ज्ञान-वाणी
****श्रीज्ञानेश्वरी****
॥ श्रीज्ञानेश्वर माउलि समर्थ ॥
॥ विज्ञानयोग ॥
तया उपमा माप कां सुवावें ।
मज अव्यक्ता व्यक्त कां मानावें ।
सिध्द असतां कां निमावें ।
साधनवरी ॥१५६॥
परि हा बोल आघवा ।
जरी विचारिजतसे पांडवा ।
तरी विशेषें या जीवां ।
न चोजवे गा ॥१५७॥
कां जे योगमायापडळें।
हे जाले आहाती आंधळे।
म्हणोनि प्रकाशाचेनि देहबळें ।
न देखती मातें ॥१५८॥
एर्हवीं मी नसें ऐसें ।
कांही वस्तुजात असे ।
पाहें पां कवण जळ रसें - ।
रहित आहे ॥१५९॥
पवन कवणातें न शिवेचि ।
आकाश कें न समायेचि ।
हें असो एक मीचि।
वाश्वीं आसें ॥१६०॥
त्या मला अपरिमिताला परिमित कां करावें ? इंद्रियातित अशा मला इंद्रियगोचर असा भौतिक कां मानावें ? आणि मी सिध्दवस्तु असतांना त्याच्या प्राप्तीकरितां साधनें करित कां मरावें ?
पण जरी हें माझें सर्व बोलणें विचार करण्याजोगें आहे, तरी ते जीवाला विशेषकरून आवडत नाही.
कारण हे जीव, त्यांच्या डोळ्यांत योगमायेचे म्हणजे त्रिगुणात्मक मायेचे पटल असल्यामुळें तें आंधळे झाले आहेत म्हणून "प्रकाशाचेनि देहबळे" म्हणजे "मी म्हणजे मर्यादित" या समजुतीमुळें, ते मला पाहू शकत नाहीत.
नाही तर 'मी नाही' अशी वस्तुच जगांत नाही. अर्जुना ! विचार कर. कोणते पाणी रसावांचून असतें ?
वारा कोण्या वस्तुला स्पर्श करीत नाही ? आकाश कशांत भरून नाही ? हें असूं दे. मीच एक जगांत भरलो आहे.
॥ जय जय श्रीरामकृष्ण हरि ॥
बुधवार, ४ मे, २०१६
विज्ञानयोग
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा