नातं म्हणजे …
मानलं तर अंतरातलं प्रेम असतं
नाही तर प्रेमातलं फक्त अंतर असतं
नातं म्हणजे …
मानलं तर मनात दडलेली खोल भावना असतं
नाही तर दुसऱ्याला लुबाडणारी असुरी कामना असतं
नातं म्हणजे …
मानलं तर नाजूक धाग्याचं तलम सूत असतं
नाही तर बळजबरीने मानगुटीवर बसलेलं भूत असतं
नातं म्हणजे …
मानलं तर एक भक्कम आधार असतो
नाही तर आयुष्यभर वाहायचा नुसताच एक भार असतो
नातं म्हणजे …
मानलं तर परमेश्वरी गंध असतं
नाही तर जखडून ठेवणारे बंध असतं
नातं म्हणजे ...
मानलं तर अनमोल असतं
नाही तर सर्व काही फोल असतं
नातं म्हणजे ...
मानलं तर सुरेल गीत असतं
नाही तर जगरहाटीतील एक रीत असतं
नातं म्हणजे ...
मानलं तर आपसातील भक्कम विश्वास असतं
नाही तर दमूनभागून सोडलेले निःश्वास असतं
नातं म्हणजे …
मानलं तर जगण्याचं सुखद कारण असतं
नाही तर रोजचंच लादलेलं मरण असतं
नातं म्हणजे …
मानलं तर भावविश्वातील नाजूक बंध असतं
नाही तर पानभर लिहिलेले शुष्क निबंध असतं
नातं म्हणजे …
मानलं तर तुमचा माझा श्वास असतं
नाही तर जगण्याचा नुसताच आभास असत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा