सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६

आज २९ फेब्रुवारी - लीपदिन

पृथ्वी सूर्याभवती एक फेरी ३६५ दिवसात पुर्ण करते म्हणुन ह्या गतीला वार्षिक गती म्हणतात . ह्या कालावधीला वर्ष असे म्हणतो ,मात्र प्रत्यक्षात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला पृथ्वीला 365.242199 दिवस म्हणजेच ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिट  लागतात  . म्हणजे ३६५ दिवसांचा वर्ष मोजल्यानंतर ही जवळजवळ ६ तास शिल्लक राहतात . हे सहा तास दरवर्षी जास्तीचे जमा झाल्यास दर चार वर्षानी १ दिवस वाढतो . हा दिवस त्या वर्षात अधिकचा दिवस असतो . म्हणजे दर चार वर्षानी ३६६ दिवसांचा वर्ष येतो . व हा अधिकचा दिवस फेब्रुवारी महिण्यात धरला जातो .  फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा असतो मात्र दर चार वर्षानी तो २९ दिवसांचा असतो . यालाच आपण लीपदिन व ह्या वर्षाला लीपवर्ष म्हणतो .

दोन हजार वर्षापुर्वी ज्युलियस सिझर ह्या रोमन सम्राटाने लीपवर्षाचा प्रारंभ केला .  ज्या वर्षाला ४ ने भाग जातो अशा वर्षी लीप वर्ष साजरा केला जातो . मात्र असे दरवेळेस करत गेलो तर दर १०० वर्षानी पुन्हा अडचण निर्माण होते कारण वर आपण पाहिले आहे की दरवर्षी ५ तास ४८ मिनिट जास्त होतात आणि आपण गणितात तर पुर्ण ६ तास पकडले आहेत . त्यामुळेच हे दरवर्षीचे  १२ मिनिट सामावुन घेण्यासाठी दर १०० वर्षात २५ अधिकचे (लीप ) दिवस न घेता २४ घेतले जातात व शतकाच्या शेवटच्या वर्षी लीपवर्ष धरला जात नाही .त्यामुळेच सन  १८०० ,१९०० , हे लीपवर्ष नव्हते . हे असे करुनही परिवलन व वर्ष यांचे भाग नि:शेष होत नसल्याने पुन्हा ४०० वर्षानी एक दिवस अधिकचा घ्यावा लागतो व हे गणित पुर्ण होते .

म्हणजे
दर चार वर्षानी लीप वर्ष येते. ज्या सालाला  ४ ने भाग जातो ते वर्ष लीपवर्ष मानले जाते .
शतकाच्या शेवटच्या सालाला ४०० ने भाग जात असल्यासच लीप वर्ष मानले जाते उदा .२०००, हे वर्ष लीप वर्ष होते .

२९ फेब्रुवारी ला जन्मलेल्या मुलांना लिपर्स किंवा लिप्लिंग असे म्हणतात .

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१६

चंद्रशेखर आझाद

चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी
 (जुलै २३, १९०६ - फेब्रुवारी २७, १९३१)
 हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एच.एस.आर.ए.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांना भगत सिंग यांचे गुरू मानले जाते व ते एच.एस.आर.ए. संघटनेचे प्रमुख होते.

जन्म व बालपण

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १९०६ रोजी सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'सिताराम तिवारी' व आईचे नाव 'जगरानी देवी' असे होते. त्यांचे पृर्वज कानपूर जवळच्या बादरका गावात राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले. डिसेंबर, इ.स. १९२१ मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या १५वर्षे वयाच्या चंद्रशेखरने सहभाग घेतला होता. त्यासाठी त्याला अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले.

मृत्यू

दिनांक २७ फेब्रुवारी, इ.स. १९३१ रोजी, अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क येथे 'सुखदेव राज' या क्रांतिकारक सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले असतांना एका अज्ञात खबऱ्याने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला व चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळीबार झाला. त्यांनी एकहाती गोळीबारात तीन पोलिसांना मारले मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपत आल्यामुळे शेवटच्या गोळीने त्यांनी स्वत:ला मारून घेतली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले.

सावरकरांनी दिलेले ४५ मराठी शब्द..

सावरकरांनी दिलेले ४५ मराठी शब्द..

महापौर, अर्थसंकल्प, दूरदर्शन या शब्दांची निर्मिती सावरकरांनी केली आहे, हे कदाचित तुम्हाला माहिती असेल. पण याव्यतिरिक्त अनेक शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिले. त्यांची ही भाषाशुद्धी चळवळ खूपच गाजली. त्यांच्या या शब्दसंपदेबद्दल...
...............................

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी ।
हे असे असंख्य खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ।।

असं सुरेश भटांनी सांगितलं असलं तरी आज मराठी माणसाला, मराठी माणसाशी, मराठी भाषेत बोलायला लाज वाटते, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आपण महाराष्ट्रात अनुभवत आहोत. ‘ यू नो ’ , ‘ यू सी ’ हे शब्द मराठी वाक्यात आले नाहीत, असं होत नसतं. अशा परिस्थितीत, काही राजकारणी मंडळी मराठी माणसामधलं मराठीप्रेम जागवण्याचा प्रयत्न करतायत, पण त्याहीपेक्षा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मांडलेल्या भाषाशुद्धीच्या विचाराचा आज विचार व्हायला हवाय...

संवादाचं माध्यम आणि अभिव्यक्त होण्यासाठीचं साधन, म्हणजेच भाषा का ? तर, नाही. भाषा ही संस्कृतीचं द्योतक असते, संस्कृतीची वाहक असते. संस्कारातून संस्कृती घडत असते आणि म्हणूनच भाषेतून संस्कारही प्रतीत होत असतात. पण अनेक शतकं मराठी भाषेवर आक्रमणं होत होती. त्या काळात अनेक परकीय शब्द मराठी भाषेत समाविष्ट झाले. हवा, जमीन, वकील, गरीब, सराफ, मसाला, हलवा, गुलकंद, बर्फी, अत्तर, तवा, हे शब्द मराठी नाहीत, ते अरबी आणि फारशी भाषेतून आलेत हे आज सांगितल्याशिवाय अनेकांना कळणारही नाही. या संकरामुळे मराठी भाषा समृद्ध झाली, असं अनेकांना वाटतं. आजही इंग्रजी शब्द मराठीत आल्यानं मराठी संपन्न झाली, असंच भाषातज्ज्ञही म्हणतात.

पण, सावरकरांना हे मत मान्य नव्हतं. १९२४ मध्ये केसरीतून त्यांनी मराठी भाषेचे शुद्धिकरण ही लेखमाला लिहिली, त्यात त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली होती. याच विषयावरून दत्तो वामन पोतदार आणि त्यांच्यात झालेला वादही प्रसिद्ध आहे. ‘ परकीय भाषेतील शब्द आत्मसात करून ते पचवून टाकले, ही आमची विजय-चिन्हंच नाहीत का ?’ , असा प्रश्न दत्तोपंतांनी सावरकरांना विचारला. त्यावर त्यांचं उत्तर होतं, ‘ ती काही आमची विजय-चिन्हं नाहीत ; ते तर आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत .’ सावरकरांचं हे म्हणणं एका अर्थानं योग्यही आहे. आपल्या भाषेत शब्द उपलब्ध असतानाही दुस-या भाषेचा आधार का घ्यावा ?

‘ आपण बहुधा हयगय करून कधी कधी निरुपाय म्हणून आणि इतर वेळी ऐट म्हणून आपल्या बोलण्यात-लिहिण्यात परकीय शब्द वापरतो. ते जितके अधिक वापरले जातात , तितके त्या अर्थाचे आपले शब्द मागे पडतात . पुढे पुढे तर त्या शब्दांवाचून तो अर्थ व्यक्‍तच होत नाही , असे वाटू लागते. ते परशब्द आपलेच झाले , असे खुळे ममत्व वाटू लागते आणि पर-शब्द आपल्या भाषेच्या हाडीमाशी रुतून बसतात ' , असं विश्लेषण सावरकरांनी केलंय.

‘ स्वकीय शब्द नामशेष करून परकीय शब्द बोकाळू देणं , हे औरस मुलांना मारून दुसरी मुले दत्तक घेण्यासारखे आहे. तो जसा वंशवृद्धीचा मार्ग नव्हे , तसाच हा काही शब्दसंपत्ती वाढवायचा मार्ग नाही. आपली संस्कृत भाषा किती संपन्न आहे! तिला अव्हेरून इंग्रजी , फारशी इत्यादी परक्या भाषांमधून शब्द घेणे , म्हणजे घरात असलेली सोन्याची वाटी फेकून देऊन चिनी मातीचे कप हाती घेण्यासारखे नाही का ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि अनेक पर-शब्दांना मराठमोळे प्रतिशब्द सुचवले. हे शब्द किचकट होते, संस्कृतप्रचूर होते आणि समजायला परभाषी शब्दांपेक्षाही कठीण होते अशी टीका काहीजण करतात. पण दिनांक, नगरपालिका, महापालिका, महापौर, हुतात्मा, दूरदर्शन, दूरध्वनी, प्राध्यापक, नेतृत्त्व हे सावकरांनीच शोधलेले, सुचवलेले शब्द आहेत. आज ते सर्रास वापरले जातात. मराठी भाषेचं सौंदर्यही त्यातून जाणवतं.

दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)

असे शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत. असं असलं तरी, परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा शुद्ध असावी, इतकंच त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. मराठी भाषेतलं त्यांचं हे योगदान निश्चितच अतुलनीय आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या भाषाशुद्धीची आजही खरंच गरज आहे.

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६

जागतिक मराठी भाषा दिवस

माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान

आज २७ फेब्रुवारी आपण जागतिक मराठी भाषा दिवस तसेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस साजरा करीत आहोत. मराठी मातृभाषा असणार्या लोकसंख्येनुसार मराठी हि जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी भाषा १५०० वर्षे जुनी आहे. मराठी भाषेस खर्या अर्थाने वैभव प्राप्त झाले ते छ.शिवाजी राजे यांच्या काळात. शिवाजी महाराजांनी हि भाषा आपला राज्यकारभार करताना वापरली . अश्या दैदिप्यमान असलेली भाषेचा गौरव करण्या साठी आपण सदैव आग्रही असले पाहिजे.
कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले त्याचीच आठवण म्हणून त्यांच्या जन्मदिवशी आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो. स्वत:चा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना कुसुमाग्रजांना कधीही मानवली नाही. अनेकांनी त्यांचे वाढदिवस साजरे करण्याचे प्रयत्न केले. पण वाढदिवसाच्या आधी २ दिवस ते अज्ञातवासात निघून जात. परंतु त्यांच्या ८५ व्या वाढदिवशी मात्र त्यांच्या चाहत्यांनी त्यांना प्रेमाची भेट दिलीच.

कुसुमाग्रजांना मुळातच आकाश चांदणे, तारे, तारकांचे वेड होते त्यामुळे अवकाशातील एका तार्‍यालाच त्यांनी कुसुमाग्रजांचे नाव दिले. स्वीडनमधील इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री मार्फत दि.२७ फेब्रुवारी १९९६ रोजी स्वर्गदारातील तारा (स्टार इन द गेट वे ऑफ हेवन्स) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तार्‍याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले. एवढयावरच त्यांचे चाहते थांबले नाहीत तर त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प त्यांनी सोडला. आणि तो सिद्धीसही नेला.

नाशिक ही कवी आणि क्रांतिकारकांची भूमी आहे. अनंत कान्हेरे, वीर सावरकर अशा क्रांतिवीरांचे धगधगते कुंड अशी एके काळी नाशिकची ओळख होती. कुसुमाग्रजांच्या प्रतिभेने या क्रांतीचा ज्वाळांना शब्दांचा अंगार चढवून कवितेला स्वातंत्र्यलढय़ाच्या समरांगणात उतरवले. त्यांची क्रांतीचा जयजयकार’ ही कविता तर स्वातंत्र्य- लढय़ातील सैनिकांचे स्तोत्र बनली होती. अशा या मराठी भाषेच्या वाढीसाठी प्रयत्न करणार्‍या वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी 'जागतिक मराठी भाषा दिवस' साजरा होतो आहे ही एक भाग्याचीच गोष्ट म्हटली पाहिजे.

मराठीचे गुणगौरव करताना कवी सुरेश भट म्हणतत -
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी ,
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी ''
अशी थोरवी आपल्या कवितातून ते मांडतात .
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यानी एवढी साहित्यसंपदा लिहून आपल्याला मराठीबद्द्द्ल प्रेम व जिव्हाळा शिकवून गेले.
तेव्हा आजच्या या पुण्यदिनी ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे "अमृताशीही पैजा जिंकणार्‍या" आपल्या माय मराठीचे कौतुक करुयात आणि तिला दिवसेंदिवस वाढीस लावण्याची मनोमन प्रतिज्ञा  करूया

मासिक  सैनिक  दर्पण  व  आधारवड  परिवार तर्फे समस्त मराठी जनांना 'जागतिक मराठी भाषा दिवसाच्या' हार्दिक शुभेच्छा  !!!
व कुसुमाग्रजांनादेखील  त्यांच्या जन्मदिनी  प्रणाम्
       

सागरा प्राण तळमळला

---सागरा-प्राण-तळमळला---
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥

भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू
तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला ॥
सागरा प्राण तळमळला

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥
सागरा प्राण तळमळला

नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे त्वदविरहाची शपथ घालितो तुजला ॥
सागरा प्राण तळमळला

या फेनमिषें हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते भिनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता रे अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥
सागरा प्राण तळमळला

स्वातंत्र्यवीर


वय ३० वर्षे: शिक्षा, ५० वर्ष जन्मठेपेची काळ्या पाण्याची... कालावधी १९११ ते १९६०, म्हणजे सुटकेचे वय ८० वर्षे फक्त!
आणि हा माणूस कोर्टात म्हणतो: Are you sure that British will rule India upto 1960?
कसं काय माणूस म्हणायचं ह्याला...

तिकडे फ्रांस सरकार हैराण, इंग्रजांनी आपल्या किना-यावरून माणूस पकडून नेला ते प्रकरण निस्तरताना...
सगळ्यांनी "असं कसं झालं? आपल्या जमिनीवरून इंग्रजांनी माणूस नेलाच कसा?" असं विचारून बेजार केलेलं...
फ्रांस सरकारने ते प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात नेलं. तिथल्या निर्णयानुसार सगळ्यांसमोर, इंग्लंडच्या पंतप्रधानांनी, जाहीररीत्या, उभं राहून माफी मागितली.
बरं माफी ठीक आहे, पण प्रकरण पूर्ण मिटवण्यासाठी फ्रांस ने विचार केला, कदाचित हा माणूस, काळ्या पाण्याची शिक्षा झालेला, परत समुद्रात उडी मारेल आणि आपण त्याला वाचवू. म्हणून स्वखर्चाने, आपल्या Defense Ministry मधली एक पाणबुडी, भारतापासून पार अंदमान पर्यंत या कैद्यांच्या बोटीमागून नेली.
पण तसं काही झालं नाही. कैदी अंदमानला पोचले. शिक्षा सुरु झाली.
नारळाच्या काथ्या कुटायच्या, दोर वळायचा. नंतर ८ तास लोखंडाचा "कोलू" फिरवायचा.
हा माणूस, हे सगळं झाल्यावर, संध्याकाळी कैद्यांचे साक्षरता वर्ग घ्यायचा.
नंतर तुरुंगात परत गेल्यावर भिंतींवर कविता लिहून काढायच्या. "मर्मबंधातली ठेव हि" हे नाट्यगीत तुरुंगात सुचले त्यांना. तुरुंगातल्या आठवणी म्हणजे ह्यांच्यासाठी मर्मबंधातली ठेव! काय पण माणूस...
कैद्यांना घरातून मिठाई ऐवजी पुस्तके आणायला सांगितली आणि Library सुरु केली, तुरुंगात.
मुसलमान कैदी हिंदूंना बाटवायचे, तो प्रकार त्यांनी बंद केला. (म्हणून पुढे अंदमानहि पुढे पाकिस्तान व्ह्यायचा वाचला, कदाचित!)
या सगळ्या प्रकारांनी जेलर जाम वैतागला. कोणीही नियमाविरुद्ध वागत नाही म्हणून कारवाईही करता येत नव्हती. मग त्याने एक माणूस बोलावला, डांबर घेऊन. तुरुंगातल्या कविता लिहिलेल्या भिंती डांबराने रंगवून टाकल्या.
आता हा माणूस कविता पुसल्या म्हणून आपल्यावर हात उगारेल आणि मग आपण त्याला ठोकून काढू अश्या आनंदात जेलर होता. तर आमचे कवी, "Thank You" म्हणत Shake-hand करायला पुढे!
"अहो, त्या भिंतीवर लिहिलेल्या कविता पाठ झाल्या होत्या, दुस-या लिहायला जागा शिल्लक नव्हती. तुम्ही भिंती रंगवून भरपूर जागा केली."

असो... तर तिकडे मनासारखं काम झाल्यावर सरकारला पत्र लिहिलं "मी काही राजकारणात पडणार नाही. मला माफ करा. पण इथून सुटका करा."
सरकारने ह्यावर विश्वास ठेवला. कैद्याला भारतात परत आणला, पण स्थानबद्धतेत ठेवलं, रत्नागिरीत!
रत्नागिरीत जातीभेद निर्मुलनासारखी राजकारणाशी (Directly) संबंधित नसलेली, समाजोपयोगी कामं, विरोध पत्करून करून स्थानबद्धतेतून सुटका झाल्यावर सक्रीय राजकारणात पडून सरकारचा विश्वासघात केला.
(जातीभेद कमी करण्यासाठी पतितपावन मंदिर उभारलं, तिथली पहिली पूजा, भंग्याच्या हातून करवली, गाभा-यात जाऊन!)
सरळ-सरळ विश्वासघात.. पर्याय नव्हता, Plan पूर्वीच ठरला होता... माफीपत्र काय उगीच दिलं नव्हतं...

हा माणूस हे सगळं करत असताना त्यांचे कुटुंबीय काय करत होते? लपून होते? शोक करत होते? अजिब्बात नाही...
इंग्लंड मधून स्वयंपाकाच्या सामानाच्या नावाखाली निघालेले बाँब नाशकात आले आणि अचानक, हो अचानकच, त्यांची वाहिनी आणि बायको यांना दिवस गेले, खोटं नाही, नाशिक पोलिसांचा Report आहे तसा.
हं, मग ह्या दोघी delivery साठी सुरत, गुजरात ला निघाल्या... आगगाडीने. गुजरात मध्ये बंगालच्या कोणीतरी दोघी आल्या होत्या. ह्या दोघींनी, त्या दोघींना, आपले दिवस deliver केले आणि नाशकात परत आल्या. नाशिक पोलिसांचा report आहे, बाँब कसे transfer झाले यावरच्या सफाईचा. त्यांनी स्पष्ट म्हटले आहे, "देवकीची मुलं यशोदेकडे जातात". बरं, गरोदर बाईची झडती घ्यायची परवानगी नाही, पोलीस काय करणार...
वाचताना गम्मत वाटेल पण त्या दोघींनी आपापल्या पोटावर, साडीच्या आतून, बाँब बांधून नेले होते, आगगाडीतून, चेष्टा नव्हे!!! आपण फक्त कल्पना करायची...
हे अख्ख कुटुंबच वेगळं होतं.
ह्या कुटुंबाला सरकारने काय दिलं? मोठ्या भावाला २५ वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा दिली, लहान भावाला अटक केली, ह्यांना अटकेचे वॉरंट (ते कान्हेरेनी पिस्तुल वापरलं, हां, ते.). सगळं घर, जमीन, शेती, भांडी सुद्धा जप्त केली. सगळी bank accounts seal केली आणि वर वाहिनी आणि बायको ह्यांना कुणीही घरात घ्यायचे नाही, घेतल्यास घरावरून गाढवाचा नांगर फिरवू, घर पाडू अशी ऑर्डर...
५-६ वर्ष ह्या दोघी, माहेरी, गुरांच्या गोठ्यात राहत होत्या.
हे सरकार भारताविरुद्धच होतं, पण गम्मत ऐकून ठेवा...
आपल्या सरकारने, भारत सरकारने, आजतागायत ती property त्यांच्या वंशजांच्या ताब्यात दिलेली नाही...

त्यांचं नशीबच वेगळं होतं. इंग्रज सरकारने त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देऊन तुरुंगात टाकलं आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा, भारत सरकारने, कोंग्रेस सरकारने, गांधी-वधाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं...
(रत्नागिरीत तुरुंगात ठेवले असताना त्यांना ज्या हातकड्या घातल्या होत्या त्या अक्षरशः आपण उचलूही शकत नाही... )
पुराव्या अभावी निर्दोष सुटले ते, सुटणारच होते. नथुरामला ह्यांनी कटात मदत करण्याची काय गरज होती? तो नथुरामच्या बुद्धीचा अपमान आहे.

तर, स्वातंत्र्यानंतरही, स्वातंत्र्यासाठी लढणा-या, आयुष्य वेचणा-या या मनुष्याला तुरुंगवास भोगावा लागला...
त्यांच्या बलिदानबद्दल मराठी शालेय पुस्तकांत थोड़ी माहिती आहे, इंग्रजी माध्यमांत तर नाहीच.
देशाचं आणि नविन पिढीचं दुर्दैव, दुसरं काय?

अखंड भारत अंगण व्हावे !
राष्ट्र ध्व्जासह निशाण भगवे!
हिंदुत्वा तू अमर करावे !
हेच मागणे आता....
विनायका घे पुनर्जन्म आता !!!!

कुशाग्र बुद्धिमत्ता, इतिहास, राजकारणाचा गाढा अभ्यास-व्यासंग, द्रष्ठेपणा, मुत्सद्दिपणा, तेजस्विता, अचाट असा बौद्दिक व शारीरिक पराक्रम, अजोड असे प्रभावी वक्तृत्व, अभ्यासू संभाषण कुशलता, व्यासंगी लेखकत्व, असीम त्याग, अतुलनीय धैर्य, निष्काम स्थितप्रज्ञता, तत्वचिंतक कर्मयोगी, महाकवी, आत्मविश्वासुवृत्ती यांचा सुरेख संगम म्हणजे तात्याराव विनायक दामोदर सावरकर.
आपल्यातील साहस, देशप्रेम आम्हास आजही प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथी निमित्त सैनिक दर्पण तर्फे विनम्र अभिवादन. व् कोटी कोटी वंदन!!!

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
(२८ मे, इ.स. १८८३:भगूर - २६ फेब्रुवारी, इ.स. १९६६)
हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.

त्यांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, शिक्षक, चित्रपट दिग्दर्शक/निर्माते प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली.

        सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील इ.स. १८९९च्या प्लेगला बळी पडले.

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.

मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.

राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरानी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली . श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.

इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले.

राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली(इ.स. १९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११).मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.

अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्‍नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.

अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्‍न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.

अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६) . हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्‍नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य (१९३०नोव्हें ) जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. स्वकीयांतील जातीयतेवरपण निर्भीड टीका केली.

त्यांनी रत्‍नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले.

जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले
रत्‍नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. इ.स. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.

एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.

सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला.१ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न ,पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.