शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

अटलजी

लोकशाहीचे सच्चे "प्रधानसेवक".....

राजकारणाचे एक युग गाजवलेल्या अन आपल्याच पक्षाच्या सद्य विचारसरणीहून भिन्न विचारशैली व मर्यादेचे समाजभान सजग असणारया, आपल्या विचारधारांशी समर्पित राहिलेल्या राष्ट्रतेज अटलजींचा आज वाढदिवस. त्यांच्या जीवनातला मोठा काळ तीव्र संघर्ष करण्यात केला. राजकारणात राहूनही ते बहुआयामी राहिले. तितकेच व्यासंगी अन सृजन. लढवय्येही अन तत्वचिंतकदेखील. अनेक चढ उतार त्यांनी आयुष्यात अनुभवले, सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचले. लोकमान्यतेच्या अन लोकप्रेमाच्या अमृतधारा अनुभवल्या....

परंतु मला प्रश्न पडतो कि आजच्या संध्याछायेच्या कुशीत त्यांना कसे वाटत असेल ? ते काय विचार करत असतील ? त्यांच्या स्मृतीच्या मंतरलेल्या चैत्रबनात अजूनही कधी बहार होत असेल का ? राहिलेल्या काही ईच्छा अन निसटलेले काही क्षण यांची पानगळ होत असेल का ? हरवलेल्या तारुण्यातील मागे राहिलेला गीत गांधार अजूनही मनात अवचित कधी बरसत असेल का ? विजनवासात देखील ते कोट्यावधींच्या मनांचे कानेकोपरे धुंडाळत असतील का ? त्यांनाही नातलग होते, आप्तेष्ट होते,मित्र होते कधी कोणी त्यांच्या स्वप्नात येत असेल का ? त्यांचे स्वर्गवासी जन्मदाते अवती भोवती असल्याचे भास होत असतील का ?सकाळी जागे होताना त्यांचे डोळे पाणावत असतील का ? थरथरत्या बोटांनी त्यांना डोळे पुसता येत असतील का ?

काही वर्षे मागे गेले की अटलजीच्या संघर्षमय जीवनाचा बोलका पट डोळ्यासमोर उलगडत जातो.

लोकशाहीची जगभरातील सर्वात मोठी परंपरा असलेल्या भारतीय राजकारणातील भीष्म पितामह म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचेच एकमेव नाव घेता येईल, असे गौरवोद्गार माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी राज्यसभेत काढले होते.

मितभाषी, मनमिळावू राजकारणी, उत्तम नेता, संवेदनशील कवी, उत्कृष्ट वक्ता अशा एक ना अनेक बिरुदावल्या वाजपेयी यांच्यासाठी वापरल्या जातात.

अटलजी वाजपेयींच्या कामाची पद्धत लक्षात घेवून तत्कालीन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी उत्तम वक्ता असेलला हा युवक पुढे या देशाचा पंतप्रधान होईल, असे भाकित केले होते. पंडित नेहरू यांनी वर्तवलेले भाकित तब्बल ३९ वर्षांनी सत्यात उतरले.

राजकारणातील सात्विक चेहरा अशी ओळख लाभलेल्या वाजपेयी यांनी आपल्या लोकांना धीर देताना

‘सूरज निकलेगा,
अंधेरा छटेगा,
कमल खिलेगा’

हा मंत्र दिला .

आपले राजकीय जीवनही अत्यंत मनमोकळेपणाने जगणाऱया वाजपेयी यांनी लिहिलेली ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘मेरी एक्क्यावन्न कविताएँ’ हा त्यांचा काव्यसंग्रह विशेष गाजला. संवेदनशील अशा कविमनाच्या वाजपेयींना पं. भीमसेन जोशी यांच्या गायकीची तर पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरी वादनाची विशेष आवड आहे. वाजपेयीजींना गेल्यावर्षी भारतरत्न हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला आहे.

वाजपेयी यांना गीतकार साहिर लुधियान्वी यांचे

‘कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है,

हे गाणे मनापासून आवडते. याच गाण्याच्या पंक्तीनुसार त्यांच्यासारखे नेते समाजोद्धारासाठीच जन्माला आलेले असतात, असे म्हटल्यास योग्य ठरेल.  

राजधर्म आणि नैतिकता यांवर आधारित सामाजिक जाण असणारया या ऋषितुल्य योगी नेत्यास दीर्घायुष्यासाठी मनस्वी शुभेच्छा.....अस्तित्वाच्या शोधाची अखेरची वाट धुंडाळत असणारया या धृवतारयास त्यांचे इप्सित मिळो ही सद्गदित शुभकामना  ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा