नाती जपून ठेवा स्वार्थ खूप झाला ,थोडी प्रीत पेरा गोफ सैल झाला.
मित्रांनो , माणूस हा समाजशील प्राणी आहे . समाजाशिवाय त्याचे अस्तित्व शून्य आहे . फुलण्यासाठी रोपांना जशी मातीची तशी माणसाला समाजाची गरज असते . अनेक पाकळ्या जेव्हा एकसंघ फुलतात तेव्हा एक सुंदर फूल उमलतं . पण त्यातल्या काही पाकळ्या मिटल्या , कोमेजल्या वा गळून पडल्या तर फूल सौंदर्यविहीन , मूल्यहीन होतं . त्याचा जगण्याचा अर्थही संपतो . आपल्या जीवनाचं पुष्पही असंच नात्याच्या पाकळ्यांनी बहरत असतं . त्याची प्रत्येक पाकळी अनमोल असते .
मी पाहिलेली , अनुभवलेली नात्यांची विलोभनीय उत्कटता शब्दांच्या कँमेरातून टिपण्याचा इथं प्रयत्न करतो आहे .
      ||   आई- वडील  ||
सार्वकालीन  सर्वश्रेष्ठ मानवी नातं 
पंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं 
आपल्या घराची जीवित दैवतं
तीर्थाचे  सागर , स्नेहाचे आगर 
आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती 
आपण जन्माला येण्याआधीच आपल्यावर प्रेमसिंचन करणारे स्नेह - निर्झर 
    || गुरुजन ||
आपल्या भविष्याचे शिल्पकार 
आपल्या जीवनाचा प्रकाश 
अज्ञान दूर करणारे वासरमणी 
मानवतेचे महादूत
    || आजी - आजोबा || 
आपले जीवन फुलविणारे माळी 
आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ 
सदैव आपली बाजू घेणारे व आपल्याच बाजुने न्याय देणारे प्रेमळ न्यायाधीश 
स्वतःचे रुप आपल्यात पाहणाऱ्या वात्सल्यमूर्ती 
  || सासू - सासरे ||
आपल्याला जन्म न देणारे आईवडील 
पदोपदी जन्मदांची अनुभूती देणाऱ्या स्नेहमूर्ती 
आपल्या आईवडिलांचे प्रतिरुप 
    || काका - मावशी ||
आईवडिलांची उणीव भरुन काढणाऱ्या  सागर - सरिता 
विशुध्द भावाचे चिंतामणी 
     || आत्या - मामा || 
वडिलकीच्या नात्याची ओळख करुन देणाऱ्या सौजन्यमूर्ती 
      || मामा ||
मानवी जीवनाचं एक मनोरम नातं 
जेव्हा दोन मा ( आई ) एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो 
मा + मा = मामा 
आपल्या विवाहाचा विधीवत साक्षीदार 
     || मामी ||
आपल्या मान सन्मानाची आरंभकर्ती 
शैशव अवस्थेत आपली शुश्रुषा करणारी सेवाव्रती 
     || दाजी ||
आपल्या आदर भावाचं शिखर 
आपले आदर्श , आपले जीवन दर्शक
     || बहिण ||
आईची पडछाया , उत्सवप्रिया सणसूचिका 
मायेचा सुगंध पालवणारी स्नेह लतिका 
कुठल्याही परिस्थितीत आपल्या हिताचा विचार करणारी हितचिंतिका 
     || भाऊ ||
आपल्या हिमतीच्या धमन्या 
आपली शक्ती सुरक्षा यांची नैसर्गिक आवरणं 
आपल्या सामर्थ्याची कवच कुंडलं 
आपल्या आवाजातील निनाद 
    ||  साडू ||
एकाच आईचं दूध प्यायलो नसलो तरी शाश्वत बंधुता निर्माण करणारं अनोखं नातं 
इस्टेटीत वाटा न मागणारा भाऊ 
     || साली / मेहुणी ||
आपले जीवन खेळकर करणारी स्नेह सरिता 
आपले सासरचे वास्तव्य रमणीय करणारी हर्षवर्धिनी 
    || मावस भाऊ बहीण ||
बहीण भावाच्या नात्यातील प्रीतिचा बोनस 
बहीण भावाची उणीव भरुन काढणारे समर्थ पर्याय 
     || मेव्हण भाऊ बहीण ||
नात्यात खेळकरपणा पेरणाऱ्या तिफणी 
थट्टा मस्करीतून प्रीतीचा आविष्कार करणारे जीवलग 
      || भाचे भाची ||
संस्कृतीचे भान देणारे प्रीतीचे ताटवे 
आपल्या दातृत्वाची शोभा वाढविणारी कोंदणं 
     || पुत्र ||
भविष्याचा प्रकाश 
अस्तित्वाचा अर्थ 
वंशाचा कुलदीपक 
कुटुंबाचा उध्दारक 
म्हातारपणीची काठी 
      || पुत्री || 
पहाटेचं दव , वात्सल्याचं विरजण 
मायेत खोट नसणारी स्नेहनंदिनी 
पवित्र प्रीतीची सह्रदयी झुळूक
मायेला वाळवी लागत नाही अशी वात्सल्यरुपा 
जिची माया शिळी होत नाही अशी अक्षय प्रेमज्योती 
    || नातवंडे ||
दुधावरली साय 
आयुष्याच्या उतारावरील रमणीय बगिचा 
अखेरपर्यंत जीवनाची गोडी टिकवून ठेवणारे मधुघट
   || मित्र मैत्री || 
ईश्वरी वरदान 
रक्ताच्या नात्यालाही लाजवणारं चिरंतन नातं 
विश्वासाची आधारशीला 
स्वतःचेच प्रतिरुप 
   || शेजार धर्म ||
मानवी मूल्यांचा ओझोन 
संस्कृतीचा संधीप्रकाश 
आपल्या सौख्याचा आलेख टिपणारी स्पंदन
    || शिष्य ||
आपल्या कर्तृत्वाचा कळस
आपल्या कौशल्याची किरणं
खरंच , नातं न जोपासणारा माणूस जणू पिसारा गमावलेला मोरच ! नाही का ?
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा