बुधवार, २ डिसेंबर, २०१५

'वाटणी..'

खुप दिवसांनी गावी आलो होतो, कट्ट्यावर सगळे मित्र भेटले. छान गप्पा रंगल्या... ☺️

"मग कसं चाल्लय तुमच्या भावंडांचे..? जमतंय की आमच्या थोरल्या बंधुराजांसारखेच तुमचे बंधु पण भांडखोर..?" ...एकाने विचारले. ��

"च्यायला.. दोन भावांचे छान जमल्याचे कुठे ऐकले आहेस का रे लेका..!" ....दुसरा मित्र. ��

हे ऐकुन सगळ्यांमधे एकच हशा पिकला.. ��

"बरं ते राहु दे.. आई कुणाकडे असते..? कि ते पण आमच्यासारखंच चाल्लय..?" ...पुन्हा पहिला मित्र सांगायला लागला.. "दोन दोन महिने आळीपाळीने सांभाळतो आम्ही.. कुणावर अन्याय नको.. आपण एकदम व्यवहारी चालतो.. उद्या कुणी बोट दाखवायला नको की बंडुने हात झटकले म्हणून.." ��

"तु हे मात्र बरं केलंस.. नाही तर आमचा म्हातारा बघ ना.. चार वर्ष झाले माझ्याकडेच पडलाय.. आमच्या बारक्याने 'माझ्याकडे जागा नाही' सांगुन सरळ हात वर केले..!" ...बबन्या सांगत होता, "बापाला बोल्लो मग, त्याला सांग 'जमिनीवर हिस्सा सांगायला येऊ नकोस आता', नाही तर तंगडं तोडेन म्हणावं.." ��

मला हेवा वाटला त्यांच्या या व्यवहार ज्ञानाचा.. जमिन जुमला आणि आई-बापाची वाटणी एकदम व्यवस्थित करून व्यवहारचातुर्य दाखवलं होतं त्यांनी..!

"कायं रे... तु का गप्प..? तुझ्याही अर्थशास्राच्या पुस्तकाचे कव्हर फाटलेलं दिसतय..!" हे ऐकुन सगळेच माझ्याकडे बघुन मनमुराद हसले.. मलाही गंमत वाटली त्या प्रश्नाने. ��

"असं काही नाही रे.. त्यातल्या त्यात आमचं ठिक चाल्लय..!" मी उत्तर देणे टाळले. घरच्या गोष्टी घरातच रहाव्या या मताचे आम्ही.. पण मित्रांनी खुपच टर खेचली मग मला पण सांगावेसे वाटले...

..."नुकताच दादा आणि माझ्यात पण गावच्या जमिनीवरून थोडा वाद झाला.. मी नाही नाही सांगतोय तरी तो गावच्या जमिनीचा एक तुकडा विकायचा म्हणतोय.. वडिलांनी अपार कष्ट करून घेतलेली ही जमिन त्यांच्या पश्चात तशीच रहावी असंच ठरलं होतं आमचं..!"

"अरे मग तु देऊ नकोस सही.. त्यात काय एवढं? आई तर तुझ्याकडेच असते ना... मग कुठे जातोय लेकाचा..!" मध्येच गण्याने उसना सल्ला टाकला..!

"तसं नाही रे.. साधा मोबाईलचा सिमकार्ड घ्यायचा असेल तरी आम्ही एकमेकांना विचारून घेतो.. कोणत्या सिमकार्डचं बिल स्वस्त पडेल यासाठी... कारण रोज दहावेळा फोन असतात आमचे एकमेकांना.. गरजेची प्रत्येक गोष्ट एकमेकांचा अनुभव वजा सल्ला घेऊनच आम्ही खरेदी करतो... इतकी सवय झाली आहे आता आम्हाला..!" मी सांगु लागलो...

"तसं पाहीलं तर आम्ही दोघं नवरा बायको नोकरी करतोय. आमच्या लहान मुलाच्या जिवाची हेळसांड होऊ नये म्हणूनच, पण शाळा जवळ असल्याचे कारण सांगुन वहिनी आणि दादाने माझ्या दहा वर्षांच्या मुलाला त्यांच्याकडेच ठेऊन घेतलं आहे.. फक्त शनिवार, रविवार काय तो आमच्या जवळ असतो.. वहिनी स्वत: सगळ्या मुलांना काही कमी पडु नये म्हणून खुप मेहनत घेत असते.. त्यांच्या शिकवण्या सुद्धा तिच घेते.. दिसतंय रे सगळं...!"

"आईचे विचारशील तर ती आम्हा दोघांकडेही रहात नाही, तर आम्हीच तिच्याकडे रहातोय... आणि आम्ही कोण रे तिला सांभाळणारे..? तिनं अन् बाबांनी रक्ताचं पाणी करून आम्हाला लहानाचं मोठं केलंय... उच्च शिक्षण दिलंय..! फक्त मी रहातो तिथल्या सोसायटीमधे असलेल्या नाना-नानी कट्ट्यामुळे तिचं मन इथे रमतेय... तसं तिला कोणत्या घरी राहायचंय हा तिचा अधिकार आहे म्हणुन आम्ही सुद्धा तिला काय हवं तसंच वागतो..!" ☺️

"तिन वर्षांपूर्वी जागा कमी पडतेय म्हणून दादाने दुसरे घर घेतले... कर्जाचा हप्ता जरा हाताबाहेरचा असल्याने मीही मदत म्हणुन त्यातला काही भार उचलला.. नाही नाही म्हणतां दादा तयार झाला.. एकदाचं ठरलं आणि शेवटी दादाचं घर घेतलं... हो, पण सणासुदीला जुन्या घरीच एकत्र रहायचं या अटीवर..!" ��

"सगळं सुरळीत सुरू असताना परवा अचानक हिच्या आईचा फोन आला.. माझ्या सासर्यांची तब्येत खालावल्याचा निरोप होता.. तशी माझ्या सासरची परीस्थिती बेताचीच आणि माझी पत्नी एकुलती एक असल्याने आम्ही दादा, आईला सांगुन तडक तिचं गांव गाठलं.. प्राथमिक तपासणीत हिच्या वडीलांना कँसर असल्याचे निदर्शनास आले.. फार उशीर न झाल्याने उपचारांती आजार बरा होऊ शकतो, पण उपचारासाठी बारा-पंधरा लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे लक्षात आले..! नुकतंच घर घेताना त्यासाठी सगळी तरतूद करून पैसा खर्च केला आहे.. पण आज 'पुन्हा लगेचच एवढा पैसा कसा उभा करायचा?' हाच मोठा यक्षप्रश्न आहे..!"

"दादाला हे कळलं.. आता तो म्हणतोय, मागे नाही हटायचं रे गड्या.. जमिनीचा एक तुकडा विकायचा.. शेवटी माणुस महत्वाचा.. जमिन काय घेऊ पुन्हा.. !"

अचानक समोर लक्ष गेलं आणि पाहिलं, माझ्या मित्रांच्या डोळ्यांतुन अश्रु ओघळत होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा