शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

नोबेल पुरस्कार गणितासाठी का नाही ?

नोबेल पुरस्कार गणितासाठी का नाही ?

अल्फ्रेड नोबेल हा कॉलेजात असतानाची ही गोष्ट आहे. आल्फ्रेड नोबेल म्हणजे डायनामाईटचा शोध लावणारा रसायनशास्त्रज्ञ, स्फोटकतज्ज्ञ आणि स्फोटकांच्या व्यापारावर धनाढ्य झालेला तंत्रज्ञ, संशोधक. तर या अल्फ्रेडच्या वर्गातला त्याचा एक मित्र हा गणित या विषयात फार हुशार होता. पुढे मोठेपणी हा मित्र एक थोर गणिती झाला. कॉलेजच्या काळात अल्फ्रेड नोबेल आणि हा मित्र हे दोघेजण कॉलेजातल्या एकाच मुलीवर जीव टाकत होते ! बरेच दिवस ही मुलगी आपल्या मनाचा थांग लागू देत नव्हती. आणि अखेर तिने कौल दिला तो गणितज्ञाच्या बाजूने ! लवकरच त्यांचा विवाहसुद्धा पार पडला.

पण यामुळे अल्फ्रेड महाशय निराश वगैरे झाले नाहीत. उलट भरपूर पैसा कमवायचा आणि मग आपल्या श्रीमंतीला भुलून ती तरुणी परत आपल्याकडे येईल अशी स्वप्ने अल्फ्रेड बघू लागला. यासाठी त्याने आपल्या वडिलांच्या स्फोटके बनविण्याच्या कारखान्यात कामाला सुरुवात केली. त्याने अनेक स्फोटकांवर संशोधन केले. एकदा कारखान्यात अपघाताने झालेल्या एका स्फोटात त्याचा लहान भाऊ मरण पावला. त्यामुळे सुरक्षित स्फोटके बनविण्याचा अल्फ्रेडने चंगच बांधला आणि डायनामाईट या नावाचे स्फोटक तयार केले. या शोधामुळे त्याला खूप प्रसिद्धी आणि पैसा मिळाला. लवकरच अल्फ्रेडची गणना जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये होऊ लागली. पण खूप श्रीमंत झाल्यावरही अल्फ्रेडची कॉलेजसखी त्याच्याकडे परतली नाहीच ! ती त्या गणितज्ञालाच एकनिष्ठ राहिली ! 

अल्फ्रेड नोबेल शेवटपर्यंत अविवाहित राहिला. आता या श्रीमंतीचं करायचं काय हा त्याच्यापुढे प्रश्नच होता. त्यात १८८८ साली त्याचा भाऊ मरण पावला. तेव्हा एका फ्रेंच वृत्तपत्रामध्ये चुकून अल्फ्रेडच्या मृत्यूची बातमी दिली गेली. अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत होणाऱ्या युद्धसामुग्रीतील स्फोटकांचा व्यापार करणाऱ्या अल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूची खबर देताना त्या वृत्तपत्रात ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याचा मृत्यू’ असा उल्लेख केलेला होता. हे वाचून अल्फ्रेडला फार दुःख झाले. यापुढे आपल्या पैशाचा काही सदुपयोग व्हावा या उद्देशाने त्याने जमविलेल्या प्रचंड पैशामधून दरवर्षी जगातील श्रेष्ठ वैज्ञानिकांना रोख पुरस्कार देण्याची योजना आखली.

नोबेल पुरस्कार देण्याचं तर ठरलं. आता हे पुरस्कार विज्ञानाच्या कोणकोणत्या शाखांसाठी द्यावेत असा विचार सुरु झाला. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र...  अशी एकेका विज्ञान शाखेची नावं पुढे येत होती आणि अल्फ्रेड नोबेल मान डोलावत होता. आणि अचानक कोणीतरी सुचवलं, ‘गणित ?’

आपली कठोर नजर रोखत नोबेल उत्तरला, “कदापि नाही ! कोणाही गणितज्ञाला माझा पैसा मिळणार नाही !”

आणि म्हणून गणितासाठी नोबेल पुरस्कार दिला जात नाही !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा