गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

ओढ रामनवमीची - चैत्र शुद्ध नवमी

श्री राम नवमी बद्दल माहिती

तिथी : चैत्र शुद्ध नवमी

इतिहास : श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या
जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या दिवशी
पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह
असतांना अयोध्येत श्री रामचंद्रांचा जन्म झाला.
महत्त्व : देवता व अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्त्व
भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते. श्रीराम नवमीला
श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. श्रीराम
नवमीला `श्रीराम जय राम जय जय राम ।' हा नामजप, तसेच
श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामतत्त्वाच
ा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.
उत्सव साजरा करण्याची पद्धत : `कित्येक राममंदिरांतून चैत्र
शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे
पारायण, कथाकीर्तन व राममूर्तीला विविध शृंगार, अशा
प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी
दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळी कुंची
(बाळाच्या डोक्याला बांधायचे एक वस्त्र. हे वस्त्र
पाठीपर्यंत असते.) घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो
पाळणा हालवतात व भक्तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात.
(काही ठिकाणी नारळाऐवजी श्रीरामाची मूर्ती
पाळण्यात ठेवतात. - संकलक) याप्रसंगी श्रीरामाचा पाळणा
(रामजन्माचे गीत) म्हटला जातो.' त्यानंतर श्रीरामाच्या
मूर्तीची पूजा करतात व प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. काही
ठिकाणी सुंठवड्याबरोबर महाप्रसादही देतात. या दिवशी
श्रीरामाचे व्रतही करतात. हे व्रत केल्याने सर्व व्रते केल्याचे
फळ मिळते, तसेच सर्व पापांचे क्षालन होऊन अंती उत्तम
लोकाची प्राप्ती होते, असे सांगितले आहे.
*************************************************
रामनवमी का साजरी करतात?
चैत्र शुद्ध नवमी हा चैत्रातील नवरात्राचा नववा दिवस आहे.
या तिथीस रामाचा जन्म झाला.हा दिवस रामनवमी म्हणुन
साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर
(दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा
होतो.रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारासमवेतच गाठी
पण घालतात.रामज्न्म झाल्यावर फटाके फोडतात.त्यानंतर
आरती करून प्रसाद वाटतात.
भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला
जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. भगवान श्रीरामाचा जन्म
चैत्र शुक्ल नवमी, गुरूवार, पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता.
विशेष म्हणजे, महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी
रामचरित मानस लिहण्यास सुरवात केली होती.
रामनवमी व्रत कसे करावे?
* व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळीच लवकर स्नान आटोपून
श्रीरामाचे नामस्मरण करावे.
* दुसर्या दिवशी (चैत्र शुक्ल नवमीला) ब्रह्म मुहर्तात ऊठून घर
स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून
घ्यावेत.
* त्यानंतर गोमूत्र, शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे.
* 'उपोष्य नवमी त्व यामेष्वष्टसु राघव| तेन प्रीतो भव त्वं भो
संसारात् त्राहि मां हरे||' या मंत्राने ईश्वराप्रती व्रत भावना
प्रकट करावी.
* त्यानंतर, 'मम भगवत्प्रीतिकामनया (वामुकफलप्राप्त
िकामनया) रामजयंतीव्रतमहं करिष्ये' हा संकल्प करून काम-
क्रोध-लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन व्रत करावे.
* मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुशोभित
करावे.
* घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून त्यात
सर्वतोभद्रमंडलाची रचना करून त्याच्या मध्यभागी
विधीपूर्वक कलश स्थापन करावा.
* कलशावर रामपंचायतन (त्यामध्ये राम-सीता, दोन्ही बाजूला
भरत आणि शत्रुघ्न, लक्ष्मण आणि पदचरणी हनुमानाच्या
सोन्याच्या मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी
आणि त्यांची पूजा करावी.
* त्यानंतर विधीपूर्वक संपूर्ण पूजा करा.
रामनवमीच्या दिवशी काय करावे?
* या दिवशी संपूर्ण आठ प्रहर उपवास ठेवला पाहिजे.
* दिवसभर ईश्वराचे भजन-स्मरण, स्तोत्र-पाठ, हवन आणि उत्सव
साजरा करावा.
* तसेच रामायण वाचणे आवश्यक आहे.
* या दिवशी मर्यादा पुरूषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा
संकल्प करावा.
* प्रभु श्रीरामचंद्र चरित्र-श्रवण करून जागरण करा.
* दुसर्या दिवशी (दशमीला) पारायण करून व्रत सोडावे.
* गरीब आणि ब्राम्हणांना दान करून त्यांना जेवू घालावे.
रामनवमी व्रताचे फळ
* हे व्रत नित्य, नैमित्तिक आणि काम्य अशा तीन प्रकारचे
आहे. नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावना ठेवून
आयुष्यभर केले तर आयुष्य आनंदमय होते.
* एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे यथेच्छ फळ मिळते.
* विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ मिळते.

जय श्री राम

1 टिप्पणी: