रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात. कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होत नाहीत. मग निराशा येते, राग येतो आणि आपली खूप चिडचिड होते. आपण रागावलो की तो राग मित्रांवर किंवा घरच्यांवर काढला जातो. मग राग गेला की आपल्याला वाईट वाटतं, आपण त्यांची क्षमा मागतो आणि ते आपल्याला माफही करतात. पण बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. आपण ज्या कारणामुळे चिडलो होतो ती गोष्ट शुल्लक वाटू लागते.
असं झालं की मला एक गोष्ट आठवते. एक माणूस देवाचे आभार मानत असतो. तो म्हणत असतो की "माझ्याकडे नवे बूट नव्हते म्हणून मी दु:खी होतो त्या वेळी तू मला एक माणूस दाखवलास ज्याच्याकडे पाय पण नव्हते. मग माझी तकरार आपोआप मुकी झाली." थोडक्यात सांगायचं तर आपण छोट्या दु:खांकडे लक्ष देऊन त्यांना मोठं करतो पण छोट्या सुखांकडे लक्षच देत नाही. जसं बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहिजे तशा होत नाहीत, तसं त्याहून कितीतरी जास्त गोष्टी आपल्याला खुश करायचा प्रयत्न करत असतात. पण आपल्या एक लहानशा दु:खाच्या नादात आपण त्या दहा खुश करणाऱ्या गोष्टींना विसरतो.
जर आतापर्यंतचे विचार पटले असतील, तर मनात एक प्रश्न पण आला असेल. आपण या लहान सुखांकडे लक्ष कसं द्यावं? काही मनासारखं नाही झालं तर त्याला पटकन मनातून बाहेर काढून जे आपल्याला सुख देतं ते कसं करावं? याचं उत्तर माझ्या एका मैत्रिणींकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. त्या म्हणाल्या की आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की 'आजची चांगली गोष्ट काय?' असा प्रश्न विचारायचा. प्रश्न सोपा आहे पण पहिले काही दिवस मला नीट उत्तरंच देता येत नव्हतं. मी 'आजची चांगली गोष्ट काही नाही' आसं म्हटलं की त्या 'काहीतरी असेल, नीट विचार कर' असं म्हणायच्या. मग मी काहीतरी छोट्यातलं छोटं छान आहे म्हणून सांगायचो. त्या पण साध्या सोप्या गोष्टी 'आजची चांगली गोष्ट' म्हणून सांगायच्या.
पण काही दिवस हा प्रकार सुरू राहिला आणि मला लहानातल्या लहान गोष्टी पण 'आजची चांगली गोष्ट' वाटू लागल्या. आज एका दुकानात मस्त कॉफी प्यायली, आज मस्त आठ तास गजर न लावता झोप झाली, आज अचानक एक जुना मित्र भेटला अशी आमची उत्तरं येऊ लागली. मग त्यांच्या प्रश्नाचा खरा अर्थ लक्षात आला. जसं आपण लहान दु:खांकडे लक्ष देतो तसं या प्रश्नामुळे आम्ही लहान सुखांकडे लक्ष देत होतो आणि कोणालातरी सांगितलं की ते सुख परत मनात यायचं. मग 'आजची चांगली गोष्ट'च्या ऐवजी 'आजच्या चांगल्या गोष्टी' अशा वाढू लागल्या. खरंच दिवसातल्या वाईट गोष्टी या चांगल्या गोष्टींसमोर शुल्लक वाटू लागल्या. आता तर मी स्वत:ला हा प्रश्न रोज झोपायच्या आधी विचारतो. गेलेला दिवस संपवताना त्यांतली एकतरी चांगली आठवण परत जगली पाहिजे. अशा छोट्या सुखांकडे नीट लक्ष दिलं तर एक एक करून सगळेच दिवस मजेत जाऊ लागतात.
तुम्ही पण हा प्रयोगकरुन बघा , अट फक्त एकच, की तुम्ही 'आजची चांगली गोष्ट काय?' या प्रश्नाला काहीतरी उत्तरं द्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा