पण मुख्य प्रेरणा वीर सावरकरांचीच होती.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती निमीत्त आधारवड परिवार व् मासिक सैनिक दर्पण तर्फे कोटि कोटी प्रणाम !!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा