.
लाल दिवा डोळा मारतो
जवळ येऊ देत नाही
दाढी खाजवून नखं गेली
शपथविधी होत नाही
.
झुंजार आम्ही, खंबीर आम्ही
झालो दीनवानी
आंदोलने गुंडाळली
सत्तेसाठी गातो गाणी
आरत्या गाऊन कंठ सुकला
तरी प्रसन्न होत नाही
दाढी खाजवून नखं गेली
शपथविधी होत नाही
.
दाढी क्रमांक एक (राजू शेट्टी)
शेतकऱयांच्या प्रश्नावर
बारामतीचं पेटवलं रान
लोकांनीही मग मतपेटीत
भरभरून टाकलं दान
पूर्वी खूप धाक होता
आता कुणी भेत नाही
दाढी खाजवून नखं गेली
शपथविधी होत नाही
.
दाढी क्रमांक दोन (महादेव जानकर)
धनगरांना जागं केलं
संसाराच्या सोडून आशा
ओठांवर रोज होती
बहुजन ऐक्याची भाषा
विचारांच्या बांधिलकीचं
इथे चीज होत नाही
दाढी खाजवून नखं गेली
शपथविधी होत नाही
.
दाढी क्रमांक तीन (विनायक मेटे)
मंत्रीपद मिळेल म्हणून
तिकडून इकडे मारली उडी
निवडणुका होईपर्यंत
खूप लावले लाडीगोडी
आता नुसत्या वांझ चर्चा
लाभ काही होत नाही
दाढी खाजवून नखं गेली
शपथविधी होत नाही
.
दाढी क्रमांक चार (रामदास आठवले)
रोजरोज स्वप्नातही
लाल दिवा दिसत असतो
तळमळतो जीव तरी
कविता करून हसत असतो
कसं सांगू कवितेवर
तसं जगता येत नाही
दाढी खाजवून नखं गेली
शपथविधी होत नाही
.
सामूहिक
अधिवेशनामागून अधिवेशनं
दुष्काळासारखी जात आहेत
जणू आमच्या संयमाचीच
ते परीक्षा पाहात आहेत
काळजाला होतात वेदना
तरी रडता येत नाही
दाढी खाजवून नखं गेली
शपथविधी मात्र होत नाही..
मंगळवार, ८ डिसेंबर, २०१५
दाढी आणि शपथविधी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा