15 जून 2016.... ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे वयाची 78 वर्षे पूर्ण करून 79 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.... त्यानिमित्त त्यांनी व्यक्त केलेले मनोगत त्यांच्याच शब्दात...
*_कार्यकर्त्यांसाठी मनोगत आणि पुढील आंदोलनाची दिशा_*.........
15 जून 1938 साली शेतकरी कुटुंबात जन्म झाला. बाल वयात आईने संस्कार केले. आईच्या संस्कारांमुळे सामाजिक राष्ट्रीय दृष्टीकोन निर्माण झाला. स्वतःसाठी जीवन जगताना समाजाचे आपण काही देणे लागतो याची जाणीव निर्माण झाली.
जीवनात एक प्रश्न सतत उभा राहिला की, प्रत्येक माणूस जन्माला येताना रिकाम्या हाताने येतो आणि जातानाही रिकाम्या हातनेच जातो. जन्माला येताना काहीच आणत नाहीत आणि जातानाही काहीच घेऊन जात नाही. मग तो माझं-माझं म्हणत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आयुष्यभर पळतो कशासाठी? अनेकांना प्रश्न विचारीत गेलो की, माणूस जगतो कशासाठी ? पण समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. त्यावेळी माझे वय होते 23 ते 24 वर्षांचे होते. मरण अटळ आहे, ते एक दिवस येणारच आहे. तर आजच मेलेलं काय वाईट? म्हणून एक दिवस आत्महत्या करण्याच्या विचारावर आलो होतो. योगायोगाने दिल्लीच्या स्टेशनवर बुक स्टॉल वरील स्वामी विवेकानंद यांचे चित्र मनाला आकर्षक वाटले म्हणून एक छोटेसे पुस्तक विकत घेतले. ते पुस्तक वाचायला सुरूवात केल्यानंतर त्यातून जीवनाचा अर्थ हळुहळू कळत गेला.
प्रत्येक माणूस जन्माला आल्यापासून मृत्युपर्यंत आनंदाच्या शोधात असतो. प्रत्येक माणसाला अखंड आनंद हवा आहे. मात्र असा अखंड आनंद तो जमीन, गाडी, माडी, हवेली अशा बाह्य वस्तुंमध्ये शोधत आहे. असा अखंड आनंद बाह्य वस्तुंपासून मिळत नसतो तर आपल्या आतूनच मिळत असतो. असा आनंद सेवेतून मिळत असतो. सेवेचा अर्थ निष्काम कर्म. “कर्मण्ये वाधिकारस्ते मां फलेशु कदाचनः” समाज, राष्ट्रहितासाठी निष्काम भावनेने केलेले कर्म हीच ईश्वराची पूजा आहे. अशा पुजेतून खरा आनंद मिळतो हे स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकातून कळत गेले.
चार भिंतीच्या आत एक मंदिर, मुर्तीची पुजा अशा सेवेबरोबरच गांव एक मंदिर आहे, राष्ट्र एक मंदिर आहे, जनता ही सर्वेश्वर आहे, त्या जनतेची सेवा ही ईश्वराची पुजा आहे,मानव सेवा हीच माधव सेवा आहे, जनसेवा ही ईश्वराची पूजा आहे, हे समजले. मंदिरातील पूजा करणे हा दोष नाही. मात्र त्या पूजेबरोबरच गांव, राष्ट्रातील जनतेची सेवा ही खरी ईश्वराची पुजा आहे. अशा पुजेतूनच माणसांना स्थायी व अखंड आनंद मिळतो. हे मला स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकातून समजत गेले. 1962 मध्ये भारत- चीनच्या लढाईत मोठ्या संख्येने आमचे जवान मारले गेले. देशाच्या संरक्षणासाठी तरूणांची गरज होती. अशा परिस्थितीत 1963 मध्ये मी भारतीय सैन्यात गेलो.
1965 मध्ये भारत पाकिस्तानचे युद्ध झाले. दुष्मनांचे आमच्यावर हल्ले झाले. या हल्ल्यात सोबतचे सर्व सहकारी शहीद झाले. माझ्या कपाळावर एका गोळीचा तुकडा उडून लागला. गाडीमध्ये 20 ते 25 गोळ्या लागूनही आपण जिवंत राहिलो ही ईश्वराची काहीतरी इच्छा असावी असे समजून त्या वेळी भारत-पाकिस्तान खेमकरणच्या सीमेवर विचार केला की, बरोबरीचे सर्व सहकारी शहीद होतात आणि आपणच जिवंत राहतो हा आपला पुनर्जन्म आहे. स्वामी विवेकानंदच्या पुस्तकातून समजले होते की मानवी जीवन सेवेसाठी असून गांव एक मंदिर आहे, राष्ट्र एक मंदिर आहे. जनता सर्वेश्वर आहे. त्या जनतेची सेवा हीच ईश्वराची पूजा आहे. म्हणून उर्वरित आयुष्य गाव, समाज आणि देश सेवेसाठीच अर्पण करण्याचा निर्णय झाला. जगायचे ते सेवेसाठीच आणि ज्या दिवशी मरायचे ते गाव, समाज व देशाची सेवा करता करताच मरायचे असा निर्णय घेतला.
घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे धोका दिसू लागला की, लग्न करावे तर चूल पेटविण्यातच वेळ जाईल. मला गावाची, जनतेची, देशाची सेवा करता येणार नाही. म्हणून निर्णय घेतला की, लग्नच करायचं नाही. अविवाहित राहूनच आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण गांव, समाज आणि देशाच्या सेवेत लागावा अशी माझी धारणा झाली. आणि आता माझ वय 78 वर्षे झाले, आजही तेच विचार जीवनात आहेत. असे विचार टिकून राहण्यासाठी ईश्वराची कृपा आहे असे मला वाटते. युवकांनी थोरामोठ्यांची चरित्रे, विचार वाचून चिंतन केले तर एखादे पुस्तकही आपले गुरू होऊन जीवनाची वाट दाखवू शकते. त्यातून जीवनात नवी ऊर्जा मिळत असते.
गावात घर आहे. जमीन आहे. भाऊ आहेत. मात्र त्या घरात जाऊन 40 वर्षापेक्षा अधिक काळ झाला. पुन्हा घरात गेलो नाही. भावांच्या मुलांची नावे काय आहेत ते कधी जाणून घेतले नाहीत. कोटी रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या, मात्र कुठेही बँक बँलन्स ठेवला नाही. कोटी रुपयांचे पुरस्कार मिळाले, त्याचाही ट्रस्ट करून टाकला. त्याच्या व्याजातून हा ट्रस्ट समाज हिताची कामे करतो.
माझ्या संपूर्ण आयुष्यात माझे बँक अकाऊंटचे पुस्तक माझे जवळ मी कधी ठेवलेले नाही. कार्यकर्त्यांच्या जीवनात पारदर्शकता असावी. जेणे करून कोणालाही संशय येण्यास वाव मिळत नाही. संत यादवबाबा समाधी मंदिरामध्ये राहतो. झोपण्याचे एक बिस्तर आणि जेवणाचे ताट या शिवाय काहीच नाही. मात्र जीवनात जो आनंद आहे तो लखपती करोडपतींनाही मिळत नसेल एवढा आनंद मी माझ्या जीवनात प्रत्यक्ष अनुभवीत आहे. आजच्या तरूणांनी माझ्यासारखे अविवाहीत राहून सामाजिक कार्य करावे असा माझा संदेश नाही. त्याऐवजी प्रपंच करून समाजासाठी व देशासाठी शक्य होईल तेवढा वेळ द्यावा. प्रपंच करीत असताना तो चार भिंतीच्या आतील लहान प्रपंच करण्याऐवजी समाजहितासाठी थोडा मोठा प्रपंच करावा. कारण लहान प्रपंचात नेहमी दुःख असते तर मोठ्या प्रपंचात आनंद असतो.
माझ्या आयुष्यातील 78 वर्षामध्ये ग्रामविकास किंवा भ्रष्टाचाराच्या विरोधात कार्य करताना आलेल्या अडी-अडचणी, झालेला विरोध, त्यासाठी करावा लागलेला संघर्ष प्रसंगी अनेक वेळेला सूड भावनेने मला अनेक वेळा जेलमध्ये पाठविले. या सर्व बाबींचे अनुभव कथन करायचे ठरविले तर एक भला मोठा ग्रंथच तयार होईल. मात्र दोन गोष्टी मला फार महत्वाच्या वाटतात. विकास आणि विकासाला लागलेली भ्रष्टाचाराची गळती थांबविणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ही दोनही कामे केल्याशिवाय गाव, समाज आणि देशाला खऱ्या अर्थाने उज्वल भविष्य मिळणे अशक्य आहे. ग्रामविकास करताना निसर्गाचे शोषण करून केलेला विकास हा शाश्वत विकास नसून तो कधी तरी विनाशकारी ठरेल. आज पेट्रोल, डिझेल, रॉकेल, कोळसा, पाणी या सारख्या वस्तुंचे अमर्याद शोषण करून शहरांचा, देशाचा जो विकास होत आहे तो शाश्वत विकास नाही. राळेगणसिद्धीच्या लोकांनी केलेला विकास हा शाश्वत विकास आहे. त्यांनी निसर्गाने दिलेले पावसाचे पडणारे पाणी अडविले, जिरविले. भू-गर्भातील पाण्याची पातळी वाढविली. त्यातून कृषीचा विकास केला व स्वावलंबी झाले. गावची अर्थव्यवस्था बदलली. हाताला काम व भाकरीचा प्रश्न गावातच सुटला. त्यांनी निसर्गाचे शोषण केले नाही. स्वातंत्र्यानंतर विकास खूप झाला. उंच-उंच इमारती उभ्या झाल्या. रस्ते पक्के झाले, कारखाने झाले. लोकांना काम मिळाले. इमारतीची उंची वाढत गेली. पण माणसांची वैचारिक पातळी खाली आली. मी आणि माझं याच्या पलिकडे लोक पहायला तयार नाहीत. यालाच खरा विकास म्हणणार का? निसर्गाने दिलेल्या देणगीच्या आधारे गावाने एकत्रित येऊन व्यक्ति, परिवार, गाव स्वावलंबी करणे हा खरा आणि शाश्वत विकास आहे. तसा विकास राळेगणसिद्धीच्या लोकांनी केला.
राळेगणसिद्धी सारख्या 2500 लोकवस्तीच्या खेड्यात गावातील सर्व लोकांनी संघटीत होऊन जे कार्य उभे केले ते पाहण्यासाठी राज्य, देश, परदेशातून 8 लाख लोकांनी पहाणी केली. अनेकांनी त्यातून प्रेरणा घेतली. पाच लोकांनी या कामाचा अभ्यास करून पी.एच.डी. केली आहे.
*भ्रष्टाचार-* विकास कामांबरोबरच विकासाला लागलेली भ्रष्टाचाराची गळती थांबविण्यासाठी राज्यामध्ये वेळोवेळी 18 वेळा 10 दिवस, 15 दिवस, 1 महिना सतत दौरे करून, काही हजार की.मी. प्रवास करून लोकशिक्षण लोकजागृतीचे काम केले. अनेक वेळेला पत्रके, फोल्डर पोष्टर प्रिन्ट करून लोकांना वाटली. त्यामुळे जनता जागृत होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये 33 जिल्ह्यात, 252 तालुक्यात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन नावाने संघटन उभे झाले. एक सामान्य कार्यकर्ता हे करू शकतो. त्यासाठी वीस वर्षाचा कालावधी जावा लागला. सरकारची इच्छा नसताना जनशक्तीच्या दबावामुळे सात कायदे सरकारला करावे लागले. माहितीच्या अधिकाराचा अत्यंत महत्त्वपूर्ण कायदा झाला. या कायद्याचा देशभरातील जनतेला लाभ मिळू लागला. मात्र त्यासाठी 8 वर्षे सतत संघर्ष करावा लागला. अनेक वेळेला आंदोलने केली. आंदोलनामुळे भ्रष्टाचार केलेल्या 6 मंत्र्यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. 400 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार केला म्हणून सरकारला कारवाई करावी लागली. त्यासाठी 25 वर्षे अथक परिश्रम करावे लागले. अपमान सहन करावा लागला. काही वेळेला जेलमध्ये जावे लागले. दिल्लीतही अनेक वेळेला जंतर-मंतर आणि रामलीला मैदानावर उपोषण करावे लागले. आंदोलन केल्यामुळे लोकपाल बिलासारखा कायदा सरकारला करावा लागला. राळेगणसिद्धीच्या कामाचे वैशिष्ट्य हे आहे की, परदेशातून कोणत्याही देणग्या घेतल्या नाही. आपल्या देशातून काही किरकोळ देणग्या सोडल्या तर कोणत्याही उद्योगपतींकडून देणग्या घेतल्या नाहीत. शासनाची योजना आणि लोकांचा सहभाग यातून हे काम उभे झाले आहे. कोटी रुपयांची कामे लोकांनी आपल्या श्रमदानातून केली आहेत.
*लोकपाल* कायद्याची अंमलबजावणी अद्यापही होत नसल्यामुळे पुन्हा एकदा आंदोलन करावे लागेल असे वाटू लागले आहे. मात्र वयोमानपरत्वे शरीराची साथ मिळेल की नाही, शंका असल्याने जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे. राज्यात आणि दिल्लीत केलेल्या आंदोलनाचा प्रभाव वाढत गेला. पण काही कार्यकर्ते या आंदोलनाचा दुरूपयोग करू लागले. अण्णा हजारे यांचे आम्ही कार्य़कर्ते म्हणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करू लागल्याने आम्ही मोठ्या अथक परिश्रमातून उभ्या केलेल्या आंदोलनाच्या सर्व समित्या बरखास्त कराव्या लागल्या. आता कुठेही समित्या ठेवलेल्या नाहीत. काही स्वार्थी कार्यकर्त्यांमुळे सदर आंदोलन बदनाम होऊ नये म्हणून ते बरखास्त केले आहे. आंदोलन हे चारित्र्यावर आधारलेले असावे. पुन्हा अशी वेळ येऊ नये यासाठी आता आम्ही निर्णय घेतला आहे की, आंदोलन करणारे कार्यकर्ते चारित्र्यशील असावेत. समाज आणि राष्ट्रहितासाठी सेवाभावाने कार्य करणारे कार्यकर्ते असावेत. सत्याच्या मार्गाने चालणारे असावेत. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, त्याग आणि अपमान पचविण्याची शक्ती असणारे कार्यकर्ते असावेत. स्वातंत्र्यासाठी झालेल्या बलिदानाची आठवण ठेवणारे कार्यकर्ते असावेत. अशा कार्यकर्त्यांनी राष्ट्रहितासाठी पुढे येऊन 100 रुपयांच्या स्टँप पेपर वर त्यांनी प्रतिज्ञापत्र करून द्यावे की, ‘मी कोणत्याही पक्ष आणि पार्टीत जाणार नाही, पक्ष पार्टीतर्फे निवडणूक लढविणार नाही. मी समाज आणि देशाची सेवा करीन.’ अशा विचारांचे हजारो कार्यकर्ते पुढे आले आणि प्रसंगी अहिंसेच्या मार्गाने जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवली तर देशातील भ्रष्टाचाराला आळा बसून देशात लोकांची, लोकांनी, लोकसहभागातून चालविलेली खरी लोकशाही येऊ शकेल.
घटनेच्या परिछेद 84 (क) आणि (ख) मध्ये म्हटल्याप्रमाणे भारतात राहणारी कोणतीही व्यक्ती जिचे वय 25 वर्षे आहे अशी व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवू शकते आणि भारतात राहणारी कोणतीही व्यक्ती जिचे वय 30 वर्षे आहे अशी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते. जी व्यक्ती पक्ष-पार्टी विरहीत आहे. घटनेप्रमाणे वैयक्तिक व्यक्ति जी चारित्र्यशील आहे अशा व्यक्तीला ही अट राहणार नाही अशा व्यक्तीने अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे ठरविले व प्रतिज्ञापत्र दिले तर नाकारता येणार नाही. कारण घटनेचा आधार आहे. घटनेने व्यक्तीला निवडणूक लढविण्याचे अधिकार दिले आहेत. पक्ष-पार्टीच्या समुहाला घटनेने अधिकार दिलेले नाहीत. या संबंधाने शंका असणाऱ्या लोकांनी घटना तपासून पहावी. निवडणूक आयोगाकडून घटनाबाह्य समुहाला कायमस्वरूपी निवडणूक चिन्ह दिले जाते आणि घटनेप्रमाणे वैयक्तिक निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीला फक्त 15 दिवस आधी चिन्ह देण्यात येते. या 15 दिवसात लोकसभेच्या सर्व मतदारांपर्यंत तो जाऊ शकत नाही. हा अन्याय आहे. घटनाबाह्य समुहाला निवडणूक आयोग जे निवडणूक चिन्ह देतात त्या चिन्हाला घटनेचा आधार काय? अशा अन्यायाविरोधात आंदोलन हाच पर्याय आहे. देशात खरी लोकशाही यावी असं वाटत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी ‘स्वातंत्र्याची दुसरी लढाई’ समजून पुढे येणे आवश्यक आहे. 1857 ते 1947 या नव्वद (90) वर्षांच्या कालखंडात स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी बलिदान केले. जुलमी, अन्यायी, लुटारू इंग्रजांना या देशातून घालविणे आणि लोकशाही आणणे हे त्यांचे खरे स्वप्न होते. लाखो लोकांच्या बलिदानामुळे इंग्रज या देशातून गेला पण अद्यापही खरी लोकशाही आली नाही.
स्वातंत्र्याच्या 68 वर्षानंतरही देशात खरी लोकशाही आली नाही. फक्त गोरे लोक गेले आणि काळे लोक आले एवढात फरक झाला. चारित्र्यशील कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या संघटनेतर्फे आंदोलनासाठी पुढे येणाऱ्या कार्यकर्त्यांना पहिली लढाई ‘लोकपालची अंमलबजावणी व्हावी’ या मागणीसाठी करावी लागणार आहे. निवडणूक सुधारणा व्हावी, पक्ष आणि पार्टीच्या लोकांनी चारित्र्यशिल लोकांनाच तिकट द्यावे म्हणून राईट टू रिजेक्टची मागणी करताना आमची मागणी होती की, एका मतदार संघामध्ये जे उमेदवार निवडणूकीसाठी उभे आहेत त्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने जे निवडणूक चिन्ह दिले आहे, मात्र मतदाराला या उमेदवारापैकी कोणीच योग्य वाटत नाही अशा मतदारासाठी निवडणूक आयोगाने नापसंतीचे चिन्ह द्यावे. जेणे करून ज्या मतदारांना उमेदवार पसंत नाही ते नापसंतीच्या चिन्हावर आपले मत देतील. सर्व उमेदवारांना मिळालेल्या मतापेक्षा नापसंतीच्या मतावर अधिक मते पडली तर निवडणूक रदद् करावी आणि फेर निवडणूक घेण्यात यावी. मात्र फेर निडवणूकीमध्ये पहिल्या निवडणूकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना एकदा मतदारांनी नाकारलेले असल्यामुळे त्यांना पुन्हा निवडणूकीसाठी उभे राहता येणार नाही. जेणे करून पक्ष आणि पार्ट्या चारित्र्य़शील उमेदवारांनाच तिकीट देतील व दूषित राजकारणाचे शुद्धीकरण होईल. मात्र निवडणूक आयोगाने तसा निर्णय न घेता इलेक्ट्रॉनिक मशीनवर फक्त ‘नोटा’आणून टाळाटाळ केली. फक्त ‘नोटा’ मुळे गुंड, भ्रष्टाचारी, व्याभिचारी, लुटारू अशा उमेदवारांना आळा बसणार नाही. या मागणीसाठी पुन्हा आंदोलन करण्याची गरज आहे.
*ग्रामसभा* ग्रामसभेला जादा अधिकार मिळणे आवश्यक आहे. ही गावची संसद असते. राज्याच्या, केंद्राच्या संसदेपेक्षा ही संसद श्रेष्ठ असते. कारण विधानसभा व लोकसभेला दर पाच वर्षातून ग्रामसंसद/ग्रामसभा बदलत असते. परंतू ग्रामसभा स्वतः कधी बदलत नसते. प्रत्येक मतदार 18 वर्षाचे वय झाले की ग्रासभेचा आपोआप सदस्य होतो आणि तो मरेपर्यंत सदस्य असतो. म्हणून राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला कोणत्याही गावातील जल, जंगल, जमीन या सारख्या इतर वस्तू घ्यावयाच्या असतील तर ग्रामसभेची मान्यता घेतल्याशिवाय घेता येणार नाही असा कायदा करावा लागेल. लोकशाही लोकांनी, लोकांची लोकसहभागातून चालविलेली शाही ती लोकशाही आहे. स्वातंत्र्याची 68 वर्षे उलटली आहेत मात्र आजही देशात लोकशाही आली नाही कारण पक्ष, पार्टीशाहींनी त्या लोकशाहीला येऊच दिले नाही. त्यासाठी पुन्हा एकदा स्वातंत्र्याची दुसरी लढाई अहिंसेच्या मार्गाने लढावी लागणार आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण करून ग्रामसभेला पूर्ण अधिकार देणारा कायदा करावा या मागण्यासाठी दिल्लीत जंतर-मंतर किंवा रामलीला मैदान या ठिकाणी जनतेला पुन्हा आंदोलन करण्याचा विचार करावा लागणार आहे. यासंबंधी कार्यकर्त्यांनी आपले विचार कळवावेत.
धन्यवाद, जयहिंद.
आपला,
*कि. बा. तथा अण्णा हजारे*
(14 जून 2016)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा