पुरे झाले सूर्यावर थुंकणे!
***डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले***
दि. 24 जानेवारी 2016च्या 'द वीक' या कोचीहून निघणाऱ्या साप्ताहिकात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांना उत्तर देणाऱ्या लेखमालेतील पहिला लेख.
हिंदुत्वनिष्ठ माणसाची आणि चळवळीची एक ठोकळेबाज प्रतिमा या मंडळींनी आपल्या मनात करून ठेवली आहे. त्या प्रतिमेला छेद देणारे सावरकर या चौकटीत कुठेच बसत नाहीत, ही या मंडळींची खरी पोटदुखी आहे. हिंदुत्व आणि बुध्दिवाद ही परस्परविरोधी मूल्ये असल्याचा या मंडळींचा ग्रह. पण सावरकरांचा बुध्दिवाद यांना ना पेलणारा, ना पचणारा. साहित्य-नाटय-काव्य या प्रांतांवर आपलीच मक्तेदारी अशी या मंडळींची घमेंड. पण साहित्याच्या सर्व प्रांतांमध्ये लीलया संचार करणारा एकमेवाद्वितीय साहित्यिक म्हणजे पुन: हिंदुत्वनिष्ठ सावरकर! जातील त्या वाटेवर सावरकर नावाचा मनुष्य यांना आडवा येतो. कितीही खटाटोप केला, तरी सूर्याला ग्रासणे अशक्य असते. सूर्याच्या तेजामुळे वैफल्यग्रस्त झालेली माणसे मग सूर्यावर थुंकायला लागतात.
या देशातील निधर्मवादाचा बुरखा घालणारे इस्लामवादी, डावे, बेगडी सेक्युलरवादी आणि भाडोत्री पत्रकार सावरकरांचा इतका द्वेष का करतात? त्यांची निंदा करण्यात एवढी शाई आणि शब्द का खर्च करतात? त्यांना कधी अनुल्लेखाने, तर कधी मिथ्यारोपांनी का मारू पाहतात? सावरकरांनी या लोकांचे काय घोडे मारले आहे की ते त्यांचा आत्यंतिक तिरस्कार करतात? या प्रश्नांचे उत्तर सरळ आहे. सावरकरांनी या सर्व हिंदूद्रोही लोकांची अडचण करून खरोखरच त्यांचे घोडे मारले आहे. या देशातून हिंदुत्व नामशेष करण्याचा विडा या सर्व मंडळींनी उचललेला आहे. इतकी वर्षे आदळ-आपट करूनही हिंदुत्व-कूळ देशाच्या केंद्रस्थानी पोहोचल्यामुळे या मंडळींचा पोटशूळ उठतो. मग या कुळाचे कुलगुरू असलेल्या सावरकरांच्या नावाने ते विषवमन करणार, यात आश्चर्य ते काय? हिंदुत्वनिष्ठ माणसाची आणि चळवळीची एक ठोकळेबाज प्रतिमा या मंडळींनी आपल्या मनात करून ठेवली आहे. त्या प्रतिमेला छेद देणारे सावरकर या चौकटीत कुठेच बसत नाहीत, ही या मंडळींची खरी पोटदुखी आहे. हिंदुत्वनिष्ठ मंडळींनी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला नाही, हा या लोकांचा आवडता सिध्दान्त! पण क्रांतिकारकांचे मुकुटमणी कोण, तर हिंदुत्वनिष्ठ सावरकर! 'हिंदुत्वनिष्ठ म्हणजे बुरसटलेल्या विचारांचे' अशी हाकाटी ही मंडळी पिटत असतात. पण यांचा पुरोगामीपणा अगदीच अळणी वाटावा, असा सावरकरांचा विचार आणि आचार! हिंदुत्व आणि बुध्दिवाद ही परस्परविरोधी मूल्ये असल्याचा या मंडळींचा ग्रह. पण सावरकरांचा बुध्दिवाद यांना ना पेलणारा, ना पचणारा. साहित्य-नाटय-काव्य या प्रांतांवर आपलीच मक्तेदारी अशी या मंडळींची घमेंड. पण साहित्याच्या सर्व प्रांतांमध्ये लीलया संचार करणारा एकमेवाद्वितीय साहित्यिक म्हणजे पुन: हिंदुत्वनिष्ठ सावरकर! जातील त्या वाटेवर सावरकर नावाचा मनुष्य यांना आडवा येतो. कितीही खटाटोप केला, तरी सूर्याला ग्रासणे अशक्य असते. सूर्याच्या तेजामुळे वैफल्यग्रस्त झालेली माणसे मग सूर्यावर थुंकायला लागतात. मणिशंकर अय्यर, ए.जी. नूरानी, शमसुल इस्लाम ही सूर्यावर थुंकणारी काही माणसे. आपण नेमाने चिखलफेक केली तर चिखलाचे काही कण तरी सावरकरांच्या प्रतिमेला चिकटतील, या विश्वासाने ही मंडळी दर वर्षी, साधारण म. गांधींच्या पुण्यतिथीच्या सुमारास, आपला रतीब घालतात. या दिवाभीतांच्या पंक्तीत यंदा निरंजन टकले नावाचा पोंगा पत्रकार बसला आहे.
सावरकरांवरील आरोप
दि. 24 जानेवारी 2016च्या 'द वीक' या कोचीहून निघणाऱ्या साप्ताहिकात लेख लिहून या पोंगा पत्रकाराने सावरकरांवर काही गंभीर आरोप केले आहेत. आरोप जुनेच आणि धादांत खोटे असल्याचे पूर्वीच सिध्द झाले असले तरी ते वारंवार लोकांवर आदळले की त्यात तथ्यांश असणार, असे काही जणांना वाटू शकते. पोंगा पत्रकाराने सावरकर साहित्य आणि सहजपणे उपलब्ध असलेली सावरकरांची चरित्रे वाचण्याची तसदी घेतली असती, तर त्याला तथाकथित संशोधन करावे लागले नसते. सर्वसामान्य वाचकाला हे सर्व वाचण्याची सवड आणि सोय नसल्यामुळे पोंगा पत्रकाराच्या निराधार आरोपांचा साधार समाचार घेणे आवश्यक आहे. सावरकरविरोधी कंपूचे साधारणपणे चार प्रकारचे आरोप आहेत ः
अंदमानात झालेल्या हाल-अपेष्टांमुळे सावरकरांचे मनोबल खचले. म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारकडे एकावर एक दयेचे अर्ज केले आणि स्वत:ची सुटका करून घेतली. त्यांच्या 'माझी जन्मठेप' या ग्रंथात या दयेच्या अर्जांचा उल्लेख नाही. अंदमानात त्यांनी कोलू ओढला असा उल्लेख त्यांच्या अधिकृत जेल-तिकिटावर नाही. इतरांना क्वचित मिळत अशा सवलती त्यांना अंदमानात मिळत होत्या.
अंदमानातून सुटल्यावरही त्यांची वर्तणूक ब्रिटिशांनी घालून दिलेल्या नियमांना अनुसरून होती. काँग्रेसला विरोध करणे आणि हिंदू-मुस्लीम यांच्यात तेढ निर्माण करणे हा सावरकर आणि व्हाइसरॉय लिनलिथगो यांचा समान कार्यक्रम होता. 'छोडो भारत' आंदोलनात त्यांची भूमिका संशयास्पद आणि ब्रिटिशांना साहाय्य करण्याची होती. हिटलरच्या ज्यूविरोधी कार्यक्रमाला त्यांचा पाठिंबा होता. सुभाषचंद्र बोस यांच्या सैन्याला विरोध करण्यासाठी आणि ब्रिटिश सैन्याला मदत म्हणून त्यांनी सैनिकीकरणाचा पुरस्कार केला.
सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिध्दान्त मांडला. ते अखंड भारताचे पुरस्कर्ते होते, याला ऐतिहासिक पुरावा नाही. तिरंगी ध्वजाला त्यांचा विरोध होता.
गांधीहत्येच्या कटात सावरकर सामील होते, हे न्या. कपूर आयोगाने सिध्द केले.
अकलेचे तारे
आपल्या तंगडया आपल्याच गळयात घालण्याची अद्भुत किमया या पोंगा पत्रकाराने कशी साधली आहे, याचे उदाहरण पाहून पुढे जाऊ. सावरकरांच्या कारागृह इतिहास दर्शिकेवर (जेल हिस्टरी तिकिटावर) त्यांना कोलूला जुंपण्यात आल्याचा उल्लेख नाही असे लिहून, ही अमानुष शिक्षा सावरकरांना झालीच नाही, असे पोंगा पत्रकार छद्मीपणे सुचवतो. इतर राजबंदिवानांच्या तुलनेत सावरकरांना सौम्य शिक्षा झाल्या असे लिहितो. लेखात त्याने शमसुल इस्लामच्या पुस्तकातून सावरकरांच्या एका 'मर्सी पेटिशन'चे (दयेच्या अर्जाचे) छायाचित्र उचलून छापले आहे. मूळ शब्द 'पेटिशन' (आवेदन, अर्ज) आहे, 'मर्सी' (दया) हा शब्द कुठेच नाही, तो अर्थातच खुबीने घुसडण्यात आला आहे. या आवेदनातील निवडक भाग ठळक करण्यात आला आहे. सावरकरांना कोलूला जुंपण्यात आले असा स्पष्ट उल्लेख, इतर बंदिवानांच्या तुलनेत त्यांना देण्यात आलेल्या अधिक कठोर शिक्षांचा तपशील सदर आवेदनात आहे. पण त्याला अर्थातच ठळक करण्यात आलेले नाही. सावरकर बंधूंना कोलूला जुंपण्यात आले ही त्यांचे सहबंदिवान असलेल्या बारींद्र घोष यांची साक्ष हाच पोंगा पत्रकार अन्य ठिकाणी देतो. मराठी नाव धारण करणाऱ्या या पोंगा पत्रकाराला महाराष्ट्रातील वैचारिक प्रवाहांविषयी घोर अज्ञान आहे. सावरकरांविषयी आणि हिंदुत्वाविषयी तिरकस लिहिण्यात ज्यांची हयात गेली, 'पुरोगामी, परिवर्तनवादी' (थोडक्यात समाजवादी) मंडळींबरोबर ज्यांची सदैव उठबस असे, त्या य.दि. फडके यांना पोंगा पत्रकाराने 'कट्टर सावरकरवादी' अशी पदवी बहाल केली आहे. पोंगा पत्रकाराने तोडलेले अकलेचे तारे पाहून 'हेचि फळ काय मम तपाला' असे बिचारे फडके म्हणाले असते!
कठोरतम शिक्षा सावरकरांना!
अंदमानच्या नियमाप्रमाणे सहा महिन्यांनी बंदिवानांना कारागृहातून बाहेर सोडण्यात येत असे. अंदमान बेटावरील वसाहतींमध्ये बायका-मुलांसह त्यांना राहण्याची मुभा असे. सेल्युलर जेलमध्ये आल्यापासून एकसारखे तीन वर्षांवर तोवर कोणासही बंद करून ठेवण्यात आले नव्हते. सावरकरांना हा नियम लावण्यात आला नाही. त्यांना तब्बल चौदा वर्षे त्या नरकपुरीत ठेवण्यात आले. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी सर्वांत निर्ढावलेला पठाण वॉर्डर नेमला जाई. बदमाश बंदिवानांना घालण्यात येणारा 'डी' (डेंजरस) बिल्ला त्यांच्या गळयात लटकवण्यात आला. बंदिपाल बारीच्या बंगल्यातून त्याला सहज दिसेल अशा कोपऱ्यातील एका खोलीत त्यांची रवानगी झाली. सुरुवातीलाच त्यांना सहा महिन्यांचा एकांत भोगावा लागला. दि. 16 ऑॅगस्ट 1911 या दिवशी त्यांना कोलूवर प्रथम जुंपण्यात आले. डिसेंबर 1911मध्ये पंचम जॉर्जच्या राज्यारोहणानिमित्त अनेक राजबंदिवानांची सुटका करण्यात आली किंवा त्यांच्या शिक्षेत सूट देण्यात आली. पण सावरकरांच्या बाबतीत ना सुटका, ना सूट! पुढे 1920 साली सावरकरांबरोबर आणि त्यांच्यानंतर जन्मठेप भोगावयास आलेल्या, सुमारे तीस-एक लोक सोडून अन्य राजबंदिवानांना सोडण्यात आले; पण सावरकरांच्याच शब्दांत सांगायचे तर 'आम्ही जसेच्या तसे पडलेलो, एक दिवसाचीदेखील सूट मिळाली नाही.' दि. 8 जून 1914 रोजी सावरकरांनी काम करण्यास नकार दिला, म्हणून त्यांना आठ दिवस हातकडयांत उभे राहण्याची शिक्षा देण्यात आली. दि. 16 जून 1914 रोजी पुन: नकार दिला, म्हणून चार महिने त्यांना साखळी बेडयांमध्ये जखडण्यात आले. दि. 18 जूनला पुन: नकार दिल्यामुळे अधिक कडक शिक्षा म्हणून दहा दिवस दंडाबेडयांत जखडण्यात आले. आजारी रुग्णांना दूध देण्यात येई. पण आजारी सावरकरांना फक्त कच्ची पोळी नाहीतर पाणी-भात देण्यात येई. अशा कठोर शिक्षा सावरकरांना किमान वीस-बावीस वेळा झाल्या. दि. 2 नोव्हेंबर 1916 रोजी कारागृहातील दुसऱ्या वर्गात त्यांची पदोन्नती झाली, तरी त्यामुळे बंधूंशी बोलण्याची अनुमती अथवा शारीरिक श्रमातून मुक्ती मिळाली नाही. नियमाप्रमाणे पाच वर्षांनंतर नातेवाइकांच्या भेटीला अनुज्ञा होती. पण तात्यारावांची आणि माईंची भेट दि. 30 मे 1919 रोजी - म्हणजे आठ वर्षांनी झाली. नोव्हेंबर 1920मध्ये सावरकर कुटुंबीयांना दोन्ही सावरकर बंधूंची भेट घेण्याची अनुमती मिळाली. त्या वेळेस कुटुंबीयांनी नेलेली आवडीच्या खाद्यपदार्थांची आणि रुमालाची ट्रंक तुरुंगाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष देऊ दिली नाहीच, पण ती गडप केली. सावरकरांसोबत असलेल्या इतर क्रांतिकारकांचा विचार करता ब्रिटिश सरकार सावरकरांशी खुनशीपणाने वागत होते, हे उघड आहे. अलीपूर बाँब खटल्यातील आरोपी हेमचंद्र दास आणि बारिंद्र कुमार घोष हे 1908 साली अंदमानात आले. सन 1920मध्ये ब्रिटिशांनी त्यांना क्षमा करून सोडून दिले. लाहोर कटातील आरोपी सचींद्रनाथ सन्याल यांनी सावरकरांप्रमाणेच 'राष्ट्रहितैषी चळवळ करायला मोकळीक दिली तर आम्ही गुप्त क्रांतिकारक चळवळीचा मार्ग काय म्हणून स्वीकारू' असे सरकारला आवेदन केले होते. त्यांची सुटका करण्यात आली, पण सावरकरांची नाही. इतर राजबंदिवानांच्या तुलनेत सावरकरांना सर्वाधिक कठोर शिक्षा देण्यात आल्या ही वस्तुस्थिती असताना त्याच्या उलट घडले असे म्हणणे म्हणजे खोटारडेपणा आहे.
अंदमानात सहबंदिवानांना संघटित करणाऱ्या, त्यांना लिहा-वाचायला शिकवणाऱ्या, त्यांचे संप घडवून आणणाऱ्या, स्वत: काम करण्यास नकार देणाऱ्या, बारीबाबाला द्वंद्वयुध्दात पराभूत करून त्याच्या तोंडावर रुमाल फेकणाऱ्या, अंदमानात शुध्दी घडवून आणणाऱ्या, हिंदीचा प्रसार करणाऱ्या, अंदमानातील परिस्थितीबाबत बाहेर वृत्त पाठवणाऱ्या, दिवसभर श्रम करून थकलेले शरीर लाकडी फळीवर विसावताच महिन्याला एक याप्रमाणे वर्षभर प्रमुख उपनिषदांवर चिंतन करणाऱ्या, साधी कागद-पेन्सिल नसतानाही तुरुंगातील भिंतींवर पाच हजार ओळींचे उदात्त काव्य लिहिणाऱ्या आणि ते सर्व मुखोद्गत करणाऱ्या, मरणोन्मुख शय्येवर असताना धीरोदात्त काव्य करणाऱ्या सावरकरांचे मनोबल खचले होते या आरोपाला 'नीच'पेक्षा सौम्य शब्द सुचत नाही.
ब्रिटिश अधिकारी सावरकरांबाबत विशेष सावधगिरीने आणि अतीव दुष्टाव्याने वागत होते. सावरकर बंधूंना सोडावे लागू नये यासाठी ब्रिटिश सरकार किती आटोकाट प्रयत्न करत होते, ते पाहण्यासारखे आहे. मुंबई सरकारच्या 'सोर्स मटेरियल फॉर अ हिस्टरी ऑॅफ फ्रीडम मूव्हमेंट इन इंडिया, खंड 2' प्रकाशनात पुढील तीन नोंदी आढळतात -
1) गणेश दामोदर सावरकर व विनायक दामोदर सावरकर यांना शिक्षेत कोणतीही सूट देण्यात येऊ नये, अशी शिफारस मुंबई सरकार करत आहे (पृ. 467).
2) सार्वजनिक शिक्षामाफीचा कोणताही लाभ सावरकर बंधूंना मिळू नये याच्याशी, दिल्ली सरकार पूर्णपणे सहमत आहे - 8 डिसेंबर 1919, पृ. 469.
3) मुंबई सरकारच्या गृहखात्याचे पत्र क्र. 1106/36 दि. 29 फेब्रुवारी, 1921 - सावरकर बंधूंना अंदमानातून भारतात पाठवण्यात येऊ नये, असे गव्हर्नर काउन्सिलचे मत आहे. कारण तसे केल्यास त्यांच्या सुटकेसाठीच्या चळवळीला बळ मिळेल.
राजबंदिवानांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील
राजबंदिवानांच्या सुटकेसाठी आपण का आणि कोणकोणते प्रयत्न केले, याचे विस्तृत विवेचन सावरकरांनी 'माझी जन्मठेप' या पुस्तकात केले आहे. पोंगा पत्रकार म्हणतो तसे त्यांनी सरकारला दिलेली आवेदने आपल्या पुस्तकात दाबून ठेवलेली नाहीत. कारण तसे करणे त्यांना मुळीच लज्जास्पद वाटत नव्हते. उलट ते त्यांना मातृभूमीच्या हिताचेच वाटत होते. सन 1920मध्ये करारपत्रावर सही करून स्वत: ची सुटका करून घेण्याची राजबंदिवानांना संधी मिळाली. अशी सही करून राजबंदिवानांनी सुटका करून घ्यावी हे सावरकरांचे मत सर्वांना पटत नव्हते. असहमत असलेल्या राजबंदिवानांना आपण कसे समजावून सांगितले, हे त्यांच्याच शब्दांत - 'इतर वाटेल ती भविष्यकालीन आणि राष्ट्रीय हितानुकूल अट मानावी म्हणून सगळयांस सांगत राहिलो. अशा प्रसंगात तशी अट लिहून देणे हेच राष्ट्रीय हितास एकंदरीत अनुकूल होते, हे मी शिवाजी-जयसिंग, शिवाजी-अफझुल, चमकोरनंतरच्या पलायनातील श्रीगुरूगोविंद आणि स्वत: श्रीकृष्ण यांच्या आणि अन्यान्य उदाहरणांनी सर्वांच्या मनावर ठसवीत होतो. जे मानधन हट्टी होते, त्यांस अर्थातच हे पटेना. इतके हाल सोसूनही ज्यांचा बाणा तिळमात्र नरम झाला नव्हता, असे ते वीर माझा विरोध करताना पाहून मला आपल्या देशाच्या भविष्यकालाविषयी अधिकच आशा वाटू लागे. परंतु अंती त्यांस तसेच करणे योग्य आहे हे राजनीतीचे धोरण मी पटवू शकलो आणि राजबंदींच्या सुटकेच्या वेळी सर्वांनी त्या करारपत्रावर डोळे मिटून सह्या करून कारागाराचे कुलूप एकदाचे तोडले.'
सावरकरांनी आपली भूमिका पुढीलप्रमाणे नि:संदिग्धपणे सांगितलेली आहे - 'अंदमानात जे काय राष्ट्रहित साधता येईल ते इतके महत्त्वाचे कधीही नसणार की जितके मुक्तता झाल्यास हिंदुस्थानात येऊन साधता येईल; परंतु म्हणून मुक्ततेसाठी वाटेल ते विश्वासघातक, निंद्य, नीच आणि देशाच्या किंवा जातीच्या स्वाभिमानास कलंक लागेल, असे लाळघोटी वर्तन त्यामुळे समर्थनीय ठरणार नाही. कारण त्यायोगे होणारी मुक्तता ही राष्ट्रास अधिक हितकारक होण्यापेक्षा स्वत:चे उदाहरणाने अधिक अनीतिमान आणि राष्ट्रघातकी मात्र होणारी होती. तेव्हा असे वर्तन टाळून जर मुक्तता मिळण्याची निश्चित संधी मिळत असेल तर ती साधावयाची. ती निश्चित संधी मिळेतो त्या परिस्थितीतच जे काय राष्ट्रहित साधता येईल ते साधण्याचा प्रयत्न करीत राहून दिवस कंठावयाचे. त्यातही शक्यतो ज्यांच्यावर सरकारचा इतका उग्र दोष व तीव्र दृष्टी नाही, तोवर त्यांच्याकडून ती कृत्ये करवावयाची. जेव्हा आपणावाचून ती त्या परिस्थितीत शक्य असलेली सार्वजनिक चळवळ करण्यास दुसरे कोणी इतके इच्छुक वा समर्थ नसेल तेव्हा ती प्रकरणे स्वत: करावयाची. मुक्ततेचा संभव दिसत असता दाटून दवडावयाचा नाही. पण तो निश्चित संभव नसता केवळ आशाळभूत भ्याडपणाने 'नाही तर सोडणार नाहीत' असे म्हणत अंदमानात स्वकीयांचे चाललेले छळ निमूटपणे पाहतही बसावयाचे नाही.' यावर भाष्य करण्याची गरज नाही.
अंदमानच्या कारागृहातून राजबंदिवानांची (केवळ स्वत:ची नव्हे!) सुटका व्हावी, यासाठी सावरकरांनी दोन प्रकारे प्रयत्न केले. त्यांच्या क्रांतिकारक मित्रांनी त्यांची मुक्तता करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी जर्मनीचे साहाय्य घेतले होते. त्याचा परिणाम म्हणून जर्मनीची 'एम्डेन' युध्दनौका अंदमानच्या आसपास फेऱ्या मारू लागली. राजबंदिवानांच्या मुक्ततेसाठी सावरकरांनी दुसरा मार्ग निवडला तो ब्रिटिशांना आवेदने धाडण्याचा! सर्वच राजकीय बंदिवानांची मुक्तता व्हावी यासाठी जनतेकडून शासनाला सार्वजनिकपणे आवेदने पाठवण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना दि. 3 मार्च 1915 रोजी धाकटे बंधू डॉ. नारायणराव यांना लिहिलेल्या पत्रात सावरकरांनी केली. ही सर्व पत्रे 'अंदमानच्या अंधेरीतून' या नावाने प्रसिध्द झाली आहेत. या आग्रहामुळेच राजकीय बंदिवानांच्या मुक्ततेसाठी ठिकठिकाणी प्रांतिक परिषदा आयोजित होऊन सहस्रावधी स्वाक्षऱ्यांची आवेदने सरकारला धाडण्यात आली. राजकीय बंदिवानांच्या सुटकेसाठी जनतेने शासनाकडे सार्वजनिक आवेदने द्यावीत यामागे सावरकरांची आणखी एक भूमिका होती. दि. 5 ऑॅगस्ट 1917 रोजी धाकटया बंधूंना लिहिलेल्या पत्रात सावरकर लिहितात, 'अशी आवेदने न झाल्यास मी असे समजेन की मातृभूमीसाठी जे लढले त्यांचे स्मरण करायचे ज्यांना धैर्य होत नाही किंवा ज्यांना तशी इच्छाही होत नाही अशा लोकांमध्ये परत तरी कशाला जायचे? त्यांच्यात जायची मला लाज वाटेल.' पाऊण लाख स्वाक्षऱ्या असलेले आवेदन शासनाला देण्यात आले हे कळताच दि. 6 जुलै 1920 रोजी पाठवलेल्या पत्रात ते लिहितात, 'निदान ह्या आवेदनाने राजकीय बंद्यांची आणि ज्या कार्यासाठी ते लढले वा हरले त्या कार्याची नैतिक प्रतिष्ठा वाढविली ह्यात शंका नाही. आता खरोखरच आमची सुटका व्हायची असेल तर त्यात काहीतरी अर्थ वाटेल.' अशी सार्वजनिक आवेदने व्हावीत म्हणून प्रयत्नशील असलेल्या सावरकरांचा बाणेदारपणा दि. 3 मार्च 1915च्या पत्रात स्पष्ट जाणवतो. ते लिहितात, 'आम्ही ज्यांना नको आहो अशा लोकांकडे अगांतुकी करायची आमची मुळीच इच्छा नाही. आपण दयेची याचना करीत नाही.'
राजबंदिवानांची सुटका व्हावी म्हणून सावरकर किती निःस्वार्थीपणे प्रयत्न करत होते, याचे दर्शन त्यांनी पहिल्या महायुध्दाच्या वेळी गव्हर्नर जनरलला पाठवलेल्या पत्रात घडते. ब्रिटिशांनी देऊ केलेले दैशिक स्वराज्य आणि राजबंदिवानांची मुक्तता या गोष्टी विभक्त नसून एकास सफळ व्हावयाचे असेल तर दुसऱ्यासहच त्याची योजना झाली पाहिजे, असे सावरकरांनी लिहिले. ते म्हणतात, 'हे आवेदन धाडण्यात माझा मुख्य उद्देश राजबंदिवान वर्गाची मुक्तता हाच असल्याने मला स्वत:ला न सोडले तरी मी असंतुष्ट राहणार नाही; उलट मला सोडावे लागणार म्हणूनच जर क्वचित राजबंदिवानांस सर्वसाधारण क्षमा करण्यात येत नसेल, तर मला न सोडता ज्या शेकडो लोकांस सोडणे शक्य आहे त्यांस जरी सरकार सोडील तरी त्यात मला खरोखर आनंदच होईल.' हे आवेदन लिहीत असताना सावरकरांची शारीरिक स्थिती कशी होती? मार्च 1917मध्ये त्यांचे वजन 119 पौंड होते, ते ऑॅगस्ट 1918मध्ये 98 पौंड झाले होते. 'दिवसानुदिवस हा जड देह झुरत चालला आहे' असे हृदयद्रावक वाक्य त्यांनी याच काळात आपल्या धाकटया बंधूंना लिहिले होते.
अंदमानच्या अंधेरीत होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक यातनांना, तसेच ब्रिटिशांच्या कावेबाज धोरणांना, श्रीकृष्णाच्या तत्त्व आणि नीतीचा अवलंब करूनच सावरकर पुरून उरले. मृत्यूनंतर जिथे जावे लागेल तिथे उत्तम सोय व्हावी, म्हणून मी प्रत्यक्ष श्रीकृष्णाचे ओळखपत्र घेतलेय असे अंदमानात मृत्युशय्येवर असताना त्यांनी कवितेत उगीच म्हटले नव्हते! परकीय विरोधक सावरकरांना पुरेपूर ओळखून असल्यामुळेच त्यांनी सावरकरांना शक्य तेवढे कारागृहात डांबून ठेवले. परकीयांना जे कळले, ते स्वकीयांना समजेल काय?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा