शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६

जागतिक मराठी भाषा दिवस

माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान

आज २७ फेब्रुवारी आपण जागतिक मराठी भाषा दिवस तसेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस साजरा करीत आहोत. मराठी मातृभाषा असणार्या लोकसंख्येनुसार मराठी हि जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी भाषा १५०० वर्षे जुनी आहे. मराठी भाषेस खर्या अर्थाने वैभव प्राप्त झाले ते छ.शिवाजी राजे यांच्या काळात. शिवाजी महाराजांनी हि भाषा आपला राज्यकारभार करताना वापरली . अश्या दैदिप्यमान असलेली भाषेचा गौरव करण्या साठी आपण सदैव आग्रही असले पाहिजे.
कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले त्याचीच आठवण म्हणून त्यांच्या जन्मदिवशी आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो. स्वत:चा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना कुसुमाग्रजांना कधीही मानवली नाही. अनेकांनी त्यांचे वाढदिवस साजरे करण्याचे प्रयत्न केले. पण वाढदिवसाच्या आधी २ दिवस ते अज्ञातवासात निघून जात. परंतु त्यांच्या ८५ व्या वाढदिवशी मात्र त्यांच्या चाहत्यांनी त्यांना प्रेमाची भेट दिलीच.

कुसुमाग्रजांना मुळातच आकाश चांदणे, तारे, तारकांचे वेड होते त्यामुळे अवकाशातील एका तार्‍यालाच त्यांनी कुसुमाग्रजांचे नाव दिले. स्वीडनमधील इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री मार्फत दि.२७ फेब्रुवारी १९९६ रोजी स्वर्गदारातील तारा (स्टार इन द गेट वे ऑफ हेवन्स) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तार्‍याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले. एवढयावरच त्यांचे चाहते थांबले नाहीत तर त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प त्यांनी सोडला. आणि तो सिद्धीसही नेला.

नाशिक ही कवी आणि क्रांतिकारकांची भूमी आहे. अनंत कान्हेरे, वीर सावरकर अशा क्रांतिवीरांचे धगधगते कुंड अशी एके काळी नाशिकची ओळख होती. कुसुमाग्रजांच्या प्रतिभेने या क्रांतीचा ज्वाळांना शब्दांचा अंगार चढवून कवितेला स्वातंत्र्यलढय़ाच्या समरांगणात उतरवले. त्यांची क्रांतीचा जयजयकार’ ही कविता तर स्वातंत्र्य- लढय़ातील सैनिकांचे स्तोत्र बनली होती. अशा या मराठी भाषेच्या वाढीसाठी प्रयत्न करणार्‍या वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी 'जागतिक मराठी भाषा दिवस' साजरा होतो आहे ही एक भाग्याचीच गोष्ट म्हटली पाहिजे.

मराठीचे गुणगौरव करताना कवी सुरेश भट म्हणतत -
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी ,
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी ''
अशी थोरवी आपल्या कवितातून ते मांडतात .
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यानी एवढी साहित्यसंपदा लिहून आपल्याला मराठीबद्द्द्ल प्रेम व जिव्हाळा शिकवून गेले.
तेव्हा आजच्या या पुण्यदिनी ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे "अमृताशीही पैजा जिंकणार्‍या" आपल्या माय मराठीचे कौतुक करुयात आणि तिला दिवसेंदिवस वाढीस लावण्याची मनोमन प्रतिज्ञा  करूया

मासिक  सैनिक  दर्पण  व  आधारवड  परिवार तर्फे समस्त मराठी जनांना 'जागतिक मराठी भाषा दिवसाच्या' हार्दिक शुभेच्छा  !!!
व कुसुमाग्रजांनादेखील  त्यांच्या जन्मदिनी  प्रणाम्
       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा