गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

कालभैरव जयंती - ३ /१२/२०१५ , यासंबंधी काही संग्रहीत माहिती 

मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी -

             कालभैरव हे दैवत,  श्री शंकराचा अवतार समजले जाते. जेथे जेथे कालभैरवांची मंदिरे आहेत, तेथील पुराणकालीन रूपकथा ऐकल्यावर असे कळते की, मूळचा श्री शंकर, महादेव नेहमी शांत-भोळा आणि प्रसन्न असणारा, परंतु ज्या ज्या वेळी स्वर्गात वा पृथ्वीतलावर अघटित, विपरीत घडले किंवा असुर, राक्षस वरदानाने माजले, उन्मत्त झाले, पृथ्वीवरील तोल ढासळला अशावेळी वातावरण पहिल्यासारखे राखण्यास भगवान शंकरांनी कडक रूप धारण करून समतोल राखलेला आहे. हरिहरेश्वराचा कालभैरव अवतार शतघ्न दैत्याचा वध करण्यासाठी झाला, अशी भैरवाची वेगवेगळी रूपे शंकराने पाचव्या अवतारात घेतल्याचे सांगितले जाते. यात भैरव महाभैरव, कालभैरव, कल्पांत भैरव, बटुक भैरव, आनंद भैरव, मरतड भैरव, अभिरूप भैरव याशिवाय क्रोध भैरव, चंडभैरव, प्रचंड भैरव, रुरुभैरव, उन्मत्त भैरव, अहंकार भैरव, संहारक भैरव अशीही आहेत. तशीच कालभैरवाची मंदिरे महाराष्ट्रात विशेषत: कोकण भागात अनेक ठिकाणी आहेत. रायगडमधील श्रीवर्धन, दिवेआगर आणि हरेश्वर या ठिकाणी

 

कालभैरवाची शक्तिस्थाने स्वयंभू मंदिरे आजही मोठय़ा ख्यातकीर्तीसह नावारूपाला आलेली आहेत.

 दिवेआगर येथील कालभैरव सिद्धनाथ भैरव आणि केदार अशी शक्तिस्थाने मंदिरे असून हरिहरेश्वर येथे कालभैरव तर श्रीवर्धन येथे सिद्ध भैरव असल्याचे सांगितले जाते. श्री कालभैरवला श्री शंकरांनी चौसष्ट कोटी गणांचा अधिपती आणि काशीचा रक्षक (कोतवाल) नेमला असल्याने अग्रपूजेचा अधिकारी कालभैरव वाराणसीत आहे. अशा कालभैरवाचे महत्त्व आणि शक्ती मोठी असून कालभैरवाचे दर्शन प्रथम घेतल्यावर त्या भाविकांची, भक्तांची काशीची यात्रा पूर्ण होते. तसेच हरिहरेश्वर येथेही कालभैरव मंदिरात प्रथम कालभैरवाचे दर्शन घेऊन हरिहरेश्वर मंदिरात ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमाया यांचे दर्शन घेऊन पुन्हा कालभैरवाचे दर्शन घेतल्यानेच हरिहरेश्वराची यात्रा पावन होते.

श्री कालभैरवाची निर्मिती कशी झाली त्याबाबत अनेक रूपकथा आहेत. एकदा स्वर्गलोकांत ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांचे आपापसात श्रेष्ठ कोण यावरून कडाक्याचे भांडण जुंपले. तत्पूर्वी ब्रह्मदेवाला पाच शिरे होती. या दोघांच्या वादावर शंकरांनी तोडगा काढावा आणि निर्णय घ्यावा, तसेच दोन्ही देवांत ब्रह्मरूप कोणाचे हाही वाद उद्भवला. तेव्हा देवऋषी नारदांनी दोन्ही देवांना बदरीकाश्रमांत जाऊन तेथील महामुनींची भेट घेऊन या शंकेचे निरसन व्हावे यासाठी पाठविले, परंतु शिव हेच ब्रह्मस्वरूप आहेत, असे महामुनींनी सांगितलेले दोन्ही देवांना पटले नाही, मग पुन्हा ते ‘चार वेद’ यांच्याकडे गेले, तेथेही अशाच उत्तराने समाधान झाले नाही. म्हणून ओमकार स्वरूपिणी त्रिपदागायत्रीकडे गेले. या त्रिपदा गायत्रीने हेच उत्तर दिले. त्यानंतर श्री शंकरांनी त्यांचे स्वर्गात असलेले शिर आणि पाताळात असलेले पाय अनुक्रमे ब्रह्मदेव आणि विष्णू यांना शोधण्यास पाठविले यासाठी दोन्ही देवतांनी अथक प्रयत्न केला. पाताळात पाय शोधीत असता श्रीविष्णूंना गणपती दिसले. पण ते ध्यानस्त बसले होते. त्यांना श्रीविष्णूंनी पायाबाबत विचारले असता गणपती म्हणाले, ‘आपण एवढी भ्रमंती केल्यावर तुम्हाला कुठे ब्रह्मांड दिसले; तरी अशी अनंत कोटी ब्रह्मांडे श्री शंकराचे चरणी असल्याने त्यांचे असे वेगळे अस्तित्व दिसणार नाही.’, असे सांगितले ते विष्णूंना पटले व मान्यही झाले. मात्र स्वर्गात ब्रह्मदेव शिर शोधण्यासाठी अथक प्रयत्न करताना सतत गुणगुणत होते मीच ब्रह्म आहे व मीच श्रेष्ठ आहे. दरम्यान, ब्रह्मदेवांना तिथे गाय आणि केतकी (केवडय़ाचे झाड) भेटले. त्यांना ब्रह्मदेवांनी आपल्याकडे वळवून शंकराचे शिर दिसले असे खोटे सांगण्यास प्रवृत्त केले. यानंतर मग स्वर्गात विष्णू, ब्रह्मदेव, गाय व केतकीसह आले. त्यानंतर विष्णूंनी सांगितले की, ‘मला पाताळात पाय दिसले नाहीत. मात्र ब्रह्मदेवांनी धारिष्टय़ दाखवून खोटेपणाने मला स्वर्गात शिर दिसले आणि यासाठी साक्षीदार म्हणून गाय आणि केतकी यांना आणल्याचे सांगितले.’ यानंतर शंकरांच्या साक्षी तपासणीत गाय व केतकी यांच्या साक्षी खोटय़ा ठरल्या, मग शंकर क्रोधायमान झाले त्यांनी खोटय़ा साक्षीबद्दल गायीला शाप दिला की, ‘तुझे मुख नेहमीच अशुद्ध आणि अपवित्र राहील, मात्र तुझे दर्शन पाठीमागून घेतील. तसेच केतकीला सुद्धा शाप दिला तुझ्या अंगावर पानोपानी काटे असतील तुझ्या केवडय़ाच्या कळीच्या पानांनी माझी पूजा केली जाणार नाही. तू मला म्हणजे शंकर, महादेव व भैरवनाथ यांना नेहमीच निषिद्ध राहशील.’ याप्रमाणे आजही गायीचे दर्शन मागून घेतात व केवडय़ाच्या कळीचे पान शंकरादी देवांना वाहिले जात नाही. यानंतर शंकराचे लक्ष्य ब्रह्मदेवाकडे गेल्यावर ते पुन्हा अतिक्रोधायमान झाले. त्यांनी रागाच्या भरात त्यांच्या जटेमधून एक केस उपटला आणि सिद्ध भैरवनाथ प्रकट झाले. याच दरम्यान ब्रह्मदेवाच्या पाचव्या मुखातून शंकराची निंदानालस्ती सुरूच होती. याबद्दल ब्रह्मदेवाला शासन व्हावे म्हणून सिद्ध भैरवानी त्वरित तलवार उपसून ब्रह्मदेवाचे पाचवे शिर धडावेगळे केले. तेव्हापासून ब्रह्मदेवाला चार शिरे राहिली. ब्रह्महत्येचे कालभैरवाकडून पातक घडल्याने ते पापशासन व्हावे म्हणून तो काशीला निघाला. पाताळात मर्त्यलोकांत- वैकुंठ लोकांत तीर्थयात्रा करून सुद्धा पापक्षालन झाले नाही; परंतु ब्रह्मदेवाचे तुटलेले शिर कालभैरवाच्या हाताला चिकटलेले होते. मात्र पवित्र काशी गंगेत स्नान केल्यावर ते शिर खाली पडले आणि कालभैरवाची ब्रह्म हत्येच्या पातकामधून मुक्तता झाली आणि मग शंकरांनी त्यांना चौसष्ट गणांचा अधिपती आणि काशीचा रक्षक (कोतवाल) नेमले.

शिवाच्या तेजापासून निघालेली शक्ती ही योगेश्वरी (जोगेश्वरी) ही कालभैरवाची पत्नी मानली जाते. कुलदैवत, उपास्य दैवत, ग्रामदैवत असे तीन प्रकार कालभैरवाचे असून त्या त्या घराण्यात भैरी भवानी (भैरवनाथ, भवानीमाता) अशी असून त्यांची नित्यनेमाने पूजा-अर्चा होत असते. कालभैरव भूतपिशाच्च करणी इ.पासून तात्काळ मुक्ती देतो. कालभैरवाचे प्रथमदर्शनीविक्राळ रूप पाहिले असता भीतीदायक, भयावह, उग्र, क्रोधदायक वाटते. परंतु कालभैरवाची ख्यातकीर्ती फारच मोठी आहे.
श्रीवर्धन येथील कालभैरवाच्या मंदिरातील मूर्ती ही दक्षिणमुखी आहे, तर हरेश्वर येथील कालभैरव मंदिरातील मूर्ती उत्तरमुखी आहे. भूतपिशाच्च बाधेपासून मुक्ती देणारा म्हणून हरेश्वर कालभैरवाची ख्यातकीर्ती सर्वदूर पसरली आहे, शिवाय येथे भूतांना घालविणारा खांबही मंदिरात आहे. अशा या हरेश्वर कालभैरवाचे महत्त्व जाणून घ्यावे, आपल्या डोळ्यांनी पाहावे, त्याच्याशी नाते जोडावे याच मूळ उद्देशाने काशीचा कोतवाल म्हणजेच कालभैरव काशीहून इकडे येण्यासाठी निघाला हे वृत्त हरेश्वराच्या कालभैरवाला समजल्यावर काशीच्या कोतवालाचे आनंदाने स्वागत करावे म्हणून कालभैरव हरेश्वर उत्तरेकडे तोंड करून (श्रीवर्धन गावाकडे) उभा राहिला. याच दरम्यान कोतवाल कालभैरव श्रीवर्धन येथे पोहोचला होता. पहाट झाली कोंबडा आरवला. कालभैरव काशी श्रीवर्धन येथे स्थिरावले. आजही दोघांचे मुख दक्षिण-उत्तर आहे.
श्रीवर्धनमधील कालभैरवाच्या मूर्ती प्राचीन काळातील असून पाषाणाच्या आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्यात चार मूर्ती असून समोर दर्शनी डावीकडे असलेली मूर्ती ही सिद्धनाथ भैरवाची असून याच मूर्तीच्या डाव्या बाजूला असलेली मूर्ती योगेश्वरीची आहे. कालभैरवाच्या बाजूला भिंतीच्या कडेला मूर्ती आहे ती ‘वीर’ याची आहे. योगेश्वरीच्या बाजूला भिंतीच्या कडेला जी मूर्ती आहे ती ‘क्षेत्रपाळाची’ आहे. सिद्ध भैरवाला चार भुजा असून त्याच्या हातात ढाल, उजव्या हातात तलवार, बाजूला त्रिशूळ, कमरेला खंजीर अशी आयुधे आहेत. श्रीवर्धन येथील मंदिरात असलेला कालभैरव हा काशी या ठिकाणांचा रक्षक (कोतवाल) असून प्रत्यक्ष काशी या ठिकाणी केलेला नवस तिथे बोललेली अर्ज, विनंती श्रीवर्धन या ठिकाणच्या मंदिरात फेडली असता काशी येथील दैवताला पावन होते, अशी भाविक- भक्त यांची दृढ श्रद्धा आजही आहे. 

श्री काळभैरावानाथांना जे वंदन करतात. त्यांना यमदूत वंदन करतात. श्री काळभैरावानाथांचा महिमा जे वाचवतील किंवा श्रवण करतील त्यांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शनाचे पुण्य मिळते 

माहिती स्तोत्र : लोकप्रभा २००९ ( लेखक : श्री गोविंद ) 

कालभैरवाष्टकम

देवराज्य_सेव्यमान_पावनाघ्रिपंकजम्

व्यालयज्ञ_सूत्रमिंदू_शेखरं कृपाकरम्|
नारदादि_योगिवृंद वंदितं दिगंबरम्
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|

भानुकोटिभास्करं भवाब्दितारकं परं
नीलकण्ठमीप्सिथार्थ_दायकं त्रिलोचनम|
कालकाल_मम्बुजाक्षमक्ष_शूलमक्षरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|

शूलटंक_पाशदण्ड_पाणिमादिकारणं
श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम|
भीमविक्रम प्रभुं विचित्र तांडवप्रियं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|

भुक्तिमुक्ति_दायकं प्रशस्तलोकविग्रहं
भक्तवस्तलं स्थितं समस्तलोकविग्रहं|
विनिकण्वन्मनोज्ञ्_हेम्_किंकिणीलस्तकटिं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|

धर्मसेतू_पालकं त्वधर्ममार्ग्_नाशकम्
कर्मपाशमोचकम् सुशर्मदारकम् विभुम्|
स्वर्णवर्ण_शेष्_पाश_शोभितांगमण्डलं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|

रत्नपादुकाप्रभाभिराम_पाद_युग्मकम्
नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरंजनम्|
मृत्यु दर्प नाशनं करालदंष्ट्र मोक्षणम्
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|

अट्टहास_भिन्नपद्म_जाण्ड्_कोश_संततिं
दृष्टिपात_नष्टपाप_जालमुग्र_शासनं
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|

भूतसंघनायकं विशालकिर्तीदायकं
काशिवास_लोकपुण्यपापशोधकं विभुम्|
नितिमार्गकोविदम् पुरातनम् जगत्पतिं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|

कालभैरवाष्टकम् पठन्ति ये मनोहरं
ज्ञानमुक्ति साधनम् विचित्रपुण्यवर्धनम्|
शोक_मोह्_दैन्य_लोभ_कोपताप्_नाशनम्
प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिम् नरा धृवम्
काशिकापुराधिनाथ कालभैरवम्
भजे

1 टिप्पणी: