बुद्ध पौर्णिमा
शनिवार, दि. २१ मे, २०१६ रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. ही पौर्णिमा मे महिन्यात येते. बुद्ध धम्माच्या अनुयायांसाठी ही सर्वात महत्त्वाची पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला त्रिगुणी पौर्णिमा असे म्हणतात. याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला.
महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथात केले आहे. ते लिहितात : "पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्त्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, "माझ्या पित्याच्या देवदहनगरीला मी जाऊ इच्छिते." "तुझ्या इच्छेप्रमाणे होईल." राजाने उत्तर दिले. "सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोदनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले. देवदहला जात असतांना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द �वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय.
लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यांपर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नानारंगांचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजुळ स्वरालाप काढीत होते. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणा-या सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंध्यापाशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वा-याच्या झुळूकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यांपैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली, आणि अशाप्रकारे हालल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व ५६३ व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला.
शुद्धोदन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती. परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते. आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोदनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्हासाने थाटामाटात साजरा केला.
पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोदनाची होती. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. याच वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम हा वयाच्या ३५ व्या वर्षी गया येथे निरंजना नदीच्या काठी असलेल्या उरूवेला वनामध्ये पिंपळवृक्षाखाली बसला असताना बुद्ध झाला. सिद्धार्थ गौतमास वैशाखी पौर्णिमेच्या रात्री तिस-या प्रहरी दुःखमुक्तीचे ज्ञान प्राप्त झाले. त्याच्या मनातील अंधःकार पूर्णपणे दूर झाला व तो सम्यक संबुद्ध झाला. याच दिवशी सिद्धार्थ गौतमाला चार आर्यसत्यांची अनुभूती झाली. "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या बुद्ध बनण्याच्या प्रक्रियेचे सविस्तर विवेचन केलेले आहे.
याच पौर्णिमेच्या दिवशी ख्रिस्तपूर्व ४८३ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी सिद्धार्थ गौतम बुद्धाचे मल्ल गणराज्याची राजधानी कुशीनारा येथील शाल वाटीकेत महापरिनिर्वाण झाले.
या पौर्णिमेच्या रात्री तिस-या प्रहरी मनाच्या जागरूक अवस्थेत समाधीचा अभ्यास करताना गौतम बुद्धाचा मृत्यू झाला
गौतम बुद्धाच्या जीवनात जन्म, बुद्धत्वप्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडल्या आहेत. निसर्गात दुर्मिळ अशाच या घटना आहेत. या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेला घडल्यामुळे या पौर्णिमेस त्रिगुणी पौर्णिमा असे म्हणतात.
हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे व तो आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला पाहिजे. प्रत्येकाने आपले घर स्वच्छ केले पाहिजे, सजविले पाहिजे, गोडधोड करून इतरांना वाटले पाहिजे, मित्रांना व नातेवाईकांना आपल्या घरी आमंत्रित केले पाहिजे. मुलांसाठी नवीन कपडे केले पाहिजेत.
अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या त्रिगुणी पौर्णिमेच्या दिवशी अष्टशीलाचे पालन केले पाहिजे. संपूर्ण बुद्ध विहारे व धम्म प्रशिक्षण संस्था यांनी धम्म कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. विहारे सजविली पाहिजेत. धम्म प्रवचने आयोजित केली पाहिजेत व मने उत्साहाने व आनंदाने ओतप्रोत भरलेली असली पाहिजेत.
सणांच्या दिवशी मंगल, सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहीत करणा-या भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांची स्मृती जपण्यासाठी सण साजरे केले जातात. सणांच्या दिवशीच्या भूतकाळातील घडामोडींपासून बोध घेऊन त्यानुसार स्वतःचे जीवन घडविण्यासाठी सण साजरे केले जातात.
बुद्धाने आयुष्यभर शील, समाधी व प्रज्ञेचा मार्ग शिकविला. त्याने करूणा विकसित करण्याचा व समता, स्वातंत्र्य व बंधुत्व यावर आधारित जीवन जगण्याचा धडा लोकांना दिला. त्यामुळे प्रत्येक बुद्ध सणाच्या दिवशी शीलांचे काटेकोरपणे पालन करणे व काया, वाचा व मनाची आपली कृती निष्कलंक व कुशल राहील याची खबरदारी घेणे निकडीचे आहे. सर्व सणांच्या दिवशी प्रत्येकाचे वर्तन हे बुद्धाच्या शिकवणूकीशी सुसंगत असेच असले पाहिजे. या दिवशी धम्म प्रवचने, परिषदा, कार्यशाळा वेगवेगळ्या भागांमध्ये आयोजित केल्या पाहिजेत आणि लोकांनी धम्म शिकण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून ते स्वतःच्या व इतरांच्या कल्याणासाठी धम्मानुचरण करतील.
सर्व बारा पौर्णिमा बौद्धांचे सण आहेत. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या जीवनातील महत्वाच्या घटना पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत. बुद्ध धम्मात प्रत्येक पौर्णिमेला वेगळे असे महत्व आहे. या सर्व दिवशी उपोसथ म्हणजेच अष्टशीलाचे गांभीर्याने पालन केले पाहिजे. जेव्हा आपण प्रसन्नतेने अष्टशीलाचे पालन करतो, तेव्हा भूतकाळात त्या दिवशी घडलेल्या महत्वाच्या घटना शील व समाधीचा जास्तीत जास्त धैर्याने अभ्यास करण्याची प्रेरणा आपल्याला देत असतात. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेचे ऐतिहासिक महत्व समजून घेणे आवश्यक आहे.
(संदर्भ : आयु. श्याम तागडे IAS लिखित "बोधिसत्व आंबेडकरांचे बुद्ध धम्म मिशन" या ग्रंथातून)
क्रोधाला प्रेमाने,
पापाला सदाचरणाने,
लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते.
- तथागत भगवान गौतम बुद्ध
सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगल सदिच्छा !!!
"सर्वांचे कल्याण होवो"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा