मंगळवार, ३१ मे, २०१६

लोककल्याणकारी अहिल्याई

लोककल्याणकारी अहिल्याई
 -------------------------

          राष्ट्रमाता अहिल्याईने आपले समस्तआयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचत असताना,जाती-धर्माची व प्रदेशाची मर्यादा न घालता, संपूर्ण भारतात कार्य केलेले आहे. अनेक विहिरी, तलाव, पाणपोई, धर्मशाळा व घाट बांधलेत. रस्ते, पूल निर्माण केलेत.जे काम आज भारताच्या शासनव्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केले जाते तेच काम शेकडो वर्षांपूर्वी राष्ट्रमाता अहिल्याईने केले. ‘प्रजा सुखी तर आपण सुखी,’ असे तत्त्व राष्ट्रमातेने अंगीकारले होते.

           मल्हाररावांच्या मृत्यूनंतर इंदोरवरून संस्थानाची राजधानी ‘महेश्‍वर’ या ठिकाणी आणून उद्योगधंद्याच्या विकासाला प्राधान्य दिले. वस्त्रोद्योग भरभराटीला आणले. वस्त्रोद्योगासाठी विणकर, कोष्टी, हलबा तसेच रस्ते, मशिदी, मंदिरे, धर्मशाळा व इतर बांधकामे सतत चालत असल्यामुळे पाथरवट, वास्तुशिल्पी, शिल्पकार, गवंडी, लोहार, सुतार, सोनार, चर्मकार अशा अनेक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यात. कलावंत, साहित्यिक व कारागीर अशा गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन, घर, पैसा व इतर सर्व सोयी उपलब्ध करून दिल्यात तसेच उद्योगासाठी पैसा आणि माल विकण्यासाठी बाजारपेठा उपलब्ध करून दिल्याने उद्योग व व्यापार भरभराटीला आला. परप्रांतात माल विकला जाऊ लागल्यामुळे इतरत्र मराठी माणसांविषयी प्रेम, आपुलकी व जिव्हाळ्याची भावना वाढीस लागली. आजही भारतात महेश्‍वरी साड्या प्रसिद्ध आहेत.

           काही भूमिहीन असणार्‍या कुणबी, मराठा, तेली, माळी यांसारख्या ओबीसी तसेच दलित, आदिवासी भटक्या, विमुक्त समाजास शेतजमिनी दिल्यात. शेतीच्या जोडीला इतर उद्योग सुरू केले. कृषिप्रधान देश असणार्‍या भारतातील संपूर्ण लोकजीवन पावसावर अवलंबून आहे. बर्‍याच वेळा दुष्काळ पडल्याने त्यांच्या जीवनात त्राही माजते. अशा वेळी भारतात तलाव, विहिरी, घाट व कुंडांची निर्मिती करून लोकांच्या गैरसोयी दूर केल्यात. शेतीचे उत्पन्न वाढावे म्हणून शेतकर्‍यांना आर्थिक मदतीचा हात दिला. त्यांच्यावरील करवसुलीची मर्यादा निश्‍चित ठरवून दिली. त्यामुळे जास्त कर वसूल करण्याची शासकीय कर्मचार्‍यांची हिंमत होत नव्हती. म्हणून राष्ट्रमातेच्या संस्थानात अंशत:ही भ्रष्टाचाराला वाव नव्हता.

           रानात चरणार्‍या पशू-पक्ष्यांसाठी रानातच तलाव बांधलेत. शेतकर्‍यांना योग्य मोबदला देऊन पिकांनी भरलेली उभी शेतं खरेदी केलीत आणि पशू-पक्ष्यांना व गायींना चरण्यासाठी सोडलीत. गो-कुरणांचीही व्यवस्था केली. त्या मुंग्यांना साखर आणि मास्यांना कणकेच्या गोळ्या टाकत.शेतात काम करणार्‍या बैलांना पाणी पाजण्यासाठी रोजाने माणसे लावली. केवळ माणसांच्याच नाही, तर पशू-पक्षांच्याही उदरनिर्वाहाची सोय केली. अशा प्रकारे आपल्या राज्यात सूक्ष्म जीवही उपाशी राहणार नाही, याची सतत दक्षता घेणारी, केवळ समाजाचेच नाही, तर निसर्गातील सजीवांचेही जीवन सुखर करणारी एकमेव राणी अहिल्याई होय!

           गोरगरिबांकरिता औषधोपचारासाठी मोफत दवाखान्याच्या सोयी केल्यात.व्यापार-व्यवसाय आणि दळणवळणासाठी पक्के रस्ते बांधलेत, दीनदुबळे, अनाथ, विधवा, अपंग यांसारख्या असहाय लोकांचे पुनर्वसन केले. त्यांच्यासाठी अन्नछत्रे व सदावर्ते चालविली. धर्मशाळा बांधून त्यांची राहण्याची नि:शुल्क व्यवस्था केली.ग्रामोद्योगांना प्रोत्साहन देऊन बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिलेत. हिवाळ्यात गोरगरीब प्रजेला गरम वस्त्रांचे वाटप केले. बेकारांना काम व श्रमांना योग्य दाम दिलेत. प्रवाशांसाठी मार्गावर अरण्यमय प्रदेशातही आमराई, बगिचे निर्माण केले. पर्यावरणाचा समतोल कायम राहावा म्हणून रस्त्याच्या दुतर्फा तसेच ओसाड, पडीक जमिनीवर व डोंगरावर झाडे लावून वृक्षरोपणासारखे उपक्रम राबवलेत. पर्यावरणाचा  समतोल राहावा व जमिनीची धूप थांबावी तथा शेतक-यांची आर्थिक  स्थीती सुधारावी यासाठी राज्यातील प्रत्येक शेतक-यांनी २० झाडे लावलीच पाहिजे असा अहिल्याईचा  दंडक होता.  त्यातील ९ झाडे ही शेतक-यांच्या मालकीची असायचीत.  त्यांना या झाडांचा  हवा तसा उपयोग करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य  असायचे.  तर ११ झाडं ही सरकारच्या अर्थात  संस्थानाच्या मालकिची असायचीत.

            अन्नछत्रे, धर्मशाळा, आरोग्यशाळा, पाथशाळा, गोशाळा, वाटसरूंसाठी विश्रांतीकरिता ओटे इत्यादींची बांधकामे केलीत. स्वत: दोनच अपत्यांना जन्म देऊन मर्यादित कुटुंबाचा आदर्श गिरवला. ग्रामपंचायतीची स्थापना, कोतवालपदाची निर्मिती, टपाल व्यवस्था, विनाविलंब न्याय देण्यासाठी न्यायालये, निपुत्रिकांना दत्तक वारसाहक्क, राज्याच्या व प्रजेच्या संरक्षणासाठी पोलिसयंत्रणा, सैन्यव्यवस्था, स्त्रीसैन्य, परराज्यात वकिलांची नेमणूक अशी व्यवस्था केली. राज्यात हुंडा घेणे आणि देणे बंदी, दारूबंदी यासारखे कायदे केले ते केवळ प्रजेला सुखी करण्यासाठीच.

           प्रजेला नियमित काम मिळावे व कलावंतांच्या वास्तुकला जिवंत राहाव्यात यासाठी सर्वधर्मसमभावाचा आदर्श गिरवीत मंदिरांची निर्मिती व जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. खडेपीर, चांदवड येथील नानावली दर्गा, बुखारी बाबांचा दर्गा, चांदशहा दर्गा व अनेक पीर, मशिदी बांधल्यात.या सर्वांच्या देखरेखीसाठी कायमस्वरूपाच्या नेमणुका करून दिल्यात.रस्ते व महारस्ते बांधून पाणपोया सुरू केल्यात.त्यामुळे प्रजेला कामं मिळालीत आणि पर्यटनाला प्रोत्साहनही मिळाले. अहिल्याईंनी उपेक्षित, दलित, पिडीत,  आदिवासी, भटके - विमुक्त, ओबीसी, गरीब, मजूर, कामगार यांच्या हितासाठी, उपजीविकेसाठी, कलाकौशल्यांना उत्तेजन देण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आयुष्य वेचले.

           वैशिष्ट्यपूर्ण होळकरांच्या राज्यात सरकारी कोष आणि खाजगी कोष होते.महसूल व कराद्वारे प्राप्त होणार्‍या उत्पन्नाचा समावेश सरकारी कोषात, तर लढाईतील लूट वा खंडणी यातून मिळणार्‍या उत्पन्नाचा २५ टक्के वाटा स्त्रीधन म्हणून खाजगी कोषात जमा व्हायचा. खाजगी कोषातून खर्च व विनियोग करण्याचे स्वातंत्र्य पूर्णत: घरातल्या प्रमुख स्त्रीस होते. गौतमाबाईच्या मृत्यूनंतर हा खाजगी कोष अहिल्याकडे आला. या खाजगीतूनच अहिल्याईने जनकल्याणाची कामे केली.

           प्रजेवर जास्त कराचा बोज  न लादता राज्याचा कोष समृद्ध करून राज्य भरभराटीस आणले. हे सर्व कार्य आपल्या खाजगी संपत्तीवर तुळशीपत्र ठेवून, खाजगी उत्पन्नाचा उपयोगसुद्धा लोककल्याणासाठी केला. ‘‘शासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो, तर तो त्यांचा विश्‍वस्त असतो. त्याची उधळपट्टी करण्याचा त्यास काहीही अधिकार पोहोचत नाही.’’ ‘‘राज्यकर्त्यांनी केवळ राजकारणात गुंतून राहण्याऐवजी समाजाच्या म्हणजेच प्रजेच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे.’’- असे त्यांचे तत्त्व होते. हा अहिल्याईचा गुण आजच्या पुढार्‍यांना निश्‍चित घेण्यासारखा आहे. अशा या लोककल्याणकारी कार्य करणार्‍या राष्ट्रमाता अहिल्याईंच्या ३१ मे रोजी  येऊ घातलेल्या २९१ व्या जयंती दिना निमित्त कोटी कोटी अभिवादन!

 होमेश भुजाडे
नागपूर
 ९४२२८०३२७३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा