शतायुषी होण्यासाठी आधारभूत अशा सिद्धांताचे सिंहावलोकन
१) अजीर्ण होऊ नये म्हणून उपाय – पोट भरेपर्यंत जेवू नका. खाण्यापिण्यात संयम राखावा. पोटाला तडस लागेपर्यंत जेवू नका.
२) प्रवाही खुराक शक्य तेवढा अधिक घ्या. पाणी, ताक, लस्सी, साई शिवाय दूध, गाजराचा रस, फळांचा रस, पालेभाज्यांचा रस, गूळ व लिंबू यांचे सरबत, तसेच गार व गरम पेयांत लिंबू व मध असलेले पेय घ्या.
३) आरोग्यास पोषक व पथ्यकारक आहार पसंत करा. ताजे व शिजवलेले अन्न खा. ते लवकर पचते.
४) चरबीयुक्त तळकट खाणे वर्ज करा. आहारात भाजीपाला असू द्या. मिठाईचा उपयोग माफक प्रमाणात करा.
५) भोजनात २५ टक्के भाजीपाला व २५ टक्के फळांचा समावेश करा. भाज्यांच्या कोशिंबीरी कच्च्या अथवा अर्धवट शिजवून दह्याबरोबर खा.
६) शक्य असल्यास जेवायच्या आधी आल्याचा रस शेंदेलोण व लिंबू घालून प्या. त्याने जठराग्नी प्रदिप्त होतो. जेवणात आल्याचा कीस कोशिंबिरीबरोबर खा. भाजीआमटीत लिंबू पिळा. प्रकृतीला माफक असल्यास जेवल्यावर ताक हे अमृतसमान होय.
७) चमचमीत मसल्यांचा उपयोग अनावश्यक व नुकसानकारक आहे. फार मिरची खाल्यास तोंड व पोट यांची आग होते. मिठाने धान्य व भाजीपाल्याची नैसर्गिक गोडी नाहीशी होते.
८) न शिजवलेली कच्ची भाजी अवश्य खा. काकडी, शेपूची भाजी, लूणी, मूळा, मोगरी, बीट, कांदा, ओली लसूण, कांद्याची पात वगैरे काही प्रमाणात कच्चे खावे. कडधान्ये भिजवून मोड आणून कच्ची खाल्यास त्यातून व्हिटॅमिन बी मिळेल. मोड आलेले कच्चे कडधान्य यासारखे आरोग्यदायक टॉनिक दुसरे नाही.
९) ऋतूप्रमाणे फळे खावीत. आंबे, जांभळे, पपई, कवठ, लिंबू, मोसंबी, नारंगी सफरचंद, खरबूज, टरबूज इत्यादी फळे सकाळी खाणे जास्त योग्य आहे.
१०) चुन्याचा क्षार बालक व किशोर यांच्या हाडांसाठी व शरीराच्या घडणीसाठी आवश्यक आहे. दूध, फळे व भाजीपाल्यापासून तो पुरत्या प्रमाणात मिळतो.
११) जेवताना खालील गोष्टी करा.
पहिल्या घासाबरोबर एक चमचा हिंगाष्टक चूर्ण अथवा दोन चमचे आल्याचा रस लिंबू व मीठ घालून घ्या लसूण, जीरे, ओवा, मेथी, लेंडीपिपर, सुंठ, शेंदेलोण व लिंबू यांची चटणी जेवताना खा.मुगाचे कढण घ्या लसणीच्या पाच पाकळ्या खा. जेवण झाल्यावर लिंबाचे सरबत अथवा ताज्या दह्याचे ताक घ्या.
१२) पोट साफ राहण्यासाठी आसने व कसरत करा. प्रकृतीला अनुकूल असेल तो व्यायाम अथवा ती आसने नियमितपणे रोज करा.
१३) बद्धकोष्ठ टाळण्यासाठी हरडे घ्या. पिकलेले फळ जसे विनासायास पडते तसा मल पडावा असे आयोजन करा.
१४)) छाती पुढे काढून व नजर दूर स्थिर करून ताठ चालावे. दुरच्या मनोऱ्यावर वा झाडे अथवा झाडीवर नजर एकवटून चालावे.
वृद्धपणी पाळायचे नियम :
ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचा नियम करा
सकाळी नास्ता करू नका
दुपारचे जेवण बेताने घ्यावे. रात्रीच्या जेवणात पेय व हलक्या आहारावर भर द्या.
दररोज दोनदा परसाकडे जाण्याची सवय लावून घ्या.
बद्धकोष्ठावर विजय मिळवण्यासाठी हरडे खा
मिरची, मीठ, मसाल्याशिवाय साधा, पचायला सोपा, समतोल व पथ्यकारक आहार पसंत करा.
आठवड्यातून दोनदा हलक्या हाताने तेलाचे मालिश करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा