आई म्हणाली मुलीला...
तिच्या लाडक्या बाहुलीला...
असाच का करशील
सासरी हि दंगा !
अशाच का घालशील
घरभर पिंगा! !
स्वप्नांचे पंख घेऊन
अशीच का उडशील !
पैंजणाच्या पायांनी
घरभर धावशील ! !
असाच का तिकडे हि
करशील पसारा !
सगळीकडे फिरशिल
पायात घेऊन वारा ! !
अशीच का तिकडे हि
उशीरा उठशील !
आयता चहा मग हातात मागशील ! !
मुलगी फक्त हसली...
मग हळूच म्हटली..
नाही ग आई...
शांत होईल तिकडे
माझा सारा दंगा !
अंगणच संपेल
घालण्यासाठी पिंगा ! !
स्वप्नांचे पंख
अलगद छाटले जातील !
पैंजणाच्या जागी
पायात बंधन ग येतील ! !
देईल माझी आठवण
करून नसलेला पसारा !
माझी खुशाली कळवेल तुला वारा ! !
तिकडे लवकर
मीच उठत जाईन !
मीच सगळ्यांना
चहा सुध्दा देईन ! !
तुझ्यासारखीच मी हि
बाई होवून जाईन !
घराला सावरणारी
आई होवून जाईन ! !
ऐकून सार दाटलं
मन आईचं !
खोल आतून फाटलं
मन आईचं ! !
सर्व आई व मुलींना समर्पित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा