मंगळवार, २८ जून, २०१६

श्री शिवलीलामृत-अध्याय पहिला


श्री शिवलीलामृत-अध्याय पहिला

श्रीगणेशाय नम: ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीसांबसदाशिवाय नम: ॥

ॐ नमोजी शिवा अपरिमिता ॥ आदि अनादि मायातीता ॥ पूर्णब्रह्मानंदशाश्वता ॥ हेरंबताता जगद्गुरो ॥१॥

ज्योतिर्मयस्वरुपा पुराणपुरुषा ॥ अनादिसिध्दा आनंदवनविलासा ॥ मायाचक्रचाळका अविनाशा ॥ अनंतवेषा जगत्पते ॥२॥

जय जय विरूपाक्षा पंचवदना ॥ कर्माध्यक्षा शुध्द्चैतन्या ॥ विश्वंभरा कर्ममोचकगहना ॥ मनोजदहना मनमोहन जो ॥३॥

भक्तवल्लभ तूं हिमनगजामात ॥ भाललोचन नीलग्रीव उमानाथ ॥ मस्तकीं स्वर्धुनी विराजित ॥ जातिसुमनहारवत जी ॥४॥

पक्षिरथप्रिय त्रिपुरांतक ॥ यक्षपतिमित्र प्रतापार्क ॥ दक्षमखविध्वंसक मृगांक ॥ निष्कलंक तव मस्तकीं ॥५॥

विशाळ भाळ कर्पूरगौर ॥ काकोलभक्षक निजभक्तरक्षणा ॥ विश्वासाक्षी भस्मलेपन ॥ भयमोचन भवहारक जो ॥६॥

जो सर्गस्थित्यंतकारण ॥ त्रिशूलपाणी शार्दुलचर्मवसन ॥ स्कंदतात सुहास्यवदन ॥ मायाविपिनदहन जो ॥७॥

जो सच्चिदानंद निर्मळ॥ शिव शांत ज्ञानघन अचळ ॥ जो भानुकोटितेज अढळ ॥ सर्वकाळ व्यापक जो ॥८॥

सकलकलिमलदहन कल्मषमोचन ॥ अनंतब्रह्मांडनायक जगरक्षण ॥ पद्मजतातमनरंजन ॥ जननमरणनाशक जो ॥९॥

कमलोद्भव कमलावर ॥ दशशतमुख दशशतकर ॥ दशशतनेत्र सुर भूसुर ॥ अहोरात्र ध्याती जया ॥१०॥

भव भवांतक भवानीवर ॥ स्मशानवासी गिरां अगोचर ॥ जो स्वर्धुनीतीरविहार ॥ विश्वेश्वर काशीराज जो ॥११॥

व्योमहरण व्यालभूषण ॥ जो गजदमन अंधकमर्दन ॥ ॐकारमहाबलेश्वर आनंदघन ॥ मदगर्वभंजन अज अजित जो ॥१२॥

अमितगर्भ निगमागमनुत ॥ जो दिगंबर अवयवरहित ॥ उज्जयिनी महाकाळ कालातीत ॥ स्मरणे कृतांतभय नाशी ॥१३॥

दुरितकाननवैश्वानर ॥ जो निजजनचित्तचकोर चंद्र ॥ वेणुपवरमहत्पापहर ॥ घुष्णेश्वर सनातन जो ॥१४॥

जो उमाहृदयपंजकीर ॥ जो निजजनहृदयाब्जभ्रमर ॥ तो सोमनाथ शशिशेखर ॥ सौराष्ट्रदेशविहारी जो ॥१५॥

कैरवलोचन करुणासमुद्र ॥ रुद्राक्षभूषण रुद्रावतार ॥ भीम भयानक भीमाशंकर ॥ तपा पार नाहीं ज्याच्या ॥१६॥

नागदमन नागभूषण ॥ नागेंद्रकुंडल नागचर्मपरिधान ॥ ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण ॥ नागाननजनक जो ॥१७॥

वृत्ररिशत्रुजनकवरदायक ॥ बाणवल्लभ पंचबाणांतक ॥ भवरोगवैद्य त्रिपुरहारक ॥ वैजनाथ अत्यद्भुत जो ॥१८॥

त्रिनयन त्रिगुणातीत ॥ त्रितापशमन त्रिविधभेदरहित ॥ त्र्यंबकराज त्रिदोषानलशांत ॥ करूणाकर बलाहक जो ॥१९॥

कामसिंधुरविदारककंठीरव ॥ जगदानंदकंद कृपार्णव ॥ हिमनगवासी हैमवतीधव ॥ हिमकेदार अभिनव जो ॥२०॥

पंचमुकुट मायामलहरण ॥ निशिदिन गाती आम्नाय गुण ॥ नाहीं जया आदि मध्य अवसान ॥ मल्लिकार्जुन श्रीशैलवास ॥२१॥

जो शक्रारिजनकांतकप्रियकर ॥ भूजासंतापहरण जोडोनि कर ॥ जेथे तिष्ठत अहोरात्र ॥ रामेश्वर जगद्गुरु ॥२२॥

ऐसिया शिवा सर्वोत्तमा ॥ अज अजित ब्रह्मानंदधामा ॥ तुझा वर्णावया महिमा ॥ निगमागमां अतर्क्य ॥२३॥

ब्रह्मानंद म्हणे श्रीधर ॥ तव गुणार्णव अगाध थोर ॥ तेथें बुध्दि चित्त तर्क पोहणार ॥ न पावती पार तत्वतां ॥२४॥

कनकाद्रिसहित मेदिनीचें वजन ॥ करावया ताजवा आणूं कोठून ॥ व्योम सांठवे संपूर्ण ॥ ऐसें सांठवण कोठून आणूं ॥२५॥

मेदिनीवसनाचें जळ आणि सिकता ॥ कोणत्या मार्पे मोजूं आतां ॥ प्रकाशावया आदित्या ॥ दीप सरता केवीं होय ॥२६॥

धरित्रीचें करूनि पत्र ॥ कुधर कज्जल जलधि मषीपात्र ॥ सुरद्रुम लेखणी विचित्र ॥ करूनि लिहीत कंजकन्या ॥२७॥

तेही तेथें राहिली तटस्थ ॥ तरी आतां केवीं करूं ग्रंथ ॥ जरी तूं मनीं धरिसी यथार्थ ॥ तरी काय एक न होय ॥२८॥

द्वितीयेचा किशोर इंदु ॥ त्यासी जीर्णदशी वाहती दीनबंधु ॥ तैसे तुझे गुण करुणासिंधु ॥ वर्णीतसें अल्पमती ॥२९॥

सत्यवतीहृदयरत्नमराळ ॥ भेदीत गेला तव गुणनिराळ ॥ अंत नकळेचि समूळ ॥ तोही तटस्थ राहिला ॥३०॥

तेथें मी मंदमति किंकर ॥ केवीं क्रमूं शकें महीमांबर ॥ पर आत्मसार्थक करावया साचार ॥ तव गुणार्णवीं मीन झालों ॥३१॥

ऐसे शब्द ऐकतां साचार ॥ तोषला दाक्षायणीवर ॥ म्हणे शिवलिलामृत ग्रंथ परिकर ॥ आरंभी रस भरीन मी ॥३२॥

जैसा घरूनि शिशूचा हात ॥ अक्षरें लिहवी पंडित ॥ तैसे तव मुखें मम गुण समस्त ॥ सुरस अत्यंत बोलवीन मी ॥ ३३॥

श्रोतीं व्हावें सावधचित्त ॥ स्कंद्पुराणीं बोलिला श्रीशुकतात ॥ अगाध शिवलीलामृत ग्रंथ ॥ ब्रह्मोत्तरखंड जें ॥३४॥

नैमिषारण्यीं शौनकादिक सुमती ॥ सूताप्रति प्रश्न करिती ॥ तूं चिदाकाशींचा रोहिणीपति ॥ करीं तृप्ति श्रवणचकोरां ॥३५॥

तुवां बहुत पुराणें सुरस ॥ श्रीविष्णुलीला वर्णिल्या विशेष ॥ अगाध महिमा आसपास ॥ दशावतार वर्णिले ॥३६॥

भारत रामायण भागवत ॥ ऐकतां श्रवण झाले तृप्त ॥ परी शिवलीलामृत अद्भुत ॥ श्रवणद्वारें प्राशन करूं ॥३७॥

यावरी वेदव्यासशिष्य सूत ॥ म्हणे ऐका आतां देऊनि चित्त ॥ शिवचरित्र परमाद्भुत ॥ श्रवणें पातकपर्वत जळती ॥३८॥

आयुरारोग्य ऐश्वर्य अपार ॥ संतति संपत्ति ज्ञानविचार ॥ श्रवणमात्रें देणार ॥ श्रीशंकर निजांगे ॥३९॥

सकळ तीर्थव्रतांचे फळ ॥ महामखांचे श्रेय केवळ ॥ देणार शिवचरित्र निर्मळ ॥ श्रवणें कलिमल नासती ॥४०॥

सकल यज्ञामाजी जपयज्ञ थोर ॥ म्हणाल जपावा कोणता मंत्र ॥ तरी मंत्रराज शिवषडक्षर ॥ बीजसहित जपावा ॥४१॥

दुजा मंत्र शिवपंचाक्षर ॥ दोहींचे फळ एकचि साचार ॥ उतरती संसारार्णवपार ॥ ब्रह्मादिसुरऋषी हाचि जपती ॥४२॥

दारिद्र दु:ख भय शोक ॥ काम क्रोध द्वंद्व पातक ॥ इतुक्यांसही संहारक ॥ शिवतारक मंत्र जो ॥४३॥

तुष्टीपुष्टीधृतिकारण ॥ मुनिनिर्जरांसी हाचि कल्याण ॥ कर्ता मंत्रराज संपुर्ण ॥ अगाध महिमा न वर्णवे ॥४४॥

नवग्रहांत वासरमणि थोर ॥ तैसा मंत्रात शिवपंचाक्षर ॥ कमलोद्भव कमलावर ॥ अहोरात्र हाचि जपती ॥४५॥

शास्त्रांमाजी वेदांत ॥ तीर्थामाजी प्रयाग अद्भुत ॥ महास्मशान क्षेत्रांत ॥ मंत्रराज तैसा हा ॥४६॥

शास्त्रांमाजी पाशुपत ॥ देवांमाजी कैलासनाथ ॥ कनकादे जैसा पर्वतांत ॥ मंत्र पंचाक्षरी तेवीं हा ॥४७॥

केवळ परमतत्व चिन्मात्र ॥ परब्रह्म हेंचि तारक मंत्र ॥ तीर्थव्रतांचे संभार ॥ ओवाळूनि टाकावे ॥४८॥

हा मंत्र आत्म प्राप्ताची खाणी ॥ कैवल्यमार्गीचा प्रकाशतरणी ॥ अविद्याकाननदाहक ब्रह्माग्नी ॥ सनकादिक ज्ञानि हाचि जपती ॥४९॥

स्त्री शूद्र आदिकरूनी ॥ हाचि जप मुख्य चहूं वर्णी ॥ गृहस्थ ब्रह्मचारी आदिकरूनी ॥ दिवसरजनीं जपावा ॥५०॥

जाग्रुतीं स्वप्नी येतां जातां ॥ उभें असतां निद्रा करितां ॥ कार्या जातां बोलतां भांडता ॥ सर्वदाही जपावा ॥५१॥

शिवमंत्रध्वनिपंचानन ॥ कर्णी आकर्णितां दोषावारण ॥ उभेचि सांडती प्राण ॥ न लागतां क्षण भस्म होती ॥५२॥

न्यास मातृकाविधि आसन ॥ न लागे जपावा प्रीतीकरून ॥ शिव शिव उच्चारितां पूर्ण ॥ शंकर येऊनि पुढें उभा ॥५३॥

अखंड जपती जे हा मंत्र ॥ त्यांसी निजांगे रक्षी त्रिनेत्र ॥ आपुल्या अंगाची साउली करी पंचचक्र ॥ अहोरात्र रक्षी तयां ॥५४॥

मंत्र जपकांलागुनी ॥ शिव म्हणे मी तुमचा ऋणी ॥ परी तो मंत्र गुरुमुखेंकरूनी ॥ घेइंजे आधीं विधीने ॥५५॥

गुरु करावा मुख्यवर्ण ॥ भक्तिवैराग्यदिव्यज्ञान ॥ सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण ॥ या चिन्हेकरून मंडित जो ॥५६॥

मितभाषणी शांत दांत ॥ अंगी अमानित्व अदंभित्व ॥ अहिंसक अतिविरिक्त ॥ तोचि गुरु करावा ॥५७॥

वर्णानां ब्राह्मणो गुरु: ॥ हीं वेदवचनें निर्धारु ॥ हा त्यापासोनि मंत्रोच्चारु ॥ करूनि घ्यावा प्रीतीनें ॥५८॥

जरी आपणासी ठाउका मंत्र ॥ तरी गुरुमुखें घ्यावा निर्धार ॥ उगाचि जपे तो अविचार ॥ तरी निष्फळ जाणिजे ॥५९॥

कामक्रोधमदयुक्त ॥ जे कां प्राणी गुरुविरहित ॥ त्यानी ज्ञान कथिलें बहुत ॥ परी त्यांचे मुख न पहावें ॥६०॥

वेदशास्त्रं शोधून ॥ जरी झालें अपरोक्षज्ञान ॥ करी संतांशीं चर्चा पूर्ण ॥ तरी गुरुविण तरेना ॥६१॥

एक म्हणती स्वप्नी आम्हांते ॥ मंत्र सांगितला भगवंतें ॥ आदरें सांगे लोकांते ॥ परी तो गुरूविण तरेना ॥६२॥

प्रत्यक्ष येऊनियां देव सांगितला जरी गुह्यभाव ॥ तरी तो न तरेचि स्वयमेव ॥ गुरूसी शरण न रिघतां ॥६३॥

मौजीबंधनाविण गायत्रीमंत्र ॥ जपे तो भ्रष्ट अपवित्र ॥ वराविण वर्‍हाडी समग्र ॥ काय व्यर्थ मिळोनी ॥६४॥

तो वाचक झाला बहुवस ॥ परी त्याचे न चुकती गर्भवास ॥ म्हणोनि सांप्रदाययुक्त गुरूस ॥ शरण जावें निर्धारे ॥६५॥

जरी गुरु केला भलता एक ॥ परी पूर्वसंप्रदाय नसे ठाऊक ॥ जैसे गर्भांधासी सम्यम ॥ वर्णव्यक्त स्वरूप न कळेचि ॥६६॥

असो त्या मंत्राचे पुरश्चरण ॥ उत्तम क्षेत्री करावें पूर्ण ॥ काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य ॥ गोकर्णक्षेत्र आदिकरुनि ॥६७॥

शिवविष्णुक्षेत्र सुगम ॥ पवित्र स्थळीं जपावा सप्रेम ॥ तरी येचिविषयीं पुरातन उत्तम ॥ कथा सांगेन ते ऐका ॥६८॥

श्रवणी पठणीं निजध्यास ॥ आदरें धरावा दिवसेंदिवस ॥ आनुमोदन देता कथेस ॥ सर्व पापास क्षय होय ॥६९॥

श्रवण मनन निजध्यास ॥ धरितां साक्षात्कार होय सरस ॥ ब्रह्मघ्न मार्गघ्न तामस ॥ पावन सर्व होती ॥७०॥

तरी मथुरानाम नगर ॥ यादवंशी परमपवित्र ॥ दाशार्हनामें राजेंद्र ॥ अति उदार सुलक्षणी ॥७१॥

सर्व राजे देती करभार ॥ कर जोडोनि नमिती वारंवार ॥ त्यांच्या मुगुटरत्नाकिरणें साचार ॥ प्रपदें ज्याचीं उजळलीं ॥७२॥

मुगुटघर्षणेंकरूनी ॥ किरणें पडलीं दिसती चरणीं ॥ जेणें सत्तावसन पसरूनी ॥ पालाणिली कुंभिनी हे ॥७३॥

उभारिला यशोध्वज ॥ जेवीं शरत्काळींचा द्विजराज ॥ सकल प्रजा आणि द्विज ॥ चिंतिती कल्याण जयाचें ॥७४॥

जैसा शुध्दद्वितीयेचा हिमांश ॥ तेवीं ऐश्वर्य चढे विशेष ॥ जो दुर्बुध्दि दासीस ॥ स्पर्श न करी कालत्रयीं ॥७५॥

सब्दुध्दिधर्मपत्नीसीं रत ॥ स्वरूपाशीं तुळिजे रमानाथ ॥ दानशस्त्रें समस्त ॥ याचकांचे दारिद्र्य निवटिलें ॥७६॥

भृभुजांवरी जामदग्न्य ॥ समरांगणी जेवीं प्रळयाग्न ॥ ठाण न चळे रणींहून ॥ कुठारघायें भूरुह जैसा ॥७७॥

चतुर्दश विद्या चौसष्टी कळा ॥ आकळी जेवीं करतळींचा आंवळा ॥ जेणें दानमेघें निवटिला ॥ दारिद्यधुरोळा याचकांचा ॥७८॥

बोलणें अति मधुर ॥ मेघ गजें जेवीं गंभीर ॥ प्रजाजनांचे चित्तमयूर ॥ नृत्य करिती स्वानंदे ॥७९॥

ज्याचा सेमासिंधु देखोनि अद्भुत ॥ जलसिंधु होय भयभीत ॥ निश्चळ अंबारींचा ध्रुव सत्य ॥ वचन तेवीं न चळेचि ॥८०॥

त्याची कांता रूपवती सती ॥ काशीराजकुमारी नाम कलावती ॥ जिचें स्वरूप वर्णी सरस्वती ॥ विश्ववदनेंकरूनियां ॥८१॥

जे लावण्यसागरींची लहरी ॥ खंजनाक्षी बिंबाधरी ॥ मृदुभाषिणी पिकस्वरी ॥ हंसगमना हरिमध्या ॥८२॥

शशिवदना भुजंगवेणी ॥ अलंकारां शोभा जिची तनु आणी ॥ दशन झळकती जेवीं हिरेखाणी ॥ बोलतां सदनी प्रकाश पडें ॥८३॥

सकलकलानिपुण ॥ यालागी कलावती नाम पूर्ण ॥ जें सौदर्यवैरागरींचे रत्न ॥ जे निधान चातुर्यभूमीचें ॥८४॥

आंगीचा सुवास न माये सदनांत ॥ जिचें मुखाब्ज देखतां नृपनाथ ॥ नेत्रमिलिंद रुंजी घालीत ॥ धणी पाहतां न पुरेचि ॥८५॥

नूतन आणिली पर्णून ॥ मनसिजें आकर्षिले रायाचें मन ॥ बोलावूं पाठविलें प्रीतीकरून ॥ परी ते न येचि प्रार्थितां ॥८६॥

स्वरूपश्रुंगारजाळें पसरून ॥ आकर्षिला नुपमानसमीन ॥ यालागीं दशार्हराजा उठोन ॥ आपणचि गेला तिजपाशीं ॥८७॥

म्हणे श्रुंगारवल्ली शुभांगी ॥ मम तनुवृक्षासी आलिंगीं ॥ उत्तम पुत्रफळ प्रसवसी जगीं ॥ अत्यानंदे सर्वांदेखतां ॥८८॥

तंव ते श्रुंगारसरोवरमराळीं ॥बोले सुहास्यवदना वेल्हाळी ॥ म्हणे म्यां उपासिला शशिमौळी ॥ सर्वकाळ व्रतस्थ असें ॥८९॥

जे स्री रोगिष्ट अत्यंत ॥ गर्भिणी किंवा ऋतुस्नात ॥ अभुक्त अथवा व्रतस्थ ॥ वृध्द अशक्त न भोगावी ॥९०॥

स्त्रीपुरूषें हर्षयुक्तं ॥ असावीं तरुण रूपवंत ॥ अष्टभोगेंकरूनि युक्त ॥ चिंताग्रस्त नसावीं ॥९१॥

पर्वकाळ व्रतदिन निरसून ॥ उत्तमकाळी षड्रस अन्न भक्षून ॥ मग ललना भोगावी प्रीतीकरून ॥ राजलक्षण सत्य हे ॥९२॥

राव काममदें मत्त प्रचंड ॥ रतिभरें पसरोनि दोर्दंड ॥ अलिंगन देतां बळें प्रचंड ॥ शरीर त्याचे पोळले ॥९३॥

लोहार्गला तप्त अत्यंत ॥ तैसी कलावतीची तनू पोळत ॥ नृप वेगळा होऊनि पुसत ॥ कैसा वृत्तांत सांग हा ॥९४॥

श्रृंगरसदनाविलासिनी ॥ मम हृदयानंदवर्धिनी ॥ सकळ संशय टाकुनी ॥ मुळींहूनी गोष्टी सांग ॥९५॥

म्हणे हे राजचक्रमुकुटावतंस ॥ क्रोधें भरों नेदीं मानस ॥ माझा गुरु स्वामी दुर्वास ॥ अनसुयात्मज महाराज ॥९६॥

त्या गुरुने परम पवित्र ॥ मज दीधला शिवपंचाक्षरी मंत्र ॥ तो जपतां अहोरात्र ॥ परमपावन पुनीत मी ॥९७॥

ममांग शीतळ अत्यंत ॥ तव कलेवर पापसंयुक्त ॥ अगम्यागमन केलें विचाररहित ॥ अभक्ष्य तितुकें भक्षिलें ॥९८॥

मज श्रीगुरुदयेंकरून ॥ राजेंद्रा आहें त्रिकाळज्ञान ॥ तुज जप तप शिवार्चन ॥ घडलें नाहीं सर्वथा ॥९९॥

घडलें नाहीं गुरुसेवन ॥ पुढें राज्यांतीं नरक दारूण ॥ ऐकतां राव अनुतापेंकरून ॥ सद्गदित जाहला ॥१००॥

म्हणे कलावती गुणगंभीरे ॥ तो शिवमंत्र मज देई आदरें ॥ ज्याचेनि जपें सर्वत्रं ॥ महत्पापें भस्म होती ॥१॥

ती म्हणे हे भृभुजेंद्र ॥ मज सांगावया नाहीं अधिकार ॥ मी वल्लभा तूं प्राणेश्वर ॥ गुरु निर्धार तूं माझा ॥२॥

तरी यादवकुळीं गुरु वसिष्ठ ॥ गर्गमुनि महाजाज श्रेष्ठ ॥ जो ज्ञानियांमाजी दिव्यमुकुट ॥ विद्या वरिष्ठ तयाची ॥३॥

जैसे वरिष्ठ वामदेव ज्ञानी ॥ तैसाच महाराज गर्गमुनी ॥ त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी ॥ शिवदीक्षा घेइंजे ॥४॥

मग कलावतीसहित भूपाळ ॥ गर्गाश्रमीं पातला तत्काळ ॥ साष्टांग नमूनि करकमळ ॥ जोडूनि उभा ठाकला ॥५॥

अष्टभावें दाटूनि हृदयीं ॥ म्हणे शिवदीक्षा मज देई ॥ म्हणूनि पुढती लागे पायीं ॥ मिती नाही भावार्था ॥६॥

यावरी तो गर्गमुनी ॥ कृतांतभगिनीतीरा येऊनी ॥ पुण्यवृक्षातळी बैसोनी ॥ स्नान करवी यमुनेचें ॥७॥

उभयतांनी करूनि स्नान ॥ यथासांग केलें शिवपूजन ॥ यावरी दिव्य रत्नें आणून ॥ अभिषेक केला गुरूसी ॥८॥

दिव्याभरणें दिव्य वस्त्रें ॥ गुरु पुजिला नृपे आदरें ॥ गुरुदक्षिणेसी भांडारे ॥ दाशार्हरायें समर्पिली ॥९॥

तनुमनधनेंसी उदार ॥ गर्गचरणीं लागे नृपवर ॥ असोनि गुरूसी वंचिती जे पामर ॥ ते दारुण निरय भोगिती ॥११०॥

श्रीगुरुचे घरीं आपदा ॥ आपण भोगी सर्व संपदा ॥ कैचें ज्ञान त्या मतिमंदा ॥ गुरुब्रह्मानंदा न भजे जो ॥११॥

एक म्हणती तनुमनधन ॥ नाशिवंत गुरुसी काय अर्पून ॥ परम चांडाळ त्याचें शठज्ञान ॥ कदा वदन न पाहावें ॥१२॥

धिक्‌ विद्या धिक्‌ ज्ञान ॥ धिक्‌ वैराग्यसाधन ॥ चतुर्वेद शास्त्रें आला पढून ॥ धिक्‌ पठण तयाचें ॥१३॥

जैसा खरपृष्ठईवरी चंदन ॥ षड्रसीं दर्वी व्यर्थ फिरून ॥ जेवीं मापें तंदुल मोजून ॥ इकडून तिकडे तिकडे टाकिती ॥१४॥

घाणा इक्षुरस गाळी ॥ इतर सेविती रसनव्हाळी ॥ कीं पात्रांत शर्करा सांठविली ॥ परी गोडी न कळे तया ॥१५॥

असो ते अभाविक खळ ॥ तैसा नव्हे तो दाशार्हनृपाळ ॥ षोडशोपचारें निर्मळ ॥ पूजन केलें गुरूचें ॥१६॥

उभा ठाकला कर जोडून ॥ मग तो गर्गे हृदयी धरून ॥ मस्तकीं हस्त ठेवून ॥ शिवषडक्षर मंत्र सांगे ॥१७॥

हृदयाआकाशभुवनीं ॥ उगवला निजबोधतरणी ॥ अज्ञानतम तेच क्षणी ॥ निरसूनि नवल जाहलें ॥१८॥

अद्भुत मंत्राचें महिमान ॥ रायाचिया शरीरामधून ॥ कोट्यवधि काक निघोन ॥ पळते झाले तेधवां ॥१९॥

किती एकांचे पक्ष जळाले ॥ चरफडितचि बाहेर आले ॥ अवघेचि भस्म होऊनि गेले ॥ संख्या नाहीं तयांते ॥१२०॥

जैसा किंचित्‌ पडतां कृशान ॥ दग्ध होय कंटकवन ॥ तैसे काक गेले जळोन ॥ देखोनि राव नवल करी ॥२१॥

गुरूसी नमूनि पुसे नृप ॥ काक कैंचे निघाले अमूप ॥ माझें झालें दिव्य रूप ॥ निर्जराहूनि आगळं ॥२२॥

गुरु म्हणे ऐक साक्षेपें ॥ अनंत जन्मींची महापापे ॥ बाहेर निघालीं काकारूपें ॥ शिवमंत्रप्रतापे भस्म झाली ॥२३॥

निष्पाप झाला नृपवर ॥ गुरुस्तवन करी वारंवार ॥ धन्य पंचाक्षरी मंत्र ॥ तूं धन्य गुरु पंचाक्षरी ॥२४॥

पंचभुतांची झाडणी करून ॥ सावध केलें मजलागून ॥ चारी देह निरसून ॥ केले पावन गुरुराया ॥२५॥

पंचवीस तत्वांचा मेळ ॥ त्यांत सांपडलों बहुत काळ ॥ क्रोध महिषासुर सबळ ॥ कामवेताळ धुसधुसी ॥२६॥

आशा मनशा तृष्णा कल्पना ॥ भ्रांति भुली इच्छा वासना ॥ या जखिणी यक्षिणी नाना ॥ विटंबीत मज होत्या ॥२७॥

ऐसा हा अवघा मायामेळ ॥ तुवां निरसला तात्काळ ॥ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ ॥ गुरु दयाळ धन्य तूं ॥२८॥

सहस्त्रजन्मपर्यंत ॥ मज ज्ञान झालें समस्त ॥ पापें जळाली असंख्यात ॥ काकरूपे देखिलीं म्यां ॥२९॥

सुवर्णस्तेय अभक्ष्यभक्षक ॥ सुरापान गुरूतल्पक ॥ परदारागमन गुरुनिंदक ॥ ऐसीं नाना महत्पापें ॥१३०॥

गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक ॥ स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक ॥ परनिंदा पशुहिंसक ॥ वृत्तिहारक अगम्यस्त्रीगमन ॥३१॥

मित्रद्रोही गुरुद्रोही ॥ विश्वदोही वेदद्रोही ॥ प्रासादभेद लिंगभेद पाहीं ॥ पंक्तिभेद हरिहरभेद ॥३२॥

ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षिघातक ॥ पाखांडमति मिथ्यावादक ॥ भेदबुध्दि भ्रष्टमार्गस्थापक ॥ स्त्रीलंपटदुराचारी ॥३३॥

कृतघ्न परद्रव्यापहारक ॥ कर्मभ्रष्ट तीर्थमहिमाउच्छेदक ॥ बकध्यानी गुरुछळक ॥ मातृहतक पितृहत्या ॥३४॥

दुर्बलघातुक कर्ममार्गघ्न ॥ दीनहत्यारी पाहती पैशून्य ॥ तृणदाहक पीडिती सज्जन ॥ गोत्रवध भगिनीवध ॥३५॥

कन्या विक्रय गोविक्रय ॥ हयविक्रय रसविक्रय ॥ ग्रामदाहक आत्महत्या पाहें ॥ भ्रूणहत्य महापापें ॥३६॥

हीं महापापें सांगितलीं क्षुद्रपापें नाहीं गणिलीं ॥ इतुकीं काकरूपें निघालीं ॥ भस्म झालीं प्रत्यक्ष ॥३७॥

कांही गांठी पुण्य होतें परम ॥ म्हणोनि नरदेह पावलों उत्तम ॥ गुरुप्रतापें तरलों नि:सीम ॥ काय महिमा बोलू आतां ॥३८॥

गुरुस्तवन करूनि अपार ॥ ग्रामासी आला दाशार्ह नृपवर ॥ सवें कलावती परमचतुर ॥ केला उध्दार रायाचा ॥३९॥

जपतां शिवमंत्र निर्मळ ॥ राज्य वर्धमान झालें सकळ ॥ अवर्षणदोष दुष्काळ ॥ देशांतूनि पळाले ॥१४०॥ 

वैधव्य आणि रोग मृत्य ॥ नाहींच कोठें देशांत ॥ अलिंगितां कलावतीसी नृपनाथ ॥ शशीऐसी शीतल वाटे ॥४१॥

शिव भजनीं लाविले सकळ जन ॥ घरोघरीं होत शिवकीर्तन ॥ रुद्राभिषेक शिवपूजन ॥ ब्राह्मणभोजन यथाविधि ॥४२॥

दाशार्हरायाचें आख्यान ॥ जे लिहिती ऐकती करिती पठण ॥ प्रीतीकरूनि ग्रंथरक्षण ॥ अनुमोदन देती जे ॥४३॥

सुफळ त्यांचा संसार ॥ त्यांसी निजांगे रक्षी श्रीशंकर ॥ धन्य धन्य तेचि नर ॥ शिवमहिमा वर्णिती जे ॥४४॥

पुढें कथा सुरस सार ॥ अमृअताहूनि रसिक फार ॥ ऐकोत पंडित चतुर ॥ गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे ॥४५॥

पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी ॥ श्रीधरमुख निमित्त करूनी ॥ तोचि बोलवीत विचारोनी ॥ पहावें मनीं निर्धारें ॥४६॥

श्रीधरवरद पांडुरंग ॥ तेणें शिरी धरिलें शिवलिंग ॥ पूर्णब्रह्मानंद अभंग ॥ नव्हे विरंग कालत्रयी ॥४७॥ 

शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ प्रथमोध्याय गोड हा ॥१४८॥

इतिश्री प्रथमोध्याय: समाप्त: ॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा