बुधवार, ४ मे, २०१६

रामराव आणि श्यामराव,


कधीही एकमेकांना न भेटलेल्या दोन व्यक्ती.
आजारपणामुळे एकत्र आलेल्या. रुग्णालयाच्या एका खोलीत दोघांचे दोन बेड. रामराव कर्करोगाने त्रस्त. शेवटच्या पायरीवर असलेले.

तर श्यामरावांना पॅरालिसीसचा अटक येऊन अंगं लुळं पडलेलं. रामराव सुदैवी होते. त्यांच्या बेडच्या बाजूलाच एक भली मोठी खिडकी होती. त्या खिडकीशी ते कायम बसलेले असत. बाहेर घडत असलेल्या अनेक गमतीजमती श्यामरावांना सांगत. "बाहेर एक भली मोठी बाग आहे," ते सांगत. वेगवेगळ्या रंगांची, आकारांची फुलं तिथे फुलत. त्यावर अनेक फुलपाखरं फिरत. झाडावर पक्षी आपली घरटी बांधत.

एके दिवशी रामरावांनी श्यामरावांना सांगितलं, आंब्याच्या झाडावर कबुतराने घरटं बांधलंय. मग त्या दिवसानंतर दोघांचा तो छंदच झाला. कबुतराचं जोडपं नेमकं काय करतंय ते बघण्याचा. श्यामराव सारं काही रामरावांच्या नजरेने पाहत होते. घरटं बांधणं. कबुतराने कबुतरणीची वाट पाहणं. एके दिवशी रामरावांनी चांगली बातमी दिली. कबुतरणीने तीन अंडी दिल्याची. नवे जीव जन्माला येणार होते. दोघंही उल्हसित झाले होते.
श्यामरावांची तब्येत झपाटय़ाने सुधारू लागली. कबुतरणीचं अंडी उबवणं सुरू होतं आणि श्यामराव उठून उभं राहण्याची शक्ती स्वत:त आणत होते. एके दिवशी रामरावांनी बातमी दिली एक अंड फोडून इवलंस पिल्लू बाहेर आलंय. श्यामरावांना पिल्लू बघण्याची उत्सुकता वाढू लागली. आपण स्वत: चालत त्या खिडकीपाशी जायचंच, त्यांनी ठरवलं.

त्याच दिवशी रामरावांच्या दुखण्याने जोर धरला. त्यांचा कर्करोग अंतिम टप्प्यातच होता. आपण जगणार नाही याची कल्पना त्यांना फार पूर्वीच आली होती. त्यासाठी ते स्वत:ला तयार करत होते. अखेर तो क्षण आलाच. त्यांच्या रूममध्ये प्रचंड धावपळ उडाली. रामरावांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं.

दुसऱ्या दिवशी ते गेल्याचीच बातमी आली. श्यामराव खिन्न झाले. आता त्यांना ओढ लागली होती घरटं बघण्याची. दोन पिल्लं अंडय़ाच्या बाहेर येणार होती. श्यामरावांची तब्येत खूपच सुधारली होती. ते आता स्वत:च्या हाताने खाऊ लागले होते. त्यांनी डॉक्टरांना विनंती केली. खिडकीजवळच्या बेडवर जाण्याची. ते खिडकीपाशी आले. त्यांना वाटलं आता कबुतराची पिल्लं नक्कीच चिवचिवत असतील. कबुतरीण त्यांना खायला घालत असलेली पाहायला मिळेल. पण बघतात तो काय.

त्या खिडकीपलीकडे काहीच नव्हतं. रुग्णालयाची भलीमोठी रूक्ष भिंत समोर उभी होती. त्यांनी नर्सला विचारलं, "इथली बाग कुठे गेली?" नर्स हसली. म्हणाली, "ती रामरावांच्या कल्पनेत होती. तुम्हाला बरं वाटावं. तुम्हाला जगण्याची उमेद वाढावी म्हणून रामरावांनी ती तयार केली होती, खास तुमच्यासाठी."

श्यामराव नि:शब्द झाले. आपल्या थरथरत्या हाताने त्यांनी ती खिडकी बंद करून टाकली.. 
शब्दांची जादू अशी असते. ती नवं काही तरी जन्माला घालत असते. सकारात्मक काही घडवत असते. फक्त आपला त्या शब्दांवर विश्वास हवा. पण तोच कमी पडतो.
आपण स्वत: काय आहोत यापेक्षा इतर लोक काय सांगतात त्यावर आपण आपलं आयुष्य घडवत असतो अनेकदा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा