शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

शेती म्हणजे कुबेराचं देणं नव्हे!

शेती म्हणजे कुबेराचं देणं नव्हे!

शेती म्हणजे काय असतं, हे शेतीत राबल्याशिवाय, शेतीसाठी पैशांची जमवा-जमव केल्याशिवाय कळतं नाही, शेतीत काम करून आलेला बाप, जेव्हा हातापायाची हाडं दुखवत, रात्रीचा कन्हत उठून बसतो, त्याच्या पोराला आणि त्या बापाला विचारा शेती म्हणजे काय असते आणि काय अडचणी येतात.
शेतकऱ्यांना लुबाडणारे दलालही म्हणतील शेतकरी नाडला जातो, आणि शेतकरी नाडला जात नाही असं म्हणणाऱ्यांना काय म्हणावं, मुळात शेती हा विषय इंग्रजी पुस्तक मराठीत भाषांतरीत करण्यासारखा साधा सोपा नाही. कुंथत कुंथत संपादकीयचे रकाने भरण्यासारखाही शेतीचा विषय सोपा नाही.

शेती कोणताही राजकीय पक्ष, संघटनेच्या विचारांचं गुलाम राहून, त्यांची वेळोवेळी दलाली करून करता येत नाही. शेतीत शेतमजूर, अल्पभूधारक, जास्त जमीन असलेले शेतकरी असा भेदभाव करता येत नाही.

पाऊस पडला तर सर्वांच्या शेतात, गारपीट, ऊन,  पिकांवरील रोग सर्वांच्याच शेतात येतात, राजकीय पक्षांची दलाली करण्यासाठी इथे हिंदू-मुस्लिम, मराठा-माळी असा भेद करून शेतीचं दुकान चालवता येत नाही, शेतीत राबतांना मानेपासून माकडहाडापर्यंत घाम वाहत येतो, तेव्हा शेती फुलते, एवढं करूनही निसर्गाने साथ दिली नाही, तर शेतकरी डोळ्यात अश्रू आणणारच, त्याला अधिकार नाही का तेवढा ही?

शेतकरी काही टीव्हीवर दिसण्यासाठी चमकोगिरी करत नाही, कारण तुम्हाला आमंत्रण पाठवलंय का शेतकऱ्यांनी, आम्ही रडतोय दाखवा आम्हाला टीव्हीवर, आमचा फोटो पेपरवर लावा?

शेतकरी निसर्ग वागेल तशी गणितं आखतो जगण्यासाठी, कुणाचं सरकार, कुणावर दबाव आणायचा, हे गणित तुम्ही आखतात,  बड्या धेंडांची, मंत्र्यांची खोटी-खोटी शाबासकी मिळवण्यासाठी. यासाठी तुम्ही वेळोवेळी शेतकऱ्यांच्या दु:खाचं भांडवलं केलं, तेव्हा त्याला विचारलं होतं का? 'शेतकऱ्या खोटारडा, तू हे सर्व खोटं खोटं रडतोय?' कारण गारपीट ही काय पहिल्यांदाच झाली नाही.

तुमच्या न्यूज पेपरच्या गिऱ्हाईकाला तुम्हाला आता मिठ नाही, तर दररोज तुम्हाला साखरच विकायची असेल तर तिथे शेतकऱ्यांची काय चूक.

शेतकरी कष्टाने शेती करतो, नुकसान सहन करण्याची ताकदही त्याच्यात आहे, पण तो आपल्यासारखी दलाली करू शकत नाही. एवढीच त्याची चूक आहे.

आंबा भरपूर येणार आहे, डाळिंबे छानच झाली आहेत वा द्राक्षे मुबलक येणार आहेत, या वाक्यांवरून तुमचा पाय शेतीला लागलेला दिसत नाही, भरपूर आंबा येणार यापेक्षा आंब्याला चांगला मोहोर आलाय, डाळिंबाची फलधारणा यंदा चांगली झालीय, फळांचा आकार एक सारखा आहे, असं शेतकरी म्हणत असतो.

'डाळिंबे छानच झाली आहेत', असं म्हणायला काय तो वरण भात आहे?, 'आंबा भरपूर येणार आहे', असं म्हणायला तो काय दिवाळी बोनस आहे का?, 'द्राक्षे मुबलक येणार आहेत', असं म्हणायला ते काय पीएफवरचं व्याज आहे का?

थोडक्यात शेतीत निश्चित काहीच नाही, शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास कधीही जाऊ शकतो, तो तुमच्या ताटातल्या पदार्थापासून, पीएफच्या व्याजासारखा निश्चित नाही.

नगदी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी किती कर्ज काढून शेती फुलवली, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी किती फळबागा फुलवल्या, तिथे धनदांडगा हा शब्द शेतकऱ्यांना आला कुठून?, शेतकऱ्यांनी फळबागांना जी औषधं दिली, त्याची उधारी किती आहे, हे तुम्हाला कृषी केंद्रावर जाऊन कळेल, ते नुकसान झालेल्या फळबागांवर दिसणार नाही.

जास्तच जास्त शेतकरी इमानदार म्हणून त्याला लाखांच्या वस्तू उधार मिळतात, पण आपली ऐपत मॉलवाल्याकडे नाही, तुम्हाला कंपनीने लाखाचा पगार दिला, त्यात तुम्ही होमलोन घेतलं, कार घेतली, मुलांच्या शिक्षणाची फी भरली..... आणि अचानक हा पगार बंद झालाय आणि पुढील वर्षी बरोबर या महिन्यात भेटा, असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला दाढी स्ट्रिमिंग करायलाही पैसे शिल्लक राहणार नाहीत. तेव्हा तुम्हाला रस्त्यावरचा भिकारीही म्हणेल चांगला धनदांडगा होता, आता तर दाढीही करत नाही.

शेतकऱ्यांनी एवढी वर्ष कमावलेलं कुठं टाकलं हे विचारतांना, किती अडचणींचा त्याने सामना केला, मुलांना त्याने काय शिकवलं, मुलीचं लग्न केलं का नाही, केलं तर खर्च केला असेलच ना? केला असेल त्याच्या ऐपतीप्रमाणे, आपल्यासारखं अंगूर रबडीचं जेवण देता आलं नसेल त्याला. तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नात  पाहुणमंडळीला आईस्क्रिम खायला देता, पण धनदांडगा आणि खोटारडा म्हणून शेतकऱ्याच्या इज्जतीचा फालुदा का करता?

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, असं म्हणणाऱ्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायला हवं? कारण २००७ साली झालेल्या कर्जमाफीच्या प्रकरणांची छाननी करा, स्वत:ला तुम्ही बडे पत्रकार म्हणून मिरवून घेतात, म्हणून हा कधीतरी थोडासा अभ्यास करा, असा शेतकरी दाखवा ज्याला १०० टक्के कर्जमाफी झालीय. जी कर्जमाफी झालीच नाही, त्याचं कौतुक त्याला काय सांगताय, आणि तीही काही शेतकऱयांनी मागितली नव्हती, आणि थोडी थोडकी दिली असेल तर ती काय तुमच्या बाबाच्या पगारातून त्याला मिळाली. हा अभ्यास का पी.साईनाथ यांच्यासारख्या पत्रकारांनीच करायचा का? पी.साईनाथ यांच्यासारखं शेतीत जाऊन पाहा, अभ्यास करा आणि मग लिहा.

कारण एकीकडे भारत हा शेतीप्रधान देश आहे असं म्हणतांना शेतकरी हा सतत गुलाम राहिला पाहिजे, त्याला संपादकीयचे रकाने भरण्यासाठी बडवून काढला पाहिजे, असा विचार करून कसं चालेल.

'बळीराजा', 'काळीआई' ही बिरूदं तुम्ही मिरवली, कारण तुम्हाला सर्वांना दाखवायचं असतं, आमच्याकडे किती शब्दसंपदा आहे, त्यासाठीही त्याचा वापर केला. तो तुमचा धंदाच आहे, पोटभरायचा.

आपण स्वत:ला अर्थशास्त्री म्हणवून मिरवतात, म्हणून शेतकरी किती प्रमाणात पिकं कर्ज घेतात, वर्षभराच्या आत किती भरणा करतात, बँकांना याचा किती फायदा होतो, अर्थव्यवस्थेला याचा किती फायदा-तोटा आहे, हे देखिल तपासून पाहा. उलट उद्योजकांना किती दीर्घकालीन कर्ज दिलं जातं, ते किती परत फेड करतात हे देखिल पाहा.

अगदी भारतात बँकिंग क्षेत्राचा विकास होत असतांना राष्ट्रीयकृत बँकांना कुणी मजबूत केलं त्याचाही अभ्यास करा, तेव्हा कृषिक्षेत्र नव्हतं का?, शेतकऱ्यांना  कर्ज मिळण्यासाठी काय काय त्रास घ्यावा लागतो हे देखिल पाहा.

मृगनक्षत्राचा पाऊस आला, जमीनीचा सुगंध डोक्यात भरल्यावर शेतकरी पेरता होतो, वेळेवर पेरायला हवं हेच त्याच्या डोक्यात असतं, मग त्यासाठी वाटेल ते तो करतो, कुठूनही पैसा उभा करतो, तो काळ्या मातीला आई म्हणत असेल तर त्याचं काय चुकलं, तो दगडाला देव तर म्हणत नाही ना.

शेतकऱ्याकडे चार पैसे खुळखुळत असतील तर ते कुबेराचं देणं नाही, ते कष्टाचं देणं आहे. शेतकरी आमचा बाप आहे, आणि शेतकऱ्यावर अन्यायाचे आसूड ओढणाऱयांसमोर खरी परिस्थिती ठेवण्याचं आमचं काम आहे, म्हणून अभ्यास न करता लिहणाऱ्यांवर हा प्रथमोपचार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा