शनिवार, ७ मे, २०१६

सैराट वरचा चष्मा.

☄सैराट वरचा चष्मा.

            भगवा चष्मा, हिरवा चष्मा, निळा चष्मा आणि जातीयवादाचा काळा चष्मा हे भारतीय चष्म्याचे प्रकार आहेत.
अजून भाषा, प्रांतवादाचे सुध्दा चष्मे फुकट मिळतात. हे सर्व चष्मे घेण्यासाठी पात्रता म्हणजे तुमचा जन्म कोणत्या धर्मात, जातीत, पंथात, तसेच कोणत्या प्रांतात कोणती भाषा बोलणा-या मध्ये झाला आहे एवढीच पात्रता आवश्यक असते. हा चष्मा एकदा घातला कि जग तुम्हांला म्हणजे फक्त भारत देश तुम्हाला त्या रंगाचा दिसू लागतो.
         सैराटच्या बाबतीत या चष्मेवाल्यांनी सोशल मिडीयावर हैदोस घातला कारण यांना सैराट तसाच दिसला. पण अजून एक रंग नसलेला स्वच्छ चष्मा आहे तो फक्त नागराज मंजूळेनी घातला. तो या वरील पुरुषी चष्मेवाल्यांना दिसला नाही तो आहे 'स्त्री'चा चष्मा.
          सैराट हा स्त्री प्रधान चित्रपट आहे हे स्वतः नागराज मंजूळेंनी त्यांच्या पोस्ट मध्ये लिहीले आहे.

संपूर्ण चित्रपट व्यापणारी आर्चीची भूमिका पहा.

सुरवातीला खोखो खेळताना आर्ची हिरोला माझ्याकडे का बघतोस म्हणून जाब विचारते. आर्ची हिरोला मावस भावापासून वाचविते. आर्ची बुलेट चालविते, आर्ची ट्रँक्टर चालविते,  आर्ची हिरोच्या घरी बिंधास्त जाते. आर्ची हिरोला भेटायला ये म्हणते. आर्ची प्रथम हिरोला आय लव्ह यु म्हणते. आर्ची हिरोला आपल्या  भावाच्या वाढदिवसाला ये. म्हणते. आर्ची हिरोला चुंबनासाठी कार मध्ये नेते.  आर्ची हिरोच्या पाठीमागे स्वतःहून घर सोडून एकटी पळून जाते. आर्ची पोलिसांना दम देऊन हिरोला सोडवते. पुन्हा हिरोला भाऊ व त्याचे साथीदार मारताना पिस्तुलाची भीती दाखवून सोडविते.  आर्ची पिस्तूलातून गोळी घालते व हिरोला घेऊन परत पळून जाते. आर्ची कर्नाटकातील हॉटेलमध्ये मध्ये तिच्याकडे पाहणा-याला फक्त अँक्शन करुन गप्प करते. आर्चीला काठी घेऊन वाचवणारी पण एक मराठी बाईच असते पुरुष नाही. आर्ची कामाला जाते. आर्चीवर संशय हिरो घेतो पण आर्ची हिरोवर संशय घेत नाही. आर्चीला हिरो मारतो पण आर्ची हिरोला मारत नाही. आर्चीला झोपडपट्टीत राहणे पटत नाही म्हणून आर्ची घर बदलते व फ्लँटचेही बुकींग करते. आर्ची आईला फोन करते पण बापाला, भावाला नाही. आर्चीला मदत आईच करते.  आर्चीला आईच भावाजवळ कपडे व गोडधोड पदार्थ, बाळासाठी चांदीचे तोडे देऊन मराठी संस्कृतीचे दर्शन घडविते.
पण आर्चीने प्रेम केले व पळून गेली म्हणून इज्जत गेली या खोट्या प्रतिष्ठेपायी तिचा भाऊ व त्याचे पुरुष साथीदार तिला व हिरोलाही मारतात.  

या पिक्चरची हिरो व हिरोईन ही आर्चीच आहे. राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला. आर्चीलाच ना.

चित्रपटात आर्चीने पोहताना कपडे न काढणे, हिरोने थोबाडीत मारल्यावरही हिरोपेक्षा सक्षम असूनही उलट न मारणारी पत्नी, तसेच भावना न चाळवणारे प्रेमप्रसंगाचे दृश्य याविषयी मंजूळेंचे कोणी कौतूक केले नाही. कारण चष्म्यातून हे दिसले नाही.

एक संस्कारी, महत्वाकांक्षी, प्रचंड धाडसी, कष्टाळू आर्ची रिंकू राजगुरुने रंगविली आहे.

धर्म, जात, प्रतिष्ठा, वर्चस्व, राजकारण यासाठी पुरुषांनी केलेले स्त्रीचे शोषण व त्या शोषणाविरुध्द एका स्त्रीने प्रेमासाठी दिलेला एक संघर्षमय परंतु अयशस्वी लढा चित्रपटात दाखविला. या चित्रपटातीला लढा आहे  एका स्त्रीचा पुरुषाच्या जातीयवादाविरुध्द, वर्चस्वाविरुध्द, शोषणाविरुध्द, अन्यायाविरुध्द.
ज्या लढ्यामध्ये स्त्री अजून हरत आहे. गुलाम आहे.
पण काही आर्ची सारख्या लढल्या, लढत आहे आणि लढत राहणार.
अंतिम विजयापर्यंत.

आणखी बरं, चित्रपटात सलीम नावाचं आणखी एक गुटखा खाणारं व मार खाणारं पात्र आहे. हिरवे चष्मेवाल्यांची बदनामी केली म्हणून अजून कोणी ओरडले नाही. 

आता या सर्व चष्मेवाल्यांना सांगा. भारत स्वतंत्र झाला 1947 साली आणि आज आम्ही आमच्या घरातील बहिणीला आणि मुलीला स्वतंत्र करत आहोत. स्त्रीला अजून मनपसंद जोडीदार शोधण्याचे म्हणजे लग्नाचे स्वातंत्र्य सर्व जाती धर्मातील पुरुषांनी दिलेले नाही.

स्त्रीला फक्त तिचा जोडीदार शोधण्याचे, लग्न करण्याचे स्वातंत्र्य देऊन बघा मग या देशात ना जातीयवाद राहील, ना धर्मवाद राहील, ना प्रांतवाद राहील, ना भाषावाद राहिल.

पण स्त्रीला मुक्त केले तर यांनी तयार केलेल्या चष्मेवाल्या लोकांची संख्या संपेल मग राजकारण करण्यासाठी हक्काचे लोक कुठुन आणणार ?

������������������������������

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा