गुरुवार, ५ मे, २०१६

श्री स्वामी समर्थ

१३८ वर्षापूर्वी आजच्या दिवशी लौकिकार्थाने स्वामींनी देह सोडला. देह सोडताना समर्थमुखातून श्रीकृष्णावतारावेळी त्यांनी सांगितलेले वचन परत पुन्हा उच्चारले गेले.
अनन्याश्चिन्तयंतो मां ये जना: पर्युपासते ।
तेषांनित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥

(जो अनन्य भावे शरण मजसी, पाहील मुक्तीचा सोहळा ।
जिंकील जीवन कला । जो मजवरी विसंबला ॥)

स्वामींनी हा श्लोक म्हटला, आशीर्वादपर हात उंचावले व देह विसर्जित केला. स्वामींनी स्पष्टच सांगितले आहे की फक्त माझे चिंतन , नामस्मरण करा बाकी मी सगळे बघून घेईन. लक्षात घ्या हे प्रत्यक्ष स्वामींनी आपल्याला दिलेले वचन आहे!

आज आपल्याला स्वामींचे अस्तित्व सदैव आपल्या अवती भवती जाणवत नाही का ?

स्वामी ब्रह्मांड व्यापी आहेत. भक्तांच्या आर्त हाका त्यांना जाणवत असतात .

आपल्या नामात सदैव गर्क राहणाऱ्या आपल्या सर्व भक्तांची स्वामी काळजी घेत असतात. नामस्मरण करणाऱ्या आपल्या भक्तांच्या पुढे मागे स्वामी सदैव वावरत असतात आणि सतत धीर देतात की , " भिऊ नकोस , भांबावू नकोस , घाबरू नकोस. हा भवसागर पार करताना मी तुझ्या सोबत आहे हे कधी विसरू नकोस. निर्भय हो आणि नामाच्या होडीत बसून सुखनैव प्रवास कर. पलीकडच्या मोक्षाच्या किनाऱ्या वर मी तुझी वाट पाहत उभा आहे. तू फक्त माझ्या नामात दंग हो. मी तुझा योगक्षेम पाहीन. तुझ्या सर्व भक्ती जाणिवा विस्तारित करेन. मी तुझाच होऊन राहीन. तू काळजी करू नकोस"

॥ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ॥

॥ ॐ श्री स्वामी समर्थ ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा