शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

श्री सत्यनारायण पूजा

श्री सत्यनारायण पूजा - कोणी, कुठे व कधी करावी ?
.
सत्यनारायण ही पूजा पती-पत्‍नी यांनी जोडीने करावी.
पुरुषांनी अगर मुलांनी केली तरी चालते . सत्यनारायण ही पूजा वर्षभरातील कोणत्याही दिवशी , कोणत्याही वेळेला केली तरी चालते यास मुहूर्त पाहण्याची जरूरी नाही तरी पण पौर्णिमा , संक्रांत , श्रावण आणि अधिक ( पुरुषोत्तम ) मासातील पूजा विशेष समजली जाते.
कोणतेही नवीन कार्य सुरू करताना पूजा करतात. संकल्प करताना पूजा करतात . पूजा शक्यतो गोरज मुहूर्तावर करावी .
पूजा होईपर्यंत उपवास करावा. प्रात : काळी पूजा केल्यास उत्तम .
पुजेला बसताना आपले मुख पुर्वेकडे करून पुजेला बसावे . दक्षिणेकडे मुख करुन बसू नये .
पुजा चालू असताना घरातील सर्व मंडळी , आप्तस्वकीय , मित्रमंडळी जर जिथे पूजा चालू आहे , तेथे थांबून मंत्र किंवा कथा ऎकतील तर यातून निर्माण होणार् ‍ या सात्विक लहरींचा त्यांना लाभ होऊन , सत्यनारायणाचे पुण्य मिळेल . या पुजेची कलियुगात नितांत गरज आहे .
.
पुजेला लागणारे साहित्य :
सत्यनारायणाचा फोटो, हळद, कुंकु, गुलाल, बुक्का प्रत्येकी ५० ग्रॅम. फूले, तुळशी (१०८ पाने) हार २, विड्याची पाने ५०, सुपार्‍या २७, नारळ २, खारीक ५, बदाम ५ हळकुंड ५, खोबर्‍याचा तुकडा, गुळाचा खडा, खोबरे वाटी १, खडीसाखर (१०० ग्रॅम), जानवी जोड, १ मीटर कापडाचे दोन पीस, पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) सुवासिक उदबत्ती, कापूर, सुट्टी रुपयांची नाणी ७, समया २, निरांजन १, तांदूळ १ किलो, गहू २५० ग्रॅम, केळीचे किंवा कर्दळीचे खूंट ४, शंख, घंटा, बाळकृष्णाची मूर्ती किंवा शाळीग्राम, अत्तराची बाटली, केळी १ डझन, तांब्याचे गडवे ३, ताम्हण २, पाट ४, चौरंग १, वेगवेगळी ५ फळे.
.
महाप्रसाद
गव्हाचा रवा, साखर, साजूक तूप, प्रत्येकी सव्वा प्रमाणात सव्वा पावशेर अथवा सव्वा किलो प्रमाणात, पाव किलो पासून प्रसाद करावा त्यावर सव्वा केळी कुस्करुन घालावीत. याशिवाय महानैवेद्यासाठी गोड स्वयंपाक करावा.
.
सत्यनारायण पुजेची मांडणी
.
स्वच्छ जागेवर शक्यतो पूर्व पश्‍चिम चौरंग मांडावा.
त्या भोवती रांगोळी काढून त्यात गुलाल अथवा रंग भरावा.
आवडीप्रमाणे रोषणाई करावी. चौरंगाला चारी बाजूंना केळीचे अथवा कर्दळीचे खुंट बांधावेत. चौरंगावर मागील बाजूस सत्यनारायणाचा फोटो उभा ठेवावा. चौरंगावर गहू किंवा तांदूळ पसरावेत, उजव्या बाजूला चौरंगावरच मुठभर तांदूळ ठेवून त्यावर गणपतीचे प्रतिक म्हणून पांढरी सुपारी ठेवावी. मधल्या तांदूळ किंवा गव्हावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा त्यात गंध, फुले, अक्षता, सुपारी, दुर्वा व एक नाणे, आंब्याचा डहाळा ठेवावा, त्यावर विड्याची ५ पाने ठेवावीत.
कलशावर हळदी कुंकवाचे पट्टे ओढावेत, छोटे स्वस्तिक चिन्ह काढावे. त्या कलशावर ताम्हण ठेवावे. ताम्हणात तांदुळ किंवा गहू पूर्ण भरावेत. मध्यभागी एक सुपारी मांडावी. (वरुणाचे प्रतिक) आठ दिशांना आठ लोक पालांच्या सुपार्‍या मांडाव्यात.
लोकपाल येणेप्रंमाणे - पूर्वेस इंद्र , पश् ‍ चिमेस वरुण , दक्षिणेस यम , उत्तरेस सोम , आग्नेयेस अग्नि ,नैऋत्येस - निश्वति , वायव्येस - वायु , ईशान्येस - इशान ; त्याचप्रमाणे नवग्रहांच्या सुपार् ‍ या मांडाव्यात .
पुजेसाठी बाळकृष्ण अथवा शाळी ग्राम घ्यावा . शाळीग्राम असेल तर अक्षता वाहू नयेत , तुळशीपत्र वहावे . बाळकृष्णाला अक्षता वहाव्यात . चौरंगावर डावीकडे पाच विडे मांडावेत . प्रत्येक विड्यावर एक हळकुंड आणि खारीक ठेवावे . डावीकडे समई ठेवावी .
तांदूळावर ठेवलेल्या सुपारी गणपती मागे शंख ठेवावा .
.
पूजन प्रारंभ - सुहासिनीने हळद-कुंकू लावावे, यजमानानी पुजेला बसल्यानंतर विडे घेऊन पळीत पाणी घ्यावे. विड्याच्या दोन पानावर अक्षता, पैसा व सुपारी ठेवावी. आपल्या कुलदैवतासमोर विडा ठेवून त्यावर एक पळी पाणी सोडावे देवाला नमस्कार करावा. घरातील थोर मंडळींना नमस्कार करावा, गुरुजींना नमस्कार करुन आपापल्या आसनावर बसावे आणि पुजेला प्रारंभ करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा