शुक्रवार, ६ मे, २०१६

सैराट........


नागराज पोपटराव मंजुळे या माणसाचं कौतुक केवळ यासाठी नाही की या माणसांनं स्वतःला प्रस्थापित प्रवाहाच्या विरोधात उभं करून दाखवलय तर त्याचं खरं अभिनंदन यासाठी की त्याने या प्रवाहाची दिशाच बदलवून टाकलीय.
-सचिन तायडे, पब्लिक स्पिकर
सैराटचं यश कशात.
 सैराटचं यश हे त्या प्रत्येकाचं यश आहे, ज्याला अमानुषतेची चीड आहे , सैराटचं यश हे त्या प्रत्येकाचं यश आहे ज्याला आपलं जगणं कुठल्याशा फुटकळ मध्ययुगीन परंपरांमुळं नाईलाजानं एकतर स्वतःच बरबाद करावं लागतं किंवा कुणाकडून ते केलं तरी जातं... सैराट चं यश हे त्या प्रत्येक ‘पुरूषी’ अहंकाराचं अपयश आहे ज्या पुरूषी अहंकाराला सांभाळणारी स्त्रीच या समाजात खाणदानी ठरवल्या येते.. सैराटचं यश त्या प्रत्येकाचं आहे ज्याने मातीतून उगवून, बंडखोरी करून आभाळाला स्पर्श करण्याचं स्वप्न पाहिलंय.. आणि सैराटचं यश हे त्या प्रत्येक जोडप्याचंही यश आहे ज्यांनी शेवटपर्यंत एकामेकांची साथ कधीच सोडली नव्हती…
सोशल मीडियावर सैराटची बदनामी... 
 मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचं सांस्कृतिकच नव्हे तर अख्खं सामाजिक जीवनच सैराटमय झालंय.. जो तो सैराटमय झालाय. मात्र याचवेळी सुरू झालेल्या, बुरसटलेल्या विरोधकांच्या बालीश, परंतु तितक्याच धूर्त नि जातीयवादी युक्तीवादामुळं सैराटच जराही नुकसान झालं नाही हेही विशेष... उलट सोशल मीडियावर जेवढा अपप्रचार करण्याचा फुटकळ प्रयत्न झाला तितके जास्तच हाऊसफूलचे बोर्ड राज्यभरातल्या थिएटरवर धडाधड लागल्या जात आहेत…
 
शेवट हेलावून टाकणारा.... 
 सैराट पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता आणि अजूनही आहे…काहींना ‘रिंकू’ जाम आवडली म्हणून असेन वा काहींना ‘आकाश’ जबराट वाटला, म्हणून असेन.. वा काहीजन नागराज मंजुळे यांचे मोठे फॅन असतील म्हणूनही असेल…कारण काहीही असो, सैराट ने एक वादळ उभं केलय ज्याच्या त्याच्या मनात… झिंगाट हे गाणं सुरू झाल्यावर जो तो थेएटरमधे बूंगाट होऊन चिंगाट नाचतोय हे चित्र एकीकडे पहायला मिळत असतांनाच चित्रपट संपतांना मात्र थिएटरमधे भयान सुन्नता पसरून जाते, हातपाय गळून जातात, कित्येकांच्या तर डोळ्याच्या कडा आपोआप ओल्याही होतात आणि कुणीही एकामेकांशी फार काही न बोलता आपआपल्या गाड्यांना पार्कींग एरियातून काढून सुन्न , प्रश्नांकीत चेह-याने घराकडं निघून जातोय…जातीचं अतिशय वास्तव मात्र तितकच क्रूर, कडू सत्य नागराजने सैराटच्या शेवटच्या क्षणांत चितारलय…सिनेमाचा शेवट भयानक आहे… कदाचित तुमच्या कित्येक रात्री खाणारा आहे…तुम्हाला विचार करायला भाग पाडणारा आहे…नागराजने फँन्ड्री च्या वेळीही हेच केलं होतं शेवटच्या क्षणी जब्याच्या हातातून त्याने जो दगड भिरकावला होता तो इथल्या जातीय सरंजामदारांना बरोबर जाऊन बसला होता.. यावेळीही सैराटनं तेच केलय मात्र यावेळी चार पाऊलं पुढं गेलय सैराटचं हे कथानक... सौंदर्य, प्रेम आणि क्रौर्य या तीन भूमिकांचा आवाज झालाय हा सिनेमा…
झी स्टुडिओचे आभार...
नागराज मंजुळेच्या पटकथेचं नि एकूणच त्यांचं कौतुक करतांना विशेष आभार त्या प्रोड्यूसरचे मानले पाहिजेत ज्यांनी अशा विषयाला पाठबळ दिलय..विशेष आभार अजय-अतुल या जोडीचेही व्यक्त केले पाहिजेत, ज्यांनी अगदी अमेरिकेत जाऊन तिथल्या कलाकारांच्या सहाय्याने या सिनेमाचं जबरदस्त म्युझिक तयार केलंय…नागराजचं  विशेष अभिनंदन यासाठीही की या माणसाने जे पाहीलं किंवा जे जे तो जगत आलाय तेच तो दाखवण्याचा आग्रह धरतोय.. निव्वळ गोड गोड दिखावा...गुडीगुडी खोटा खोटा रोमँन्टीसिझम या माणसाला कबूल नाही... त्याच्या “उन्हाच्या कटाविरूद्ध” या काव्यसंग्रहाला वाचतांनाही हे सतत जाणवत राहतं की या माणसाची नजर अस्सलतेला प्राधान्य देते...या माणसाची भाषाही पडद्यावर तीच असते जी त्याच्या रोजच्या जगण्यात आहे… शुद्ध शब्दांचा, शुद्ध उच्चारांचा पोक्कळ आवेश नाही वा सो कॉल्ड बॉडीलँग्वेजचा अभिनिवेश दिसत नाही, नागराजच्या जगण्यात ना त्याच्या सिनेमात. आज घडीला राज्याच्या गावागावांमधे करोडो लोक जे खरं जीवन जगतात तेच नागराज त्याच्या पटकथेत मांडतोय… 
नागराजचं कौतुक करावं तेवढे थोडं...
साध्यासुध्या चेह-याची, जाड्याभरड्या काळ्या रंगाची माणसं, उन्हात काम करून करून घामानं चिंबलेले मजूर, संसार जगवण्यासाठी दिनरात राबलेल्या अन् रापलेल्या आज्या त्याला महत्वाचाएत… तर दूसरीकडे स्त्रीच्या सौंदर्याची पिढ्यानपिढ्या ठरलेली टीपीकल व्याख्या तर सैराटच्या रूपानं नागराजने टराटर फाडलीय… मात्र हे सारं काही अनेकांना सहन होणारं नाहीए खरतर अनेकांना झोंबणारच आहे  हे  सारं…जातीचा माज असलेल्यांना तर हा सिनेमा म्हणजे संस्कृती बुडवणारा वाटायला लागलाय…मुळात कोणत्या संस्कार आणि संस्कृतीचं तुणतुणं वाजवत असतो आपण..? या सिनेमात आर्ची च्या बूलेट ला शिवरायांचा झेंडा आहे म्हणून काही पोट्यांचं टोळकं कोर्टात जाण्याच्या बेतात होतं.. अनेकांनी सोशलमिडीयावर तर सैराटविरुद्ध “ धर्म खतरेमें है ”  सारखं वादळ उठवण्याचा वावटळी प्रयत्नही करून पाहिला…मग यावेळी किशोरवयीन मुलांमुली व त्यांच्यावर पडणा-या संस्कारांपर्यंत अनेकांनी आपलं लबाड समाजप्रबोधन सुरू केलं... या आधी असे कित्येक चित्रपट आलेले आहेत.. हिंदी सिनेमाचा सनी लिओनी पर्यंतचा प्रवास तर सांगायलाच नको....अगदी मराठीत सुद्धा बीपी, शाळा ,टाईमपास सारखे चित्रपट डोक्यावर घेण्यात आलेत मात्र त्यावेळी असं रान कुणी उठवलं नाही कदाचित सैराट च्या निमित्तानं झालेली तुफान प्रसिद्धी आणि लोकांचा मिळालेला जबरदस्त प्रतिसाद हे सारं काही एक वडार समाजातून आलेल्या एका मंजुळेला मिळतय हे सारं कही अनेकांना पाहावल्या गेलं नसावं… या सा-याच विरोधात जातीचा दूर्गंध अधीक जास्त जानवतोय…आणि नेमकं नागराज ने, जे आजूबाजूला रोज घडतय तेच सैराटमधून दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय …
महाराष्ट्रातील 'सैराट' वास्तव...
काही महीण्यांपूर्वीच कोल्हापूरमधे लग्न करून आपला संसार सुरू केलेल्या एका जोडप्याला मुलीच्या भावांनी रात्रीच्यावेळी घरात घूसून गळे चिरून जिवंत मारलं हे वास्तव नाही का? नगर जिल्ह्यात खर्डा येथे नितीन आगे प्रकरणात सुद्धा त्या अकरावीत शिकणा-या पोराच्या शरीरात मागच्या बाजूने त्याच्या अंगात वीटभट्टीतली तप्त सळई खूपसून हालहाल करून आणि नंतर झाडाला लटकवून ठार मारलं हे वास्तव नाही का? राज्यभरात विविध ठिकाणी कुठे हातपाय तोडण्यात आलेएत.. तर कुठे अख्ख्या गावानेच बहिष्कृत करून नग्न धिंड काढलीय तर कुठे कुणाचे डोळे फोडण्यात आलेय हे वास्तव नाही का ? तर शिर्डीमधे भीमगीताची रिंगीग टोन ठेवल्यामुळं सागर शेजवळच्या तोंडावर,छातीवर बूलेट रगडून रगडून त्याला मारण्यात आलं हेही वास्तव नाही का ? आश्चर्य याचंय की हे सारं एकतर इज्जत वाचवण्यासाठी केलं जातय किंवा जातीची दादागीरी बरकरार ठेवण्यासाठी केलं जातय… 
शिवाजी महाराजांना ओढून आणतायं...
 यात सगळ्यात वाईट काही असेल तर ओढून ताणून या सा-यात शिवरायांना ओढून आणलं जातं…महाराजांचा उदो उदो करतांना काही खूजे लोक महाराजांच्या पायाची धूळ बनण्याची लायकी नसतांनाही स्वतःला छत्रपती म्हणवून घेतात... महाराज, राजमाता जिजाऊसाहेब यांना कळल्या नाहीत आणि कळणारच नाहीत…अशांचं कर्तृत्व काय, तर ते महाराज ज्या जातीचे होते त्याच जातीत हेही जन्माला आलेत एव्हढच… खरतर हे सारच दुर्देवी आहे…तरीही आजघडीला महाराजांच्या ख-या संस्कारांवर चालणारे असंख्य आहेत हेही नाकारून चालणार नाही परंतू ही जमेची बाजू जरी असली तरी अशांची संख्या तुलनेने कमीच आहे.
जातीयवादाची दुर्गंधी
87 व्या अखिल भारतीय साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी मराठा जातीत जन्मलेले फ.मु.शिंदे यांची निवड झाली होती त्या प्रसंगी माध्यमांसमोर बोलतांना शिंदे आवर्जून म्हणाले होते की, “ पिढ्यापिढ्या जे उन्हातच होते अशांना सावलीत आणणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मी मला मिळालेला हा अध्यक्षपदाचा बहुमान अर्पण करतो…” एखाद्या उच्च जातीत जन्माला येउन अशी सहवेदना वाटून घेणारे असे लिखाणाच्या, चिंतनाच्या आणि कलेच्या क्षेत्रात काम करणारे कितीजण आहेत?  हाच खरा सवाल मला वाटतं सैराटच्या निमित्तानं पुन्हा उभा राहिला आहे... निव्वळ राजकीयच नाही तर सांस्कृतिक क्षेत्रातही ही जातीयवादाची दुर्गंधी पोहचलीय..आधी काही लोकांच्या ओठात जात असायची आता ती पोटातही आहे आणि कृतीतही आहे याचे दुःख अधीक आहे…
ग्रामीण जीवन पडद्यावर...
या सा-यामुळचं नागराज आजूबाजूचं उघडंनागडं सत्य दाखवण्यावर भर देतोय, मुळात तो त्याची ही जबाबदारी मानतोय.  ज्याची पर्वा इथल्या इस्टमनकलरवाल्यांना कधीच नव्हती ना इथल्या कित्येक पटकथाकारांना हे सारं लिहीणं कधी गरजेचं वाटलं ? जे करोडोंचं जगणच नाही तेच पडद्यावर आतापर्यंत दाखवण्यात प्रयत्न होत आलाय. नेमकं याच गोष्टीला नागराजने फाटा दिलाय. खरतर आजूबाजूच्या सामाजिक विस्तवाचं वास्तव लक्षात घ्यावसं वाटत नाही कित्येक पटकथाकारांना . काही विचारवंत - लेखकांना शेजारच्या जिल्ह्यात काय शिजतय आणि याही उपर जाऊन आपल्या बुडाखाली काय जळतय याचं साधं सोयरसूतक नसतंच. मात्र तिकडे आखातातल्या तेलावर किंवा तिथल्या भयंकर अशा रासायनिक अण्वस्त्रांवर किंवा लँटीन अमेरिकेत झालेल्या बदलांवर आपली लेखणी पळवायला यांचा हात अधिकची गती घेतो.  उंटाचा मुका घ्यायच्या स्पर्धेत उतरू पाहणा-या या विचारवंत लेखकांना देशाच्या विकासासाठी वा एकूणच प्रगतीसाठी युरोपीअन देशांची वा अमेरिकेतल्या पाच पन्नास राज्यांची तूलना करणारी लीटमस टेस्ट नेहमीच गरजेची का पडते हेही कळत नाही.
लग्नाचा बाजार... 
सिनेमात लग्नाचं जोडपं हे हमखास गोरंगोमटं दाखवण्यावर भर असायचा मग हेच प्रतिबिंब समाजातही पडायला लागलं..प्रत्येकाला आपली जोडीदारीन ऐश्वर्या राय सारखी हवीय आणि जोडीदार शाहरूख सारखा..बाकीच्यांचं जणू हृदय धडधडतच नाही, त्यांना जणू प्रेमच होत नाही... बाकीच्यांना जशा काही भावनाच नसतात. मुळात याला - त्याला दाखवण्यासाठीच ज्यांचा त्यांचा हा रंगाचा, सौंदर्याचा खटाटोप सुरू असतो…अगदी लग्नाच्यावेळीही केवळ याला त्याला दाखवण्यासाठीच अगदी कर्ज काढून लग्नाचा बडेजाव करण्यात येतो, हुंडा देतांना घेतांना मुळात ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे मात्र उलट “आमच्यात हुंडा खूप असतो ना” हे असं किळसवाणं वाक्य वापरतांना त्यांचील छाती अभिमानाने फूलून येते. कित्येक घरांमधे मुलीला पाहण्यासाठी एक नाही दोन नाही पन्नास पन्नास मुलं  येऊन जातात, मग पन्नास वेळेला चहा बनतो, पन्नास वेळेला पोहे तयार होतात, पन्नास वेळेला तीला साडी नेसावी लागते..पन्नास वेळेला तीला चेह-यावर हसू ठेवावं लागतं या सगळ्यातून बिचारी तरली की मग एकतर देण्याघेण्यावरून मुद्दा फिस्कटतो किंवा कुठले तरी गुणच जूळून येत नाहीत..जर वागणुकीच्या बाबतीत काही चूकीचं जाणवलं असेल तर लक्षात येऊ शकतं मात्र दिसण्याहून किंवा रंगावरून जेव्हा नाकारण्यात येतं अशावेळी कुण्या परक्यानं आपल्याला नाकारल्याचं दुख एकीकडे नक्कीच होत असतं मात्र त्याहीपेक्षा अधिक वेदना त्यावेळी होतात ज्यावेळेला आपल्या घरातलेच आपल्याच पोटच्या पोरीला तू बूटकी आहेस काळी आहेस म्हणून तुझं लग्न होत नाहीए असं म्हणतांना दिसून येतात.. मुळात आपल्याला मिळेलेल्या शरिरापासून संस्कारापर्य़तची सारी देण मायबापाचीच तर असते.
आधुनिकता म्हणजे काय....
 प्रतिभावान नाटककार शेक्सपिअर नेहमी म्हणायचा निग्रो स्त्री ही मला जगातली सर्वात सुंदर स्त्री वाटते..ते तीच्या गडद काळ्या रंगामुळेच. तिच्या रंगात इतर कुठलीही मिलावट होऊ शकत नाही.. कुठलाही मेकअप तिला, तिच्या अस्सलतेला बदलवू शकत नाही. जगण्यातली आणि दिसण्यातली अस्सलताच तर अधिक महत्वाची असते. चेहरा गोरा आहे या पेक्षा मन स्वच्छ असणं हे अधिक श्रेयस्कर नाहीए का..? मातीत राबणारे काळेकुळकुळीत झालेले शेतमजूर प्रेमळ, मायाळू नसतात का..? विकलांगता शरिराला असेल तर हरकत नाही मात्र वृत्तीनं विकलांग असणं हे कितीतरी घातक असतं.. मॉलमधे इस्केलेटरवर उभं राहता येणं किंवा चार इंग्रजीचे शब्द बोलता येण्यानं कुणी आधुनिक होत नसतं..आधुनिकतेचा संबंध योग्यतेशी असतो.. नसता , स्पर्धा परीक्षेसाठी समाजसुधारक पाठ करायचे आणि पोस्ट हातात पडताच हुंडा मागून लग्नाच्या बाजारात स्वतःचा भाव ठरवायचा हा असा करंटेपणा करणा-यांना  बहिष्कृत करण्याची एक मोहिमच आता हातात घेतली पाहीजे..
भयानक सत्य...
 जातीसाठी माती खाऊन पोटच्या पोरीला जिवंत मारणा-यांना चौकात नेऊन बदडलं पाहीजे... कुठे बलात्कार झाला असेल तर अशी छापून आलेली बलात्काराची बातमी चवीनं नाही तर रागानं वाचली पाहीजे…नागराज त्याचा हा असा साराच राग सैराट सारख्या चित्रपटांतून व्यक्त करत चाललाय…जातीसाठी दिवसरात्र जगणारे कित्येक वंशाचे दिवे ‘प्रिंस’ च्या माध्यमातून नागराजने जगाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ज्यांना आपल्या बहिणीपेक्षा आपली जात मोठी असते…मुळात अशा कित्येक ‘प्रिंस’ला भैय्या भैय्या म्हणून एक माजलेला पुरूष बनवण्यासाठी त्या त्या घरातले कित्येक आजी आजोबा आणि कित्येक मायबाप कारणीभूत असतात, लहानपणापासूनच मोठ्याप्रमाणावर त्यांचे सारेच लाड पुरवण्यावर इतका भर असतो की पुढे ते स्वतःच्या आईला ‘घरात नीट रहायचं नाहीतर तुला मामाच्या घरी नेऊन सोडेन’ इथपर्यंत बोलायची हिम्मत ठेवतात…हे सारं खूप भयानक आहे परंतु सत्य आहे…नागराज या अशाच कित्येक जळजळीत सवालांच्या विरोधात उभा राहीलाय अगदी सैराट बनून…
 
नागराजचं सैराटपण कायम राहो....
 नागराजमधे पराकोटीचा आत्मविश्वास आहे, मुळात हा आत्मविश्वास त्याला त्याच्या अनुभवांनी, निरिक्षणांनी आणि संवेदनशीलतेनच बहाल केलाय. म्हणूनच की काय आमचंही संपूर्ण नाव आम्हीही अभिमानाने मिरवून दाखवू शकतो ही त्याची कृतीशील धारणा आहे…त्याने स्वतःला सिद्ध केलय..जर्मनीमधे तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लोकांनी त्याला डोक्यावर घेतलय नि रिंकू राजगुरू या देखण्या मुलीला पदार्पणातच मिळालेल्या भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्कारानं ते अधिक स्पष्टही झालय की सैराट एक लाजवाब चित्रपट आहे , नागराजचं हे सामाजिक जाणीवांचं सैराटपण अजून काही अशाच चित्रपटांच्या निर्मितीचं कारण बनत राहो याच सदिच्छांसह तूर्तास थांबतो. 
सचिन तायडे, पब्लिक स्पिकर : 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा