शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

सियाचिन

सियाचिन : ...इथे पावलापावलावर मृत्यूशी संघर्ष असतो... तिथलं सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते म्हणजे जगणं... इथे तैनात असलेला जवान तीन महिन्यांनी सुखरुप बेस कॅम्पवर परतला तर तो असतो त्याचा पुनर्जन्म...

सियाचिन... जगातली सगळ्यात उंचावर असलेली युद्धभूमी... इथलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे जगणं... जिवंत राहणं... सियाचीन या शब्दाचा अर्थ 'गुलाबांचं खोरं'.... पण इथे गुलाबांपेक्षा बोचणारे काटेच जास्त आहेत... नजर जाईल तिथपर्यंत बर्फच बर्फ... पण समुद्रसपाटीपासून तब्बल २२ हजार फुटांवरचा बर्फ प्रचंड जीवघेणा.

चीन-भारत सीमारेषा

हिमालयाच्या काराकोरम रांगांमध्ये सियाचिन वसलंय. चीन आणि भारतीय उपखंडाला वेगळी करणारी ती रेषा... सियाचिन सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं... म्हणूनच सियाचिनच्या सुरक्षेशी अजिबात तडजोड केली जात नाही.

सुरक्षेवर १५०० कोटींचा खर्च

७६ किलोमीटरचं असलेलं सियाचिन जगभरातलं दुसरं मोठं हिमशिखर... इथलं तापमान उणे ४० ते ५० अंश असतं, थंडीत ते उणे ७० पर्यंत खाली जातं... वारे वाहतात ते बंदुकीच्या गोळीच्या वेगानं... सियाचिनमध्ये जवळपास भारताची दीडशे पोस्ट आहेत. त्यावर सुमारे १० हजार जवान तैनात असतात. सियाचिनच्या सुरक्षेवर वर्षाकाठी १५०० कोटी खर्च होतात. इथे तैनात असलेल्या सैनिकांवरचा रोजचा खर्च ४ ते ८ कोटी इतका आहे.

चालतानाही मृत्यू देतो चकवा

बेसकॅम्पपासून सगळ्यात लांब असलेली चौकी म्हणजे इंद्राकॉल... बेसकॅम्पपासून या चौकीवर चालत जायला तब्बल २० ते २२ तास लागतात. कंबरभर बर्फात चालायचं म्हटलं तर २ किलोमीटरचं अंतर चालायला सहा सात तास लागतात. दहा पावलं चाललं की विश्रांतीसाठी थांबावंच लागतं... इथे सगळे सैनिक एकापाठोपाठ एक आणि एकमेकांच्या कंबरेला दोरी बांधून चालतात... कुठल्याही क्षणी बर्फ खचू शकतो आणि एखादा जवान गाडला जाऊ शकतो... एखादा जवान असा गाडला गेलाच, तर बाकीचे जवान त्याला ओढून काढू शकतील, यासाठी या दोरीचं प्रयोजन... शरीराच्या हालचालीही प्रचंड नियंत्रित असतात.

...तर दृष्टीही जाऊ शकते

इथे सूर्यप्रकाश बर्फावर पडला आणि तो थेट डोळ्यांत परावर्तित झाला तर दृष्टीच जाऊ शकते. इथे आंघोळ करणं निव्वळ अशक्य.... दाढीही करता येत नाही... चुकून त्वचा कापली गेलीच तर जखमही भरुन येत नाही... बर्फात कुठलंही मनोरंजन नाही... महिनाभरानं घरुन येणारं एखादं पत्र तेव्हढंच काय ते मिळणारं मनोबल आणि जिवंत असल्याचं लक्षण...

झोपेतून उठवण्यासाठी चौकीदार

जेवायचं काय तर फक्त चॉकलेटस आणि ड्रायफ्रुटस... जेव्हा एखादं विमान येईल तेव्हा ते रेडी टू इट फूडची पॅकेटस टाकून जातं. सियाचिनमध्ये फक्त चिता हेलिकॉप्टरच उतरू शकतं... पण तेही ३० सेकंदांपेक्षा जास्त तिथे थांबू शकत नाही. सियाचीनमधले जवान झोपतात लाकडाच्या बाकांवर, स्लीपिंग बॅगमध्ये... ऑक्सिजन कमी झाला तर झोपेतच मृत्यू होऊ शकतो.... म्हणून तिथला चौकीदार प्रत्येक जवानाला मधून - मधून उठवत राहतो... अस पावलापावलावर मृत्यू तिथे लपाछपी खेळत असतो... आणि त्याही परिस्थितीत भारताचा जवान तिथे घट्ट पाय रोवून उभा असतो, तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी... सुखासाठी... या जवानांना, त्यांच्या धैर्याला आणि शौर्याला सलाम...!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा