बुधवार, २ डिसेंबर, २०१५

श्रीपाद प्रभूंचे सर्वव्यापकत्व

अध्याय ४ 

एकदा बापन्नाचार्युलू  श्रीपाद प्रभुना म्हणाले “श्रीपादा| तू तीन वर्षाचा आहेस परंतु मोठ्या माणसासारखे बोलतोस सर्वांबद्दल माहिती असावयास तू सर्वज्ञ आहेस काय? यावर  बालक श्रीपाद हसून म्हणाले “मी तीन वर्षाचा आहे असे तुम्हास वाटते परंतु मला तसे वाटत नाही. माझे वय अनेक लक्ष वर्षाचे आहे. मी या सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर होतो आणि प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे.सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी  मी होतो. माझ्या शिवाय सृष्टीची उत्पत्ती,स्थिती, आणि लय होऊच शकत नाही. मी साक्षिभुत होऊन सर्व व्यवहाराचे अवलोकन करतो.”  यावर बापन्नाचार्युलू म्हणाले“श्रीपादा, लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत  असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात आहोत असे होत नाही. प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो सर्वज्ञान सर्वव्यापकत्व, सर्व शक्तीतत्व हे केवळ जगनियंताचे लक्षण आहे.”  यावर श्रीपाद प्रभू म्हणाले “मी सर्वत्र स्थित असणारे आदितत्व आहे. प्रसंगानुसार मी व्यक्त होतो.मी सर्वव्यापी आहे. ज्ञान, विज्ञान माझ्या चरणाशी  लीन आहेत.माझ्या केवळ संकल्पाने ही सृष्टी निर्माण झाली.. मी सर्व शक्तिमान आहे यात आश्चर्य के काय? यावर पिता अप्पलराज शर्मा म्हणाले “बाळा श्रीपादा, बालपणापासून तू आम्हास एक कोडेच आहेस. तू वारंवार मी दत्त प्रभू आहे असे म्हणतोस आणि नृसिंह सरस्वती रुपाने पुन्हा एकदा प्रकट होईन असे म्हणतोस. पीठिकापुरमचे ब्राम्हण या भाषणाला  मनचांचल्य बुद्धीभ्रष्टता असे म्हणतात” पित्याचे हे वक्तव्य ऐकून बालक श्रीपाद म्हणाले “ तात, खरे सांगितले पाहिजे ना? नभोमंडळातील सूर्यास तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तो सूर्य नाही असे होईल काय? सत्य हे देश, काळ अबाधित असते.” श्रीपादांचे हे भाषण ऐकून पिता अप्पलराज शर्मा,आजोबा बापन्नाचार्युलू अगदी थक्क होऊन गेले.

एकदा बालक श्रीपाद त्यांच्या घरी असलेल्या काळाग्नीशमन श्रीदत्तांची आराधना करीत होते. त्यावेळी बापन्नाचार्युलू आजोबांनी श्रीपादाना विचारले “बाळा, तू दत्त आहेस का दत्तउपासक आहेस?तत्काळ श्रीपाद म्हणाले “आजोबा, ज्यावेळी मी दत्त आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्तच असतो. जेंव्हा मी दत्तउपासक आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्तउपासकच असतो. मी ज्या वेळी “मी श्रीपाद वल्लभ आहे” असे म्हणतो, त्यावेळी मी श्रीपाद वल्लभच  असतो.मी जो संकल्प करतो तेच होत असते. हेच माझे तत्व आहे.” श्रीपाद पुढे म्हणाले “आजोबा तुम्ही आणि मी एकच आहोत पुढील अवतारात मी अगदी तुमच्यासारखाच दिसेन.” असे म्हणून श्रीपादानी आपल्या आजोबांच्या भूमध्यावर दोन बोटे ठेवून स्पर्श केला. ते कूटस्थ चैतन्याचे स्थान आहे. कांही क्षणातच बापनाचार्युलुना  हिमालयात निश्चल समाधीत असलेल्या   बाबाजींचे दर्शन झाले. कांही वेळातच ते प्रयाग महाक्षेत्रतिल त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे दिसले आणि नंतर श्रीपाद प्रभू समोर उभे असल्याचे दिसले. हे स्वरूप कांही क्षणातच कुक्कटेश्वराच्या स्वयंभू दत्तात्रेयात विलीन झाले. त्याच्यातून एक अवधुत  स्वरूप निघाले आणि त्याना सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले. त्या अवधूताचे रूप कांही क्षणातच, महाराणी सुमतीच्या मांडीवर निजलेल्या तान्हया बाळात बदलले. पाहता, पाहता ते बाळ सोळा वर्षाच्या युवकात रुपांतरीत झाले. त्या युवकाने हुबेहूब बापन्नाचार्युले सारखेच परंतु संन्याशाचे रूप धारण केले. त्यांनी दोन नद्यांच्या  संगमात स्नान केले आणि बापन्नाचार्युलूकडे पाहत म्हटले “मला नृसिंहसरस्वती म्हणतात. हे गंधर्वपूर आहे” असे सांगितल्यावर स्वामिनी एक वस्त्र नदीवर पसरले आणि त्यावर बसून श्रीशैल्यास गेले. तेथून ते कर्दळी वनात गेले. तेथे अनेक वर्षे तपस्या केल्यानंरार ते कौपिनधारी महापुरुषाच्या रूपात प्रकट झाले. त्यांनी बापन्नाचार्युलू कडे पहात म्हटले “माझ्या या रुपाला स्वामी समर्थ असे म्हणतात. थोड्याच वेळातच त्यांनी प्राणत्याग केला आणि त्यांची प्राण शक्ती वटवृक्षात  गेली. त्यांचा दिव्यात्मा श्रीशैल्यावरील मल्लीकार्जुनाच्या स्वरूपात  विलीन झाला. त्या परम पवित्र शिवलिंगातून  ध्वनी उमटला “ बापानार्या तू धन्य आहेस. त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी, श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रुपात तुला अनुग्रहित करीत आहे.”  हा मंगल ध्वनी ऐकून  आणि दिव्य दृश्ये पाहून बापान्नाचार्युलू स्तब्धच झाले.त्यांना समोर निरागस चेहऱ्याचा तीन वर्षाचा हसरा बालक श्रीपाद दिसला, त्यांनी त्याला प्रेमाने उराशी कवटाळून धरले. त्यावेळी ते दिव्य तन्मय अवस्थेत गेले. या अवस्थेत किती वेळ गेला ते कळलेच नाही. त्यांनी डोळे उघडले त्यावेळी अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती. ते चटकन उठले आणि अग्निहोत्रात समिधा घालून नित्याप्रमाणे वेदमंत्र म्हणू लागले. दररोज एकदा मंत्र म्हणताच अग्नी प्रज्वलित होत असे. परंतु त्या दिवशी मात्र अनेक वेळा मंत्र म्हटल्यावर सुद्धा अग्नी पेटला नाही. आजोबा घामाने ओले-चिंब झालेले श्रीपादानी पहिले आणि अग्निकुंडाकडे पाहून म्हणाले “ अरे अग्निदेवा तुला आज्ञा करतो तू आजोबांच्या देवकार्यात अडथळा आणू नकोस .” आणि आश्चर्य असे की त्या कुंडात अग्नी तत्काळ प्रज्वलित झाला. त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले “माझ्या संकल्पा शिवाय, आजोबा सारखे महान तपस्वी सुद्धा अग्नी निर्माण करू शकत नाहीत”

||   श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा